“माझा जन्म झाला ना, तेव्हापासनं हे असंच आहे, मजुरीच सुरू आहे,” रत्नव्वा एस. हरिजन सांगतात. ऑगस्ट महिन्यातल्या एका सकाळी आम्ही त्यांच्या घरून ज्या शेतात त्या मजुरीला जातात तिथे निघालो होतो. आजूबाजूला धुकं पसरलेलं होतं. सडपातळ बांध्याच्या, पाठीला थोडा बाक आलेल्या रत्नव्वा इतक्या झपाझप चालतात त्यांना थोडंसं लंगडत चालावं लागतं हे लक्षात सुद्धा येत नाही.
शेतात पोचल्यावर कामावर घालायचे कपडे त्या पिशवीतून काढतात. सर्वात आधी त्या साडीवरूनच एक चुरगळलेला निळा शर्ट घालतात. त्यानंतर एक लांबसर पिवळा गाऊन कंबरेला बांधतात, जेणेकरून परागकणांचा स्पर्श होणार नाही. मग एका झिरझिरीत हिरव्या कापडाचा ओचा त्या कंबरेला बांधतात ज्यात भेंडीची 'गांडु हावु' (नर फुलं) ठेवता येतात. डोक्याला विटलेला पांढरा पंचा बांधतात आणि ४५ वर्षीय रत्नव्वा डाव्या हाताच्या करंगळीला धागे बांधून कामाला सज्ज होतात.
एकेक फुलाच्या पाकळ्या वाकवून नर फुलाच्या पुंकेसरावरचे परागकण स्त्री केसरावर चोळतात. परागीकरण झालेल्या मादी फुलाला खूण म्हणून धागा बांधून ठेवतात. ओणवं उभं राहून भेंडीच्या सरीतल्या प्रत्येक रोपावरच्या प्रत्येक फुलाचं असं परागीकरण त्या करतात. या कामात त्या एकदम पटाईत आहेत. लहान असल्यापासून त्या हे काम करतायत.
रत्नव्वा माडिगा समाजाच्या आहेत. हा कर्नाटकातला दलित समाज आहे. त्या कर्नाटकाच्या हावेरी जिल्ह्यातल्या राणीबेन्नूर तालुक्यात कोननताळी गावाच्या मडिगारा केरी (मडिगा वस्ती) मध्ये राहतात.
त्यांचा रोजचा दिवस पहाटे ४ वाजता सुरू होतो. घरातलं सगळं काम उरकून, घरच्यांना चहा-नाष्टा देऊन झाला की त्या दुपारचा स्वयंपाक उरकतात, घाईघाईत दोन घास खाऊन सकाळी ९ वाजता त्या शेतात जायला निघतात.
दुपार होईपर्यंत जवळपास तीन एकरावरच्या भेंडीच्या २०० रोपांवरच्या फुलांचं परागीकरण केलं जातं. त्यानंतर दुपारी जेवणाची अर्ध्या तासाची छोटीशी सुटी असते. मग परत शेतात येऊन कळ्यांच्या बंद पाकळ्या काढून टाकतात. दुसऱ्या दिवशी आतल्या स्त्रीकेसराचं परागीकरण करण्याची ही तयारी. या सगळ्या कामासाठी जमीनमालकाने ठरवलेला रोज आहे २०० रुपये.
हाताने परागीकरण करण्याचं कौशल्य त्या फार लवकर शिकल्या. “आम्हाला जमीन नाही त्यामुळे आम्ही कायम दुसऱ्याच्या रानातच मजुरी करत आलोय,” त्या सांगतात. “मी काही शाळेत गेले नाही. न्हाण यायच्या आधीपासनं मी काम करतीये. कसंय, आम्ही गरीब माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला हे करावंच लागणार. त्या काळी मी खुरपणी आणि टोमॅटोच्या रोपांचं क्रॉसिंग करायचे.” दोन वाणांच्या संकराचं काम त्या हाताने करतात, त्याला त्या 'क्रॉस' किंवा 'क्रॉसिंग' असे शब्द वापरतात.
रत्नव्वांचा जन्म राणीबेन्नूर तालुक्यातल्या तिरुमालादेवरकोप्पा गावात एका भूमीहीन शेतमजूर कुटुंबात झाला. हावेरीत एकूण कामगारांपैकी शेतमजुरांचं प्रमाण ४२.६ टक्के आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मजुरांमध्ये स्त्रियांचं प्रमाण जवळपास ७० टक्के आहे (जनगणना, २०११). त्यामुळे रत्नव्वा अगदी लहान वयात मजुरीला जायला लागल्या, याच वावगं काहीच नाही.
आठ भावंडांमध्ये सगळ्यात थोरल्या, त्यातही पाठच्या अनेक बहिणी, त्यामुळे रत्नव्वाचं लग्न कोननताळीतल्या सन्नचौदप्पा एम हरिजन यांच्याशी लावून देण्यात आलं. “माझे वडील दारूडे होते. त्यामुळे अगदी न्हाण यायच्या आधीच, पोरवयात माझं लग्न लावून दिलं होतं. तेव्हा माझं वय किती होतं ते काही मला माहित नाही,” त्या सांगतात.
तिरुमालादेवरकोप्पामध्ये रत्नव्वांना हाताने परागीकरण करण्याचे दिवसाचे ७० रुपये मिळायचे. १५ वर्षांपूर्वी त्यांनी कोननताळीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा रोज १०० रुपये इतका होता. “त्यांनी [जमीनदार] दर वर्षी १० रुपये वाढ केली आणि आता मला २०० रुपये मिळतात.”
कोननताळीत बीजनिर्मितीमध्ये हाताने परागीकरण करण्याची प्रक्रिया फार मोलाची आहे. इथे भेंडी, टोमॅटो, दोडकं आणि काकडीच्या संकरित जातींची लागवड होते. शक्यतो पावसाळा आणि हिवाळ्यात या भाज्या घेतल्या जातात. भाजीचं बी आणि कापूस ही या गावातली मुख्य उत्पादनं. गावाचा एकूण पेरा ५६८ हेक्टर क्षेत्रावर होतो (जनगणना, २०११). कर्नाटक आणि महाराष्ट्र ही दोन राज्यं देशामध्ये भाजीच्या बियांचं उत्पादन करण्यात आघाडीवर आहेत आणि यात खाजगी क्षेत्राचा मोठा वाटा आहे.
हाताने परागीकरण करण्याची प्रक्रिया सोपी नाही. त्यासाठी तुमची नजर अगदी तेज पाहिजे, हाताच्या हालचाली एकदम नाजूक पण सफाईदार, एकाग्रपणे आणि चिकाटीने काम करण्याची वृत्ती असली पाहिजे कारण तुम्ही फुलाचे अगदी नाजूक भाग हाताळणार असता. या कामासाठी पुरुषांपेक्षा बायांना मागणी जास्त असते. इतकी की परागीकरणाच्या हंगामात त्यांना कामावर घेऊन येण्यासाठी कोननताळीच्या आजूबाजूच्या गावांमधून शेतमजूर बायांना घेऊन येण्यासाठी रिक्षा पाठवल्या जातात.
रत्नव्वा अगदी दररोज परमेशप्पा पकीरप्पा जडार या अंबिगा (इतर मागासवर्गीय) समाजाच्या जमीनदाराच्या शेतात काम करतात. त्यांच्याकडून रत्नव्वांनी १.५ लाखांचं कर्ज घेतलंय. त्या सांगतात की त्यांच्याकडून घेतलेलं बिनव्याजी कर्ज म्हणजे त्यांच्या कामासाठीची उचल मानली जाते.
“सध्या मला हातात पैसे मिळत नाहीत. जमीनदार [किती दिवस काम केलं त्याचा] हिशोब ठेवतात आणि तितका पैसा कर्जाची फेड म्हणून वळता करून घेतात,” त्या सांगतात. “आम्ही शेतात काम करून कर्ज फेडतो आणि पुन्हा पैसा लागणार असेल तेव्हा उचल घेतो. त्यामुळे उसनवारी आणि फेड चालूच असते.”
रत्नव्वांसाठी सगळ्यात कठीण काळ म्हणजे पावसाळा. जुलै ते सप्टेंबर या काळात भेंडी आणि काकडीच्या रोपांवर परागीकरण करतात. काकडीच्या रोपांवर काम करायचं म्हणजे सलग सहा तास काम. त्यात भेंडीच्या फुलांनी बोटं पण कापू शकतात.
ऑगस्ट महिन्यात माझी रत्नव्वांची भेट झाली त्या दिवशी त्यांनी भेंडीच्या फुलांच्या पाकळ्या सोलण्यासाठी एक युक्ती केली होती. त्यांनी चक्क आपल्या मुलाचं नख अंगठ्याला चिकटवलं होतं आणि त्याने त्या पाकळ्या उकलत होत्या. परमेशप्पांच्या शेतावर त्यांनी दोन दिवसांची सुटी घेतली होती. त्यांचा मुलगा लोकेश, वय १८ आजारी होता त्यामुळे त्याच्या जागी त्यांना दुसऱ्या एका शेतात कामाला जायचं होतं. त्याच्या कॉलेजच्या प्रवेशावेळी ३,००० रुपयांचं कर्ज काढलं होतं ते फेडण्यासाठी आता लोकेशसुद्धा काम करून आपल्या आईला हातभार लावतोय.
खरं तर आपलं सहा जणांचं कुटुंब चालवण्याची सगळी जबाबदारी एकट्या रत्नव्वांच्या खांद्यावर आहे. नवरा, सासू, कॉलेजात जाणारी तीन मुलं आणि स्वतःचा रोजचा खर्च तर भागवावाच लागतो त्यात त्यांचे पती सतत आजारी असल्याने त्यांच्या महागड्या उपचारांचा भारही रत्नव्वांवरच आहे.
ऑगस्ट महिन्यातच त्यांनी नवऱ्याच्या उपचारासाठी जमीनदाराकडून २२,००० रुपये उसने घेतले होते. काविळ होऊन गेल्यानंतर त्यांच्या रक्तातल्या पांढऱ्या पेशी अचानक कमी झाल्या आणि त्यांना रक्त चढवावं लागणार होतं. अशी सोय असणारं सगळ्यात जवळचं सरकारी रुग्णालय थेट मंगळुरूत, इथून ३०० किलोमीटरवर आहे.
जमीनदार त्यांना जेव्हा लागेल तेव्हा पैसे देतो. “अन्नधान्यासाठी, दवाखान्यासाठी अगदी रोजच्या घरखर्चासाठीसुद्धा मला पैसे उसने घ्यावे लागतात. त्यांना आमच्या समोर काय अडचणी असतात ते फारसं कळत नसलं तरी त्यांनी इतका पैसा आम्हाला उसना दिलाय. मी केवळ त्यांच्याकडेच जाते, बाकी कुठेच नाही,” रत्नव्वा सांगतात. “मी अजूनही सगळं कर्ज फेडलंही नाहीये. एकटीला फेड कशी जमावी?”
पैशासाठी सतत उसनवारी करावी लागत असल्याने, त्यासाठी जमीनदारावर अवलंबून असल्यामुळे ते सांगतील त्या वेळी रत्नव्वांना कामाला जायलाच लागतं. मजुरीविषयी त्या ब्रही काढू शकत नाहीत. शेजारच्या गावातल्या बाया कोननताळीत २५० रुपये रोजाने आठ तासांची पाळी करतात. रत्नव्वांना मात्र कितीही तास काम केलं तरी २०० रुपयांहून जास्त रोजगार मिळत नाही.
“त्यांनी मला कधीही कामावर बोलावलं तर मला जावं लागतं. कधी कधी सकाळी सहा वाजताच कामाला सुरुवात होते आणि संध्याकाळी सात वाजून जातात तरी काम सुरूच असतं. जर क्रॉसिंगचं काम नसेल आणि नुसतं खुरपायचं असेल तर मला दिवसाला फक्त १५० रुपये मिळतात,” त्या सांगतात. “मी काहीच बोलू शकत नाही. मी पैसे उसने घेतलेत म्हटल्यावर मला जायलाच लागतं. जास्त मजुरी तरी कशी मागणार?”
पण केवळ कर्ज घेतलंय म्हणून रत्नव्वांच्या श्रमांचं अवमूल्यन होतंय असं मात्र नाही. कित्येकदा रत्नव्वांना गावातल्या एका लिंगायत कुटुंबाच्या घरी कामासाठी बोलावलं जातं. ओक्कालु पद्धती (किंवा बिट्टी चक्री, ‘बिनमोल श्रम’) ही पूर्वापार चालत आलेली जातीय व्यवस्था आहे. कायद्याने तिला मनाई असली तरी आजही कोननताळीत ती सुरूच आहे. यामध्ये एका मडिगा कुटुंबाला एका लिंगायत या प्रबळ मागासवर्गीय जातीच्या कुटुंबाशी बांधून घातलं जातं. मडिगा कुटुंबाला त्या लिंगायत कुटुंबाकडे फुकटात सगळं काम करावं लागतं.
“त्यांच्याकडे लग्न असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल किंवा कुणी मयत झालं असेल तरी आम्हाला जाऊन घराची साफसफाई करून द्यावी लागते. अख्खा दिवस त्यात मोडतो. सगळं काम आम्हालाच करावं लागतं. जर घरात लग्न असेल तर आम्ही आठवडाभर तिथेच असतो,” रत्नव्वा सांगतात. “पण आम्हाला घराच्या आत प्रवेश नाही. बाहेरच बसवतात. लाह्या आणि चहा देतात. त्यांच्याकडची ताटली देखील देत नाहीत. आम्ही घरनं आमच्या ताटल्या घेऊन जातो. कधी कधी एखादं मेंढरू किंवा पिलू देतात. पण पैसा कधीच नाही. त्यांच्या घरात जनावर मेलं तर त्याचं मढं ओढण्यासाठी आम्हालाच जावं लागतं.”
चार वर्षांपूर्वी, या लिंगायत कुटुंबातल्या कुणाचं तरी लग्न होतं. तेव्हा रिवाजानुसार रत्नव्वांनी चपला खरेदी केल्या, त्यांची पूजा केली आणि त्या नवऱ्या मुलाला भेट दिल्या. अगदी अलिकडे, दोन वर्षांपूर्वी त्यांनी या घरात जाऊन काम करणं थांबवलंय. आपल्या श्रमाचा मोबदला मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न फोल गेले त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. पण या लिंगायत कुटुंबाला तो पचनी पडलेला नाही.
या वर्षी परमेशप्पांच्या मदतीने रत्नव्वांनी गावात दीड एकर जमिनीत भेंडी आणि मका लावली. ही जमीन शासनाकडून त्यांच्या नवऱ्याला मिळालेली आहे. मात्र, जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला आणि कोननताळीतल्या माडिगा-मसूर तळ्याच्या काठावर असलेल्या माडिगा समाजाच्या लोकांना दिलेल्या या जमिनी पूर्णपणे पाण्यात गेल्या. “यंदा हरिजनांच्या [माडिगांच्या] जमिनीवर भेंडी लावली होती, पण सगळं पाण्यात गेलं,” त्या म्हणतात.
शासकीय यंत्रणादेखील रत्नव्वांचं ओझं कमी करण्यासाठी फार पावलं उचलताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या कुठल्याही कल्याणकारी योजनांसाठी त्या पात्र नाहीत, कारण त्या एक भूमीहीन मजूर आहेत. त्यांचं पीक वाहून गेलं, त्यासाठी त्यांना कसली नुकसान भरपाई मिळाली नाही किंवा अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींसाठी राज्य सरकारकडून दर महिन्याला मिळणारा १,००० रुपये निर्वाह देखील त्यांना मिळत नाही, अपंगत्वाचा दाखला असूनसुद्धा.
तासंतास काबाडकष्ट करूनही रत्नव्वांना कायमच पैशाची चणचण जाणवत असते. आणि म्हणूनच त्या मायक्रो फायनान्स किंवा लघु वित्त कंपन्यांच्या कर्जावर विसंबून असतात. पण यामुळे त्यांच्या पाय कर्जाच्या गर्तेत जास्तच खोलात चालला आहे. परमेशप्पांचं कर्ज आहेच, ते जाता त्यांच्यावरचं कर्ज आता २ लाखांच्या आसपास गेलंय. आणि व्याजाचे दर २ ते ३ टक्के आहेत.
गेल्या दोन वर्षांमध्ये घरातल्या एका खोलीचं बांधकाम, मुलांच्या कॉलेजची फी आणि दवाखान्याच्या खर्चासाठी म्हणून त्यांनी १० वेगवेगळ्या ठिकाणहून त्यांनी कर्ज काढलं असेल. रोजच्या घरखर्चासाठी पैसे लागले तर त्या लिंगायत कुटुंबांमधल्या स्त्रियांना पैसे मागतात. “गेल्या वर्षी मी दर महिन्याला नुसते व्याजाचे मी २,६५० रुपये भरत होते,” त्या सांगतात. “कोविड-१९ चा लॉकडाउन लागला आणि आता माझ्याकडे व्याजाचे पैसे भरण्याइतके सुद्धा पैसे नाहीयेत. पण तरीसुद्धा गरज लागेल तसे मला पैसे उसने घ्यावेच लागतात.”
कर्जाचा डोंगर वाढत असला तरी रत्नव्वांनी मुलांचं कॉलेजचं शिक्षण बंद करायचं नाही हे पक्कं ठरवलंय. शिवाय, आपल्या मुलीला, सुमाला बिट्टी चक्रीच्या प्रथेपासून त्यांनी लांब ठरवलंय. “माझं कसं होतं, माझ्या पायासारखीच मी स्वतःदेखील कमजोर होते. मला त्यातनं बाहेर पडता आलं नाही. पण माझ्या मुलांची मात्र यातून सुटका होणं गरजेचं होतं. नाही तर त्यांना शाळा सोडावी लागली असती. म्हणून मग मीच काम करत राहिले,” त्या सांगतात. आपल्यासमोरच्या संकटांनी दबून न जाता रत्नव्वा ठामपणे सांगतात, “त्यांना जितकं शिकायचंय ना तितकं मी शिकवेन.”