मंचाजवळून अनेक जण हातात विविध रंगातले झेंडे घेऊन चालले होते – लाल, पिवळा, हिरवा आणि पांढरा. डोक्यावर हिरव्या ओढण्या घेतलेल्या शेतकऱी महिलांचा एक जत्था चालत चालत आला. तितक्यात सफेद आणि लालसर काळ्या रंगाच्या, हिरव्या आणि पिवळ्या पगड्या बांधलेल्या पुरुषांचा एक गट ट्रॅक्टरवरून आला. दिवसभर मंचाच्या समोरून वेगवेगळे झेंडे हातात घेतलेल्या शेतकऱ्यांचे गट येजा करत होते. एखाद्या कवितेच्या वेगवेगळ्या कडव्यांसारखे हे वेगवेगळे रंग एकामागून एक लहरत येत होते.
२६ नोव्हेंबर २०२० ला बरोबर एक वर्ष उलटलं. याच दिवशी संसदेत पारित झालेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे असंख्य शेतकरी दिल्लीच्या वेशीवर येऊन पोचले होते. शेतकरी चळवळीत हा दिवस मैलाचा दगड ठरला त्याची वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी सिंघु, टिक्री आणि गाझीपूरच्या आंदोलनस्थळी शेतकरी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सगळ्यांची गर्दी झाली होती.
हा दिवस विजयाचा आणि अश्रूंचा होता. गेल्या वर्षभराच्या आठवणी आणि आगामी काळातल्या कार्यक्रमांच्या नियोजनाचा होता. आम्ही आज लढाई जिंकलीये, हा काही अंतिम विजय नाहीये, ३३ वर्षांचा गुरजीत सिंग सांगतो. १९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली तेव्हा तो सिंघुमध्ये होता. गुरजीत पंजाबच्या फिरोझपूर जिल्ह्याच्या झिरा तालुक्यातल्या अरियांवाला इथे आपल्या २५ एकरात शेती करतो.
“हा लोकांचा विजय आहे. आम्ही एका आडमुठ्या शासकाला झुकायला लावलंय आणि त्याचा आम्हाला आनंद आहे,” ४५ वर्षीय गुरजीत सिंग आझाद सांगतात. तेही सिंघुमध्ये आहेत. गुरदासपूर जिल्ह्याच्या कह्नुवान तालुक्यातलं भट्टियां हे आझाद यांचं गाव. त्यांच्या मालकीच्या दोन एकरात त्यांचे चुलते गहू आणि तांदूळ करतात. “ही लढाई काही २६ नोव्हेंबरला सुरू झाली नाहीये. त्या दिवशी ती दिल्लीच्या वेशीपर्यंत येऊन पोचली इतकंच,” ते सांगतात. “या विधेयकांचं कायद्यात रुपांतर होण्याआधीच शेतकऱ्यांनी त्याविरोधात आंदोलन करायला सुरुवात केली होती. सप्टेंबर महिन्यात जेव्हा हे कायदे पारित करण्यात आले तेव्हा आम्ही दिल्लीला येण्याचं आवाहन करण्यात आलं आणि आम्ही त्यानुसार दिल्लीला आलो.”
गेल्या वर्षीचा त्यांचा मोर्चा ते कधीच विसरणार नाहीत. इतक्या साऱ्या गोष्टी घडल्या त्या दिवशीः “आम्ही आमच्याच देशाच्या राजधानीकडे निघालोय आणि सरकार आमच्यावर पाण्याचा मारा करत होतं. त्यांनी खंदक खणले. तट उभारून, काटेरी तारा लावून आम्हाला रोखलं गेलं, आम्ही काही युद्धासाठी आलो नव्हतो.” (गेल्या वर्षी ६२ वर्षांचे जोगराज सिंग मला म्हणाले होते की आम्ही शेतकरीच पोलिसांना दोन घास खाऊ घालतो ना आणि हे पोलिससुद्धा त्यांच्या लेकरांसारखेच आहेत – आता त्यांच्या लाठ्याच भुकेल्या असतील तर आमची पाठ त्या लाठ्यांसाठी सज्ज आहे.)
गेल्या आठवड्यात पतियाळा जिल्ह्याच्या दौंन कलां गावातल्या राजिंदर कौर सिंघुला आल्या. इथल्या आंदोलनस्थळाची त्यांची ही सव्विसावी खेप आहे. “आंदोलन सुरू झालं तेव्हापासून मी पतियाळाच्या एका टोलनाक्यावर स्वतः जाऊन थांबते आणि कोणत्याही शेतकऱ्याकडून टोल घेतला जाणार नाही ना याच्यावर लक्ष ठेवते,” ४८ वर्षांच्या राजिंदर सांगतात. त्यांच्या कुटुंबाची पाच एकर जमीन आहे. “आधी त्यांनी [पंतप्रधानांनी] कायदे लादले. नंतर ते रद्द केले. यामध्ये आमचं [जीव आणि उपजीविकांचं] प्रचंड नुकसान झालं. मुळात त्यांनी कायदे आणायलाच नको होते आणि जरी आणले तरी फार आधी मागे घ्यायला पाहिजे होते.”
गेले १२ महिने पंतप्रधान काही कायदे मागे घ्यायला तयार नव्हते आणि शेतकरी मात्र थंडीवाऱ्यात, उन्हापावसात तटून बसले होते. सरकार त्यांचं काही ऐकायला तयारच नव्हतं. उन्हाचा तडाखा सहन केला, महामार्गावर उभारलेल्या तंबूंची छपरं उडवून नेणारी वादळं आणि पावसाचा मारा झेलला. त्यांचं पाणी आणि वीज तोडण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. पुरेश्या मोऱ्या नव्हत्या, महासाथीची जोखीम तर होतीच.
“सरकार आम्हाला दमवू पाहत होतं. त्यांना वाटलं असावं की आम्ही जाऊ. पण नाही, आम्ही गेलो नाही,” आझाद सांगतात. शेतकऱ्यांनी निर्धाराने आपलं आंदोलन सुरू ठेवलं पण मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी मात्र त्यांची बदनामी केली. शेतकऱ्यांना अडाणी, खलिस्तानी अशी विविध दूषणं देणाऱ्या माध्यमांना प्रत्युत्तर देण्यासाठी शेतकरी स्वतः समाजमाध्यमांवर असणं गरजेचं होतं. अशाच एका हँडलसाठी आझाद स्वेच्छेने काम करत होते. “त्यांनी आम्हाला अडाणी ठरवलं, आमच्या विचार करण्याच्या आणि स्वतःच्या ठरवण्याच्या क्षमतेवरच त्यांनी हल्ला केला. मी हे आव्हान स्वीकारलं आणि त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत राहिलो.”
“या चळवळीने आम्हाला खूप काही शिकवलंय,” गुरजीत सिंग सांगतो. “आणि लढाई कितीही खडतर असू दे, सत्याचाच विजय होतो. आणि या देशात कायदे करणाऱ्यांना यातून किमान एक गोष्ट तरी समजली असेल – यापुढे अशा प्रकारे लोकांच्या गळी कायदे उतरवण्याआधी हजार वेळा विचार करा बरं.”
“आम्ही जिंकण्यासाठीच इथे आलो होतो आणि आम्ही विजयी झालो की इथून जाऊ,” ४७ वर्षीय सुखदेव सिंग सांगतात. फतेहगड साहिब जिल्ह्याच्या खमनोंन तालुक्यातल्या मोहन माजरा गावचे ते रहिवासी आहेत. सुमारे १५ वर्षांपूर्वी एका अपघातानंतर त्यांचा जावा पाय काढून टाकावा लागला होताः “ही [कायदे रद्द करण्याची] घोषणा झाल्यानंतर देखील सगळा भर कशावर आहे, तर आम्हाला घरी परत पाठवण्यावर. कायदे रद्द करण्याची संसदीय कार्यवाही पूर्ण होत नाही आणि बिजली बिल [वीज (सुधारणा) विधेयक, २०२०] मागे घेतलं जात नाही तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही.”
गेलं वर्षभर इतक्या अपेष्टा सहन करूनही शेतकऱ्यांनी विजयाचा आनंद साजरा करत असताना आपलं भान सोडलेलं नाही. नाचत, गात, बुंदी, लाडू, बर्फी आणि फळं वाटून त्यांनी आपला आनंद साजरा केला, एकमेकांबरोबर वाटून घेतला. लंगर आणि इतर सेवाही थांबलेली नाही.
२६ नोव्हेंबर रोजी सिंघु आणि टिक्री सीमांवर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची गर्दी फुलून आली होती. यातले अनेक जण शेतकऱ्यांचं अभिनंदन करायला आले होते. काही जणांना तर रडू फुटलं होतं.
अनेक शेतकरी नेते मंचावर होते आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक घोषणेला समोर बसलेल्या सगळ्याच शेतकऱ्यांकडून जोरात आणि जोशात प्रतिसाद मिळत होता. मंचावर बोलत असणाऱ्या प्रत्येकानेच गेल्या वर्षभराच्या लढ्यात शहीद झालेल्या ७०० शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली.
“आज वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी जे शेतकरी इथे आलेत, ते काही फक्त विजय साजरा करण्यासाठी आले नाहीयेत. या आंदोलनात शहीद झालेल्यांप्रती ते आदरही व्यक्त करतायत,” आझाद सांगतात. “आज आम्ही खुश आहोत का दुःखी आहोत, ते सांगताच येणार नाही,” गुरजीत सांगतो. “या संघर्षात प्राण ठेवलेल्या आमच्या साथीदारांच्या आठवणीने डोळे भरून येतात. आज आम्ही त्यांना आदरांजली वाहतोय.”
अमृतसरच्या अजनाला तालुक्यातल्या सेह्नसरा गावातल्या ८७ वर्षीय मुख्तार सिंग यांनी या ऐतिहासिक दिवशी आंदोलनस्थळी जायचंच असा निर्धार केला होता. गावी त्यांची नऊ एकर जमीन आहे. त्यांना धड चालता येत नाही, बोलताही येत नाही. कंबरेतून वाकलेले मुख्तार सिंग हातातल्या काठीचा आधार घेत एकेक पाऊल टाकत मंचाच्या दिशेने येत होते. ज्या दिवशी कायदे रद्द करत असल्याची घोषणा झाली त्याच दिवशी त्यांनी आपल्या मुलाला, ३६ वर्षीय सुखदेव सिंग यांना आपल्याला आंदोलनस्थळी नेण्याची विनंती केली. ते सुखदेव यांना म्हणाले की माझं सारं आयुष्य मी (संघटना सदस्य म्हणून) शेतकऱ्यांसाठी काम करण्यात घालवलंय. आणि आता मला एकदा ते आंदोलनस्थळ डोळे भरून पाहायचंय म्हणजे मी सुखाने डोळे मिटायला मोकळा.
या क्षणाची आंदोलकांनी वर्षभर वाट पाहिलीये. आणि ते काही सोपं नव्हतं, गुरदासपूरच्या बटाला तालुक्यातल्या हरचोवाल गावचे ५८ वर्षीय कुलवंत सिंग सांगतात. ते म्हणतात की कायदे रद्द होतील का नाही याची त्यांना शाश्वती नव्हती. “मनात उमेद जिवंत ठेवणं फार अवघड होतं. पण मी ते करायचो आणि स्वतःला सांगायचो – चढ़दी कला [उमेद सोडू नकोस या अर्थाची पंजाबी म्हण].”
शेतकरी त्यांच्या बाकी प्रलंबित मागण्यांबद्दलही बोलतात. यामध्ये शेतमालासाठी किमान हमीभावाचा कायदा आणि लखीमपूर खेरीमध्ये मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय या मागण्याही आहेत. या आणि इतर मागण्यांसाठी त्यांचा लढा सुरूच राहणार असल्याचं ते सांगतात. एक अख्खं आणि ऐतिहासिक वर्ष पार पडलंय. कवी इक्बाल यांच्या काही ओळी इथे आठवतातः
जिस खेत से दहक़ाँ को मयस्सर नहीं रोज़ी
उस ख़ेत के हर ख़ोशा-ए-गुन्दम को जला दो