“माझ्या मालकीची शेतजमीन नाही, माझ्या पूर्वजांचीही कुणाची नव्हती,” कमलजीत कौर सांगतात. “पण मी इथे येऊन या शेतकऱ्यांना मदत करून माझा खारीचा वाटा उचलतीये. कारण मला अशी भीती आहे की आज जर मी इथे आले नाही तर उद्या माझ्या लेकरांना चार घास खाऊ घालायचे तर मला आधी कॉर्पोरेट कंपन्यांची हाव आहे ना त्याला तोंड द्यावं लागेल.”
३५ वर्षीय कमलजीत पंजाबच्या लुधियानामध्ये शिक्षिका आहेत आणि इथे सिंघुच्या सीमेवर सावलीमध्ये त्या त्यांच्या दोघी मैत्रिणींसोबत त्या दोन शिवणयंत्रं चालवतायत. त्या आळीपाळीने, तीन-तीन दिवस आंदोलनाच्या ठिकाणी येतात आणि आंदोलक शेतकऱ्यांना कपडे दुरुस्त करायचे असले, शर्टाची बटनं तुटलीयेत, सलवार-कमीज कुठे उसवलाय, तर ते शिवून देतात. दररोज त्यांच्या सेवेचा लाभ घ्यायला सुमारे २०० लोक तरी येतात.
सिंघु सीमेवर ही अशीच सेवा अनेक प्रकारे, मनोभावे केली जात आहे – आणि त्यातून आंदोलकांप्रती आपली एकजूट व्यक्त केली जातीये.
यातलेच एक आहेत ईर्शाद (पूर्ण नाव उपलब्ध नाही). सिंघुपासून चार किलोमीटरवर कुंडली औद्योगिक वसाहतीतल्या टीडीआय मॉलबाहेरच्या एका बारक्या बोळात ते एका शीख आंदोलकाच्या डोक्याला चंपी करून देतायत. इतरही अनेक रांगेत आहेत. ईर्शाद कुरुक्षेत्रात नाभिक आहेत आणि बिरादरीच्या – बंधुभावातून इथे आले आहेत.
त्यांच्याच वाटेवर आपल्या मिनी-ट्रकबाहेर बसलेल्या सरदार गुरमीत सिंग यांच्या भोवतीही आंदोलकांचा गराडा पडलाय. यातल्या अनेकांना दुखऱ्या स्नायूंना मालिश करून घ्यायचीये. पंजाबहून सिंघुचा रस्ता खचाखच भरलेल्या ट्रॉलींमध्ये केल्याने अंग आंबून गेलंय. “सध्या त्यांना इतरही अनेक प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागतायत ना...” मुळात हे लोक इथे का आले त्याबद्दल ते म्हणतात.
चंदिगडच्या डॉ. सुरिंदर कुमार यांच्यासाठी सिंघु सीमेवर इतर डॉक्टरांसोबत वैद्यकीय शिबिर चालवणं हीच सेवा आहे. आंदोलन स्थळी सुरू असलेल्या अनेक दवाखान्यांपैकी हा एक आहे – काही तर थेट कोलकाता किंवा हैद्राबादहून आलेल्या डॉक्टरांनी चालवले आहेत. “आम्ही पदवी घेतली त्या वेळी शपथ घेतली होती त्याला जागतोय फक्त – इतके दिवस या बोचऱ्या थंडीत उघड्या रस्त्यावर राहणाऱ्या म्हाताऱ्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवतोय,” सुरिंदर सांगतात.
आंदोलकांचं धैर्य टिकून रहावं म्हणून सत्पाल सिंग आणि त्यांच्या दोस्तांनी लुधियानाहून सिंघुला एका खुल्या ट्रकवर लादून चक्क एक उसाचा भला मोठा चरकच आणलाय. ही यंत्रं एरवी साखर कारखान्यांमध्ये वापरली जातात. इथे आंदोलनाच्या ठिकाणी या चरकातून उसाचा गोड रस येणाऱ्या जाणाऱ्याला दिला जातोय. ते या ‘रसवंतीवर’ रोज एक ट्रकभर उसाचा रस काढून वाटतायत आणि हा ऊसदेखील लुधियानाच्या सीमेवर असलेल्या त्यांच्या अलिवालच्या गावकऱ्यांनी दिलेल्या देणगीतून विकत घेतला जातोय.
आणि याच कुंडलीच्या लॉनवर भटिंड्याहून आलेला निहंग अमनदीप सिंग आपल्या काळ्या घोड्याला अंघोळ घालतोय. तो म्हणतो की पंजाबची कृषी अर्थव्यवस्था सुरक्षित रहावी यासाठी तो इथे आलाय. मॉलजवळच्या लंगरवर येईल त्याला खाणं देण्याचं काम तो करतो. तसंच तो आणि इतर निहंग (शीख योद्ध्यांचा पंथ) रोज संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी अडथळे म्हणून जे कंटेनर उभे केले आहेत त्याच्या सावलीत उभ्या केलेल्या तंबूंमध्ये कीर्तनही सादर करतो.
अमृतसरचा गुरवेज सिंग पंजाब विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि इतर विद्यार्थ्यांसोबत सिंघुच्या सीमेवर असलेल्या शेतकऱ्यांना ट्रॉली टाइम्स या पाक्षिकाचे अंक वाटतोय. त्यांनी एक मोठा मंडप टाकलाय आणि तिथे कागद आणि पेनं ठेवलीयेत. कुणीही जाऊन तिथे पोस्टरवर घोषणा लिहू शकतं – या अशा पोस्टरच एक प्रदर्शन तिथे कायमच मांडलेलं असतं. आणि ते एक मोफत वाचनालय देखील चालवतायत. पंजाब विद्यापीठाच्या आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे सदस्य देखील सिंघु सीमेवर एक मोफत वाचनालय चालवतायत. आणि ते पोस्टर देखील तयार करतात (शीर्षक छायाचित्र पहा).
रात्र होत जाते आणि आम्ही सिंघु सीमेपासून कुंडलीच्या दिशेने चालत जायला लागतो, आणि वाटेत अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या असतात आणि लोकांचे घोळके हात पाय शेकत बसलेले असतात. तिथेच आम्हीही.
आम्ही त्याच वाटेवरच्या बाबा गुरुपाल सिंग यांच्या तंबूत जाऊन त्यांची भेट घेतो आणि आलेल्यांसाठी कायमच तयार असलेला चहा आम्हालाही मिळतो. संन्यासी असलेले ८६ वर्षीय बाबा गुरुपाल पतियाळाजवळच्या खानपूर गोंडिया गुरुद्वारेमध्ये ग्रंथी आहेत. ते ज्ञानी आहेत आणि आम्हाला अस्मितेच्या मुद्द्यावरचं शिखांचं राजकारण आणि त्याचा इतिहास आम्हाला समजावून सांगतात. ते असंही म्हणतात की हे आंदोलन आता मर्यादा लांघून देशव्यापी झालं आहे आणि ते सर्वांच्याच भल्यासाठी सुरू आहे.
मी त्यांना विचारतो की ते आणि त्यांच्यासारखेच किती तरी वयोवृद्ध लोक इथे सिंघुपाशी दिवसाचे आठ तास चहा देत हे आंदोलन का करतायत म्हणून. शेकोट्यांच्या एकमेकात मिसळत जाणाऱ्या ज्वाळा आणि धुरांनी सजलेल्या बाहेरच्या रात्रीच्या दृश्याकडे नजर टाकत ते म्हणतात, “आता बाहेर पडून आपलं योगदान देण्याची वेळ आली आहे कारण आता हा लढा थेट सुष्ट आणि दुष्टामधला आहे. कुरुक्षेत्राच्या महायुद्धातही हेच तर घडलं होतं.”
अनुवादः मेधा काळे