तमिळनाडूच्या उत्तरेला तिरुवल्लुर जिल्ह्यातच्या किनारी भागात गावांची राखण करणारा देव म्हणजे कन्नीसामी. आणि तो दिसतोही तसाच. मच्छीमार समाजातलाच भासावा असा. त्याचा पोषाखही तसाच. एकदम भडक रंगाचा सदरा आणि वेटी, डोक्यावर टोपीसुद्धा. दर्यावर जाण्याआधी सगळं आलबेल असावं म्हणून मच्छीमार त्याला पूजतात.
मच्छीमार कुटुंबं कन्नीसामीची वेगवेगळ्या अवतारात पूजा करतात आणि चेन्नईच्या उत्तरेपासून ते पुळवेलकाडुच्या भागात तो एकदम लोकप्रिय देव आहे.
एन्नर कुप्पम गावातले मच्छीमार सात किलोमीटर प्रवास करून अतिपट्टुला येतात आणि कन्नीसामीच्या मूर्ती घेऊन जातात. जूनमध्ये भरणारा ही जत्रा चांगली आठवडाभर साजरी केली जाते. २०१९ साली मी या गावातल्या मच्छीमारांसोबत हा प्रवास केला. आम्ही चेन्नईच्या उत्तरेला औष्णिक विद्युत प्रकल्पाजवळच्या कोसस्थलैयार नदीकिनारी उतरलो आणि तिथून अतिपट्टु गावी चालत गेलो.
एका दुमजली बैठ्या घरापाशी पोचलो तर तिथे ओळीने कन्नासामीच्या मूर्ती मांडून ठेवलेल्या होत्या. सगळ्यांना पांढरं वस्त्र गुंडाळलेलं होतं. चाळिशी पार केलेला, पांढरा सदरा आणि वेटी नेसलेला, कपाळावर तिरुनीर [विभूती] लावलेला एक गृहस्थ तिथे उभा होता. सगळ्या मूर्तींपुढे त्याने कापूर पेटवला. त्यानंतर त्याने त्या मूर्तींची पूजा केली आणि मग एकेक मूर्ती एकेका मच्छीमाराच्या खांद्यावर ठेवली.
दिल्ली अण्णांना भेटण्याची ही माझी पहिलीच वेळ. पण त्यांच्याशी जास्त काही बोलायला बिलकुल वेळ नव्हता. मच्छीमारांनी खांद्यावर मूर्ती घेतल्या आणि मी त्यांच्यासोबत परतलो. चार किलोमीटर चालत कोसस्थलैयार नदीच्या काठावर यायचं आणि तिथून बोटीने तीन किमी प्रवास करून एन्नूर कुप्पमला परत.
गावी पोचल्यावर हे मच्छीमार देवळापाशी सगळ्या मूर्ती ओळीने मांडून ठेवतात. पूजा आणि इतर विधींसाठी लागणारं सगळं साहित्य त्यांच्यापुढे मांडून ठेवलं जातं. दिवस मावळला की दिल्ली अण्णा कुप्पमला येतात. गावकरी या मूर्तींभोवती गोळा होतात. दिल्ली अण्णा मूर्तीवरचं सफेद वस्त्र काढून घेतात. माइ म्हणजेच काजळाने कन्नीसामीचे डोळे चितारतात. त्यानंतर ते तोंडानेच कोंबड्याची मान उतरवतात. असं केल्याने नजर लागत नाही असा समज आहे.
त्यानंतर कन्नीसामींच्या या मूर्ती गावाच्या वेशीपाशी नेल्या जातात.
एन्नोरेच्या किनारी आणि खारफुटीच्या प्रदेशाने मला कित्येकांच्या संपर्कात आणलं आहे. दिल्ली अण्णा त्यातलेच एक. त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य या कन्नीसामीच्या मूर्ती घडवण्यासाठी अर्पण केलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी दिल्ली अण्णांना भेटायला [२०२३ साली] मे महिन्यात त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांच्या कपाटात कुठल्याही घरगुती वापराच्या किंवा शोभेच्या वस्तू नव्हत्या. फक्त मातीचे गोळे, पेंढा आणि मूर्ती. घरभर मातीचा सुगंध भरून राहिला होता.
कन्नीसामीची मूर्ती करण्यासाठी सुरुवातीला गावाच्या वेशीवरची मूठभर माती बाकी मातीत मिसळावी लागते. “असं केल्याने देवाची सगळी शक्ती त्या गावाला मिळते असं मानतात,” ४४ वर्षीय दिल्ली अण्णा सांगतात. “गेल्या किती तरी पिढ्यांपासून आमचं कुटुंबच कन्नीसामीच्या मूर्ती घडवतंय. माझे वडील होते तेव्हा मला या सगळ्यात बिलकुल रस नव्हता. २०११ साली ते वारले. त्यानंतर आमचे सगळे लोक मला म्हणू लागले की वडलांनंतर आता मीच हे काम करावं लागणार... म्हणून मी आज हे काम करतोय. दुसरं कुणी नाहीच आहे.”
दहा दिवसांमध्ये दिल्ली अण्णा दहा मूर्ती पूर्ण करू शकतात. एकाच वेळी सगळ्या मूर्तींवर काम सुरू असतं. एका वर्षभरात ते सुमारे ९० मूर्ती बनवू शकतात. “एक मूर्ती पूर्ण करायला १० दिवसांचं काम लागतं. सुरुवातीला माती फोडून घ्यायची, त्यातले खडेबिडे काढून टाकायचे. त्यानंतर त्यात पेंढा मिसळायचा,” दिल्ली अण्णा सांगतात. पेंढ्यामुळे मूर्ती मजबूत होते त्यामुळे तो एक थर मूर्तीमध्ये असतो.
“अगदी सुरूवातीपासून ते मूर्ती तयार होईपर्यंत मला एकट्यालाच सगळं काम करावं लागतं. हाताखाली कुणाला ठेवण्याइतके पैसे माझ्यापाशी नाहीत,” ते सांगतात. “आणि सगळं काम सावलीत करावं लागतं. कारण उन्हात माती चिकटत नाही आणि मूर्ती फुटते. मूर्ती तयार झाल्या की त्या भट्टीत भाजाव्या लागतात. सगळे मिळून १८ दिवस लागतात.”
दिल्ली अण्णा अतिपट्टुच्या पंचक्रोशीतल्या अनेक गावांना मूर्ती पुरवतात. एन्नूर कुप्पम, मुगतिवरा कुप्पम, तळनकुप्पम, कट्टुकुप्पम, मेट्टुकुप्पम, पलतोट्टीकुप्पम, चिन्नकुप्पम आणि पेरियकुप्पम.
देवाची जत्रा असते तेव्हा या गावातले लोक कन्नीसामींच्या मूर्ती गावाच्या वेशीपाशी वाहतात. बहुतेकांना देवाची मूर्ती हवी असली तरी काहींना देवीची मूर्ती वहायची असते. पापती अम्मन, बोम्मती अम्मन, पिचइ अम्मन अशी वेगवेगळी नावं आहेत या देवतांची. काहींना देव घोड्यावर किंवा हत्तीवर आरुढ झालेला हवा असतो. आणि काहींना देवाशेजारी कुत्रा देखील हवा असतो. असं मानलं जातं की रात्री देव येतात आणि खेळ खेळतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मूर्तीच्या पायाला चीर गेलेली दिसते ती त्यामुळेच.
“काही गावांमध्ये दर वर्षी नवे कन्नीसामी वाहिले जातात. काही ठिकाणी दर दोन वर्षांनी आणि काही ठिकाणी दर चार,” दिल्ली अण्णा सांगतात.
या गावांमधून आणि मच्छिमारांकडून मूर्तींची मागणी जरी कमी झाली नसली तरी दिल्ली अण्णांना सतत घोर लागून असतो की गेल्या तीस वर्षांपासून ते ही परंपरा अखंडपणे जपतायत, ती त्यांच्यानंतर पुढे कोण सुरू ठेवेल. त्यांनाही हे आताशा परवडेनासं झालंय. “आजकाल किंमती वाढल्या आहेत... मी जर त्याचा सगळा हिशोब करून किंमत सांगितली तर ते मलाच विचारतात की मी इतके पैसे का मागतोय म्हणून. पण यात कष्ट किती आहेत ते फक्त आम्हालाच माहितीये.”
चेन्नईच्या उत्तरेकडच्या किनाऱ्यांवर औष्णिक विद्युत प्रकल्पांची संख्या वाढल्यापासून जमिनीच्या पोटातलं पाणी जास्तीत जास्त खारं व्हायला लागलं आहे. त्यामुळे इथे शेती कमी कमी होत चाललीये, परिणामी मातीच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. “आजकाल मला कुठेही चिकणमाती मिळत नाही,” दिल्ली अण्णा सांगतात. त्यांना आता कच्चा माल शोधण्यासाठी पायपीट करावी लागते.
माती विकत घेणं महाग पडतं, ते सांगतात आणि म्हणतात, “मी माझ्या घराशेजारी खड्डा खणतो आणि त्यानंतर त्यात रेती भरून टाकतो.” रेती मातीहून स्वस्त असल्याचंही ते सांगतात.
अतिपट्टुमधले ते एकमेव मूर्तीकार असल्याने पंचायतीच्या परवानगीने सार्वजनिक ठिकाणी खड्डा खणून माती काढणं त्यांच्यासाठी अवघड होतं. “माझ्यासारखी अजून १०-२० कुटुंबं मूर्तीकाम करत असती तर आम्ही तळ्याच्या काठी खणण्याची परवानगी काढू शकलो असतो. पंचायतीनेच आम्हाला फुकटात माती घेऊ दिली असती. पण इथे मी एकटाच मूर्ती बनवतो, त्यामुळे एकट्यासाठी असं काही मागणी करणं शक्य होत नाही. त्यामुळे मी माझ्या घराच्या आसपासची माती काढतो.”
दिल्ली अण्णांना लागणारा पेंढाही आता सहज मिळत नाही कारण भाताची काढणी आता हाताने होत नाही. “यंत्राने काढणी केली की फारसा पेंढा राहत नाही. पेंढा असला तर काम होणार, नाही तर नाही,” ते सांगतात. “मी शोधातच असतो, ज्याच्या शेतात मजुरांनी भातं काढली असतील तिथून मी पेंढा घेऊन येतो. आजकाल मी फुलदाण्या आणि चुली बनवणं बंद केलंय. खरं तर त्याला मागणी जास्त आहे. पण त्या गोष्टी आताशा करणं होत नाही.”
त्यांच्या कमाईचं गणित ते सांगतात. “एका मूर्तीचे मला गावात २०,००० रुपये मिळतात. पण सगळा खर्च वगळता हातात फक्त ४,००० येतात. मी चार गावांसाठी मूर्ती बनवल्या तर मला १६,००० रुपये मिळतात.”
अण्णांना फक्त उन्हाळ्यात, फेब्रुवारी ते जुलै या काळात हे काम करता येतं. आडि (जुलै) महिन्यात जत्रा सुरू होतात तेव्हा लोक मूर्ती घ्यायला येऊ लागतात. “मी सहा-सात महिने कष्टाने या मूर्ती बनवतो. एका महिन्यात त्या विकल्या जातात. पुढचे सहा महिने कसलीही कमाई नसते. मूर्ती विकल्या जातात तेव्हाच फक्त पैसे मिळतात.” दिल्ली अण्णा सांगतात की ते दुसरं कुठलंही काम करत नाहीत आणि शोधतही नाहीत.
त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी ७ वाजता आणि सलग आठ तास त्यांचं काम सुरू असतं. मूर्ती सुकत असतात तेव्हा त्यांना बारीक लक्ष ठेवावं लागतं नाही तर त्या तुटू शकतात. त्यांच्या कलेप्रती त्यांची निष्ठा किती आहे ते त्यांनीच सांगितलेल्या एका प्रसंगातून कळून येतं. ते सांगतात, “एका रात्री मला श्वासच घेता येत नव्हता आणि खूप त्रास झाला. सकाळी उठल्यावर मी तसाच सायकल चालवत दवाखान्यात गेलो. तिथे डॉक्टरांनी ग्लुकोज [सलाइन] चढवलं. मग माझ्या भावाने मला काही तरी तपासणी करण्यासाठी म्हणून दुसऱ्या दवाखान्यात नेलं. तिथल्या लोकांनी सांगितलं की स्कॅन थेट रात्री ११ वाजता होईल म्हणून.” पण दिल्ली अण्णा स्कॅन न करताच घरी परतले, कारण “माझ्या मूर्तींकडे कोण पाहणार?” त्यांचा प्रश्न.
सुमारे तीस वर्षांपूर्वी कट्टुपल्ली गावाच्या चेपक्कम पाड्यावर दिल्ली अण्णांच्या कुटुंबाची चार एकर जमीन होती. “तेव्हा माझं घर चेपक्कम गणेश मंदिरापाशी सिमेंट फॅक्टरीजवळ माझं घर होतं. शेती करणं सोपं जावं म्हणून आम्ही आमच्या जमिनीपाशीच घर बांधलं होतं”
“आम्ही चार भावंडं आहोत पण एकटा मीच हे काम करतोय. माझं लग्न पण झालं नाहीये. इतक्या कमाईत घर किंवा एखादं मूल कोण कसं काय सांभाळू शकेल?” ते विचारतात. त्यांनी दुसरं कुठलं काम सुरू केलं तर मच्छीमार समाजासाठी या मूर्ती कोण बनवेल याचीच दिल्ली अण्णांना चिंता आहे.
मूर्ती तयार करणं म्हणजे दिल्ली अण्णांसाठी फक्त एक व्यवसाय नाहीये. त्यांच्यासाठी तो सोहळा आहे. त्यांना आठवतंय की त्यांच्या वडलांच्या काळात एक मूर्ती ८००-९०० रुपयांना विकली जात होती. जे कुणी मूर्ती घ्यायला यायचं त्यांना जेवू घातलं जायचं. “लगीनघर असावं तसा सोहळा असायचा,” ते सांगतात.
भाजताना मूर्तीला चिरा जाऊ नयेत इतकीच त्यांची इच्छा असते. आणि त्या तशा भाजून निघाल्या की ते अगदी खूष होतात. “मी मूर्ती बनवत असतो ना तेव्हा मला सतत असं वाटत राहतं की कुणी तरी माझ्यासोबत आहे. कधी कधी वाटतं मी या मूर्तींशी बोलतोय. आयुष्यात किती कठीण काळ आला तेव्हा या मूर्तीच माझ्यासोबत होत्या ना. आता एकच घोर लागलाय...माझ्यानंतर या मूर्ती कोण बनवेल बरं?”