“हे सिक्स पॅक अगदी सहज तयार झालेत. मी काही कधी व्यायाम करत नाही. शाहबाझचे बायसेप्स पाहिले का?” आपल्या सहकाऱ्याकडे बोट दाखवत आदिल हसत हसत मला विचारतो.
मोहम्मद आदिल आणि शाहबाज अन्सारी
मेरठच्या जिम आणि फिटनेस साहित्याच्या कारखान्यात काम करतात. जिमला जाणारे लोक
आठवड्यात उचलतात तेवढं वजन हे दोघं रोजच उचलतात. त्यांच्यासाठी हा काही कुठला
संकल्प नाही. उत्तर प्रदेशच्या मेरठमधल्या मुस्लिम कुटुंबातल्या अनेक तरुणांसाठी
पोटापाण्याचा हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडचा हा
जिल्हा क्रीडासाहित्य तयार करण्याचं मोठं केंद्रच आहे.
“काहीच दिवसांपूर्वी ही पोरं आपापल्या
बायसेप्स आणि ॲब्स [पोटाचे स्नायू]ची तुलना करण्यासाठी फोटो
काढत बसली होती,” मोहम्मद साकिब सांगतो. ३० वर्षांचा साकिब सूरज कुंड रोडवरच्या जिम
साहित्याच्या शोरुममध्ये गल्ल्यावर बसला आहे. मेरठ शहरातला हा एक किलोमीटरचा रस्ता
म्हणजे क्रीडा साहित्याची मोठी बाजारपेठ आहे आणि साकिबच्या कुटुंबाने ही शोरुम
भाड्याने घेतली आहे.
“आज कसंय अगदी घरी गृहिणी वापरतात
त्या डम्बेल असतील किंवा व्यावसायिक खेळाडू वापरतात ते जिमचे विविध प्रकार,
सगळ्यांना आणि जिम किंवा तंदुरुस्तीसाठी क्रीडा साहित्य हवं आहे,” तो म्हणतो.
आम्ही बोलत असतानाच या रस्त्यावरून
अनेक विजेवर चालणाऱ्या तीनचाकी गाड्यांची येजा सुरू असते. यांना इथे मिनी-मेट्रो
म्हणतात. लोखंडी पाइप, कांबी असा कच्चा माल तसंच घरगुती वापरासाठीचं जिम आणि
लोखंडी बार अशा तयार वस्तू असं सामान येऊन पडत असतं. “जिमची यंत्रं सुटी सुटी तयार
केली जातात आणि इथे आम्ही त्यांची जुळणी करतो,” आपल्या शोरूमच्या काचेच्या
दरवाजातून बाहेरच्या गाड्यांची आणि येणाऱ्या मालाची पाहणी करत साकिब सांगतो.
लोखंडाच्या वस्तू आणि साहित्य निर्मितीमध्ये या शहराचा हात कुणीच धरू शकत नाही. “हे शहर इथल्या कैंची [कात्री] उद्योगासाठी अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे,” साकिब आम्हाला सांगतो. गेल्या तीन शतकांहून जास्त काळ सुरू असलेल्या कात्री उद्योगाला २०१३ साली भौगोलिक चिन्हांकन म्हणजेच जीआय बिरुद मिळालं आहे.
जिम साहित्याची निर्मिती मात्र इथे
अलिकडेच म्हणजे नव्वदच्या दशकात झाली. “जिल्ह्याच्या क्रीडा साहित्याचा उद्योग
चालवणाऱ्या पंजाबी व्यावसायिकांनी आणि स्थानिक कारखाने चालवणाऱ्या काही जणांनी
त्यासाठी खरं तर पुढाकार घेतला,” साकिब सांगतो. “लोखंडाचं काम करण्यात तरबेज
असलेले कारागीर इथे होतेच. पुनर्वापर करण्यासाठी आलेले लोखंडी पाइप, कांबी आणि
पत्रा असा जिमचं साहित्य तयार करण्यासाठी लागणारा सगळा माल शहरातल्या लोहा
मंडीमध्ये मिळत होता [कच्चा माल मिळण्याची ही मोठी बाजारपेठ आहे].”
बहुतेक सगळे लोहार आणि लोहे की ढलाई
करने वाले, लोखंडाचे ओतारी मुस्लिम असून गरीब कुटुंबातले आहेत. “घरातल्या थोरल्या
मुलाला फार लहानपणीच हे काम शिकवलं जातं,” साकिब सांगतो. “सैफी/लोहार (इतर
मागासवर्गीय) या पोटजातीचे लोक लोखंडाच्या कामात फार कुशल मानले जातात,” तो
सांगतो. साकिब अन्सारी आहे. ही विणकरांची जात असून उत्तर प्रदेशात त्यांची गणना
इतर मागासवर्गीय म्हणून केली जाते.
“असे अनेक छोटे-मोठे कारखाने मुस्लिम
बहुल भागात आहेत – इस्लामाबाद, झाकिर हुसैन कॉलनी, लिसाडी गेट आणि झैदी फार्म,”
साकिब सांगतो. मेरठ जिल्ह्यात ३४ टक्के लोकसंख्या मुस्लिम असून आणि संपूर्ण
राज्यात हा जिल्हा या निकषावर सातव्या क्रमांकावर आहे (जनगणना, २०११).
या कामात मोठ्या संख्येने मुस्लिम
कारागीर असणं हे फक्त मेरठमधलं चित्र नाहीये. २००६ साली आलेल्या
सच्चर
समितीच्या अहवालामध्येही
मुसलमान कामगारांची संख्या जास्त आहे असी तीन उद्योगांमध्ये
फॅब्रिकेटेड धातूच्या वस्तू या उद्योगाचा समावेश होतो.
साकिब आणि त्याचे भाऊ मोहम्मद नज़ीम आणि मोहम्मद असीम दोघांनी शहरातल्या लोखंडाच्या कारखान्यांमध्ये कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली. २००० च्या सुरुवातीला त्यांच्या वडलांच्या कपड्याच्या ठोक व्यवसायामध्ये प्रचंड तोटा सहन करावा लागल्यामुळे हे दोघं बाहेर पडून कामं करू लागले. आज दोघंही तिशीत आहेत.
असीम अहमद नगरमधल्या आपल्या घरी
डम्बेलच्या प्लेट बनवू लागला आणि नज़ीम वाहनांचे सुटे भाग तयार करण्याच्या
उद्योगात काम करू लागला. साकिब उस्ताद कारीगर असलेल्या फख्रुद्दिन अली सैफी
यांच्या धातूच्या फॅब्रिकेशन कारखान्यात हाताखाली कामाला जाऊ लागला. “त्यांनी मला
वेगवेगळं साहित्य कसं तयार करायचं ते शिकवलं. जिमचं साहित्य, झोपाळे आणि जाळीचे
दरवाजे. कटाई, वाकवणं, जोडणी आणि जुळणी, सगळं काही,” साकिब सांगतो.
सध्या या तिघा भावांचा फिटनेस आणि
जिम साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. मेरठ शहरातल्या त्यांच्या शोरुमपासून नऊ
किलोमीटरवर असलेल्या तातिना सैफी या छोट्या वस्तीत. लोखंडी वस्तू, अवजारं, उपकरणं,
कात्र्या आणि फर्निचर अशा लोखंडी वस्तू तयार करणारं मेरठ हे मोठं केंद्र
असल्याचंही जनगणनेत आपल्याला दिसतं.
“मेरठमध्ये लोखंडाचं काम करणारे किती
तरी कुशल कारागीर आहेत ज्यांना माझ्यापेक्षा या क्षेत्राची फार जास्त माहिती आहे. फरक
इतकाच की मी एक कामगार होतो ते आता लोकांना कामावर ठेवू लागलोय. बाकीच्यांना हे
करता आलेलं नाही,” साकिब म्हणतो.
त्याला हे करणं शक्य झालं त्याचंही
एक कारण आहे. दोन्ही भावांनी पैसे साठवले होते त्या आधारे त्याला एमसीए ही डिग्री
घेता आली. “माझ्या भावांना सुरुवातीला खात्री नव्हती. पण कुठे तरी त्यांनाही हा
विश्वास वाटत होता की एमसीए केल्यानंतर मला जे ज्ञान मिळेल त्याचा उपयोग आपला
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि जिम व फिटनेस साहित्य उद्योगाची पायाभरणी
करण्यासाठी नक्कीच होणार,” साकिब म्हणतो.
*****
“जिमचं साहित्य तयार करायचं तर धातूचे तुकडे कापायचे, वेल्डिंग, बफिंग करून घासून घायचे, त्यानंतर रंगकाम आणि पावडर कोटिंग आणि मग पॅकिंग. छोट्या सुट्या तुकड्यांची नंतर जुळणी केली जाते,” आम्ही कारखान्यात एक चक्कर मारत असताना साकिब सगळी प्रक्रिया समजावून सांगतात. “सामान्य माणसाला इथे कुठला भाग तयार होतोय हे कळणार पण नाही कारण त्यांनी फक्त एसी जिममधलं तयार जिम पाहिलेलं असतं.”
ते वर्णन करत असलेलं जिम आणि आम्ही
जिथे होतो तो कारखाना यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. तीन भिंती आणि वर पत्रा
असलेल्या या कारखान्यात तीन विभाग आहेत. फॅब्रिकेशन, पेंटिंग आणि पॅकिंग. एकच बाजू
खुली आहे आणि तिथून जरा हवा येते – उन्हाळ्यात जेव्हा तापमानाचा पारा ४० अंशाच्या
वर जातो, कधी कधी पार ४५ अंशाला टेकतो तेव्हा जरासा दिलासा.
कारखान्यात फिरत असताना कुठे पाय
पडतोय त्याकडे मात्र बारीक लक्ष हवं.
१५ फूट लांबीचे लोखंडी पाईप आणि
कांबी, तब्बल ४०० किलो वजनाचे लोखंडी दंडगोल, एकदम घन आणि चपट्या आकाराचे वजनाच्या
थाळ्यांसाठी वापरले जाणारे लोखंडाचे पत्रे, विजेवर चालणारी मोठाली यंत्रं आणि बनण्याच्या
प्रक्रियेत असलेलं जिमचं साहित्य इतस्ततः पडलेलं असतं. एक अगदी अंधुकशी, कसल्याही
खुणा नसलेली पायवाट आहे, ती जर चुकली तर मात्र एखाद्या धारदार पात्याने तुम्हाला
कापलं जाणार किंवा पायावर काही तरी वजनदार वस्तू पडून हाडाचा चुरा होणार हे नक्की.
काळ थांबलाय असं वाटावं अशा या
काळ्या-करड्या-पारव्या- जड जड दुनियेत इथले कामगारच काय ते उत्फुल्ल आणि उत्साही.
रंगीबेरंगी टी शर्ट आणि विजेवर चालणाऱ्या यंत्रांवर ठिणग्या उडत असताना उजळणारे
त्यांचे चेहरे.
इथल्या कामगारांमध्ये केवळ मोहम्म्द आसिफ तातिना सानीचा रहिवासी आहे. बाकी सगळे मेरठ शहरातल्या आणि आसपासच्या वस्त्यांमधून इथे येतात. “मी गेले अडीच महिने इथे काम करतोय. पण हे काही माझं पहिलं काम नाहीये. मी या आधी जिमचं साहित्य तयार करणाऱ्या दुसऱ्या एका कारखान्यात कामाला होतो,” १८ वर्षांचा आसिफ सांगतो. लोखंडी पाइप कापण्यात तो एकदम तरबेज आहे. अनेक पाइप वेडेवाकडे रचलेले दिसतात. त्यातनं एक ओढून तो रिकाम्या जागेतून ढकलत कटिंग मशीनवर न्यायचा. असं एका मागून एक त्याचं काम सुरू असतं. जिमच्या गरजेनुसार किती आकाराचे तुकडे कापायचे ते ठरतं आणि त्याप्रमाणे आसिफ लोखंडी पाइपवर टेपच्या सहाय्याने खुणा करतो.
“माझे वडील रिक्षा चालवतात, दुसऱ्याची,”
आसिफ सांगतो. “त्यांची कमाई काही पुरेशी नाही म्हणून मी जसं कळायला लागलं तसा
कामाला लागलो.” त्याला महिन्याला ६,५०० रुपये मजुरी मिळते.
कारखान्याच्या दुसऱ्या भागात मोहम्मद
नौशाद लोखंडाच्या एक घन दंडगोलाच्या बँड सॉ कटिंग मशीनच्या मदतीने चकत्या करतोय. ३२
वर्षीय नौशाद लेथ मशीनवर देखील काम करतो. तो असीम सोबत २००६ पासून काम करतोय. “हे
भाग वेगवेगळ्या प्रकारच्या जिममध्ये वजन
उचलण्यासाठी वापरले जातील.” नौशाद काम करतो तिथे अनेक चकत्या आणि थाळ्या
वजनाप्रमाणे एकमेकींवर रचून ठेवल्या आहेत. त्याला महिन्याला १६,००० रुपये मिळतात.
नौशादच्या डाव्या बाजूला मोहम्मद
आसिफ सैफी, वय ४२ आणि आमिर अन्सारी, वय २७ बसलेले दिसतात. ते आठ वेगवेगळ्या प्रकारचं
व्यायाम साहित्य असणाऱ्या मल्टि जिमची जुळणी करतायत. त्यांना हा माल जम्मू-काश्मीरच्या
कुपवाड्यात सैन्याच्या तळावर पाठवायचा आहे.
या कंपनीला श्रीनगर आणि कटरा
(जम्मू-काश्मीर), अंबाला (हरयाणा), बिकानेर (राजस्थान) आणि शिलाँग (मेघालय) या
ठिकाणच्या सैन्यदलाच्या वसाहतींमधून कामाच्या ऑर्डर मिळतात. “खाजगी जिमचं विचाराल
तर मणिपूरपासून ते केरळपर्यंत सगळीकडचे खरेदीदार आहेत. आम्ही नेपाळ आणि
भूतानलासुद्धा आमचा माल निर्यात करतो,” साकिब सांगतो.
हे दोघंही कारागीर आर्क वेल्डिंगच्या कामात एकदम तरबेज आहेत. छोटे सुटे भाग असोत किंवा मोठं यंत्र, ते सफाईने काम करतात. दोघांना किती काम आहे आणि त्यांनी किता मशीन तयार केली यानुसार महिन्याला ५० ते ६० हजार रुपये मिळतात.
“आर्क वेल्डिंग मशीनला समोरच्या
बाजूला एक पातळ इलेक्ट्रोड असतो. तो एकदम मजबूत लोखंडसुद्धा वितळवतो आणि आरपार
जातो,” आमिर सांगतो. तो पुढे म्हणतो, “दोन भाग जोडायचे असतात तेव्हा मात्र हा इलेक्ट्रॉड
अगदी स्थिर हाताने नीट चालवावा लागतो. हे काम शिकायला आणि त्यात तरबेज व्हायला जरा
अवघड आहे.”
“आमिर आणि आसिफ ठेक्यावर कामं घेतात,”
साकिब त्यांच्या मजुरीविषयी सांगतो. “ज्या कामात फार सफाई आणि कौशल्य लागतं ते ठेका
देऊन करून घेतलं जातं. बाकीच्या कामाचं तसं नाही. तज्ज्ञ कारागिरांना मोठी मागणी
असते आणि ते देखील पैसे वाढवून मिळण्यासाठी घासाघीस करू शकतात,” तो सांगतो.
अचानक कारखान्यात अंधार दाटून येतो.
वीज पुरवठा अचानक थांबलाय आणि काम काही क्षणांसाठी थांबलंय. काहीच क्षण. जनरेटर
सुरू होईपर्यंत. त्या जनरेटरच्या आवाजातही एकमेकांचं बोलणं ऐकू यावं यासाठी आता
सगळे घशाच्या शिरा ताणताणून बोलतायत.
शेजारच्याच भागात २१ वर्षांचा इबाद
सलमानी मेटल इनर्ट गॅस (मिग) वेल्डरच्या मदतीने जिमचे जोड मजबूत करण्याचं काम
करतोय. “पातळ आणि जाड तुकडे कुठल्या तापमानाला वेल्ड करायचे हे जर तुम्हाला माहित
नसेल तर लोखंड वितळून जातं,” इबाद सांगतो. त्याला महिन्याला १०,००० रुपये मिळतात.
ओणवं वाकून तो एका लोखंडी तुकड्यावर
काम करतोय. ठिणग्यांपासून डोळ्यांचं आणि हाताचं रक्षण व्हावं यासाठी त्याने
हातानेच एक शील्ड धरलंय. “आमच्याकडे सगळ्यांकडे संरक्षक साहित्य आहे. कितपत गरज
आहे, किती सुरक्षित किंवा असुरक्षित आहे, वापराला सोपं आहे किंवा नाही असा सगळा
अंदाज घेऊन कामगार हे साहित्य वापरत असतात.”
“आमची बोटं कापली जातात, लोखंडी पाइप आमच्या पायावर पडतात. कापणं वगैरे किरकोळ आहे,” आसिफ सैफी सांगतात, अगदी सहज. “छोटे होतो तेव्हापासून सवय झालीये. त्यासाठी हे काम सोडायचं हा पर्याय आमच्यापाशी नाही.”
इथले सर्वात वयस्क कारागीर, साठीचे बाबू
खान हाताला सुती कापडाच्या पट्ट्या गुंडाळून घेतात. कंबरेभोवतीही कापड गुंडाळतात.
जेणेकरून ठिणग्यांपासून बचाव व्हावा. “मी तरुणपणी दुसऱ्या एका जिम साहित्याच्या
कारखान्यात लोखंडाचं वेल्डिंग करायचो. पण आता मी बफिंगचं काम करतो,” ते सांगतात.
“बफिंग म्हणजे लोखंड कापताना
वेल्डिंग करताना त्यात काही बर राहते, ते काढून टाकण्याचं काम,” साकिब सांगतात. बाबू
खान महिन्याला १०,००० रुपये कमावतात.
सगळ्या बाजू नीट गुळगुळीत केल्यानंतर
४५ वर्षीय शाकिर अन्सारी यंत्रांच्या सांध्यांवर बॉडी फिलर पुट्टीचा लेप देतात आणि
सँडपेपरने घासून, तासून एकदम गुळगुळीत करतात. शाकिर साकिबचे मेहुणे आहेत आणि
गेल्या सहा वर्षांपासून इथे काम करतायत. ते ठेका घेऊन काम करतात आणि महिन्याला
५०,००० रुपयांच्या आसपास कमवतात. “डिझेलवर चालणाऱ्या रिक्षांसाठी लोखंडाच्या नॉझल
तयार करण्याचा माझा स्वतःचा धंदा होता. पण सीएनजी आला आणि माझं सगळं काम ठप्प झालं,”
ते सांगतात.
यंत्रावर, उपकरणावर रंग आणि प्राइमर
लावायचं काम शाकिर पूर्ण करतात आणि त्यानंतर यंत्राच्या मदतीने पावडर कोटिंग केलं
जातं. “त्यामुळे त्याला गंज लागत नाही आणि त्याची मजबुती देखील वाढते,” साकिब
सांगतो.
जिमचे भाग तयार झाल्यावर गेटजवळच्या भागात वेगवेगळे पॅक केले जातात आणि तिथून ट्रकमध्ये लादून पाठवले जातात. पॅकिंग आणि फिटिंगचं काम करणारे मोहम्मद आदिल आणि समीर अब्बासी, मोहसीन कुरेशी आणि शाहबाज अन्सारी या सगळ्यांची वयं १७-१८ वर्षं आहेत आणि त्यांना महिन्याला ६,५०० रुपये मिळतात.
कुपवाड्यातल्या सैन्याच्या तळावरच्या
जिमसाठीची ऑर्डर तयार झाली आहे आणि सामान लादायला सुरुवात होईल.
“आमची ऑर्डर ट्रकने जाते आणि आम्ही रेल्वेने
तिथे जातो,” समीर सांगतो. आणि पुढे म्हणतो, “या कामाच्या निमित्ताने आम्हाला
डोंगरदऱ्या, समुद्र आणि वाळवंटं देखील पहायला मिळाली.”