“कुणी जिंकलं काय किंवा हरलं काय? आयपीएल असू दे किंवा वर्ल्ड कप.”
ज्या देशात क्रिकेट म्हणजे जणू धर्म आहे, तिथे मदन यांचा हा प्रश्न म्हणजे पापच मानायला हवं.
पुढचं ऐका तर. “कोई भी जीते, हमें काम मिल जाता है.” ५१ वर्षीय मदन सांगतात. ते क्रिकेटचे चेंडू तयार करतात. मेरठ शहरामध्ये असे लाल आणि सफेद चेंडू बनवणारे अनेक कारखाने आहेत, त्यातला एक त्यांचा.
मार्च महिना आहे. त्यांच्या सभोवताली प्रत्येकी सहा चेंडू भरलेली किमान १०० खोकी मांडलेली आहेत. क्रिकेटचा हंगाम आता सुरू होईल आणि हे चेंडू मैदानात अवतरतील. हंगामाचा पहिला चेंडू मार्च महिन्याच्या शेवटी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पहिल्या सामन्यात टाकला जाईल. पुढचे दोन महिने आयपीएलचा जल्लोष सुरू असेल. आणि त्यानंतर जून महिन्यात आयसीसी जागतिक पाच दिवसीय टेस्ट स्पर्धा. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची मालिका.
“कोणत्या स्तरावरच्या स्पर्धांमध्ये चेंडू वापरला जाणार, कोण खेळणार, किती षटकांचा सामना असणार हे सगळं या चेंडूच्या दर्जावर अवलंबून असणार,” मदन सांगतात.
“मोठ्या स्पर्धा असल्या की क्रीडा साहित्य विकणारे किरकोळ आणि ठोक विक्रेते आधीच आमच्याशी संपर्क साधतात,” ते सांगतात. अख्ख्या देशालाच क्रिकेटने कसं वेड लावलंय याचाही त्यांच्या बोलण्यात उल्लेख येतो. “दोन महिने आधीच चेंडूंची मागणी वाढायला लागते आणि मोठ्या शहरांमधली दुकानं सामन्यांचा मुहूर्त साधत चेंडूंचा साठा करून ठेवतात.” किंमत २५० रुपये ते थेट ३,५०० रुपयांपर्यंत जाऊ शकते. कोणाची मॅच आहे आणि त्यावर किती पैसा लागलाय यावर हा सगळा हिशोब ठरतो.
मुंबई, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, बंगळुरू आणि पुण्यातल्या क्रिकेट प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मदन यांना थेट ऑर्डर मिळतात. कनिष्ठ पातळीवरचे सामने आणि सरावासाठी त्यांनी तयार केलेले चेंडू वापरले जातात.
आम्ही त्यांच्या कारखान्यात होतो. जुन्या डब्यासारख्या टीव्हीवर क्रिकेटचा सामना सुरू होता. तिथे काम करणाऱ्या आठ कारागिरांना पाहता येण्यासाठी टीव्ही थोडा वाकडा बसवण्यात आला आहे. तसंही ते फार काही पाहू शकतच नाहीत. त्यांचे फक्त कानच काम करत सतात. सगळं लक्ष हातातल्या कामावर असतं. “हमें बिलकुल फुरसत नही है,” मदन म्हणतात.
मध्यम दर्जाच्या दोन तुकडे जोडून तयार केलेल्या ६०० चेंडूंची ऑर्डर आली आहे आणि त्यासाठी लोखंडी चिमट्यांवर झुकून चेंडूला शिवण घालण्याचं किचकट काम सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या एका गिऱ्हाइकाची ऑर्डर आहे आणि त्याला तीन दिवसांत चेंडू हवे आहेत.
पाठवायच्या मालापैकी एक लाल चुटुक चेंडू मदन उचलतात. “हा चेंडू तयार करायचा तर तीन गोष्टी हव्यात. चेंडूचा वरचा पदर म्हणजे, तुरटीने कमावलेलं कातडं, आतला गोळा तयार करण्यासाठी बूच किंवा कॉर्क आणि शिवण घालण्यासाठी सुती दोरा.” या तिन्ही वस्तू मेरठ जिल्ह्यात मिळतात. “कसल्या दर्जाचा चेंडू हवा आहे हे गिऱ्हाइकाने एकदा सांगितलं की त्यानुसार आम्ही चामडं आणि कॉर्क निवडतो.”
जिल्हा उद्योग व उद्योजकता विकास केंद्राच्या (DIPEDC) अंदाजानुसार मेरठमध्ये क्रिकेटचे चेंडू तयार करणारे ३४७ कारखाने आहेत. यामध्ये औद्योगिक क्षेत्रात उभारण्यात आलेले मोठे कारखाने आहेत तसंच मेरठ जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण वस्त्यांमध्ये सुरू असणारी छोटी-मोठी युनिट देखील आहेत.
पण यामध्ये सुटं सुटं काम करणारी अनेक छोटी मोठी केंद्रं गणली जात नाहीत. घरगुती पातळीवर जिथे अख्खे चेंडू तयार होतायत किंवा अख्ख्या प्रक्रियेतलं एखादंच काम होतं अशा उत्पादन केंद्रांचा यात समावेश नाही. यामध्ये मेरठ जिल्ह्यातल्या जंगेठी, गागुल आणि भवानपूरसारख्या गावांमध्ये अशा पद्धतीचं उत्पादन होतं. “आज गावों के बिना बिलकुल पूर्ती नही होगी मेरठ में,” मदन म्हणतात.
“गावात काम करणारे किंवा शहरातल्या मोठ्या कारखान्यांमधले बहुतेक कारागीर जटाव आहेत. क्रिकेटचे चेंडू चामड्याचे असतात ना,” ते सांगतात. १९०४ च्या जिल्हा गॅझेटनुसार मेरठमध्ये चामड्याच्या वस्तू उद्योगामध्ये काम करणाऱ्या कारागिरांमध्ये सगळ्यात जास्त संख्या जटाव किंवा चमार (उत्तर प्रदेशात अनुसूचित जातीत समाविष्ट) जातीच्या लोकांची होती. “क्रिकेटचा चेंडू चामड्याचा चालतो, त्याचं कुणाला काही वाटत नाही. पण चामड्याचं काम म्हटल्यावर लोक नाक मुरडतात,” ते म्हणतात.
त्यांच्या कुटुंबाचा शोभापूरमध्ये स्वतःच्या मालकीचा कातडं कमावण्याचा कारखाना आहे. क्रिकेटचे चेंडू तयार करण्यासाठी तुरटीचा वापर करून कातडं कमावण्याचं काम फक्त इथेच होतं (Read: Meerut's leather workers: not out, still batting ). “तुरटी वापरून कमावलेल्या कातड्याची मागणी वाढतच जात होती. तेव्हा मी अंदाज बांधला की क्रिकेटच्या चेंडूंच्या मागणीत कधीच खंड पडणार नाही,” ते सांगतात. आणि त्याच जोरावर वीस वर्षांपूर्वी त्यांनी मे. बी. डी. अँड सन्स हा कारखाना सुरू केला. या भागात क्रिकेटचे चेंडू तयार करणाऱ्या दोन युनिटपैकी एक.
एक चेंडू तयार करण्यासाठी किती वेळ लागतो असं नक्की सांगणं मुश्किल असल्याचं मदन म्हणतात. कारण किती तरी प्रक्रिया एकत्रित केल्या जातात. कोणता ऋतू सुरू आहे, चामडं कसं आहे यावरही किती वेळ लागणार हे ठरतं. “दो हफ्ते लगते हैं एक गेंद को तय्यार होने में कम से कम,” ते म्हणतात.
मदन यांच्या कारखान्यात सगळ्यात आधी तुरटी वापरून कातडं कमावण्याचं काम केलं जातं. त्यानंतर त्याला लाल रंग दिला जातो. उन्हात सुकवल्यावर त्याला चरबीने मालिश केली जाते. लाकडी हातोडीचा वापर करून ते चांगलं मऊ केलं जातं. “पांढऱ्या चेंडूसाठी रंगकामाची गरज नसते. कारण तुरटीने कमावलेलं कातडं पांढरंच असतं. त्या चामड्याची मालिश गाईच्या दुधापासून तयार केलेल्या दह्याने केली जाते,” मदन सांगतात.
“लाइन से काम होवे है, और एक कारागीर एक ही काम करें है,” ते सांगतात. कारागीर चामड्याचे दोन अर्धगोल कापतो किंवा चार पाकळ्या. क्रिकेटचा चेंडू दोन किंवा चार तुकड्यांपासून तयार केलेला असतो.
“दोन्ही तुकडे अगदी सारख्या जाडीचे हवेत, त्यावरची केसांची छिद्रंही अगदी सारखी हवीत. इस वक्त छांटने में गलती हो गई तो समझो गेंद डीशेप होगा ही,” मदन सांगतात.
चेंडू तयार करण्याच्या प्रक्रियेतलं सगळ्यात अवघड काम कोणतं असेल तर सुती दोऱ्याने चेंडूची शिलाई. या दोऱ्याच्या टोकांना डुकराचे टोकदार केस जोडलेले असतात. “सुयांऐवजी हे केस वापरले जातात. मजबूत पण लवचिक असतात आणि खूप जास्त तीक्ष्ण नसल्यामुळे चामडं फाटत नाही,” मदन म्हणतात. “बरं, लांबही असतात, धरायला सोपे आणि शिवणाऱ्याच्या बोटांना इजाही होत नाही.”
“लेकिन सिर्फ इसी वजह से हमारे मुसलमान भाई यह काम नही कर सकते. उनको सूअर से दिक्कत होती है ना,” मदन भाई म्हणतात.
“चार पाकळ्यांच्या चेंडूच्या शिलाईत तीन प्रकारचे टाके घालावे लागतात. ते कसब शिकायला मात्र अनेक वर्षांची मेहनत पाहिजे,” मदन यांच्या कारखान्यातले सर्वात अनुभवी कारागीर धरम सिंग सांगतात. ते जम्मू काश्मीरच्या गिऱ्हाइकाच्या चेंडूंवर रोगण लावण्याचं काम करतायत. “एखाद्या कारागिराला एकानंतर दुसरा टाका जमायला लागला की त्याला मिळणारा मेहनतानाही वाढतो.” प्रत्येक टाक्याचं तंत्र वेगळं असतं आणि त्याचा उपयोगही वेगवेगळा असतो.
सर्वात आधी चामड्याच्या दोन पाकळ्या जोडून एक अर्धगोल तयार केला जातो. याला म्हणतात 'जुडाई'. पहिली शिवण नवशिके कारागीर घालतात आणि प्रत्येक अर्धगोलामागे त्यांना साडेसात रुपये मिळतात. “जुडाईनंतर या अर्धगोलांना आतून चामड्याच्या पातळ पाकळ्या लावल्या जातात. या तुकड्यांना म्हणतात 'लप्पे',” धरम सिंग सांगतात. आतून अस्तर लावलेल्या या अर्धगोलांना नंतर गोलाई यंत्रावर नीट गोल आकार दिला जातो.
कारागीर कॉर्कच्या एका गोलावर हे दोन्ही अर्धगोल पक्के बसवतात आणि दोन्ही बाजूंनी टाके घालतात. याला म्हणतात 'कप जुडाई'. या कामासाठी १७ ते १९ रुपये नग इतकी मजुरी मिळते. दोन तुकड्यांच्या चेंडूला पण अशीच कप जुडाई करावी लागते.
“दुसरी शिवण पूर्ण झाल्यावरच आम्ही याला 'गेंद' [चेंडू] म्हणायला लागतो,” धरम सिंग सांगतात. “पहली बार चमडा एक गेंद का आकार लेता है.”
सूरज कुंड रोडवरच्या एका कारखान्यात ३५ वर्षांपूर्वी चेंडू बनवण्याची कला धरम सिंग शिकले. १९५० च्या दशकात तिथे क्रीडा साहित्य तयार होत असे. फाळणीनंतर सियालकोटहून विस्थापित झालेल्या लोकांना मेरठच्या सूरज कुंज रोड आणि व्हिक्टोरिया पार्क परिसरातल्या स्पोर्ट्स कॉलनींमध्ये वसवण्यात आलं होतं. त्यांच्यापैकी काही जणांनी क्रीडा साहित्याचे उद्योग सुरू केले. “मेरठ शहराच्या आसपासच्या गावातले लोक शहरात यायचे, ही कला शिकून गावी परत जायचे.”
चार पाकळ्यांच्या चेंडूसाठी तिसरी शिवण फार महत्त्वाची असते. त्यासाठी चेंडूवरती फार नाजूक पद्धतीने चार समांतर शिवणी घालाव्या लागतात. “सगळ्यात चांगल्या चेंडूवर सुमारे ८० टाके असतात,” ते सांगतात. टाक्यांच्या संख्येप्रमाणे कारागिराला चेंडूमागे ३५-५० रुपये मजुरी मिळते. दोन तुकड्यांच्या चेंडूची शिलाई यंत्रावर होते.
“स्पिनर हो या फास्ट बोलर, दोनो सीम के सहारे ही गेंद फेंकते है,” धरम सांगतात. शिवण पूर्ण झाली की चेंडूच्या वरती येणारी ही शिवण हाताने आत दाबली जाते. त्यानंतर चेंडूला रोगण लावून छाप मारला जातो. “खिलाडी क्या पहचानते है? सिर्फ चमकती हुई गेंद, सोने की मुहर के साथ.”
“क्रिकेट बॉल की एक खास बात बताइये,” मदन मला विचारतात.
“फक्त या एकाच खेळामध्ये सामन्यांचं स्वरुप बदलंय,” ते म्हणतात. “लेकिन बनानेवाला और बनाने की तकनीक, तरीका और चीजें बिलकुल नही बदली.”
मदन यांच्याकडे काम करणारे कारागिर दिवसभरात सरासरी २०० चेंडू तयार करू शकतात. एक चेंडू किंवा चेंडूंची एक बॅच तयार करण्यासाठी साधारणपणे २ आठवडे लागतात. कातडं कमावण्यापासून ते चेंडूवरचा शेवटचा हात आणि कलाकुसर असे सगळे टप्पे पाहता किमान ११ कारागीर हवेत. क्रिकेट संघात ११ खेळाडू असतात, तसेच,” आपण केलेल्या कोटीवर स्वतःच खूश होत मदन सांगतात.
“पर खेल के असली कारागिर तो खिलाडी ही होवे है,” ते म्हणतात.
या वार्तांकनासाठी बहुमोल अशी मदत केल्याबद्दल भारत भूषण यांचे आभार.
मृणालिनी मुखर्जी फौंडेशनकडून मिळालेल्या फेलोशिप अंतर्गत हे वार्तांकन करण्यात आलं आहे.