“इल्लल्ला की शराब नजर से पिला दिया, मैं इक गुनाहगार था सूफी बना दिया,
सूरत में मेरे आ गई...सूरत फकीर की...ये नजर मेरे पीर की... ये नजर मेरे पीर की... ”

माईक नाही, तरी त्याचा आवाज घुमटावरील कळसापर्यंत सहज पोचतोय. सोबतीला ना कुणी झिलकरी, ना कुणी दाद देणारं - पूर्ण सोलो परफॉर्मन्स.

मनगटाला घुंगरू, मांडीवर बाळासारखी ठेवलेली ढोलकी वाजवत पुणे शहराजवळच्या दर्ग्यात तो गातोय.

एकानंतर दुसरी, लागोपाठ तिसरी कव्वाली. जुहर व मगरिब अर्थात दुपार व संध्याकाळच्या नमाजपुरता अमजद विश्राम घेतो. प्रार्थनेच्या वेळी गाणंबजावणं अशोभनीय मानतात. म्हणून तेवढा वेळ तो थांबतो, एरवी रात्री आठपर्यंत तो गात असतो.

“मेरा नाम अमजद, पुरा नाम अमजद मुराद गोंड, हम राजगोंड है. आदिवासी है हम!” नाव-पेहराव मुसलमानी पण आपण आदिवासी आहोत हे सहज सांगणारा अमजद पुढे लगेच म्हणतो “कव्वाली हमारा पेशा है।”

PHOTO • Prashant Khunte

अमजद गोंड खेड शिवापूरच्या दर्ग्यामध्ये कव्वाली गातो. जुहर व मगरिब अर्थात दुपार व संध्याकाळच्या नमाजपुरता अमजद विश्राम घेतो. प्रार्थनेच्या वेळी गाणंबजावणं अशोभनीय मानतात. म्हणून तेवढा वेळ तो थांबतो, एरवी रात्री आठपर्यंत तो गात असतो.

गालात पानाचा विडा ठेवत तो विचारतो, “कव्वाली पे कौन नही झूमताॽ” कव्वालीबद्दल बोलतना त्याची कळी खुलते, “कव्वाली ऐसा चीज है, सब पसंद करते है।” जिभेवर पानाचा रस घोळताच उजळलेल्या चेहऱ्यानं अमजद सांगतो, “पब्लिक को खूश करने का बस्स!”

‘पांव मे बेडी हाथों में कडा रहने दो, उसको सरकार की चौखट पे पडा रहने दो...’चाल ओळखीची. ‘अभी जिंदा हूँ तो जी लेने दो, भरी बरसात मे पी लेने दो’ या मुजरिम सिनेमातील गाण्याच्या चालीवरची कव्वाली ऐकताना कुतुहल वाटतं.

अमजद ‘बॉलिवूडच्या चालीवर कव्वाली गातोय’ असला आक्षेप दर्ग्यावर आलेले भक्त घेत नाहीत. उलट ते दहा, वीसच्या नोटा अमजदच्या पुढ्यात टाकतात. दुआ केली, चादर चढवली, माथा टेकला की दर्ग्याचे सेवेकरी भाविकांच्या हातांवर तिळगुळ देतात. मुजावर मोरपिसांच्या झाडूनं सवालींच्या झुकलेल्या माथ्याखांद्यांवरून इडापिडा झटकून लावतात. तेव्हा जसं पीरासमोर एखादी नोट अर्पण होते, तसंच कव्वालांच्या पुढ्यातही पैसे टाकणं भाविकाला आपलं कर्तव्य वाटत असावं.

अमजद सांगतो, “इस दर्गा पे सेठ लोग ज्यादा आते है।” दर्ग्याकडेच्या वाटेवर फुलांची चादर-चुनरी वगैरे विकणाऱ्यांची दुकानं आहेत. कोणतंही श्रद्धास्थान रोजगाराचंही केंद्र बनणं ओघानंच आलं.

पीर कमर अली दुर्वेशच्या दरबारात भेदभाव नाही. दर्ग्याच्या पायऱ्यांवर एखादा फकीर भिक्षा मागतो तसाच एखादा अंध, कुणी पांगळा बसलेला दिसतो. एखादी काष्टा नेसलेली हिंदू विधवा म्हातारीही आढळते, सर्वांवर हजरतची रहमत समान बरसते. मुजावरना मिळतं, तसंच फकीर, विकलांग, अनाथ नि कव्वालांनाही दान मिळतं.

अमजद भिक्षेकरी नाही. कलाकार आहे. तो सकाळी अकराला दर्ग्याच्या चबुतऱ्यासमोर बैठक मारतो. हळुहळू भाविकांचा ताता वाढतो. दुपार चढते, तसतशी चबुतऱ्याभवतीची शुभ्र ग्रॅनाईटची जमीन तापते. सवालींचे अनवाणी पाय भाजू लागतात. दर्ग्याला प्रदक्षिणा घालणारे चटचट पाय उचलून दुडूदुडू चालतात. या प्रदक्षिणा करणारांत हिंदू भाविकांची संख्या जास्त.

महिलांना मजारजवळ प्रवेश नाही. म्हणून बुरख्यातील महिला चबुतऱ्याच्या व्हरांड्यात बसकण मारतात. डोळे मिटून कुराणची आयत पुटपुटत बंदगी करतात. या बायकांशेजारीच एखादी खेडूत हिंदू बाई घुमू लागते. तिच्या अंगात पीराचं वारं येतं.

PHOTO • Prashant Khunte
PHOTO • Prashant Khunte

डावीकडेः पुण्याजवळच्या खेड शिवापूरमधल्या पीर कमर अली दुर्वेश दर्ग्यावर भाविकांची वर्दळ असते आणि त्यात गरीब आणि श्रीमंत असा भेद नाही. उजवीकडेः स्त्रियांना मझारीवर जाता येत नाही त्यामुळे अनेक जणी बाहेरूनच कुराणमधल्या आयत पुटपुटत बंदगी करतात

PHOTO • Prashant Khunte

अमजद गोंड नेमाने खेड शिवापूरच्या दर्ग्यावर येतो. म्हणतो, 'उपरवाला भूखा नही सुलाता'

मजारसमोर तेवणाऱ्या चिरागमधील तेल लावल्यास विंचू-सापाच्या जहरचा असर उतरतो असं मानतात. अर्थातच सर्पदंशावर उपचारांची सोय नव्हती, त्याकाळी ही श्रद्धा रूढ झाली असणार. आता दवाखाने आहेत, पण इलाज परवडत नाही. कुणाला मूलबाळ नाही, कुणाची सून, सासू, नणंद, सासरा, नवरा कुणी ना कुणी कुणालातरी छळत असतं. कुणाचं कुणी हरवलेलं सापडत नाही.

हा समुदाय पाहून वाटतं, कित्येकांच्या मनांतली एकतारी तुटलीये. काही मनोरूग्णही दर्ग्यावर आणलेले दिसतात. जीवनाची तार जुळावी, म्हणून हे दुर्वेश दरबारात आलेत. यांच्या आर्जवांना कव्वालीचा ठेका मिळतो, धून सापडते हे किती थोर! नकळत आपल्याही मनात कव्वालीचा नाद घुमतो.आरती गाताना आपसुक वाजते, तशीच कव्वाली ऐकताना मनातल्या मनात ब्रम्हानंदी टाळी वाजते.

या माणसाचा गळा बसत नसेलॽ असं वाटतं, जणू याच्या छातीत फुफ्फुसांचं हार्मोनियम असावं.  अमजदने दोन गाण्यांच्या मध्ये मिनिटभर वक्फा घेताच, मी बोलण्याकरता वेळ मागतो.‘मी पत्रकार आहे, मुलाखत हवीये,’ असं सांगितल्यावर अमजद म्हणतो, ‘मेरेकू कुछ देना पडेंगा क्याॽ’ हे विचारताना त्यानं तर्जनीवर अंगठ्याची टकटक करत नोटांची खूण केली.मी खजिल झालो. मान नकारार्थी हलवून वेळ घेतली. नि पुन्हा कव्वाली ऐकत बसलो.

कव्वालीचं नातं रूहानी. सूफी परंपरेतून ती परमात्म्याशी तादात्म्य पावली. हल्ली टॅलेंट शो मधून दिसणारी कव्वाली रूमानी! दर्ग्यात गाणाऱ्या अमजदची कव्वाली मात्र तिसऱ्याच प्रकारची, तिला ‘खानाबदोशी’ म्हणता येईल. उदरनिर्वाहासाठी भटकत ही कव्वाली अमजदपर्यंत पोचलीय.

“ताजदारे हरम, हो निगाहे करम...
हम गरीबों के दिन भी सँवर जाएंगे...
आप के दर से खाली अगर जाएंगे...”

‘खाली अगर जाएंगे’ या ओळीतला गर्भितार्थ जाणवला. गाणाऱ्याशी बोलायची उत्सुकता अजूनच वाढली. पण तो गायचं सोडून मुलाखत कशी देणारॽ म्हणून मीदुसऱ्या दिवशीची वेळ घेतली. पुन्हा दर्ग्यावर गेलो. अमजदशी प्रत्यक्ष बोलण्यापूर्वी मनात रहेमतुल्ला पीर कमर अली दुर्वेश घोळत राहिलो.

व्हिडिओ पहाः अमजद गोंड कव्वाल

अमजद भिक्षेकरी नाही. कलाकार आहे. सकाळी अकराला दर्ग्याच्या चबुतऱ्यासमोर बैठक मारतो. हळुहळू भाविकांचा ताता वाढतो. यातही हिंदू भाविकांची संख्या जास्त

*****

सुमारे सातशे वर्षांपूर्वी हजरत शिवापूरला आले. तेव्हाची एक आख्यायिका सांगतात, गावात एक सैतान होता. लोक त्याला कंटाळलेले. गावकऱ्यांनी सैतानापासून मुक्ती द्यायची विनंती औलियांना केली. औलियांनी सैतानाला एका दगडात कैद केलं नि शाप दिला : ‘ता कयामत तक मेरे नाम से लोग तुझे उठा उठा के पटकते रहेंगे, तू लोगों को परेशान किया करता था, अब जो सवाली मेरे दरबार मे आयेंगे वो तुझे मेरे नाम से पटकेंगे।’

तेव्हापासून दर्ग्यासमोरचा ९० किलोचा दगड कुणीही अकरा लोक तर्जनी लावून उचलतात.‘याऽ कमर अली दुर्वेऽश’ - अशी आरोळी देऊन आपटतात. बोटानं उचलेला दगड श्रद्धाळूंना चमत्काराची प्रचिती वाटतो.

गावोगाव दर्गा आहेत. पण सगळीकडेच गर्दी नसते.शिवापूरला मात्र चमत्काराचा अनुभव रोजच्यारोज मिळतो. - दगड उचलून! बहुदा म्हणूनच इथे नेहमीच गर्दी असते. असं ठिकाण अमजदसारख्या कव्वालांना उदरनिर्वाहाची सोय करून देतं. शिवाय - ‘औलिया बेऔलादो को औलाद देते है।’ अशीही मान्यता आहे. अमजदचे भाऊबंदही याच मर्जवरील जडीबुटी विकणारे निघाले. योगायोगानं हेही एक नातं आहे.

PHOTO • Prashant Khunte

पीर कमर अली दुर्वेश दर्ग्यातल्या चबुतऱ्यासमोरचा ९० किलोचा दगड कुणीही अकरा लोक तर्जनी लावून उचलतात.‘याऽ कमर अली दुर्वेऽश’ - अशी आरोळी देऊन आपटतात. बोटानं उचलेला दगड श्रद्धाळूंना चमत्काराची प्रचिती वाटतो

*****

दर्ग्याच्या आवारातच मस्जिद आहे. जवळच वजूखाना. अमजदने तिथे खळखळून वजू केली. मग माझ्याशी बोलायला आला. केसांचा बुचडा बांधला. डोईवर स्कलकॅप ठेवून म्हणतो, “मै एक दो म्हैने मे आठ दस दिन यहाँच ऱ्हैता।” अमजद आधी वडलांसोबत या दर्ग्यावर येत असे. “मेरी उमर दस-पंधरा रही होगी जब आब्बा मेरेकू लेके यहाँ आए थे। अब मेरी उमर हो गयी तीस के आगे, अब मै कभी कभी मेरे बेटे को यहाँ लेके आता... ” अमजद सांगतो.

दर्ग्याखाली बेसमेंटमध्ये पथारी पसरून काही दरवेशी झोपलेले. तिथंच उशापायथ्याला अमजदनं बॅग ठेवलेली. त्यानं बॅगेतून चटई काढून अंथरली. त्यावर बसत मी विचारतो, “मग घर कुठंयॽ” तो सांगतो, “पाचोरा, जिला - जळगाव।”

आपली ओळख हिंदू की मुसलमानॽ या फंदात अमजद पडलेला दिसत नाही. मी त्याच्या कुटुंबाबद्दल विचारतो. “अब्बा है, दो माँ है। हम चार भाई, मेरे बाद शाहरूख, उसके बाद सेठ, फिर चार नंबर का बाबर। पाँच बहनो के बाद मेरा जनम हुआँ।” मी विचारतो, “तुम्हा भावंडांची नावं मुस्लिम, मग तुम्ही आदिवासी कसेॽ” तो म्हणतो, “हमारे गोंड लोगों में हिंदू और मुसलमानो के भी नाम रखते। हमारा धरम कोई नही।” त्याचं पुढचं वाक्य मोलाचं.“हमारे धरम मे जात पात नही मानते। हमारा कुछ अल्लग ही धरम है, राजगोंड बोलते हमको।”

‘मुसलमान गोंड’ कोण याचा शोध घेतला तर अशी माहिती मिळते की सुमारे तीनशे वर्षांपूर्वी या जमातीने इस्लाम कबूल केला. देवगढचे गोंड राजा भगतू शाह यांनीही इस्लाम स्वीकारला होता. १८व्या शतकात मराठ्यांनी यांची रियासत काबिज केली. तर हे मूळचे राजगोंड आता मुसलमान गोंड मानले जातात. नागपूर इलाख्यात यांचे वारस आढळतात. जळगाव जिल्ह्यातही गोंडांचं वास्तव्य आहे. पण अमजदला या इतिहासाचा मागमूस नाही. रोजची जद्दोजहद करण्यात जिंदगी गुंतलेली.

अमजद म्हणतो, “हमारेमें शादी मुसलमान से नहीं, गोंडमेही होती है। मेरी बिवी चाँदनी गोंड है। मेरी एक बेटी का नाम लाजो, एक का नाम है आलिया, और एक का नाम अलिमा। ये सब गोंड ही हुये नाॽ” नावांवरून धर्माची ओळख होते, असं अमजदला वाटत नाही. तो पुराव्यादाखल आपल्या बहिणींचेही तपशील सांगतो, “मेरी सबसे बडी बहन निशोरी। उसके बाद रेश्मा, फिर सौसाल, उसके बाद डिडोली और सबसे छोटी का नाम मेरी। अभी आप देखो मेरे बहनो के नाम गोंड है। लेकिन सबसे छोटी का नाम किरिश्चन में आता है...हमारे में ऐसा कुछ नही, जो नाम अच्छा लगता वो रख देते...” सर्वात थोरली निशोरी आता पंचेचाळिशीत आहे तर धाकटी तिशीत. या चौघींचीही लग्न गोंड मुलांशी झालीत. मात्र यातली एकही शाळेत गेलेली नाही.

अमजदची बायकोही अशिक्षित. त्यामुळं त्याच्या मुलींच्या शिक्षणाबद्दल विचारलं. तो म्हणतो, “मेरी बच्चियाँ अभी तो सरकारी स्कूल मे जाती है। लेकीन हम लडकियों को ज्यादा पढाते नहीं।”

PHOTO • Prashant Khunte
PHOTO • Prashant Khunte

अमजद गोंड जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्याचा रहिवासी. मुसलमान नाव आणि पेहराव असलेला अमजद राजगोंड आदिवासी आहे. हिंदू-मुस्लिम असा भेद त्याला मान्य नाही

मुलांबद्दल विचारल्यावर अमजद सांगतो,  “मेरे एक बेटे का नाम नवाज, दुसरे का गरीब।”  ख्वाजा मोईनुद्दिन चिश्तींना जनसामान्यांनी ‘गरीब नवाज’ ही उपाधी दिलीय. अर्थात दिनदुबळ्यांचा कैवारी! या उपाधीची विभक्ती करत अमजदनं आपल्या दोन मुलांचं नामकरण केलंय. तो म्हणतो, “नवाज तो अभी एक साल का भी नही हुआ। लेकीन गरीब को मै पढाऊंगा। उसको मेरे जैसा भटकने नही दूंगा।” गरीबचं वय आठ. तो तिसऱ्या इयत्तेत आहे. पण बापासोबत हे मूलही अनेकदा कव्वाली गात भटकतं.

या कुटुंबातील सर्वच पुरूषांनी उदरनिर्वाहासाठी कव्वालीला जवळ केलंय.

अमजद सांगतो,“हमारे लोग जंगल मे जाकर जडी बुटी ढूँढते है। किसी को औलाद नही होती, किसी को पुरानी बीमारी ऱ्हैती, ऐसे मरिजो को हमारे लोग दवा देते है।हमारे गोंड लोग ऐसे है ना, मट्टी उठाके बेच देते है। हम लोग कान का मैल निकालने का भी काम करते। खजूर भी बेचते है। घर से निकल गए, तो हजार पाचसौ कमाकेच आते। लेकीन हमारे लोग पैसा उडा देते है। जमा नही करते। हमारा एक काम है ना एक धंदा। हमारे मे बिलकुल भी किसी को नौकरी नही।”

रोजगाराचं स्थायी साधन नाही. या वास्तवाला भिडता भिडता अमजदच्या वडलांना कव्वालीचा शोध लागला. तो सांगतो, “अब्बा, मेरे दादा की तरह गाँव गाँव घुमते थे। कभी जडीबुटी, कभी खजूर बेचते थे। लेकीन अब्बा को गाने-बजाने का शौक लगा। फिर वो कव्वाली की लेन मे घुस गये, मै बचपन से अब्बा के पीछे पीछे जाता था, कव्वाली के प्रोग्राम मे बैठ बैठ के अब्बा गाने लगे। उनको देखकर मै भी सिख गया।”

मी विचारलं, “तो आप स्कूल नही गयेॽ” अमजदने खिशातून चुन्याची पुडी काढली. बोटावरचा चुना जिभेला चाटवून तो म्हणतो, “मै दुसरी तिसरी तक गया स्कूल। फिर गयाच नही। लेकीन मै पढ लिख सकता। इंग्लिश भी आता मेरेकू। मै पढा ऱ्हैता तो भोत आगे जाता। लेकीन पढा नही। उसके वजह से पीछे है हम।” अमजदच्या भावांच्या शिक्षणाचीही हीच गत. अक्षरओळखीपुरतं ही मुलं शाळेची पायरी चढली. नंतर कामधंद्याला जुंपली.

PHOTO • Prashant Khunte

माईक नाही, तरी त्याचा आवाज घुमटावरील कळसापर्यंत सहज पोचतोय. सोबतीला ना कुणी झिलकरी, ना कुणी दाद देणारं - पूर्ण सोलो परफॉर्मन्स

अमजद सांगतो,“हमारे गाँव मे पचास घर गोंड के है। बाकी हिंदू, मुसलमान, ‘जय भीम’... सब है। सबमें पढे लिख्खे मिलेंगे। हमारेमेच कोई नही। सिर्फ मेरा एक भांजा पढा है। शिवा उसका नाम। शिवा कमसेकम पंधरवी सोलहवी तक पढा। वो मिल्ट्री मे जाना चाहता है। लेकीन उधर उसका काम नही बना। अब वो पुलिस भरती मे ट्राय कर रहा है।”अमजदच्या परिचयात-नात्यात एक तरी मुलगा आहे, जो करियर, शिक्षण वगैरेचा विचार करतोय तर.

म्हटलं तर अमजदनंही करियर केलंय. “हमारी पार्टी है। केजीएन कव्वाली पार्टी।” तो सांगतो. ख्वाजा गरीब नवाज या अद्याक्षरांपासून केजीएन ही पार्टी अमजदने आपल्या भावंडासह सुरू केली. लग्नसमारंभात या पार्टीला काम मिळतं. “किती पैसे मिळतातॽ” माझा प्रश्न. “जिसका प्रोग्राम रहेगा उसके हिसाब से पाच दस हजार मिलते है। सुननेवाले भी पैसा छोडते है। सब मिलाकर पंधरा-बीस हजार की कमाई हो जाती है, एक प्रोग्राम मे।” तो सांगतो. अर्थातच हे पैसे ग्रुपमध्ये समान वाटले जातात. त्यामुळं प्रत्येकी एक-दोन हजारांहून जास्त वाट्याला येत नसावेत. लग्नसराई संपली की ‘प्रोग्राम’ मिळणं बंद होतं. मग अमजदची पावलं पुण्याकडे वळतात.

शिवापूरचा दर्गा हे अमजदसाठी हमखास उत्पन्नाचं ठिकाण. इथं दर्ग्याखाली बेसमेंटमध्ये पथारी टाकून निवाऱ्याची सोय होते. तो म्हणतो, “उप्परवाला भूखा नहीं सुलाता।” मुराद पूर्ण झाल्यानिमित्त अनेकजण दर्ग्यावर लंगर करतात. त्यातून अन्नाची सोय होते.आठवडाभर दर्ग्यावर रहायचं. कव्वाली गायची. बिदागी जमवून घरी जायचं. अशी घडी त्यानं बसवलीये. “किती कमाई होतेॽ” विचारल्यावर अमजद म्हणतो, “कभी दस, पंधरा, तो कभी बीस हजार भी। लेकिन ज्यादा की भूख अच्छी नहीं। ज्यादा पैसा रखेंगे कहाँॽ चोरी हो गया तोॽ इसलिए जित्ता भी मिलता है, समेटकर चले जाते है।”

“इतने मे गुजारा हो जाता हैॽ” मी विचारतो. “हाँ चल जाता है। फिर गाँव जाकर भी काम धंदा करते है।” याच्या मालकीची शेतजमीन नाही. मग कुठला कामधंदा असेलॽ “रेडियम का करते।” “मतलबॽ” माझा प्रश्न. “आरटीओ पे जाकर गाडियों पर नाम, नंबर निकालते।हम क्या करते मालूमॽ कव्वाली प्रोग्राम तो हमेशा नही मिलता, तो हमने झोला उठाया, रेडियम खरीदा, फिरते फिरते कोई गाडी मिला, तो उसको दुल्हन जैसा सजा दिया।” अमजदने हा एक साईड बिझनेस शोधून काढलाय. त्यातही कला आहे. तीही रस्त्यावरचीच. कमाई जेमतेम.

PHOTO • Prashant Khunte
PHOTO • Prashant Khunte

अमजदचे वडील गावोगावी जडीबुटी विकत, कव्वाली गात हिंडायचे आणि लहानगा अमजदही त्यांच्यासोबत जायचा. शाळा सुटलीच

याच्या कलेला मोठा चाहता वर्ग नाही. जीवनयापनाची साधनं मर्यादित. तरीही भारतीय लोकशाहीनं अशा माणसांच्या जीवनातही प्रकाश पोचवलाय. “मेरे अब्बा गाँव के सरपंच है।” अमजद सांगतो. अर्थातच ग्रामपंचायत स्तरांवरील आरक्षणामुळं हे घडलं असणार. अमजद म्हणतो, “अब्बा ने भोत अच्छे अच्छे काम किये, हमारी बस्ती मे चिख्खल ऱ्हैता था, अब्बा ने रोड बना दिया।”पण आपल्या समाजबांधवांबद्दल एक नाराजीही अमजदच्या मनात आहे, तो म्हणतो, “सरपंच के आगे कौन जाता है क्याॽ हमारे लोग सुनतेच नही। हाथमें पैसा आया नही की मुर्गी-मछली लाते। सब पैसा उडा डालते। सिरफ मौज करते। आगे की कोई नही सोचता।”

“तो आप वोट किस पार्टी को करते होॽ” मतदान गुप्त असतं. तरीही मी विचारतो. “पैले पंजा को करते थे। अभी तो बीजेपीच चल रहा है। जातवाले जो फैसला करते, उसकोच वोट करते। जो चल रहा है वईच चल रहा है! हमको पोलिटिक्स से मतलब नही।” अमदजचं सरळ साधं उत्तर.

PHOTO • Prashant Khunte

गावोगाव दर्गा आहेत. पण सगळीकडेच गर्दी नसते.शिवापूरला मात्र चमत्काराचा अनुभव रोजच्यारोज मिळतो. बहुदा म्हणूनच इथे नेहमीच गर्दी असते. असं ठिकाण अमजदसारख्या कव्वालांना उदरनिर्वाहाची सोय करून देतं


मी मध्येच विचारतो, “आप शराब पिते होॽ” अमजद लगबगीने म्हणतो, “नही नही... बिडी नही, शराब नही। हमारे भाई बिड्या पिते, पुड्या खाते, लेकीन मैं नही, कोई शौकच नही गंदा।” पण शौकपाणी करण्यात गैर कायॽ माझा प्रश्न. त्यावर अमजद म्हणतो, “हम भोत अल्लग लेन ने मे है। आदमी शराब पिके गाने बैठा तो उसका बेईज्जती होता नाॽ तो कायको वैसा काम करने काॽ तो बचपन से आपुन शौक ही नही करे...” ही आशादायी गोष्ट.

आपको कौनसी कव्वाली पसंद हैॽ“संस्कृत मे जो कव्वाली ऱ्हैती ना वो मुझको भोत अच्छी लगती। गाने मे भी अच्छा लगता, सुनने मे भी अच्छा लगता। ” संस्कृत कव्वालीॽ “असलम साबरी ने गायी है ना ‘किरपा करो महाराज’, कितना मीठा लगता, जो गीत दिल को छु लेता है वही संस्कृत होता है, कव्वाली भगवान के लिए गाओ या नबी के लिए, दिल को छु जाए बस्स!” भाषा नि लिपींचे भेद फक्त आपणच करत बसलोय.

ऊन चढू लागलेलं. दर्ग्यावर लोकांची वर्दळ वाढू लागली. चबुतऱ्यासमोर एक गट गोळा झाला. त्यातल्या कुणी डोईवर गोल टोपी घातली, तर कुणी रूमाल बांधला. या मंडळींनी दगडातील सैतानाची ‘याऽ कमर अली दुर्वैऽश’ अशी आरोळी ठोकून आदळआपट सुरू केली. मग मी अमजदची मुलाखत आटोपती घेतली.

कलेत कुणीही गुरू नाही, घराणं नाही, प्लॅटफॉर्म, मोठा चाहता वर्गही नाही. अशा या कलाकाराला त्याचं काम करू द्यावं. त्याचा उदरनिर्वाह चालावा, त्यानं गात रहावं. पब्लिकनं खुश व्हावं, ही दुआ करत मीही मनातल्या मनात याऽ कमर अली दुर्वेऽश अशी घोषणा दिली. नि अमजदचा निरोप घेतला.

Prashant Khunte

প্রশান্ত খুন্তে একজন স্বাধীন সাংবাদিক, লেখক ও সমাজকর্মী। প্রান্তিক জনগোষ্ঠীর খবরাখবর তুলে ধরার পাশাপাশি তিনি কৃষক হিসেবেও সক্রিয়।

Other stories by Prashant Khunte
Editor : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে