थेट पोलिस स्टेशनच्या बाहेरच आपल्या बायकोवर हात टाकायला त्याला काहीच वाटत नव्हतं. हौसाबाई पाटलांच्या दारुड्या नवऱ्याने तिला निर्दयपणे मारायला सुरुवात केली. “तसला मार खाऊन माझी पाठ दुखायला लागली,” त्या सांगतात. “हे घडलं [सांगलीतल्या] भवानी नगरच्या लहानशा पोलिस चौकीच्या बाहेर.” चौकीतल्या चारपैकी दोनच पोलिस जागेवर होते. “दोघं जेवायला गेले होते.” मग त्यांच्या झिंगलेल्या नवऱ्याने “एक मोठा दगड उचलला. ‘आता हितंच या दगडानं तुझा जीव घेतो बघ,’ तो गुरकावला.”
त्याचा हा आरडाओरडा ऐकून चौकीतले दोघं पोलिस बाहेर आले. “त्यांनी आमचं भांडण सोडवायचा प्रयत्न केला.” तेव्हाच हौसाबाई तिथेच असलेल्या त्यांच्या भावाला विनवून सांगू पाहत होत्या की त्यांना असल्या मारकुट्या नवऱ्याकडे नांदाया जायचं नाही म्हणून. “मी म्हटलं की मी जाणार न्हाई. न्हाईच. मी हितं राहीन, तुझ्या घराशेजारीच मला छोटी जागा घेऊन दे. नवऱ्याबरोबर जाऊन मरण्यापेक्षा, मी हितंच राहीन, काहीबाही करून, जे मिळेल त्यावर गुजराण करीन... पण आता याफुडं मला त्याचा मार खायाचा न्हाई.” पण त्यांच्या भावानं काही त्यांचं ऐकलं नाही.
पोलिसांनी किती तरी वेळ त्या दोघांना समजावयचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी समझौता घडवून आणला आणि या जोडप्याला त्यांच्या गावी जाणाऱ्या गाडीत बसवून दिलं. “आमची तिकिटंदेखील त्यांनीच काढली अन् माझ्या हातात दिली. ते माझ्या नवऱ्याला म्हटलं – आता तुला तुझी बायको पाहिजे न्हवं का, सांभाळ तिला. आन् भांडू नगा.”
हे सगळं घडत असताना तिकडे हौसाबाईंच्या साथीदारांनी पोलिस चौकी लुटली होती, तिथे असलेल्या चारही रायफली पळवल्या होत्या. आणि ते सगळं करता यावं म्हणूनच हौसाबाई, आणि त्यांच्या तोतया ‘पतीने’ आणि ‘भावाने’ हा सगळं खरंच वेदनादायी नाटक वठवलं होतं, जेणेकरून पोलिसांचं लक्ष विचलित होईल. साल होतं १९४३, हौसाबाईंचं वय होतं १७, लग्नाला तीन वर्षं झाली होती. इंग्रज राजवटीच्या विरोधात कारवायांसाठी बाहेर पडताना त्या त्यांच्या तान्ह्या मुलाला, सुभाषला आत्यापाशी ठेऊन बाहेर पडत असत. आज, ७४ वर्षांनंतरही त्या तोतया नवऱ्यावरची त्यांची नाराजी मात्र कायम आहे, त्यांचं भांडण खरं वाटावं म्हणून त्याने किती जोरात मारलं होतं त्यांना. आज ९१ व्या वर्षी सांगली जिल्ह्याच्या विट्यात त्या आम्हाला ही सगळी कहाणी सांगतायत. “आज काल डोळ्याला, कानाला जरा त्रास व्हायलाय, पर मीच सगळं सांगते तुमाला.”
‘त्या खोक्यावर डोळा लागून चालणार नव्हतं, तो बुडू द्यायाचा नव्हता. मला हिरीत पोहता यायचं, पण नदीचं पाणी - वाहतं होतं की ते. आन् मांडोवी काय छोटी नदी हाय होय?’
या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून हौसाबाई पाटील लढल्यायत. त्या आणि त्यांच्या सोबतचे सगळे कलाकार तुफान सेनेचे सदस्य होते. १९४३ मध्ये साताऱ्यात इंग्रज राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याचं जाहीर करणाऱ्या भूमीगत, हंगामी सरकारची, प्रति सरकारची सशस्त्र सेना म्हणजे तुफान सेना. कुंडल हे प्रतिसरकारचं केंद्र आणि जवळच्या ६०० हून अधिक गावांमध्ये प्रति सरकारचा अंमल होता. हौसाबाईंचे वडील, नाना पाटील प्रति सरकारचे प्रमुख होते.
१९४३ ते १९४६ दरम्यान हौसाबाई (बहुतेक वेळा त्यांना हौसाताई म्हटलं जातं) इंग्रजांच्या आगगाड्यांवर हल्ले करणाऱ्या, पोलिसांची शस्त्रं पळवणाऱ्या आणि डाक बंगले पेटवून देणाऱ्या क्रांतीकारकांच्या चमूत होत्या. (त्या काळात या बंगल्यांमध्ये पोस्ट ऑफिसं असायची, कामानिमित्त प्रवास करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी राहण्यासाठी जागा म्हणून तर कधी कधी चक्क तात्पुरतं न्यायालय म्हणून सुद्धा या जागा वापरल्या जायच्या). १९४४ मध्ये त्यांनी गोव्यामध्ये देखील भूमीगत कारवायांमध्ये भाग घेतला होता. तेव्हा गोव्यात पोर्तुगिजांची राजवट होती. भर मध्य रात्री एका लाकडी खोक्यावर तरंगत तरंगत त्यांनी शेजारी पोहणाऱ्या सोबत्यांसोबत मांडोवी नदी पार केली होती. “स्वातंत्र्याच्या चळवळीत मी माझे मावस भाऊ बापू लाड यांच्यासोबत थोडं काही तरी काम केलंया. लई काय भलं मोठं मी केलेलं न्हाई.”
“मी तीन वर्षांची होते तवा माझी आई वारली,” त्या सांगतात. “माझ्या वडलांना तेव्हाच स्वातंत्र्य चळवळीने भारून टाकलं होतं. त्या आधी देखील जोतिबा फुल्यांनी सांगितलेल्या मूल्यांच्या मार्गाने ते जात होते. आणि त्यानंतर महात्मा गांधींच्या. त्यांनी गावातली तलाठ्याची नोकरी सोडली आणि चळवळीत उडी घेतली... आपलं स्वतःचं सरकार यावं हेच सगळ्यांचं ध्येय होतं. आणि इंग्रज राजवटीला असा काही दणका द्यायचा की त्यांच्यापासून आपली सुटका व्हावी.”
नाना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात वॉरंट निघाले होते. “त्यांना त्यांचं काम भूमीगत राहूनच करावं लागत होतं.” नाना पाटील गावोगाव फिरत होते, जोरदार भाषणं करून लोकांना बंड करण्यासाठी चिथावणी देत होते. “[त्यानंतर] ते परत भूमीगत होत. त्यांच्याबरोबर कमीत कमी ५०० माणसं असतील, आणि त्यांच्या सगळ्यांच्या नावाने वॉरंट निघाली होती.”
असलं धारिष्ट्य दाखवल्याची किंमत त्यांना मोजावीच लागणार होती. इंग्रजांनी नाना पाटलांची शेतजमीन आणि सगळी मालमत्ता ताब्यात घेतली. ते भूमीगत होते मात्र त्यांच्या घरच्यांना फार अपेष्टा सोसाव्या लागल्या.
“सरकारने मग आमच्या घरावर जप्ती आणली. आम्ही स्वयंपाक करत होतो – चुलीवर भाकरी आणि वांग्याचं कालवण केलेलं होतं – आन् ते आले. आम्ही एका खोलीत कसाबसा आसरा घेतला. माझी आजी, मी आणि माझी आत्ती... आमचं मोठं खटलं होतं तिथे.”
इंग्रजांनी हौसाबाईंच्या कुटुंबाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला, पण खरीददारच मिळेना. त्या सांगतातः “रोज सकाळी दवंडी निघायचीः ‘नाना पाटलाची शेतजमीन इकायची हो.’. [पण] लोक म्हणायचं, आपण नानांचं रान कशापायी घ्यावं? त्यांनी काय कुणावर दरोडा टाकलाय का कुणाचा जीव घेतलाय?”
असं असलं तरी “आम्हाला काय ती जमीन कसता येत नव्हती... [म्हणून] मग पोटापाण्यासाठी काही तरी रोजगार करावा लागणार होता. लक्षात येतंय ना रोजगार म्हंजी? म्हंजी काय तर आम्हाला लोकाच्यात कामाला जावं लागणार हुतं.” पण इंग्रज राजवट छळ करेल याची लोकांना भीती होती. “त्यामुळे आम्हाला गावात कुणी कामच देईना.” मग एका मामाने त्यांना एक बैलजोडी आणि गाडी देऊ केली. “ती गाडी भाड्याने देऊन कसं तरी कमाई व्हावी.”
“आम्ही गूळ, भुईमूग आणि ज्वारी वाहून न्यायचो. आमची गाडी येडे मच्छिंद्रापासून [नानांचं गाव] १२ किलोमीटरवरच्या ताकारीपर्यंत गेली तर आम्हाला ३ रुपये मिळायचं. थेट कराडपर्यंत [२० किलोमीटरवर] तर ५ रुपये. बास [तितकंच भाडं मिळायचं].”
“माझी आजी रानातून काही तरी हुडकून आणायची. मी आणि माझी आत्ती बैलाला खाऊ घालायचो. आमची गाडी [आणि आमची जिंदगानी] त्यांच्याच भरोशावर होती, त्यामुळे त्यांचं दाणापाणी नीट व्हाया नको का? गावातलं लोक आमच्याशी बोलायचं बी न्हाईत. दुकानदार साधं मीठसुद्धा देईना गेलता, [म्हणायचा] ‘दुसरीकडून कुठून तरी घ्या.’ कधी कधी तर आम्ही दुसऱ्यांच्यात कांडायला जायचो, बोलावलं नसलं तरी. – काही तरी खायला मिळेल वाटायचं. न्हाईच तर आम्ही उंबराच्या दोड्या आणायचो आणि त्याचं कालवण करून खायचो.”
भूमीगत कारवायांमध्ये हौसाबाईंचं मुख्य काम असायचं माहिती गोळा करण्याचं. त्यांनी इतर काही सहकाऱ्यांसोबत काही हल्ल्यांसाठी आवश्यक माहिती मिळवली होती, उदा. (सध्याच्या सातारा जिल्ह्यातल्या) वांगीचा हल्ला जिथे डाक बंगला पेटवून दिला होता. “त्यांचं काम होतं – किती पोलिस आहेत, कधी येतात, कधी जातात, याची सगळ्याची माहिती ठेवायची,” त्यांचे पुत्र अॅड. सुभाष पाटील सांगतात. “बंगला पेटवून द्यायचं काम वेगळ्यांनीच केलं होतं.” त्या भागात भरपूर बंगले होते. “ते सगळे त्यांनी पेटवून दिले,” ते सांगतात.
भूमीगत कारवायांमध्ये इतर कुणी स्त्रिया होत्या का? हो, त्या सांगतात. “शालूताई [मास्तरांची बायको], लीलाताई पाटील, लक्ष्मीबाई नायकवडी, राजमती पाटील – या काही होत्या बाया.”
हौसाबाईंनी जे अनेक धाडसी प्रताप केले ते ‘शेलार मामां’च्या आणि विख्यात क्रांतीकारी जी. डी. बापू लाड यांच्या सोबत केले होते. शेलार मामा हे त्यांच्या सोबती कृष्णा साळुंकी यांचं टोपण नाव.
बापू लाड, प्रति सरकार आणि तुफान सेनेचे एक ज्येष्ठ नेते म्हणजे “माझे मावस भाऊ,” त्या सांगतात. “बापू मला सारखं निरोप धाडायचं – ‘तू घरात थांबू नको!’ आम्ही अगदी भावा-बहिणीसारखं काम करायचो. पण लोकांना काय, शक घ्यायला कारणच लागतंय. पण माझ्या मालकाला मात्र माहित होतं की मी आणि बापू खरंच भावा-बहिणीसारखे होतो. माझ्या मालकाच्या नावे [देखील] वॉरंट निघालं होतं. गोव्याला बी मी आणि बापूच संगं होतो.”
गोव्याहून साताऱ्याला सेनेसाठी शस्त्र घेऊन जात असताना एका सहकाऱ्याला पोर्तुगीज पोलिसांनी पकडलं होतं. त्याला सोडवण्यासाठी गोव्याची धाडसी मोहीम आखण्यात आली होती. “तर, तिथे एक कार्यकर्ते होते, बाळ जोशी. त्यांना शस्त्रं घेऊन येताना पकडलं होतं. थेट फासावरही दिलं असतं त्यांना. बापू म्हणले, ‘त्यांना तुरुंगातून सोडवून आणंपातुर आपण काही परत यायाचं न्हाई’.”
हौसाबाई जोशींना त्यांची ‘बहीण’ असल्याचं भासवून तुरुंगात जाऊन भेटल्या. सोबत त्यांच्या सुटकेचा मार्ग “लिहिलेला एक [छोटा] कागद मी अंबाड्यात लपवून सोबत नेलता.” पण, त्यांना पोलिसांच्या हाती न लागलेली शस्त्रंदेखील घेऊन यायचं होतं. आता परतणं धोक्याचं होतं.
“पोलिसानं मला पाहिलं होतं आणि त्यानं मला वळखिलं असतं.” त्यामुळे त्यांनी रेल्वेपेक्षा रस्त्यानेच प्रवास करायचं ठरवलं. “पण मांडोवी नदीचं काय – एकही होडी न्हाई, अगदी मासेमारीची नावही न्हाई. आम्हाला पुरतं कळून चुकलं की आम्हाला आता पोहूनच पल्याड जावं लागणार. नाही तर मग बेड्या पडल्याच समजा. पण नदी पार कशी करायची? माशाच्या जाळ्यात ठेवलेला एक खोका [आम्हाला सापडला].” त्या खोक्यावर ओणवं पडून शेजारी पोहणाऱ्या आपल्या सोबत्यांच्या साथीने त्यांनी मध्यरात्री नदी पार केली.
“त्या खोक्यावर डोळा लागून चालणार नव्हतं, तो बुडू द्यायाचा नव्हता. मला हिरीत पोहता यायचं, पण नदीचं पाणी वाहतं होतं की ते. आन् मांडोवी काय छोटी नदी हाय होय? [आमच्यातले] बाकीचे काही पोहत होते... त्यांनी अंगातली कोरडी कापडं डोक्याला गुंडाळली – नंतर घालाया.” तर अशा रितीने त्यांनी नदी पार केली.
“[मग] आम्ही जंगलातून पायी निगालो... तब्बल दोन दीस. कसं तरी आम्हाला त्या जंगलातून बाहेर पडायचा रस्ता गावला. घरी परतायला आम्हाला तब्बल १५ दीस लागलं.”
बापू आणि हौसाबाईंनी मागे राहिलेली शस्त्रं स्वतः गोळा केली नसली तरी त्यांनी ती साताऱ्यापर्यंत ती पोचवायची त्यांनी सोय लावली. त्यानंतर काही दिवसांनी बाळ जोशींनी तुरुंगातून सुटका करून घेतली.
पारीचे आम्ही सगळे निघालो तेव्हा लुकलुकत्या डोळ्यांनी हौसाबाई आम्हाला विचारतात, “मंग, तुमच्यासोबत नेताय का न्हाई मला?”
“कुठे, हौसाबाई?”
“तुमच्यासंगं काम कराया,” हसत हसत त्या म्हणाल्या.
अनुवादः मेधा काळे