तर, दुपारची नीरव शांतता भंग करत मलियामा या बौद्ध पाड्यावर एक मोर्चा येऊन आदळतो. ओरडत, चिरकत. ऑक्टोबर महिना असला तरी इथे पूजोचा गोंधळ नाहीये. पण दुर्गापूजेची सुट्टी मिळाल्याने वय वर्ष २ ते ११ या वयोगटातली आठ-दहा पोरं हा मोर्चा घेऊन आलीयेत.
इतर कुठला दिवस असता तर शाळेची घंटा झाली असती आणि खेळाचा तास सुरू झाला असता. इथून ७ ते १० किलोमीटर अंतरावर एक सरकारी आणि दोन खाजगी शाळा आहेत. या पाड्यावरची मुलं रोज चालत शाळेत जातात. पण आता जवळपास दहा दिवस शाळेला सुट्टी आहे. त्यामुळे खेळण्यासाठी शाळेच्या घंटेची काही या पोरांना गरज नाहीये. जेवण झालं की दुपारी २ वाजता खेळायला सुरुवात. समुद्रपातळीपासून १,८०० मीटरवर असलेल्या या पाड्यावर दुपारच्या वेळेत इंटरनेट नसल्यात जमा होतं आणि मग आपापल्या पालकांचे मोबाईल फोन त्यांच्याकडे परत देत ही पोरं घराबाहेर येतात. आणि मग गावातल्या मधल्या रस्त्यावर मांखा लाइदाचा खेळ सुरू होतो. त्याचा शब्दशः अर्थ आहे, अक्रोडाचा खेळ.
या पाड्याभोवतीच्या जंगलांमध्ये अक्रोड उदंड पिकतात. आणि सुक्या मेव्यातल्या या फळाचं उत्पादन पाहिलं तर देशात अरुणाचल प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे. या वेस्ट कामेंग जिल्ह्यातले अक्रोड तर खास निर्यातीच्या दर्जाचे म्हणून ओळखले जातात. पण या पाड्यावरचं मात्र कुणीच त्याची लागवड किंवा शेती करत नाहीत. मुलांनी जे गोळा करून आणलेत ते जंगलात येणारे अक्रोड आहेत. मलियामामध्ये राहणारी १८-२० कुटुंबं मूळची तिबेटमधल्या परंपरागत पशुपालक, शिकारी आणि जंगलातून वस्तू गोळा करून जगणाऱ्या मोंपा जमातीची आहेत. रोजच्या गरजा भागवण्यासाठी ते वनोपज गोळा करतात. “दर आठवड्याला गावातली माणसं जंगलात जातात आणि अळंबी, सुका मेवा, काही फळं, सरपण आणि इतर वनोपज घेऊन येतात,” ५३ वर्षीय रिनचिन जोम्बा सांगतात. दररोज दुपारी गावातल्या रस्त्यात खेळायला येण्याआधी मुलं खिशात अक्रोड भरून येतात.
रस्त्यावर काही अक्रोड ओळीने मांडले जातात. प्रत्येक खेळाडू आपल्याकडचे तीन अक्रोड मांडून ठेवतो. आणि मग काही अंतरावरून हातातल्या अक्रोडाने रांगेतले अक्रोड टिपायचा खेळ सुरू. जितके नेम बसतील तितके अक्रोड तुम्ही जिंकले. आणि अक्रोड खायचे हेच तुमचं बक्षीस! हा खेळ कितीही काळ सुरू राहतो. पोटभर अक्रोड खेळून आणि खाऊन झाले की पुढचा खेळ सुरू, था ख्यांदा लाइदा. म्हणजेच रस्सी खेच.
या खेळात एकच बदल केलाय. रस्सीच्या जागी एक कापड वापरलेलं दिसतंय. दर वर्षी घरच्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून एक पूजा घातली जाते आणि तेव्हा प्रत्येक घराच्या वर काही झेंडे उभारले जातात. त्याचंच उरलेलं कापड इथे खेळात आलंय.
एक-दोन तास उलटले की नवा खेळ सुरू होतो. खो-खो, कबड्डी, डबक्यात उड्या मारायच्या किंवा नुसतं पळत सुटायचं. आणि कधी कधी खेळण्यातल्या जेसीबीने कुठे तरी खणायला जायचा खेळही सुरू असतो. त्यांचे आई-वडील मनरेगाच्या कामावर ‘जॉब-कार्ड’ कामं करायला जातात, तसंच.
कधी कधी खेळून झालं की सगळी मुलं जवळच्याच छोट्याशा चुग या बौद्ध विहाराला भेट देतात आणि काही जण शेतात आपल्या आई-वडलांना मदत करायला जातात. तिन्ही सांजा होईपर्यंत मोर्चा पुन्हा पाड्याच्या दिशेने येतो. वाटेतल्या झाडांची संत्री किंवा पर्सिमन नावाची फळं खात खात घर गाठतो. रोजचा दिवस असाच संपतो.