राजस्थान-हरियाणा सीमेवर मगरीच्या आकाराचं टोपीवालं हिरवं जॅकेट आणि लोकरीचे मोजे घातलेला हरफतेह सिंह आपल्या वडलांना एका मोठ्या पिंपाले मटार सोलण्यात मदत करतोय. अवघ्या १८ महिन्यांचा हरफतेह राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील शाहजहानपूर येथील दिल्ली-जयपूर महामार्गावरील आंदोलकांमधला वयाने नक्कीच सर्वांत लहान असणार. हरफतेहचं शेतकरी आंदोलनातील योगदान म्हणजे भाज्या सोलणं. निदान, तसा प्रयत्न तरी तो करतोय. त्याला कदाचित तितक्या निगुतीने ते करता येत नसेलही, पण म्हणून त्याचा रस किंवा प्रयत्न कमी पडले नाहीत.
दिल्ली आणि हरियाणाच्या विविध सीमांलगत अनेक राज्यांतून लाखोंच्या संख्येने जमलेले शेतकरी त्यांच्या पोटावर पाय देणारे तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करतायत. ५ जून रोजी प्रथम वटहुकूम म्हणून काढण्यात आलेले हे तीन कायदे १४ सप्टेंबर रोजी संसदेत विधेयक म्हणून सादर करण्यात आले आणि त्याच महिन्याच्या २० तारखेला कायद्यांत रूपांतर करण्यासाठी रेटण्यात आले.
२५ डिसेंबर रोजी मी हरफतेहला भेटले तेंव्हा महाराष्ट्रातून सुमारे एक हजार शेतकरी पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शाहजहानपूरच्या आंदोलनस्थळी जमले होते. ठिकठिकाणी आंदोलन करणाऱ्या विविध राज्यांतील आपल्या साथीदारांच्या समर्थनार्थ या शेतकरी आणि शेतमजुरांनी नाशिकहून टेम्पो, जीप आणि मिनीव्हॅनमध्ये बसून १,२०० किमीपेक्षा अधिक अंतर पार केलं होतं.
महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांचं स्वागत करणाऱ्यांपैकी एक हरफतेह याचं कुटुंब होतं – त्यांना जवळपास शंभर लोकांसाठी आलू मटर बनवायची आहे. "आम्ही थंडीच्या दिवसांत इथे आलो ते आमच्या मुलांच्या भविष्यासाठी. आम्ही किसानांनी आज आंदोलन केलं नाही, तर फतेहचं भविष्य काही खरं नाही," हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील छाजूपूर गावचे ४१ वर्षीय जगरूप सिंह, त्या तान्ह्याचे वडील सांगतात.
छाजूपूर गावी जगरूप यांच्या कुटुंबाच्या मालकीची पाच एकर जमीन आहे ज्यात ते तांदूळ, गहू आणि बटाटे यांचं पीक घेतात. मी त्यांना भेटले तेंव्हा त्यांना आंदोलनात येऊन २८ दिवस झाले होते. ते पहिले २० दिवस हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील सिंघु सीमेवर होते आणि नंतर राजस्थान-हरियाणा सीमेवरील महामार्गाची वाहतूक ठप्प पाडण्याच्या उद्देशाने हजारो शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी आपला तळ शाहजहानपूरला हलवला.
जगरूप म्हणतात की त्यांना सुरुवातीच्या आठवड्यांत आपल्या कुटुंबाची आठवण यायची. २३ डिसेंबर रोजी त्यांची बायको गुरप्रीत कौर, वय ३३, आणि दोन मुलं एकमजोत, वय ८, आणि हरफतेह शाहजहाँपूरमध्ये आंदोलनस्थळी चालवण्यात येणाऱ्या लंगरमध्ये मदत करण्यासाठी इथे आले. "माझी मुलगी पण सेवा करतेय. ज्यांना हवा त्यांना चहा नेऊन देतेय. माझ्या मुलांना आम्ही इथे काय करतोय याची जाणीव आहे," हरफतेहला मटार नीट कसा सोलायचा ते शिकवत शिकवत जगरूप म्हणतात.
शेतकरी या तीन कायद्यांचा विरोध करत आहेतः शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा , २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०. या कायद्यांमुळे कोणाही भारतीय नागरिकाला कायदेशीर मार्गांचा अवलंब करता येणार नाही आणि या तरतुदीने भारतीय संविधानातल्या अनुच्छेद ३२ चाच अवमान होत असल्याने त्यावर टीका होत आहे.