“आज गोळा केलेल्या सगळ्या वस्तू मी वेगवेगळ्या केल्या आहेत. ते (भंगार खरेदी करणारे व्यापारी) या वस्तू घेतील, त्यांचं वजन करतील आणि पैसे देतील,” उरलेले पेपर आपल्या पिशवीत कोंबत कालू दास सांगत होते. “त्यानंतर जर गाडी वेळेवर मिळाली तर दोन तासांत मी घरी पोचेन.”
सप्टेंबरच्या सुरुवातीला ६० वर्षांचे कालू दास दक्षिण २४ परगणातील हसनपूर या आपल्या गावाहून शेअर टोटो (ऑटोरिक्षा) आणि बसने प्रवास करत जवळपास २८ किलोमीटरवरच्या कोलकात्यात आले होते. कित्येक महिन्यांनंतरची ही त्यांची दुसरीच चक्कर होती. या आधी ते ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आले होते. त्यांच्या खांद्यावर एक मोठी, झोळीसारखी पांढरी पिशवी लटकत होती.
दास मागील २५ वर्षांपासून दक्षिण आणि पूर्व कोलकाताच्या वेगवेगळ्या भागातून भंगार गोळा करतायत. भंगारवाला बनण्याआधी ते एका चित्रपट वितरण कंपनीत कामाला होते. “नेपच्यून पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडसाठी मी सिनेमाची फिल्मची रिळं वाहून न्यायचं काम करायचो,” ते सांगतात. “बॉम्बे, दिल्ली, मद्रासहून (३५ एमएमच्या रील्ससाठी) ऑर्डर येत असत. मोठ-मोठ्या ट्रंकांमध्ये फिल्म यायच्या मी त्या हावडाला घेऊन जायचो, त्यांचं वजन करायचो आणि वितरणासाठी त्यांना पुढे पाठवायचो.”
ती कंपनी बंद झाल्यावर दास बेरोजगार झाले. त्यावेळी ते दक्षिण कोलकात्यातील बोसपुकुर भागात भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना भंगारच्या धंद्याची ओळख करून दिली. “माझी नोकरी गेल्यावर त्याने मला त्याच्या कामात सामील होण्याबद्दल विचारले. तो म्हणाला, ‘मी तुला दररोज २५ रुपये देईन. तू सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडशील आणि दुपारपर्यंत घरी परत येशील. तुला सामान वाहून न्यावं लागेल आणि माझ्यासोबत फिरावं लागेल. आपल्याला सोबत चहा पिता येईल. मी राजी झालो. मी त्याच्याकडून शिकत गेलो. एखादा शिक्षक ज्याप्रमाणे त्याच्या विद्यार्थ्यांना शिकवतो त्याप्रमाणेच त्याने मला शिकवलं. तो माझा गुरु होता.”दास यांनी आपल्या गुरुचं निरीक्षण करत पेपर, प्लास्टिक, ग्लास बॉटल, लोखंड आणि इतर धातू अशा प्रत्येक वस्तूची किंमत कशी ठरवायची ते शिकून घेतलं. “१५० ग्रामची, २०० ग्रामची, २५० ग्रामची किंमत किती? मी वेगवेगळ्या सामानातला फरक ओळखायलाही शिकलो.” त्या काळात बाजार चांगला होता. त्यांनी धंदा सुरु केला तो दोन दशकांपूर्वीचा काळ त्यांना आठवतो.
दास १९७१ मध्ये त्या काळातील हिंसाचारापासून वाचण्यासाठी बांग्लादेशातून भारतात आले. त्यांचं कुटुंब तिथं शेती करतं. “त्या ‘झमेल्या’ मुळे (अराजक आणि युद्ध) मी तिथून निघून आलो. त्यावेळी त्यांचा भाऊ (आता हयात नाही) सायकल रिक्षा चालवत असे. तो त्यावेळी उत्तर २४ परगणातील कंचरापारा शहरात राहत होता. येथे आल्यावर काही काळ कालू दास यांनी गवंड्याच्या हाताखाली काम केलं. कालांतरानं भारत सरकारकडून त्यांना मतदान कार्ड, आधार कार्ड आणि राशन कार्डसह सर्व प्रकारचे दस्तावेज आणि मान्यता मिळाल्या, ते सांगतात.
लॉकडाऊनपूर्वी दास हसनपूरहून सोनारपूर तालुक्यात भंगार गोळा करण्यासाठी आठवड्यातून चार चकरा मारत. उंच इमारती आणि झोपडपट्ट्यांमधून दिवसाचे चार-पाच तास फिरून ते महिन्याकाठी रु.३००० कमवत.
मार्चमध्ये लॉकडाऊन लागल्यावर बस आणि लोकल ट्रेन बंद पडल्या आणि दास यांचं कामही थांबलं. “कोलकात्याला (काहीतरी करून) येण्याचा मी विचार करत होतो,” ते सांगतात, “परंतु लोकांनी मला बजावलं. मीही टीव्हीवर पाहिलं, पोलिस लॉकडाऊन मोडणाऱ्यांचा पाठलाग करून त्यांना मारत होते.” शिवाय, आसपास करोनाचे काही रुग्णही होते. दास म्हणतात, “मी विचार बदलला. मी निर्णय घेतला, मी उपाशी राहीन पण घर सोडणार नाही.”दास यांच्या पत्नी मीरा दक्षिण कोलकात्यातील जादवपुर भागात घरकामगार म्हणून काम करतात. गाव सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या १८, १६ आणि १२ वर्षांच्या तीन नातवांना आपल्या आजोबासोबत राहण्याची विनंती केली. “ती त्यांना म्हणाली, ‘तुमचे दादू म्हातारे आहेत. ते एकटे राहतात’, दास सांगत होते. लॉकडाऊनच्या काळात, मीरा यांच्या बँकेत महिना ७००० रुपये जमा होत होते, त्यातच दास यांना भागवावं लागले.
“माझ्या पत्नीला लॉकडाऊनमध्येही काम करावं लागलं. नाही तर महिन्याला १००० रुपये भाडं आणि इतर खर्च आम्ही कसा भागवला असता?” ते विचारतात. मीरा दर महिन्यातून दोन ते तीन दिवस गावाला येतात. “तिला तिच्या नातवांना पाहता येत नाही. त्यांना पाहायची खूप इच्छा झाली की ती रडते. जेव्हा ती घरी येते तेव्हा तिला त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला आवडतं,” दास सांगत होते. त्यांचा सगळ्यात मोठा नातू इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो, परंतु लॉकडाऊनपासून त्यालाही फारसं काम आलेलं नाही. सगळ्यात लहान नातू शाळेत आहे. मधला बेरोजगार आहे.
परंतु मीराचं कामही लवकरच सुटणार आहे. “ते तिला जास्त दिवस ठेवणार नाहीत,” दास म्हणतात. “ती आता घरी येणार आहे. त्यांना (मीरा ज्यांच्याकडे कामाला आहेत) आता तिला पगार देणं परवडत नाही.”
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दास यांनी भंगार गोळा करण्यासाठीच्या आपल्या फेऱ्या सुरु केल्या. पण धंदा नाही. “कोरोनाच्या काळात लोक (भंगारमध्ये विकण्यासाठी) फारशा वस्तू घरात ठवत नाहीयेत. ते वस्तू फेकून देतायत,” भंगारमधील मिक्सरचं बूड बसवता-बसवता ते सांगतात.दास घरोघरी फिरून ८ रुपये किलोने वर्तमान पत्र आणि इतर कागद विकत घेतात आणि ९-९.५ रुपये किलोने ते भंगार व्यापाऱ्यांना विकतात. काही प्लास्टिक बाटल्यांसाठी ते २-४ रुपये देतात. “प्लास्टिकच्या बाटल्यांचा रेट कमी झालाय,” ते सांगतात. “भंगार व्यापाऱ्याकडे जायला मला रिक्षा भाड्याने करावा लागतो. या धंद्यातील काही जणांकडे हातगाडी आहे (भंगार वाहून नेण्यासाठी). त्यांना बाटल्यांसाठी जास्त पैसे देणं परवडतं.”
विकत घेतलेलं सर्व भंगार दास एका मोठ्या गोल बांबूच्या टोपलीत टाकतात. जवळपास २० किलोपर्यंतचं ओझं ते आपल्या डोक्यावर उचलू शकतात. मग जवळच्या रथतालातील भंगार व्यापाऱ्याच्या दुकानावर जाण्यासाठी ते सायकल रिक्षाला आवाज देतात. गावाहून कोलकात्याला येणं-जाणं आणि या सायकल रिक्षाचं भाडं हे सर्व मिळून साधारण १५० रुपये प्रवासावर खर्च होतात. हा खर्च जाऊन त्यांना अगदीच किरकोळ नफा उरतो. ज्याला ते बोलीभाषेत “काय, २-४ रुपये” म्हणतात. थोडक्यात, इतके कष्ट घेऊन एका फेरीत त्यांना (प्रवास खर्च वगळून) फक्त ८० ते २०० रुपयांची कमाई होते.
“मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा माझ्या घरातील कोणीच काम करत नव्हतं. या कामामुळे निदान आमच्या खाण्याची सोय झाली. येथे (बोसपुर, कोलकाता) टिकून राहणं सोपं नव्हतं. मला तीन मुलं आहेत – दोन मुलं आणि एक मुलगी. ते शाळेत जात होते. मग मला माझ्या मुलीचं लग्न करावं लागलं.” कालू दास सांगत होते. त्यांचा मोठा मुलगा, तारक, फार पूर्वी वारला, त्यांची मुलगी, पूर्णिमा साधारण ३० वर्षांची आहे आणि सगळ्यात लहाना, नारू २७ वर्षांचा. ते काय करतात असं विचारलं असता, दोघेही “कोणाच्या तरी हाताखाली” काम करतात असं ते सांगतात.
दास म्हणतात, या सगळ्या रहाटगाडग्यात दुसरं काही तरी काम करून पाहण्याची संधीच कधी मिळाली नाही. “मी आणखी काय करू शकणार? आणि या वयात कोणी मला काम तरी देईल का?”
आठवड्याच्या शेवटी ते भंगारच्या कामावर निघतात. इतर दिवशी ते घरीच थांबतात किंवा जवळच राहत असलेल्या नारूच्या घरी जातात. “मी कोरोनाचा फार विचार करत नाही. जो काम करील तो चांगला राहील. कामावर जाण्याऐवजी मी जर घरी बसून राहिलो तर रोगाची भीती मनात घर करेल. तुमच्यात हिंमत असली पाहिजे,” आपला पातळ पांढरा मास्क नीट लावत दास सांगतात.
अनुवादः परीक्षित सूर्यवंशी