“माझ्या पाच वर्षांच्या मुलीला खूप ताप आहे,” शकीला निझामुद्दीन सांगते. “माझा नवरा तिला डॉक्टरकडे घेऊन निघाला होता, पण पोलिसांनी त्याला थांबवलं. तो घाबरला आणि परत आला. आम्ही आता आमच्या कॉलनीच्या बाहेर जाऊच शकत नाही, अगदी हॉस्पिटलमध्येही नाही.”
तीस वर्षांची शकीला अहमदाबादच्या सिटिझन नगर रिलीफ कॉलनीमध्ये राहते. घरी बसून पतंग बनवणं, हे तिच्या उत्पन्नाचं साधन. ती आणि तिचा नवरा, दोघंही रोजंदारीवर काम करणारे. आता लॉकडाऊनमध्ये उत्पन्नाबरोबर त्यांच्या आशाही मावळतीला लागल्यात. “दवाखाना बंद आहे,” ती मला व्हिडिओ कॉलवर म्हणाली. “ते आम्हाला सांगतायत, घरी जा, काही घरगुती औषधं घ्या. हॉस्पिटलमध्ये जायचंच असेल, तर पोलिस फाइल आणि कागदपत्रं मागतात. आता ते सगळं आम्ही कुठून आणायचं?”
गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या भीषण जातीय दंगलीमध्ये विस्थापित झालेल्या ५० हजार लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी काही धर्मादाय संस्थांनी ज्या ८१ वसाहती बांधल्या, त्यातली ही एक, सिटिझन नगर. लॉकडाऊन हे सिटिझन नगरच्या रहिवाशांचं दु:स्वप्न आहे.
तसंच, ‘सगळ्यांनी एकत्र येऊया आणि लॉकडाऊन पाळत कोरोनाव्हायरसचा संसर्ग देशभर पसरण्यापासून रोखूया’ असं सांगणाऱ्या अमिताभ बच्चनला टीव्ही स्क्रीनवर पाहाणं, हेही.
“हातावर हात ठेवून घरातच बसायचंय सगळ्यांनी, तर मग हात धुवायचे तरी कशासाठी?” रेश्मा सय्यद विचारते. रेश्मा सिटिझन नगरमधली ‘लीडर’ आहे. सगळे प्रेमाने तिला रेश्मा आपा म्हणतात. सिटिझन नगर ही २००२ च्या गुजरात दंग्यांमधल्या दंगलग्रस्तांची, नरोडा पाटिया विभागातल्या रहिवाशांची पुनर्वसन वसाहत आहे. अहमदाबादमध्ये अशा १५ वसाहती आहेत. कॉलनीच्या गेटवरची दगडी पाटी सांगते की, केरळ राज्य मुस्लिम रिलीफ कमिटीच्या मदतीतून ती २००४ मध्ये उभी राहिली आहे. त्या वेळेला इथे पहिली ४० कुटुंबं आली. दोनच वर्षांपूर्वी त्यांनी आपलं सर्वस्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना पाहिलं होतं.
सध्या सिटिझन नगरमध्ये जवळजवळ १२० मुस्लिम कुटुंबं आहेत. त्याला लागूनच असलेल्या मुबारक नगर आणि घासिया मस्जिद भागात काहीशे कुटुंबांची वस्ती आहे. २००२ च्या पूर्वीही या भागात मुस्लिम वस्तीच होती, एका भल्या मोठ्या ‘घेट्टो’चा, बंदिस्त वस्तीचा भाग आहे हा. सिटिझन नगर बांधलं गेलं, त्याच सुमाराला दंगलग्रस्त निर्वासित त्याच्या आसपासच्या भागातही आल्यामुळे या भागाची लोकसंख्या वाढली.
सिटिझन नगर कुप्रसिद्ध पिराणा ‘कचरा पर्वतरांगां’च्या पायथ्याशी आहे. हा भाग १९८२ पासून अहमदाबादचं कचरा भूमी म्हणून वापरला जातो. ८४ हेक्टरवर पसरलेल्या या जमिनीवर कचऱ्याचे असंख्य मोठेमोठे डोंगर आहेत. काहींची उंची तर ७५ मीटरपर्यंत आहे. पिराणावर ८५ लाख मेट्रिक टन कचरा आहे. या कचऱ्याच्या ढिगांमधून अनेक वेळा अहमदाबादच्या आकाशात विषारी वायू बाहेर पडलाय.
सात महिन्यांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने अहमदाबाद महानगरपालिकेला हा कचरा साफ करण्यासाठी एका वर्षाची मुदत दिली होती. त्यापैकी आता जेमतेम १५० दिवस शिल्लक आहेत, पण कचरा भूमीत कचऱ्यांचं वर्गीकरण करणारं फक्त एकच यंत्र काम करतंय. खरं तर तिथे या कामासाठी ३० यंत्रं लागायला हवी होती!
दरम्यान, तिथे छोट्या ज्वालामुखीसारखे उद्रेक वारंवार होत असतात, आगी लागत असतात आणि त्यातून प्रचंड मोठा आणि दाट असे धुराचे ढग तयार होत असतात. असं काही घडलं, की सिटिझन नगर बातमीत येतं, इथले लोक कोणत्या परिस्थितीत राहातायत, यावर वर्तमानपत्रांची पानं सजतात, वृत्तवाहिन्यांचे प्राइमटाइम भरतात. पंधरा वर्षं झाली आहेत इथे लोकांचं पुनर्वसन होऊन, लोक घरात राहातायत, पण अजून त्यांच्याकडे घरांची कागदपत्रं नाहीत. सिटिझन नगरचे रहिवासी गेल्या १५ वर्षांपासून विषारी वायूचाच श्वास घेतायत.
“सर्दी-खोकल्याच्या तक्रारी घेऊन इथे खूप लोक येतात,” डॉ. फरहीन सय्यद सांगतात. इथल्या ‘राहत सिटिझन क्लिनिक’मध्ये त्या रुग्णांना तपासतात. काही धर्मादाय संस्था आणि समाजसेवक मिळून हा दवाखाना चालवतात. “हवेचं प्रदूषण आणि सतत हवेत असणारा विषारी वायू यामुळे या भागात श्वासोच्छ्वासाचा त्रास आणि फुप्फुसाचा संसर्ग हे त्रास खूप जास्त असतात. कॉलनीत क्षयरोगाचेही खूप रुग्ण आहेत,” ते सांगतात. लॉकडाऊन सुरू झाला, तेव्हा हे क्लिनिक बंद करावं लागलं.
कोविड १९ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सतत हात धुवायला सांगितलं जातं. रेश्मा आपाच्या मते ही सिटिझन नगरच्या लोकांची थट्टा आहे. कारण इथे पाण्याच्या नावाने आनंद आहे! लोकांना स्वच्छ पाणी मिळतच नाही, मिळालं तर अगदी थोडं मिळतं.
सिटिझन नगरमधली कोरोनाव्हायरसची भीती ही फक्त त्याच्या संसर्गाची, आजारपणाची, त्यामुळे येणाऱ्या मरणाची भीती नाही. या भीतीशी सिटिझन नगर कायमच सामना करत आलंय. आताच्या या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये ही भीती आहे अन्नधान्याचा अभाव, उपाशी पोटं आणि वैद्यकीय मदतीची वानवा यांचीही.
“आम्ही बहुतेक बायका इथल्या आसपासच्या प्लास्टिकच्या, डेनिमच्या, तंबाखूच्या कारखान्यांत काम करतो,” पंचेचाळीशीच्या रेहाना मिर्झा सांगतात. “या कारखान्यांचं काही सांगता येत नाही. काम असलं तर ते आम्हाला बोलावतात, नसलं तर नाही.” विधवा असलेल्या रेहाना जवळच्या तंबाखूच्या कारखान्यात काम करायच्या. रोज आठ ते दहा तास काम करून दिवसाला २०० रुपये मिळवायच्या. लॉकडाऊनच्या दोन आठवडे आधी ते काम थांबलं. आता लॉकडाऊन उठल्याशिवाय काही काम मिळण्याची आशाच नाहीय. त्यांच्याकडे आता धान्य विकत आणायलाही पैसे नाहीयेत.
“इथे आमच्याकडे भाज्या नाहीत, दूध नाही, चहापत्ती नाही,” रेश्मा आपा सांगतात. “बरीच घरं गेला आठवडाभर उपाशी आहेत. स्थानिक प्रशासन बाहेरच्या भाज्यांच्या गाड्या वस्तीत येऊ देत नाही, इथे जवळ असलेली दुकानं उघडू देत नाही. इथे राहाणारे बरेच जण छोटे विक्रेते आहेत, कोणी रिक्षाचालक आहे, कोणी सुतार आहे, कोणी रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. आता ते बाहेर जाऊन पैसे मिळवू शकत नाहीयेत. पैसाच येत नाहीये, आम्ही खाणार काय? करायचं तरी काय?”
फारूख शेख रिक्षा चालवतो. कॉलनीतल्या अनेक रिक्षाचालकांपैकी तो एक. तो म्हणतो, “मी दिवसाला ३०० रुपये भाड्याने रिक्षा घेतो. पण माझं रोजचं उत्पन्न नक्की नाही. एखादा दिवस माझा धंदा चांगला झाला नाही, तरी मला रिक्षाचं भाडं तेवढंच द्यावं लागतं. पैशासाठी मग मी कधीकधी कारखान्यातही काम करतो.” रोज १५ तास रिक्षा चालवून फारूखला दिवसाला ६०० ते ७०० रुपये मिळतात. पण त्यापैकी फक्त ५० टक्के किंवा त्यापेक्षाही कमी त्याच्या हाती पडतात.
सहा जणांच्या कुटुंबातला एकमेव कमावणारा सदस्य असलेल्या फारूखला लॉकडाऊन आणि त्याच्या भागात असलेल्या कर्फ्यूचे भलतेच चटके सोसावे लागत आहेत. “रोज कमवून रोज खाणारी माणसं आम्ही. आता बाहेर पडून कमवूच शकत नाही. बाहेर पडलं तर पोलिस मारतात,” तो सांगतो. “काही जणांच्या घरी तर पाणीही नाही. सॅनिटायझरचं काय सांगता? मास्कचं काय सांगता? आम्ही गरीब माणसं आहोत. अशा फॅशनेबल गोष्टी आमच्याकडे नाहीत. इथे कायमच प्रदूषण असतं, आजार असतात आणि आजारपणही.”
अशा भयंकर आणि बिकट परिस्थितीत जगणाऱ्या या लोकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा या भागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केली आहे, पण तेही मिळालेलं नाही. इथे ‘राहत सिटिझन क्लिनिक’ सुरू झालं ते २०१७ साली. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत काम करणारे अहमदाबाद विद्यापीठातले तरुण प्राध्यापक अबरार अली यांच्या अथक प्रयत्नांनी ते सुरू झालं. संपूर्णपणे खाजगी देणग्यांवर हे क्लिनिक चालतं. ते चालवणं सोपं तर नाहीच. चांगले डॉक्टर्स, देणगीदार आणि क्लिनिकसाठी जागा देणारे मालक शोधण्यासाठी अली यांना खूप यातायात करावी लागली, अजूनही करावी लागते आहे. गेल्या अडीच वर्षांत या क्लिनिकने तीन जागा आणि चार डॉक्टर्स बदलले. आता तर लॉकडाऊनमुळे ते बंदच आहे.
सिटिझन नगर खरं तर अहमदाबाद महानगरपालिकेच्या हद्दीतच येतं, पण महापालिका तिथे पाणी पुरवत नाही. सुरुवातीची पाचेक वर्षं तर लोक खाजगी टॅंकरवरच अवलंबून होते. २००९ मध्ये इथे बोअरवेल घेतली गेली. पण तिचं पाणी कधीच वापरायोग्य नव्हतं. अहमदाबादच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ने केलेल्या अभ्यासानुसार त्या पाण्यात क्षार, धातू, क्लोराइड, सल्फेट आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानंतर आत्ता आत्ता, सहा महिन्यांपूर्वी आणखी एक बोअरवेल घेतली. त्यातून आता सिटिझन नगरला अपुरं का होईना, पण पाणी मिळतंय. जलजन्य आजार आणि पोटाचे जंतुसंसर्ग यांचं प्रमाण इथे बरंच आहे. दूषित पाण्याचा संपर्क येत असल्याने, त्यात काम आणि त्याचंच सेवन केल्यामुळे बायका आणि मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे त्वचाविकार होतात, बुरशीची लागण होते.
जग आत्ता ‘सामाजिक अंतर’ (सोशल डिस्टन्सिंग) पाळायला लागलंय, सिटिझन नगर मात्र गेली कित्येक वर्षं सरकार आपल्यापासून सामाजिक अंतर पाळताना बघतंय. कोविड-१९ आणि त्यामुळे झालेला लॉकडाऊन ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरलीय, आधीच असंख्य समस्यांच्या जंजाळात सापडलेल्या या वस्तीला अधिकच गर्तेत रुतवणारी. “सरकार नुसत्याच बाता मारतं आणि मतं मागतं,” सिटिझन नगरमध्ये राहाणारा प्लंबर मुश्ताक अली (नाव बदललंय) म्हणतो. “आम्ही कसं जगतोय, ते बघायला इथे एकही नेता अद्याप आला नाहीये. असं सरकार काय कामाचं? इथल्या लोकांनाही त्यांची चाल कळायला लागलीय आता.”
मुश्ताक आमच्याशी बोलत असतो, त्याच वेळेला एका खोलीच्या त्याच्या घरात, आणि त्या दाटीवाटीच्या वस्तीतल्या इतर घरांमध्येही, टीव्हीवरच्या अमिताभ बच्चनचा धीरगंभीर आवाज घुमत असतो : “...गरज नसेल तर तुमच्या डोळ्यांना, नाकाला, तोंडाला वारंवार हात लावू नका... यापैकी कोणतंही लक्षण असलं तर ताबडतोब तुमच्या जवळच्या दवाखान्यात किंवा डॉक्टरांकडे जा...”
अनुवादः वैशाली रोडे