यमुना जाधवांकडे पाहिल्यावर अशी शंकाही येणार नाही की दोन दिवस त्यांना झोप मिळाली नाहीये. त्या हसतात, वळलेली मूठ उंचावून ‘लाल सलाम’ करतात आणि म्हणतात, “पुढच्या दोन दिवसाकडून लई आशा टांगून ठेवल्यात आम्ही.”
महाराष्ट्रातल्या
नाशिक जिल्ह्यातल्या दुडगावहून निघालेल्या यमुनाबाईंना दिल्लीला येऊन सहाच तास
झालेत. “आम्ही २७ नोव्हेंबरला रात्री दिल्लीची गाडी पकडली,” त्या सांगतात. “आमच्याकडे
कुठं रिझर्वेशन? मग काय, सगळा प्रवास
दारात बसून केला. सलग २४ तास बसून बसून माझी पाठ धरलीये आता.”
२९
नोव्हेंबर रोजी सकाळी कडाक्याच्या थंडीत दिल्लीत पोचलेल्या हजारो शेतकऱ्यांपैकी एक
यमुनाबाई (शीर्षक छायाचित्रातील). देशभरातल्या शेतकरी आणि अन्य १५०-२०० संघटनांच्या
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने देशभरातल्या शेतकऱ्यांना दिल्लीतल्या दोन
दिवसांच्या मोर्चामध्ये सामील होण्याचं आवाहन केलं आहे. आज, ३० नोव्हेंबर रोजी
आंदोलक शेतकरी संसदेच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत. शेतीवरील अरिष्टासंबंधी
संसदेचं २१ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं ही त्यांची मागणी.
वेगवेगळ्या राज्यांमधून शेतकरी आलेत, आणि त्यातले किमान ३,००० महाराष्ट्रातले आहेत, अखिल भारतीय किसान सभेचे शेतकरी नेते, अजित नवले सांगतात. त्यातले अनेक यमुनाबाईंसारखे दिवसाला १५० रुपये रोजावर काम करणारे शेतमजूर आहेत.
शेतीवरचं
संकट गहिरं होत असल्यामुळे त्यांच्या कमाईवरच थेट परिणाम झाला आहे असं त्या
सांगतात. “शेतीत कामं सुरू असली की आमच्या पण हातात थोडे पैसे पडतात,” किसान सभेचा
लाल टी-शर्ट घातलेल्या यमुनाबाई म्हणतात. “यंदा, महाराष्ट्रात गंभीर दुष्काळ आहे.
शेतकऱ्यांनी रब्बीच पेरली नाही. अशात, आम्हाला काम कुठून भेटावं?”
हझरत
निझामुद्दिन स्थानकाच्या जवळ असणाऱ्या श्री गुरुद्वारा बाला साहेबजी इथे दिल्लीला
पोचलेल्या शेतकऱ्यांनी मुक्काम केला, तिथेच गुरुद्वारेने सकाळी डाळ-भाताची सोय केली
होती. सकाळी ११ वाजेपर्यंत सगळ्यांचा नाश्ता उरकला. नाशिक जिल्ह्यातल्या गंगावरे
गावच्या अंदाजे पस्तिशीच्या असणाऱ्या तुळजाबाई भडंगे सांगतात, त्यांनी घरनं चटणी
भाकर बांधून आणली होती. आदल्या रात्री त्यांनी तीच खाल्ली, पण दोन दिवस उलटल्यावर
ती खाता येईना. “आम्ही प्रवासासाठी १००० रुपये सोबत आणलेत,” त्या सांगतात. “कालच्या
दिवसात खाण्यावर २०० रुपये खर्चले. नाशिक स्टेशनला जायला रिक्षाला पैसे लागले.
त्यात पाच दिवसांची मजुरी बुडणार ते तर आम्ही धरूनच चाललोय. पण हा मोर्चा म्हणजे
आमचं म्हणणं आहे. मुंबईतही आम्ही तेच केलं आणि आताही आम्ही परत तेच करणार आहोत.”
नाशिकच्या
आदिवासी पट्ट्यातली एक प्रमुख समस्या म्हणजे कसत असलेल्या वनजमिनींचे अधिकार आदिवासींना
देणाऱ्या वन हक्क कायदा, २००६ ची अंमलबजावणी झालेली नाही. दशकानुदशकं आदिवासी जमिनी
कसतायत पण त्या जमिनीची मालकी काही त्यांच्याकडे नाही, तुळजाबाई सांगतात. “माझ्या
मालकीची काही फार जमीन नाही पण मी दुसऱ्यांच्या रानात काम करते की,” त्या म्हणतात.
“त्यांच्याच जमिनी गेल्या, तर आम्ही कुठं काम करावं?”
दिल्लीला आलेल्या महाराष्ट्राच्या आदिवासी पट्ट्याबाहेरच्या शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या समस्या काय आहेत – सिंचनाच्या सोयी नाहीत, पाण्याची टंचाई, अन्याय्य पीक विमा धोरण आणि कर्जमाफीची गरज. “प्रत्यक्षात जमिनीवर काहीही झालेलं नाही,” अहमदनगरच्या अंबेवंगन गावचे सत्तरीचे देवराम भांगरे सांगतात. दुपारचे १२.३० झालेत आणि मोर्चा दिल्लीच्या रस्त्यांवरून पुढे सरकतोय. “शेतकऱ्याला कधीच खरिपाच्या पेरण्यांच्या वेळेत विम्याचे पैसे हातात येत नाहीत, आणि तेव्हाच तर नड जास्त असते. शेतकऱ्याकडेच पैसा नसेल तर तो मजुरीवरचा खर्च कमी करतो. आता आमच्याच गावात कुठेच पाणी नाही, पण कसलीच मदत मिळंना गेलीये. मोदींनी काही त्यांचा शब्द पाळला नाही. त्यांना आमचा संताप दिसायलाच पाहिजे.”
लाल
रंगाचे टी शर्ट आणि बावटे हातात घेतलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीचे रस्ते फुलून गेले
आणि हवेत ‘मोदी सरकार होश में आओ’ चा नारा घुमू लागला. रस्त्याच्या कडेने उभे
असलेले लोक आणि प्रवासी काय चालू आहे ते पाहत असताना शेतकऱ्यांच्या घोषणा मात्र
दुमदुमत होत्या.
शिस्तबद्ध
आणि जोरकसपणे शेतकऱ्यांचा मोर्चा रामलीला मैदानाच्या दिशेने – निझामुद्दिनपासून नऊ
किलोमीटर – निघाला, रात्रीचा मुक्काम तिथेच होता. अंदाजे पाच किलोमीटर गेल्यावर
त्यांनी फक्त एकदा विश्रांती घेतली आणि दुपारी ४.३० च्या सुमारास आंदोलक रामलीला
मैदानात पोचले.
आंदोलक महिला आणि पुरुष सगळ्या वयोगटातले आहेत. अठरा वर्षांचा कृष्णा खोडे नाशिकच्या पिंपळगावहून आलाय. त्याचे वडील निवृत्ती, मार्च महिन्यातील लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते. नाशिक ते मुंबई असं १८० किलोमीटर अंतर चालून शेतकरी मुंबईत थडकले होते. “ते परतले आणि आजारी पडले,” हातात लाल बावटा आणि पाठपिशवी घेतलेला कृष्णा सांगतो. “दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्या छातीत दुखायला लागलं. आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला एक्स रे काढायला सांगितला. पण ते करायच्या आधीच ते वारले.”
तेव्हापासून
कृष्णाची आई सोनाबाई, दोन्ही आघाड्या सांभाळतीये, रानात काम करायचं आणि मजुरीला
जायचं. कृष्णाला पोलिस अधिकारी व्हायचंय. “मला शेती नाही करायची,” तो सांगतो. “माझ्या
वडलांची इच्छा होती की मी पोलिस अधिकारी व्हावं. आणि मी त्यासाठी भरपूर मेहनत
घेणार आहे.”
निवृत्तींबाबत
जे झालं त्यानंतर सोनाबाईंनी आपल्या मुलाला मोर्चात सहभागी होण्यापासून रोखलं का?
कृष्णा हसतो. “तिने मला विचारलं की तुला कशापायी जायचंय,” तो सांगतो. “मी म्हणालो,
मला त्यात सहभागी व्हायचंय. त्यावर ती इतकंच म्हणालीः ‘जिवाला जप.’”
अनुवादः मेधा काळे