दिवाळीला अजून दहा दिवस होते; तेव्हा मुकेश राम महम्मदपूर गावच्या आपल्या घरी परतला होता. हिमाचल प्रदेशातल्या सिमला जिल्ह्यात बांधकाम मजूर म्हणून तो काम करत होता.
दिवाळीच्या सहाव्या दिवशीची छट पूजा चुकवायची नाही या हिशेबाने ४० वर्षीय मुकेश बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातल्या आपल्या घरी परतला. बायको प्रभावती देवी आणि चार मुलं त्यामुळे एकदम आनंदात होती.
परत आल्यानंतर त्याने घरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगलपूर पुराना बाजार इथल्या एका बांधकामावर मजुरीचं काम घेतलं. सकाळी ८ वाजता तो घरातून बाहेर पडायचा आणि संध्याकाळी ६ वाजता परत यायचा.
२ नोव्हेंबर २०२१ला तो उशिरा घरी परतला आणि डोकं ठणकतंय असं म्हणू लागला.
डोकेदुखीचा ठणका काही कमी झाला नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तर डोळे उघडे ठेवणंही त्याला अवघड व्हायला लागलं. कामावर जायचं म्हणून तो कसाबसा तयार झाला पण घराबाहेर पडणंही शक्य होणार नाही इतपत तो आजारी होता.
मुकेशची ही अवस्था पाहून प्रभावतीने त्याला गोपालगंज शहरामधल्या दवाखान्यात नेण्यासाठी गाडी भाड्याने घेतली. दवाखाना घरापासून ३५ किलोमीटरवर होता. “सुबेरे ले जात, ले जात, ११ बजे मौगत हो गेल (सकाळी आम्ही दवाखान्यात पोहोचेपर्यंत तो मरण पावला. ११ वाजले होते.)’’
३५ वर्षांची विधवा प्रभावती जेव्हा आपल्या पतीचा मृतदेह घेऊन घरी आली तेव्हा तिला मोठा धक्का बसला- त्यांचं घर सील करण्यात आलं होतं. महम्मदपूर स्थानकातल्या पोलिस अधिकाऱ्यांनी तिच्या घरावर छापा टाकला होता.
“परत आल्यावर पाहिलं तर आमच्या घराला टाळं मारण्यात आलं होतं. मला माझ्या पतीचा मृतदेह घराबाहेरच ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. मी आणि माझ्या मुलांनी थोडं गवत जाळून शेकोटी केली आणि अख्खी रात्र मोकळ्या आकाशाखाली जागून काढली,’’ प्रभावती सांगते.
“घरबो से गैनी, आ मर्दो से गैनी? ई ता कोनो बात नइखे भइल ना. कोनो ता आधार करे के चाही (मी माझं घर गमावलं आणि माझा नवराही. याला काही अर्थच नाही. हे असं सारं घडण्यासाठी काही ठोस कारण तरी असायला हवं ना!’’ ती म्हणते.
*****
विषारी दारू प्यायल्याने २६ जणांचा मृत्यू झाला आहे आणि पूर्व चंपारण जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये अजूनही बरेच लोक आजारी आहेत, असं बिहार पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. हा लेख प्रसिद्ध होत असतानाची म्हणजे १४ एप्रिल २०२३ रोजीची ही आकडेवारी आहे.
बिहार दारूबंदी आणि उत्पादन शुल्क कायदा २०१६ नुसार बिहारमध्ये विदेशी आणि देशी दारू तसंच ताडीचं उत्पादन, खरेदी, विक्री आणि सेवन करण्यास बंदी आहे.
त्यामुळे बेकायदा दारूमुळे प्रभावतीने नवरा गमावला आणि दारूबंदीच्या कायद्यापायी घर!
महम्मदपूर स्थानकातल्या पोलिसांनी स्थानिकांच्या जबाबाच्या आधारे एफआयआर दाखल केला. मुकेश दारूविक्री करत होता आणि त्याच्या घरातून १.२ लिटर देशी दारू जप्त करण्यात आली, असं त्यात म्हटलं आहे.
या एफआयआरनुसार, माहिती मिळाल्यानंतर पोलिस मुकेश रामच्या घरी पोहोचले आणि प्रत्येकी २०० मिली दारू भरलेले सहा प्लॅस्टिक पाऊच आणि तीन रिकामे पाऊच त्यांनी जप्त केले.
हे सगळे आरोप फेटाळून लावत, सिमेंटच्या पत्र्याचं छप्पर असलेल्या आणि आता सील झालेल्या आपल्या पक्क्या घराकडे बोट दाखवत प्रभावती म्हणते, “दारू विकणाऱ्यांची घरं जाऊन बघा... जर आम्हीही तसं केलं असतं तर आमचं घर असं दिसलं असतं का?’’
एफआयआरमध्ये पोलिसांनी केलेले आरोप तिने फेटाळून लावले आहेत आणि आपल्या घरातून दारूचा व्यवसाय सुरू असल्याचा इन्कार केला आहे. “हमरे मालिक साहेब के दारु बेचते देखती ता हम खुद कहती की हमरा के ले चली (माझा नवरा खरंच दारू विकत असता, तर मी स्वत: पोलिसांकडे गेले असते आणि मला आत टाकण्याची विनवणी केली असती),’’ ती सांगते.
“तुम्ही गावकऱ्यांना विचारू शकता. मालिक साहेब (तिचा नवरा) मिस्त्री म्हणून काम करायचे हे सगळे जण मान्य करतील,’’ मुकेश अधूनमधून दारू प्यायचा हे न नाकारता ती म्हणते. “जेव्हा कधी मित्र आग्रहाने प्यायला लावायचे तेव्हाच ते प्यायचे. ज्या दिवशी ते घरी आल्यावर डोकं दुखतंय म्हणत होते, त्या दिवशी दारू प्यायली आहे असं काही त्यांनी मला सांगितलं नव्हतं.’’
मुकेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला नव्हता, त्यामुळे नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याची संधी तिला कधीच मिळणार नाही.
*****
उत्तर प्रदेश-बिहार सीमेवरच्या सिधबलिया तालुक्यातल्या महम्मदपूर गावाची लोकसंख्या ७,२७३ इतकी आहे (जनगणना २०११), आणि सुमारे दहा टक्के कुटुंबं (६२८) अनुसूचित जातींची आहेत. कामाच्या शोधात इथले बरेचसे लोक इतर राज्यांत स्थलांतर करतात आणि ज्यांना ते शक्य नसतं ते रोजंदारीवर राबत राहतात.
विषारी दारू प्यायल्याने गोपालगंज जिल्ह्यात १८ जणांचा मृत्यू झाला. त्यातले मुकेशसारखे १० जण बिहारमध्ये महादलित समजल्या जाणाऱ्या चमार जातीचे होते. मृत जनावरांचं कातडं सोलून काढून त्याची विक्री करणं हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे.
बिहार राज्यात गेल्या वर्षी एकट्या डिसेंबर महिन्यात विषारी दारू प्यायल्याने ७२ जणांचा मृत्यू झाला असून २०१६ पासून अशा बळींची संख्या २०० पर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळालेली नाही.
अनेकदा पोलिस व इतर अधिकारी दारूमुळे मृत्यू झाला आहे अशी नोंद करत नाहीत, त्यामुळे ही आकडेवारी दिशाभूल करणारी ठरू शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये अवैध दारू हे मृत्यूचं कारण आहे हे मानायलाच पोलिस नकार देतात.
*****
प्रभावतीचं घर अचानक सील करण्यात आलं. कपडे, चौकी (लाकडी खाट), अन्नधान्य अशा जीवनावश्यक वस्तू सोबत घ्यायची संधीही तिला मिळाली नाही. नणंद आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांनी तिला त्यावेळी मदत केली.
मुकेश सिमल्यात काम करत होता तेव्हा तो घरी दरमहा पाच ते दहा हजार रुपये पाठवायचा. त्याच्या निधनानंतर प्रभावती शेतमजूर म्हणून राबते आणि आपल्या चार मुलांचं पोट भरतीये. संजू, प्रीती (वय १५ आणि ११) या दोघी मुली आणि दीपक, अंशु (वय ७ आणि ५) ही दोन मुलं. पण काम फक्त वर्षातून दोनच महिने मिळतं आणि मग विधवा-पेन्शन म्हणून दरमहा मिळणाऱ्या ४०० रुपयांवर भागवावं लागतं.
गेल्यावर्षी तिने वाट्याने १० कठ्ठा (अंदाजे ४ गुंठे) भातशेती केली आणि साधारण २५० किलो तांदूळ पिकवला.
जमीनमालकाने बियाणं दिलं होतं आणि खतं, कंपोस्ट, सिंचन याकरता खर्चासाठी म्हणून बहिणीने प्रभावतीला ३,००० रुपये दिले होते.
मुकेश आणि प्रभावती यांचा मोठा मुलगा दीपक प्रभावतीच्या बहिणीकडे राहतो. त्याच्या शिक्षणाची जबाबदारीही तिने घेतली आहे. कधी ५०० रुपये, कधी १००० रुपये असं थोडं थोडं करून झालेलं १०,००० रुपयांचं कर्ज प्रभावतीवर आहे.
ती त्याला कर्ज नाही; ‘हातउसने पैसे’ (कोणत्याही व्याजाशिवाय उचललेली छोटी रक्कम) म्हणते.
“कधी कुणाकडून ५०० (रुपये), कधी दुसऱ्या कुणाकडून १००० रुपये मी उसने घेते. ते अगदी थोड्याच दिवसात परत करते. असे जर मी ५०० किंवा १००० रुपये घेतले आणि लगेच परत केले, तर ते कोणतंही व्याज लावत नाहीत,’’ प्रभावती सांगते.
मुकेशच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी प्रभावतीला दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत बिहार सरकारकडून एक छोटीशी गुमटी (छोटीशी लाकडी टपरी) आणि २० हजार रुपये मूल्याच्या वस्तू मिळाल्या.
“सर्फ (साबण), कुरकुरे (स्नॅक्स), बिस्किटं या गोष्टी विकण्यासाठी
मला देण्यात आल्या होत्या. पण त्यात नफा जेमतेम होता आणि त्यातून दिवसअखेर मी फक्त १० रुपये वाचवू शकायचे.
माझी
मुलं ते दहा रुपये खर्च करायची आणि काहीतरी खायला आणायची. यातून मला नफा मिळणं कसं
काय शक्य होईल? त्यात मी
आजारी पडले आणि दुकानातून जे काही कमावलं होतं ते सगळं उपचारांवर खर्च झालं,’’ प्रभावती सांगते.
प्रभावतीला
भविष्याची चिंता सतावतेय. “माझ्या मुलांना कसं वाढवणार मी? माझ्या दोन मुलींची लग्नं कशी लावून
देणार? या
विचारांनी माझं डोकं भणभणतं आणि मी आजारी पडेपर्यंत रडत राहते.
कुठे
जायचं, काय
करायचं याचाच विचार मी करत राहते... जेणेकरून थोडीफार कमाई करून माझ्या लेकरांचं पोट मी भरू शकेन,’’ असं सांगता सांगता ती म्हणते, “हमरा खानी दुख आ हमरा खानी बिपद मुदई
के ना होखे (माझ्या शत्रूंवरही असं दु:ख आणि संकट कोसळू नये).”
प्रभावतीच्या पतीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबाला गरिबीच्या खाईत लोटून दिलं : “मालिक साहेब होते तेव्हा आम्ही मांस-मच्छी खायचो. पण ते गेल्यापासून आम्हाला भाजीही परवडत नाही.
"सर, कृपा करा आणि (तुम्ही) अशा पद्धतीने लिहा की सरकारला मला मदत करणं भाग पडेल आणि मला थोडे पैसे मिळतील,’’ हताशेपायी काकुळतीला येत प्रभावती म्हणते.
बिहारमधल्या शोषितांच्या मुद्द्यांवर संघर्षरत असलेल्या एका दिवंगत कामगार नेत्याच्या स्मृतीत सुरू केलेल्या फेलोशिपमधून हा वृत्तांत तयार झाला आहे.