रोज सकाळी पेंटापल्ली राजा राव डोक्यावर किंवा पाठीवर लाल मिरचीचं पोतं लादून हळू हळू सहा मजले चढून जातो. पोत्याचं वजन सुमारे ४५ किलो तरी आहे आणि पुढच्या काही तासात तो अशा अनेक खेपा करेल. “या १३० पायऱ्या चढण्यापेक्षा उतरणं तसं सोपं जातं,” २९ वर्षांचा असणारा राजा राव सांगतो. वयाच्या १९ व्या वर्षापासून पाठीचा काटा ढिला करणारं काम तो करतोय.
विश्व
कोल्ड स्टोरेजच्या तळमजल्यावर एकदा का या गोण्या उतरवल्या की राव आणि इतर ११
कामगार आवारात थांबलेल्या ट्रकमध्ये त्या लादतात. ट्रक पूर्ण भरला की तो ७
किलोमीटरवरच्या गुंटूरच्या एनटीआर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिशेने प्रस्थान
करतो.
“ट्रकमधून
पोतं उतरवून शीतगृहात नेण्याचे पोत्यामागे १५ रुपये आणि परत खाली उतरवून ट्रकमध्ये
लादण्याचे आम्हाला १० रुपये मिळतात,” राजा राव सांगतो. श्रीकाकुलम जिल्ह्याच्या
गारा मंडलातल्या कोरनी गावचा तो रहिवासी आहे. “पण आमच्या हातात पोत्यामागे २३
रुपयेच पडतात. मिस्त्री दोन रुपये कमिशन घेतो.” म्हणजेच वर चढवलेल्या आणि खाली
उतरून आणलेल्या प्रत्येक पोत्यामागे १ रुपया.
फेब्रुवारी
ते मे मिरचीचा हंगाम जोरावर असतो तेव्हा राजा राव दिवसाला ३०० रुपयांची कमाई करतो.
विश्व कोल्ड स्टोरेजमध्ये फक्त मिरची साठवली जाते. बाकी वर्षभर त्याची कमाई शंभर
रुपये किंवा त्याहून कमीच असते.
राजा राव आणि त्याचे सहकारी आता जो माल आत नेतायत तो प्रकासम जिल्ह्यालत्या ओड्डूपालेमचे शेतकरी गरला वेंकटेश्वरा राव यांचा आहे. “गेली दोन वर्षं (२०१६-१७ आणि २०१७-१८) मिरचीला फारच कमी भाव मिळतोय, त्यामुळे मी मार्च २०१७ पासून ४० क्विंटल मिरची शीतगृहात ठेवलीये, नंतर विकता यावी म्हणून. मी गेले १५ महिने वाट पाहतोय पण भाव तसाच राहिलाय.” २०१८ च्या जुलैमध्ये वेंकटेश्वरा राव यांना ४,५०० रुपये प्रति क्विंटल दराने त्यांचा माल विकावा लागला होता कारण त्यातून आलेल्या पैशातून त्यांना २०१८-१९ च्या हंगामासाठी मिरचीची लागवड करायची होती. मिरचीचा हंगाम ऑक्टोबर ते फेब्रुवारी असतो तर मार्केट यार्डात मे महिन्यापर्यंत खरेदी सुरू असते. (वाचाः गुंटूरमधली रास्त भावांची प्रतीक्षा )
गुंटूर
आपल्या मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातल्या १२५-१२७ शीतगृहांमध्ये जास्त
करून मिरचीच साठवून ठेवली जाते कारण तिच्या भावात भरपूर चढ-उतार होत असतात. २०१६
साली प्रसिद्ध झालेल्या एका
अभ्यासानुसार
आंध्र प्रदेशात २०१० साली अशी २९०
शीतगृहं होती. या शीतगृहांचे मालक, कामगार आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी सांगतात
की १९९० च्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये शीतगृहं बांधायला सुरुवात झाली. या
शीतगृहांमुळे मालाची नासाडी होत नाही आणि दर्जाही टिकून राहतो. हळद, भाज्या, फळं आणि
शोभेची फुलंदेखील या शीतगृहांमध्ये साठवून ठेवली जातात.
शेतकऱ्याकडून
१० महिन्यांसाठी – साधारणपणे शेतकरी एवढ्या काळासाठी मिरची गोदामात ठेवतात – ४५ - ५०
किलोच्या पोत्यामागे १७० ते २०० रुपये घेतले जातात. गुंटूरच्या शीतगृहांची क्षमता
६०,००० ते १ लाख २० हजार पोती इतकी आहे.
काही शीतगृहांचे मिरची बाजारातल्या काही दलालांशी लागेबांधे आहेत तर काही जण फक्त शीतगृहं चालवतात. हे दलाल बाजारात सौदा घडवण्यासाठी शेतकऱ्याकडून दलाली घेतात, त्यांच्याकडून भाव पाडून माल खरेदी करतात आणि नंतर मार्केट यार्डात चढ्या भावाने माल विकतात – आणि वरकड स्वतःकडेच ठेवतात. “मालाचा भाव पाडणं हे दलालाच्या आणि शीतगृह मालकाच्या, दोघांच्या पथ्यावर पडतं,” वेंकटेश्वरा राव म्हणतात. भाव वधारतील या आशेने शेतकरी आपला माल शीतगृहात आणून ठेवतात. गुंटूरमधले अनेक दलाल कालांतराने शीतगृहांचे मालक झाले आहेत.
बहुतेक
शीतगृह मालक प्रबळ अशा कम्मा, रेड्डी आणि इतर जातीचे आहेत तर इथले कामगार बहुतकरून
उत्तरांध्रा प्रदेशातले मागास जातींमधले आहेत. फेब्रुवारी ते मे या काळात जेव्हा
मिरचीचा हंगाम जोरावर असतो तेव्हा या शीतगृहांमध्ये किमान २५०० कामगार काम करत
असतात असा अंदाज कोल्ड स्टोरेज वर्कर्स अँड एम्प्लॉईज युनियन या सेंटर फॉर ट्रेड
युनियन्स (सीटू)शी संलग्न असलेल्या संघटनेने व्यक्त केला आहे. शीतगृहाच्या
क्षमतेनुसार प्रत्येक गोदामात १२-२५ कामगार पोत्यावर मजुरी देऊन कामाला घेतले
जातात.
“या
शीतगृहांमध्ये काम करणारे ९५% कामगार श्रीकाकुलम आणि विजयनगरम जिल्ह्यातले असले
तरी गेल्या काही वर्षांपासून ओदिशातून लोक कामाला येऊ लागलेत,” ५० वर्षीय चिंतदा
विष्णू सांगतात. ते विश्व कोल्ड स्टोरेजमध्ये मिस्त्री असून कामगार संघटनेचे सचिव
आहेत. “जून ते डिसेंबर फारसं काम नसतं तेव्हा काही कामगार आपापल्या गावी जाऊन
शेतीची कामं करून येतात. आम्हाला जशी गरज असेल तसं आम्ही त्यांना बोलावून घेतो.”
विष्णू कलिंगा या मागास जातीचे आहेत आणि त्यांची स्वतःच्या मालकीची जमीन नाही. “शेती पिकेनाशी झाल्यावर १९९९ मध्ये मी [श्रीकाकुलमहून] इथे आलो. मी भाडेपट्ट्यावर जमीन घेतली आणि तीन वर्षं भातशेती केली. पण सिंचनाच्या सोयी नाहीत आणि मालाला चांगला भावच नाही त्यामुळे पुरता तोट्यात गेलो.”
शीतगृहातले
कामगार फेब्रुवारी ते मे या हंगामात आठवड्यातले पाच दिवस काम करतात आणि दोन दिवस
सुटी घेतात. त्यांच्या कामाच्या वेळा पक्क्या नसतात, मिरचीच्या मागणीप्रमाणे
त्यांना कामावर यायला लागतं. “आम्हाला अडनिड्या वेळी काम करायला लागतं, कारण मालच
तेव्हा येतो. आम्ही अगदी मध्यरात्री ३ पासून ते दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंतही काम
करतो. दिवसभरात आम्हाला वेळ मिळेल तशा आम्ही डुलक्या काढतो,” राजा राव सांगतो.
बहुतेक
अविवाहित कामगार (इथे सगळे पुरुष कामगारच आहेत) शीतगृहाच्याच आवारात एक दोन
खोल्यांमध्ये राहतात. भात आणि कालवण रांधून घेतात. विवाहित कामगार शक्यतो जवळपास
भाड्याने खोली करून राहतात.
“आम्ही
अकरा जणांनी मिळून आज दिवसभरात १५० गोण्या खाली उतरवून आणल्यात. आम्ही
कामगारांच्या संख्येनुसार मजुरी वाटून घेतो. आज प्रत्येकाच्या वाट्याला शंभरहून
थोडे जास्त पैसे आलेत,” चाम्मला संपत राम सांगतात. श्रीकाकुलम जिल्ह्याच्या गारा
मंडलातल्या कोरनी गावाहून ते दहा वर्षांपूर्वी कामाच्या शोधात गुंटुरला आले.
विष्णू मिस्त्री कुठे आजूबाजूला नाही याची खात्री करून ते मला सांगतात, “सगळी मेहनत आम्हीच करतो. कोणताही मिस्त्री कसल्याच कामाला हात लावत नाही. त्यांचं काम म्हणजे फक्त आम्हाला सूचना द्यायच्या. असं असूनही आम्ही आमच्याच खांद्यावरून पोती वाहून नेली तरी प्रत्येक वेळी त्याला एक रुपया द्यायचा. त्याउपर त्याला आम्हाला मिळतात तेवढे [पोती वाहण्याचे] पैसे मिळणार, पोत्याला साधा हातही न लावता.”
विश्व
कोल्ड स्टोरेजमध्ये एका वेळी १ लाख २० हजार पोती ठेवण्याची क्षमता आहे, म्हणजेच दर
वर्षी मिस्त्रीची २.४ लाखाची कमाई होते, वर पोती वाहण्याची मजुरी मिळते ती वेगळीच.
पण मिस्त्रीच्या कारभारावर बोट ठेवणं म्हणजे स्वतःच्या पोटावर पाय देण्यासारखं आहे
याची कामगारांना कल्पना आहे. “तो आम्हाला काढून टाकेल आणि दुसऱ्या कुणाला तरी
घेईल,” राजा राव म्हणतो.
करिमी
चिन्नम नायडू, वय ३५ यांनी १३ वर्षांनंतर गेल्या वर्षी शीतगृहांमध्ये काम करणं
थांबवलं. “मी या दोन रुपये दलालीच्या विरोधात भांडलो आणि माझ्या मिस्त्रीलाच फैलावर
घेतलं. मग काय त्याने माझं जगणंच मुश्किल करून सोडलं. मला काम सोडायलाच लागलं आणि
दुसरीकडे जावं लागलं,” नायडू सांगतात. ते आता मिरची मार्केट यार्डात हमाली करतात.
मी
जेव्हा विष्णू यांना या दलालीविषयी विचारलं तेव्हा ते म्हणतात, “कधी कधी आम्ही या
कामगारांना उचल देतो आणि ते आम्हालाच गंडा घालतात. हा असला तोटा भरून काढण्यासाठी
ही दलाली वापरली जाते. कामगारांनी शीतगृहाच्या मालकांकडे मजुरी वाढवण्याची मागणी
करायला पाहिजे.”
मालकांकडे
मजुरी वाढवण्याची मागणी करून काहीही फायदा झालेला नाही. “मी १० वर्षांपूर्वी काम
करायला सुरुवात केली, तेव्हा पोत्यामागे १२ रुपये मजुरी मिळायची, आता आम्हाला २३
रुपये मिळतात, दुप्पटदेखील नाही. याच दरम्यान शीतीकरणाचं शुल्क [मजुरीसहित] ५०
रुपयांवरून २०० रुपयांवर गेलंय,” संपत राव सांगतात. जे शेतकरी आपला माल इथे ठेवतात
त्यांच्याकडूनच हे वसूल केलं जातं.
शीतगृहाचे मालक बख्खळ नफा कमवतात. शीतगृह चालवण्यासाठी फारसा खर्च येत नाही. विश्व कोल्ड स्टोरेजचे मालक, श्रीनिवासा राव सांगतात, “सगळ्यात मोठा खर्च म्हणजे, वातानुकुलन यंत्रणेसाठी वीज, वीजकपातीच्या काळात जनरेटर चालतो त्याचं डिझेल, अमोनिया [शीतीकरणासाठी] आणि पाणी, बाकी देखभाल खर्च तर असतोच. विजेचाच खर्च महिन्याला २.८ ते ३ लाख रुपये इतका येतो आणि पाण्यावर २५,००० रुपये खर्च होतात.”
“सगळा
मिळून अगदी महिन्याला ५ लाख रुपये खर्च पकडला तरी शीतगृहाचा धंदा एकदम फायदेशीर आहे,
दर वर्षी तब्बल ५० लाखांचा नफा मिळतो,” गुंटूर शहर सीटूचे सचिव नलिनीकांत कोटापटी
सांगतात.
हे
कामगार शीतगृहाचे नियमित कामगार नाहीत त्यामुळे कामगार कायद्यामध्ये नमूद केलेले
कोणतेही लाभ यांना मिळत नाहीत – आरोग्याचा विमा नाही, भविष्य निर्वाह निधी नाही,
राज्य कामगार विमा योजनेचा लाभ नाही, बोनस नाही ना इतर कोणते लाभ. “माल लादायला
आणि उतरायला शेतकरीच आपली माणसं घेऊन येतात असं शीतगृहाचे लोक सांगतात आणि त्यांची
जबाबदारी चक्क झटकून टाकतात,” नलिनीकांत सांगतात.
संघटनेच्या
माध्यमातून कामगार अधिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र संघटनाच तितकी
मजबूत नाही. कामाचं स्वरुपच इतकं असंघटित आहे की या माथाडी कामगारांना संघटित
करणंही अवघड आहे आणि त्यांचे मालक आणि मिस्त्री यांचं जुमानलं नाही तर त्यांना
त्यांचं कामच हातचं जाण्याची भीती आहे.
“आम्हाला
गावाकडे जगण्यासाठी काहीही नाही, म्हणून तर आम्ही इथे येतो ना,” राजा राव म्हणतो.
“नाही तर आपली प्रेमाची माणसं तिकडे सोडून असं गुलामासारखं जिणं जगायला कुणाला आवडेल
का? आम्हाला तर साधं या गुलामगिरीबद्दल बोलायचीसुद्धा चोरी आहे.”
अनुवादः मेधा काळे