प्रवाशांची घाईगर्दी, जे काही हाताला लागेल, दाराचं हँडल किंवा आतल्या एखाद्याचा हातही धरून गाडीत चढायची चढाओढ या सगळ्याच्या विपरीत अंधेरीच्या गाडीतली शांतता आणि स्तब्धता जास्तच जाणवते. जिथे पहावं तिथे लोकांची नुसती घुसळण सुरू आहे. कुणी अडखळतंय, कुणी रिकाम्या जागेसाठी धडपडतंय, कुणी कुणाला विनवतंय, कुणी हुज्जत घालतंय आणि काही जण बसलेल्यांनाच आणखी आत ढकलतायत.
याच प्रवाशांच्या लाटेतले एक आहेत ३१ वर्षांचे किशोन जोगी आणि त्यांची १० वर्षांची मुलगी भारती. मोरपंखी रंगाचा राजस्थानी घागरा आणि कुर्ता घातलेली. पश्चिम उपनगरीय रेल्वेची सात वाजताची मुंबई लोकल ही आजची त्यांची पाचवी गाडी.
गाडी वेग घेते, प्रवासी आपापल्या जागी स्थिरस्थावर होतात आणि किशन यांच्या सारंगीचे गोड सूर गाडीत पसरू लागतात.
“तेरी आँखे भूलभुलैय्या... बातें है भूल भुलैय्या...”
उजव्या हातातला बो तीनतारी वाद्यावर सफाईने फिरतो आणि मंजुळ स्वर हवेत पसरतात. वाद्याच्या दुसऱ्या टोकाला असलेला छोटासा घोषक छाती आणि डाव्या खांद्याच्या मधोमध धरलेला असतो. २०२२ साली आलेल्या भुलभुलैय्या-२ सिनेमातलं हे गाणं त्यांच्या स्वरात जास्तच गूढ भासू लागतं.
डब्यातले काही प्रवासी रोजच्या धोपट गप्पा सोडून काही काळ ही गोड गाणी लक्ष देऊन ऐकू लागतात. काही जण आपले फोन बाहेर काढून रेकॉर्डिंग सुरू करतात. काही जणांच्या चेहऱ्यावर हलकं हास्य उमटतं. पण बरेचसे लोक कानात इयरफोन घालून आपापल्या मोबाइल फोनमध्ये डोकं घालतात. छोटी भारती डब्यातल्या लोकांकडे पैसे मागते तेव्हाच त्यांचं लक्ष थोडं विचलित होतं.
‘वडलांनी ही सारंगी आमच्याकडे सोपवली. शाळेत जाणं वगैरे विचारसुद्धा मी केला नाही. मी फक्त ही सारंगी वाजवत राहिलो’
“लोक मी दिसलो की माझं वादन ऐकायला मला जागा करून द्यायचे,” किशन काहीशा खेदाने सांगतात. १०-१५ वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता. “लोकांना मोल होतं. पण आता काय, ते कानात इयरफोन घालणार आणि आपापल्या फोनमध्ये डोकं घालून स्वतःपुरती करमणूक करून घेणार. संगीतात आता कुणालाच फारसा रस राहिलेला नाही.” क्षणभर थांबून ते परत पुढची धून वाजवायला लागतात.
“मी लोकगीतं वाजवतो, भजन... राजस्थानी, गुजराती, हिंदी गाणी... हवं ते सांगा. चार-पाच दिवस एखादं गाणं ऐकलं की माझ्या डोक्यात पक्कं बसतं आणि मग मी ते सारंगीवर जसंच्या तसं वाजवू शकतो. प्रत्येक सूर बरोबर लागावा म्हणून मी खूप सराव करतो,” पुढच्या गाण्याआधी सारंगी सुरात जुळवत जुळवत ते सांगतात.
तिकडच्या कोपऱ्यात काही जण आपापल्या पाकिटात किरकोळ चिल्लर किंवा एखादी नोट आहे का ते पाहतायत. भारती त्यांच्यापाशी पोचते. गाडीच्या चाकांच्या गतीने भारती डब्यातल्या अगदी प्रत्येकापर्यंत जाऊन पैसे मागते. पुढचं स्टेशन येईपर्यंत यातला एकही प्रवासी ती सुटू देत नाही.
किशन यांची रोजची कमाई कमी जास्त होत असते. कधी कधी ४०० रुपये तर कधी पार १,००० रुपये. तेही दिवसभरात सहा गाड्यांमध्ये शिरून आपली कला सादर केल्यानंतर. नालासोपाऱ्याहून संध्याकाळी ५ वाजता सुटणारी मुंबई लोकल ही त्यांची पहिली गाडी. त्यांचा रोजचा मार्ग काही ठरलेला नसतो. ते दोघं चर्चगेट ते विरार या मार्गावर ये-जा करत राहतात. गाडीत प्रवासी भरपूर असावेत आणि त्यांना उभं राहून आपली कला सादर करता यावी या दोन गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं.
“सकाळच्या वेळेत लोकांना कामावर जायची घाई असते. गाड्या ओसंडून वाहत असतात. तेव्हा माझी सारंगी ऐकायला कुणाकडे वेळ असणार?” संध्याकाळच्या गाड्या निवडायचं कारण किशन सांगतात. “ते कामावरून परत जात असतात तेव्हा जरासे निवांत असतात. काही जण मला दूर ढकलतात. पण मी लक्ष देत नाही. दुसरा काही पर्याय आहे का?” त्यांच्याकडे ही एवढी एकच कला आहे. तीही वारशाने मिळालेली.
त्याचे वडील मिताजी जोगी राजस्थानच्या लुनियापुराहून मुंबईत आले तेव्हा लोकलमध्ये आणि रस्त्यांवरती सारंगी वाजवायचे. “माझे आई-बाबा धाकट्या भावाला, विजयला घेऊन मुंबईला आले तेव्हा मी फक्त दोन वर्षांचा होता,” ते सांगतात. ते त्यांच्या वडलांसोबत फिरत रहायचे. भारतीहून कमी वयात.
मिताजी जोगी समाजाचे (राजस्थानात इतर मासागवर्ग प्रवर्गात समाविष्ट). ते स्वतःला कलाकार मानायचे. त्यांचं कुटुंब गावी पोटापाण्यासाठी रावणहत्था वाजवत असे. लोकसंगीतामध्ये वाजवलं जाणारं हे अगदी पुरातन असं तंतुवाद्य आहे. ऐकाः उदयपूरमध्ये रावणहत्थ्याचे विरते सूर .
“कुणाकडे काही कार्यक्रम असला, काही सणवार, धार्मिक कार्यक्रम असेल तर माझा बाप आणि इतर वादकांना बोलावलं जायचं,” किशन सांगतात. “पण हेही फार क्वचित. मिळालेली बिदागी सगळ्या वादकांमध्ये वाटून घेतली जायची.”
यात कमाई इतकी तुटपुंजी होत असे की मिताजी आणि त्यांची पत्नी जमना देवी अगदी कमी रोजावर शेतात मजुरीला जायचे. “गावातल्या गरिबीमुळे आम्हाला मुंबईला येणं भाग पडलं. दुसरं काही धंदा-मजदुरी नव्हतंच,” ते म्हणतात.
मुंबईत मिताजींना दुसरं काहीच काम मिळालं नाही आणि ते रस्त्यात आपला रावणहत्था वाजवत फिरत रहायचे. कालांतराने रावणहत्था गेला आणि त्यांच्या हाती सारंगी आली. “रावणहत्थ्यात जास्त सूर निघतात, नाद थोडा खालचा असतो,” किशन वाद्यांमधले बारकावे समजावून सांगतात. “सारंगीचा स्वर चढा असतो, ताराही कमी असतात. लोकांना आवडतं म्हणून माझे बाबा सारंगी वाजवू लागले. या वाद्यावर जास्त गाणी वाजवता येतात.”
किशन यांची आई जमना देवी आपले पती आणि दोन मुलं यांच्यासोबत फिरत राहिली. “आम्ही इथे आलो, तेव्हा फूटपाथ हेच आमचं घर होतं,” ते सांगतात. “जिथे जागा मिळेल तिथे आम्ही आडवे व्हायचो.” ते आठ वर्षांचे होईपर्यंत धाकटा सूरज आणि गोपीचा जन्म झाला होता. “तो काळ आता मला आठवावासाही वाटत नाही,” किशन सांगून टाकतात. त्यांच्या चेहरा वेदनेने काळवंडतो.
ज्या स्मृती त्यांनी मनात जशाच्या तशा जपून ठेवल्या आहेत त्या आहेत वडलांच्या संगीताच्या स्मृती. आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेली लाकडी सारंगी त्यांनी आपल्या मुलांना शिकवली होती.”रस्ते आणि रेल्वेगाड्या हाच त्यांचा मंच होता. ते कुठेही वाजवायचे आणि कुणी त्यांना कधी थांबवायचं नाही. त्यांचं वादन सुरू झालं की मोठी गर्दी गोळा व्हायची,” किशन अगदी खुशीत येऊन सांगतात. दोन्ही हात पसरून किती मोठी गर्दी ते सांगण्याचा प्रयत्न करतात.
पण तेच रस्ते आज मिताजींच्या मुलावर तितकी माया करत नाहीत. जुहू-चौपाटीच्या बीचवर पर्यटकांसाठी सारंगी वाजवल्याबद्दल एका पोलिसाने त्यांना १,००० रुपये दंड ठोकला. तो भरणं शक्य नव्हतं तर त्यांना एक-दोन तास कोठडीत टाकलं. “मी काय चूक केली तेच मला कळत नव्हतं,” किशन सांगतात. या प्रसंगाचा त्यांनी इतका धसका घेतला की त्यानंतर मात्र त्यांनी लोकल गाड्यांमध्ये सारंगी वाजवायला सुरुवात केली. पण आजही त्यांचं प्रांजळ मत आहे की वडलांच्या कलेची सर त्यांच्या वादनाला कधीच येणार नाही.
“माझा बाप माझ्यापेक्षा फार छान आणि फार प्रेमाने हे वाद्य वाजवायचा,” किशन सांगतात. मिताजी सारंगी वाजवता वाजवता गायचे देखील. किशन मात्र गायला लाजतात. “मी आणि माझा भाऊ पोटासाठी वाजवतो.” किशन १० वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांना कदाचित क्षयाची बाधा झाली होती. “आमच्याकडे चार घास खायला पैसे नव्हते, दवाखान्यात जाणं दूरची गोष्ट आहे.”
किशन यांना अगदी लहान असल्यापासून कमवायला सुरुवात करावी लागली. “बाकी कसला विचार करायला वेळ कुठे होता? बाप ने सारंगी थमा दी, कभी स्कूल का भी नही सोचा. बस बजाते गया, ” ते सांगतात.
वडील वारल्यानंतर जमना देवी किशन, विजय आणि गोपी यांना येऊन राजस्थानला परत गेल्या. सूरज नाशिकला गेला. “त्यांना मुंबईची ही घाईगर्दी आवडत नाही. त्यांना सारंगी वाजवायलाही आवडत नाही,” किशन सांगतात. “सूरजला आवडायचं आणि तो आजही सारंगी वाजवतो. बाकी दोघं मात्र पोटापाण्यासाठी पडेल की कामं करतात.”
“मी मुंबईत का राहतो, काय माहित? पण कसं का असेना माझं एक छोटं जग मी इथे उभं केलंय,” किशन म्हणतात. नालासोपारा (पश्चिम) इथे मातीची जमीन असलेली पत्र्याची खोली त्यांनी भाड्याने घेतली आहे. १० x १० फूट खोलीच्या भिंती सिमेंटच्या पत्र्याच्या आणि छताला टिनाचा पत्रा.
रेखा म्हणजे किशन यांचं पहिलं प्रेम. गेली १५ वर्षं त्यांची पत्नी आणि युवराज व भारती या दोन मुलांची आई. रेखा आम्हाला घरात बोलावतात. या चौघांचं कुटुंब आणि त्यांचा संसार या खोलीत मांडलेला दिसतो. कोपऱ्यात छोटंसं स्वयंपाकघर, छोटा टीव्ही आणि कपडे. सिमेंटच्या एका खांबाला लागून त्यांची मोलाची ठेव असलेली सारंगी अडकवलेली दिसते.
रेखाचं आवडतं गाणं कोणतं असं विचारायचा अवकाश, किशन पटकन सांगतात, “ हर धुन उस के नाम. ”
“ते वाजवतात ते मला आवडतं, पण फक्त तेवढ्याने आमचं भागेनासं झालंय,” रेखा म्हणतात. “त्यांनी धड नोकरी करावी असं मला वाटतं. पूर्वी आम्ही दोघंच होतो पण आता ही दोघं लेकरं आहेत ना.”
किशन यांच्यासोबत प्रवास करणारी भारती जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीत शिकते. नेलिमोरमधल्या त्यांच्या घरापासून शाळा अगदी हाकेच्या अंतरावर आहे. शाळा सुटल्या सुटल्या ती आपल्या वडलांबरोबर निघते. “बाबा जे काही वाजवतात ते मला आवडतं. पण रोज त्यांच्या बरोबर जायला काही मला आवडत नाही. मला माझ्या मैत्रिणींबरोबर खेळायला, नाच करायला जास्त आवडतं,” ती म्हणते.
“ती पाच वर्षांची होती तेव्हा मी तिला माझ्यासोबत घेऊन जायला लागलो,” किशन सांगतात. “काय करणार? मला काही तिला न्यावंसं वाटत नाही. मी वाजवतो तेव्हा पैसे गोळा करायला कुणी तरी लागतं. नाही तर आम्ही कमवणार कसं?”
किशन या महानगरात इतर काही कामं मिळतायत का त्याच्या शोधात असतात. पण शिक्षण नाही त्यामुळे त्यांच्या नशिबात कसलंच काम नाही. लोक गाडीत त्यांचा नंबर घेतात तेव्हा त्यांच्या मनात आशा निर्माण होते की एखाद्या मोठ्या कार्यक्रमात त्यांना वाजवायला बोलावलं जाईल. त्यांनी काही जाहिरातींसाठी सारंगी वाजवली आहे. मुंबई, फिल्म सिटी आणि वरसोव्याच्या स्टुडिओंमध्ये ते जाऊन आले आहेत. पण अशी संधी अगदी एकदाच. कधी तरी २,००० ते ४,००० रुपये मिळालेही. पण तेही क्वचित.
गेल्या चार वर्षांत काही त्यांचं नशीब खुललं नाहीये.
दहा वर्षांपूर्वी रोज ३०० किंवा ४०० रुपयांच्या कमाईत भागत होतं. पण आता नाही. घराचं महिन्याचं भाडंच ४,००० रुपये आहे. रेशन, पाणी, वीजबिल असं सगळं मिळून महिन्याला १०,००० रुपये असेच खर्चून जातात. मुलीच्या शाळेत एका सत्राची फी ४०० रुपये आहे.
हे दोघं नवरा बायको चिंध्या गोळा करण्याचं काम करतात. लोकांकडून जुनी कापडं विकत घ्यायची आणि विकायची. पण यातही किती कमाई होईल हे काही निश्चित नाही. काम मिळालं तर दिवसाला १०० रुपये ते ५०० रुपये मिळू शकतात.
“झोपेतून उठवलंत तरी मी सारंगी वाजवू शकतो. मला तितकंच तर येतं,” किशन म्हणतात. “पण सारंगीत आता कमाई होत नाही.”
“यह मेरे बाप से मिली निशानी है और मुझे भी लगता है मैं कलाकार हूं... पर कलाकारी से पेट नही भरता ना?”