मध्य मुंबईपासून ९५ किलोमीटरवर ठाणे जिल्ह्याच्या निंबवली गावातल्या सपऱ्या डोंगराच्या पायथ्याशी आहे आमचा गरेलपाडा. या छोट्याशा आदिवासी पाड्यावर अगदी मोजकी २०-२५ घरं आहेत.
दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील पाड्यावर पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी झाली. महिन्याच्या सुरुवातीलाच सगळे जण सणाच्या तयारीला लागले.
आमच्या समुदायासाठी या सणाचे चार महत्त्वाचे दिवस म्हणजे वाघबारसी, बारकी तिवली, मोठी तिवली आणि बलिप्रतिपदा. या वर्षी नोव्हेंबर ५-८ दरम्यान आम्ही हे सण साजरे केले.
वारली लोक वाघाला देव मानतात आणि वाघबारसीच्या दिवशी आम्ही त्याची पूजा करतो. बहुतेक आदिवासी पाडे जंगलांमध्ये आहेत. आणि पूर्वी वारलींचं जीवन पूर्णपणे जंगलावर अवलंबून होतं. ते त्यांची जनावरं चारायला जंगलात घेऊन जायचे, आणि आजही बरेच जण हे करतायत. या जनावरांवर हल्ला करू नये म्हणून ते वाघाची प्रार्थना करायचे – आणि याच भीतीतून त्याची पूजा करणं सुरू झालं.
मध्य मुंबईपासून ९५ किलोमीटरवर, ठाणे जिल्ह्याच्या निंबवली गावातल्या सपऱ्या डोंगराच्या पायथ्याशी आहे आमचा गरेलपाडा. या वर्षीदेखील पाड्यावर पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी झाली
गावदेवीच्या देवळात मध्यावर लाकडावर एक वाघ कोरलेला आहे. गावकरी इथे येऊन नारळ फोडतात, उदबत्ती लावतात आणि देवाची पूजा करण्यासाठी दिवा लावतात. पाड्याजवळच्या जंगलात शेंदूर फासलेली एक शिळा आहे, तो आहे आमचा वाघ्या देव.
बारक्या तिवलीच्या दिवशी माझी आई प्रमिला जंगलातून चिरोती गोळा करून आणते. माझी आई ४६ वर्षांची आहे, तिने पूर्वी वीट भट्टयांवर काम केलंय, काळ्या गुळापासून दारू करून विकलीये पण आता ती वनजमिनीवर शेती करतीये. काकडीवर्गीय, मात्र लहान आणि कडू चिरोतीचे आई दोन तुकडे करते आणि आतला गर काढून टाकते. आता यामध्ये पणतीसारखी दिवा लावता येतो.
गायीचं शेण आणि माती मिसळून त्याचा एक गोल दिवा केला जातो, त्याला म्हणतात, बोवाला. भिंतीवर थोड्या उंचीवर हा बोवाला लिंपून बसवला जातो. त्याला झेंडूच्या फुलांनी सजवलं जातं. संध्याकाळी या बोवाल्यात दिवा लावतात. हा दिवा उंचावर असल्याने सगळा परिसर उजळून निघतो.
पूर्वी पाड्यावरची सगळी घरं कारवी आणि लाकडाची होती. छप्परही शाकारलेलं असायचं. तेव्हा बोवाला शेणाचा असल्याने आगीची भीती नसायची. (२०१० च्या सुमारास पाड्यावरच्या लोकांनी इंदिरा आवास योजनेअंतर्गत विटा आणि सिमेंटची घरं बांधायला सुरुवात केली.)
बारकी आणि मोठी तिवली – या दोन्ही दिवशी पाड्यावरची घरं दिव्यांनी सजतात. दोन्ही दिवशी या तिवल्यांच्या उजेडाने पाड्यावरचा अंधार फिटून जातो – गोठ्यात, शेणकईत (गोवऱ्यांचा उडवा) आणि गावच्या विहिरीच्या काठावर – सगळीकडे पणतीच्या वाती वाऱ्यावर थरथरत असतात.
बलिप्रतिपदेच्या दिवशी पहाटेच सण सुरू होतो. पूर्वी घरच्यांच्या नकळत पेटत्या बिडीचा हलका चटका, ‘डांब’ देऊन खोडी काढली जायची. “प्रत्येकाने पहाटे लवकर उठलं पाहिजे, अंघोळ केली पाहिजे. झोपून राहिलेल्यांना जागं करायला डांब द्यायचा,” राम पारेड सांगतात. ते माझा काका आहेत, त्यांचं वय ४२ वर्षं आहे. त्यांचं कुटुंब पण वीटभट्ट्यांवर काम करायचं, पण आता ते कंत्राटी कामगार आहेत आणि पावसाळ्यात वनजमिनीवर शेती करतात.
बलि प्रतिपदेच्या दिवसी सगळ्यांची अंगणं शेणाने सारवून घेतली जातात आणि गोठे साफ केले जातात. सगळ्या गुरांना सजवून त्यांची आरती केली जाते. “ही आदिवासी परंपरा आहे,” अशोक काका गरेल सांगतात. ते गुराखी आहेत. त्यांचा हात भाताची पेज कालवलेल्या गेरुने भरलाय. या विटकरी गेरूने गुरांच्या अंगावर हाताचे छप्पे उठवतात. आणि याच काल्याने त्यांची शिंगही रंगवतात.
पाड्यावरची पुरुष मंडळी गुरांना सजवण्यात गुंतलेली असताना बाया खास दिवाळीचे पदार्थ करण्यात मग्न असतात. पानमोडी, चवळी आणि करांदे हे खास पदार्थ असतात. आदिवासी स्वतः पिकवतात त्याच धान्यातून हे सगळे पदार्थ बनवले जातात.
“आमच्या रानातला नवा भात येतो ना, त्याची आम्ही बारीक पिठी करतो. त्यात काकडी किसून घालायची आणि थोडा गूळ. मग चाईच्या पानामध्ये हे सारण भरायचं आणि वाफेवर शिजवायचं,” पानमोडी कशी करायची ते माझी आई, प्रमिला सांगते. “आणि पानमोडी करताना, घर झाडायचं नाही हां, नाय तर पानमोडी शिजत नाय!”
करांदे लावण्यासाठी पावसाळ्यात मातीचा एक वरंबा करतात. दिवाळीच्या सुमारास वेलीवर करांदे लागतात. काही काळपट असतात, तर काही सफेद, काही गोल तर काही खडबडीत. त्यांची चव बटाट्यासारखी असते. वनजमिनीच्या एका तुकड्यात पाचोळा, तणीस आणि गोवऱ्यांचा राब करून चवळी पेरण्यासाठी रान तयार केलं जातं. रान नांगरून मग चवळी, ज्याला आम्ही चवला म्हणतो पेरली जाते. बलिप्रतिपदेच्या दिवशी करांद्यांचे काप आणि चवळी पाण्यात मीठ टाकून उकडतात.
स्वयंपाक उरकला की बाया गोठ्यात जातात. तिथे भाताचं तणीस, बत्ता, पहार आणि झेंडूची फुलं ठेवलेली असतात. गोठ्यातून गुरं बाहेर पडली की चिरोतीची फळं त्यांच्या खुराखाली फेकतात. असं मानलं जातं की गुरांच्या खुराखाली चेचलेल्या फळांच्या बिया लावल्या की त्याला गोड फळं लागतात.
गुरं शेतीचा कणा आहेत, शेतकऱ्यांच्या सोबतीने ते रान पिकावं आणि घरी धान्य यावं म्हणून राबत असतात. आणि यामुळेच वारली लोकांचा असा समज आहे की करणी करणारे गुरांवर करणी करतात. ही बाधा जावी म्हणून आदिवासी ‘अग्नी पूजा’ करतात. पाड्यावरची सगळी जनावरं – गायी, बैल, म्हशी आणि बकरी – सगळ्यांना भाताचं तणीस पेटवून लावलेला आगीचा लोट झटक्यात पार करायला लावतात.
या दिवशी वारली त्यांच्या देवांची प्रार्थना करतात – वाघ्या (वाघ), हिरवा (हिरवाई), हिमाई(डोंगराची देवता), कन्सारी (धान्य देवता), नरानदेव (रक्षक देव) आणि चेडोबा (दुष्टापासून रक्षण करणारा देव). झेंडूची फुलं मंतरून देवांना चढवली जातात सोबत चवला, करांदे आणि पानमोडीचा प्रसाद दाखवला जातो. दिवाळीपासून पाऊस पडेपर्यंत अनेक वारली बाया केसात झेंडूची फुलं माळतात. त्यानंतर मात्र पूजेसाठी किंवा सजवण्यासाठी दिवाळीपर्यंत झेंडूची फुलं वापरली जात नाहीत.
आदिवासी आपल्या छोट्या वनजमिनींच्या तुकड्यात संपूर्ण पावसाळाभर कष्ट करतात. डोंगरावरच्या खडकाळ जमिनीतही ते कष्टाने शेती करतात. दिवाळीच्या सुमारास, पिकं – भात, उडीद, ज्वारी आणि इतर – काढणीला आलेली असतात. जर का निसर्गाची कृपा झाली तर चांगलं पिकलं तर काही कुटुंबांना जास्तीचं धान्य विकून थोडा फार पैसा कमवता येतो. आणि याच आनंदात वारली आपली दिवाळी साजरी करतात. नवं पीक पूजल्यानंतरच ते त्याचा घास घेतात.
पावसाळा संपल्यानंतर मात्र रानात काहीच काम नसतं. मग पोटासाठी काय काय करायचं याची शक्कल लढवण्याची वेळ येऊन ठेपते. मग पुढचे काही महिने कोणी जवळच्या गावांमध्ये वीटभट्ट्यांवर जातात, किंवा मुंबईच्या उत्तरेकडच्या उपनगरांमध्ये बांधकामावर कामाला जातात. काही जण दगडखाणींमध्ये जातात तर काही जण साखरकारखान्यांच्या पट्ट्यात.
इंग्रजी अनुवादः संयुक्ता शास्त्री
अनुवादः मेधा काळे