नोसुमुद्दिन रडत होता. पहिल्यांदाच घर सोडून तो दूर चालला होता – आपल्या घरापासून १०-१२ किलोमीटरवर, आई-वडलांना सोडून. सात वर्षांच्या लहानग्यासाठी हे खूपच अवघड होतं. “मला खूप वाईट वाटत होतं आणि मी रडत होतो. घर आणि घरच्यांना सोडून जायचं या विचाराने माझे डोळे भरून येत होते,” ते सांगतात.
त्यांची राखाल (गुराखी किंवा राखुळी) म्हणून पाठवणी होत होती. “आमच्या घरी खूपच गरिबी होती आणि माझ्या आई-वडलांकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता,” आता ४१ वर्षांचे असणारे नोसुमुद्दिन सांगतात. “आम्हाला पोटभर खायला पण मिळायचं नाही. बहुतेक वेळा दिवसातून एकदाच जेवायचो, तेही रानात उगवणाऱ्या फुकटचा भाजीपाल्यातलं काही तरी. आमच्या गावातली मोजकी लोकंच दिवसांतून दोन वेळा जेवायची.” शिक्षण वगैरे तर कल्पनेच्या पलिकडचं होतं. “त्या काळी मी शाळेत जायचा विचारसुद्धा करू शकत नव्हतो. माझ्या घरची परिस्थिती इतकी हालाखीची होती की शाळा वगैरे कसं परवडणार?”
तर, तेव्हाच्या धुबरी जिल्ह्यातल्या उरारभुई गावातलं आपलं साधंसं झोपडीवजा घर सोडून ते मनुल्लापारा या गावी पोचले. बसला ३ रुपयांचं तिकिट पडलं. तिथे ७ गायी असणाऱ्या, १२ बिघा (सुमारे ४ एकर) जमीन असणाऱ्या एका इसमाने त्यांना कामावर घेतलं होतं. “राखाल म्हणून काम करणं काही सोपं नाही. त्या वयात मला कित्येक तास सलग काम करावं लागायचं. कधी कधी पोटभर जेवण पण मिळायचं नाही. किंवा शिळंपाकं मिळायचं. भुकेने कळवळून मला रडू यायचं,” नोसुमुद्दिन सांगतात. “सुरुवातीला मला काहीच पगार मिळायचा नाही. जेवण आणि निजायला जागा तेवढी होती. माझ्या मालकाला वर्षाला १००-१२० मण भात होत असे. चार वर्षांनंतर त्यांनी मला दोन मण (सुमारे ८० किलो) भात द्यायला सुरुवात केली.” खरिपाचा हंगाम संपला की त्यांना हे धान्य मिळत असे.
आसाम आणि मेघालयाच्या सीमेवरील ग्रामीण भागात काही दशकांपूर्वीपर्यंत लहान मुलांना एखाद्या कुटुंबाकडे राखाल किंवा राखुळी म्हणून पाठवण्याची रीत होती. गरीब घरातली मुलं श्रीमंत शेतकऱ्यांना ‘देऊन टाकली’ जात असत आणि हे शेतकरी त्यांना गुरं राखण्याच्या ‘कामावर घेत.’ ही व्यवस्था स्थानिक भाषेत ‘पेटभात्ती’ (अक्षरशः पोटभर भात) म्हणून ओळखली जाते.
नोसुमुद्दिनच्या दोन धाकट्या भावंडांना देखील त्यांच्याच गावात, उरारभुईमध्ये राखाल म्हणून कामाला लावलेलं होतं. त्यांचे वडील हुसैन अली (गेल्या महिन्यात वयाच्या ८० व्या वर्षी वारले) भूमीहीन शेतकरी होते आणि ७-८ बिघा जमिनीत बटईने शेती करायचे. (गृहिणी असलेली त्यांची आई नोसिरोन खातुन २०१८ साली मरण पावली.)
नोसुमुद्दिन खूप कष्टाळू होते. राखाल म्हणून त्यांचा दिवस पहाटे ४ वाजता सुरू व्हायचा. “सकाळी अजानच्या सुमारास मी उठायचो,” ते सांगतात. उठून जनावरांना वैरण पाणी आणि खोल (मोहरीची पेंड) द्यायची, त्यानंतर गोठ्यातली शेणघाण काढायची, मालकाच्या भावासोबत गायींना भाताच्या खाचरात न्यायचं. तिथे गवत साफ करायचं, गायींना पाणी पाजायचं आणि इतर कामं करायची. दुपारचं जेवण शेतातच यायचं. पिकं काढणीच्या काळात ते रात्री उशीरापर्यंत रानातच काम करायचे. “मी दिवसभर काम करून थकून जायचो. त्यात रात्री पोटभर खायला मिळालं नाही किंवा शिळंपाकं मिळालं तर तुम्हाला कसं वाटेल? मला असहाय्य वाटायचं.”
बांबूच्या बाजेवर गवताचा भारा आणि जुन्या कपड्यांची उशी टाकून पाठ टेकली तरी रात्र रात्र ते रडून काढायचे.
दर २-३ महिन्यांनी त्यांना गावी जायची परवानगी असायची. “मला २-३ दिवस रहायला मिळायचं,” ते सांगतात. “घर सोडून परत कामावर जायचं म्हटलं की माझ्या जिवावर यायचं.”
नोसुमुद्दिन १५ वर्षांचे झाल्यावर त्यांच्या वडलांनी त्यांना दुसऱ्या मालकाच्या हाताखाली पाठवलं. या वेळी त्यांना मनुल्लापाऱ्यातल्या एका धंदेवाल्या शेतकऱ्याकडे पाठवण्यात आलं. त्याची ३०-३५ बिघा जमीन होती, कपड्याचं दुकान आणि इतर काही व्यवसाय होते. “मला घरची आठवण येत होती. त्यात दुसऱ्या अनोळखी जागी जायचं म्हटल्यावर मला रडूच फुटलं. सोधा बेपारीनी [नवा मालक] माझी घरच्यांशी ओळख करून दिली आणि मला २ रुपये बक्षीस म्हणून दिले. त्यातनं मी नंतर एक चॉकलेट विकत घेतलं. जरा खूश झालो. काही दिवस गेल्यावर मला बरं वाटायला लागलं आणि त्यानंतर मात्र मी त्यांच्यात रुळलो.”
या वेळी देखील गोठ्यात रहाणं, खाणं आणि पिकं आली की दोन मण भात, शिवाय ४०० रुपये रोख असा सौदा होता. त्यांची रोजची कामं म्हणजे गुरांना चारायला नेणं आणि गोठ्याची साफसफाई. पण आता नोसुमुद्दिन यांचं आयुष्य जरासं सुधारलं होतं. ते आता १५ वर्षांचे होते आणि भराभर काम उरकायचे. आणि मुख्य म्हणजे त्यांचा मालक मायाळू होता.
आता जेवणात देखील गरम भात, भाजी, मच्छी किंवा मटणाचं कालवण असायचं. पूर्वीच्या मालकासारखं फक्त पांताभात नसायचा. “मी जर त्यांच्याबरोबर बाजारात गेलो तर मला रसगुल्ल्याची मेजवानी मिळायची. आणि ईदला नवे कपडे. मला त्यांच्या कुटुंबातलाच एक असल्यासारखं वाटायचं.”
पण त्यांच्या वडलांच्या मनात दुसराच डाव होता. दोन वर्षांनी, ते १७ वर्षांचे झाल्यानंतर त्यांना त्यांच्याच गावातल्या दुसऱ्या एका घरी पाठवण्यात आलं. गावाच्या पंचायत प्रमुखाने त्यांना वर्षाला १,५०० रुपये पगार आणि दोन मण भाताच्या बोलीवर कामाला घेतलं.
एक वर्ष असंच गेलं.
“माझ्या नेहमी मनात यायचं की मी माझं संपूर्ण आयुष्य असं गुलामीत घालवणार का? पण काही पर्यायदेखील दिसत नव्हता,” नोसुमुद्दिन सांगतात. तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती – कधी तरी आपल्या मर्जीने काही तरी काम सुरू करण्याचं स्वप्न ते उराशी बाळगून होतं. १९९० च्या सुमारास त्यांच्या गावातले अनेक तरुण कामासाठी गाव सोडून बाहेर जात असल्यांचं ते पाहत होते – त्या भागात पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर कामं निघत होती. आता या तरुणांना राखाल म्हणून काम करण्यात रस राहिला नव्हता. गावांमध्ये, उपनगरांमध्ये चहाच्या टपऱ्या, खानावळींमध्ये काम करून त्यांना दिवसाला ३००-५०० रुपये मिळवता येत होते. ‘मोठी’ कमाई करून खिसाभर पैसे घेऊन हे तरूण गावी परतत होते.
त्यांना पाहिलं, त्यांच्याकडच्या नव्या रेडियोवर गाणी ऐकली, हातातली चकचकीत घड्याळं पाहिली की नोसुमुद्दिन अस्वस्थ व्हायचे. काही जणांनी तर सायकली देखील विकत घेतल्या होत्या. “ते अमिताभ बच्चन किंवा मिथुन चक्रवर्तीसारख्या खालून रुंद असणाऱ्या पॅँट घालायचे. आणि कसे धट्टेकट्टे दिसायचे,” ते सांगतात. “ते नक्की काय करतात आणि कसं काय जमवतात हे मी त्यांना विचारत असायचो. अखेर मी ठरवलं की त्यांच्या बरोबर जायचं.”
मेघालयाच्या बाघमारा गावात काम निघाल्याचं नोसुमुद्दिन यांच्या कानावर आलं. हे गाव त्यांच्या गावाहून ८० किलोमीटरवर होतं. त्यांनी गुपचुप बेत आखला, कसं जायचं तो रस्ताही पाहून ठेवला. “मला काळजी वाटत होती पण मी निश्चय केला होता. मी घरी कुणालाच काही सांगितलं नाही. त्यांना समजलं असतं तर ते माझा पाठलाग करत आले असते आणि मला माघारी घेऊन आले असते अशी भीती मला वाटत होती.”
एक दिवस सकाळी, गुरं चरायला नेण्याऐवजी नोसुमुद्दिन चक्क पळायला लागले. “एक मुलगा होता ज्याच्याशी मी बाहेर कुठे काम करण्याबद्दल बोलत असे. त्याच्याबरोबर मी निघालो. हातसिंगीमारी गावातलं बस स्थानक येईपर्यंत आम्ही पळत होतो.” तिथून बाघमाराला पोचायला नऊ तास लागले. “मी काहीही खाल्लं नव्हतं. माझ्याकडे तर तिकिटाचे १७ रुपये देखील नव्हते. बाघमाराला पोचल्यावर आमच्या गावातल्या एकाकडून मी ते उसने घेतले.”
“माझ्या नेहमी मनात यायचं की माझं संपूर्ण आयुष्य मी असं गुलामीत घालवणार का? पण काही पर्यायदेखील दिसत नव्हता,” नोसुमुद्दिन सांगतात. तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती – आपल्या मर्जीने काही तरी काम सुरू करण्याचं स्वप्न उराशी होतं
अखेर, आपल्या गंतव्य ठिकाणी नोसुमुद्दिन पोचले, खिसा आणि पोट दोन्ही रिकामे. बसमधून रोमोणी चा दुकानासमोर ते उतरले. हा एकटा आणि भुकेलेला मुलगा पाहून त्या चहाच्या दुकानमालकाने त्यांना आत यायची खूण केली. नोसुमुद्दिन यांना जेवण, रहायला जागा आणि भांडी घासण्याचं व साफसफाईचं काम मिळालं.
पहिली रात्र मात्र त्यांच्या डोळ्याचं पाणी खळलं नाही. आपल्या गावातल्या मालकाकडे पगाराचे १,००० रुपये राहिले बाकी आहेत हा विचार त्यांना छळत होता. त्या वेळी त्यांना तेवढीच काळजी होती. “मला खूप वाईट वाटत होतं. इतके सगळे कष्ट केले आणि एवढा पैसा हातचा गेला.”
असेच अनेक महिने गेले. ते कप बशा विसळायला, टेबलावर मांडून ठेवायला शिकले. गरम वाफाळता चहा कसा करायचा तेही. त्यांना महिन्याला ५०० रुपये पगार मिळायचा, तो सगळा त्यांनी वाचवून ठेवला होता. “माझ्याकडे १,५०० रुपये जमा झाले तेव्हा मी ठरवलं की आता आई-वडलांना भेटण्याची वेळ आली. ही रक्कम त्यांच्यासाठी खूपच मोलाची होती हे मला माहित होतं. आणि मलाही घरी कधी जातो, असं झालं होतं.”
घरी परतल्यावर त्यांनी जमा केलेला सगळा पैसा वडलांना दिला. त्यांच्या कुटुंबावर फार पूर्वीपासून एक कर्ज होतं, ते फेडलं गेलं. ते सांगतात की पळून गेल्याबद्दल अखेर त्यांना घरच्यांनी माफही केलं.
एका महिन्यानंतर नोसुमुद्दिन बाघमाऱ्याला परत आले आणि दुसऱ्या एका चहाच्या दुकानात त्यांना महिना रुपये १,००० पगाराची भांडी आणि साफसफाईची नोकरी मिळाली. त्यातूनच त्यांची बढती होऊन ते वेटर झाले. आलेल्या लोकांना चहा, मिठाई आणि स्नॅक्स देण्याचं काम त्यांना मिळालं. पुरी-भाजी, पराठे, समोसे, रसमलाई, रसगुल्ले आणि इतरही पदार्थ ते देऊ लागले. सकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत ते काम करायचे. सगळे वेटर आणि कामगार तिथे खानावळीतच झोपायचे.
इथे त्यांनी चार वर्षं काम केलं, घरी नियमितपणे पैसे पाठवत राहिले. त्यांच्याकडे ४,००० रुपये जमा झाले तेव्हा त्यांनी घरी परतायचा निर्णय घेतला.
या पैशातून त्यांनी एक बैल विकत घेतला आणि भाड्याने घेतलेली जमीन कसायला सुरुवात केली. त्यांच्या गावात हे इतकंच काम होतं. नांगरणी, पेरणी, वेचणी अशा सगळ्यात ते संपूर्ण दिवस व्यग्र असायचे.
एक दिवस हलोईं चा (हलवाई) एक गट त्यांच्या शेताजवळनं चालला होता. “त्यांच्याकडच्या जरमेलच्या मोठाल्या थाळ्यांमध्ये ते काय घेऊन चाललेत ते मी त्यांना विचारलं. ते म्हणाले रसगुल्ले. या धंद्यात नफा आहे हे मी ताडलं. मी ज्या चहाच्या दुकानात काम करायचो तिथे रसगुल्लेही बनायचे पण मी काही ते शिकून घेतले नाहीत. त्याचं मला तेव्हा वाईट वाटलं.”
नोसुमुद्दिन यांना आता ‘स्थिरस्थावर’ होण्याचे वेध लागले होते. “माझ्या वयाच्या [विशीच्या] मुलांची लग्नं होत होती, काही जणांची प्रेम प्रकरणं होती. मला वाटायला लागलं की आपण सुद्धा आता एक जीवनसाथी शोधावा, घर बांधून, मुला-बाळांसह सुखाचा संसार करावा.” एका शेतकऱ्याच्या शेतात पाणी द्यायला येणाऱ्या एका तरुणीकडे ते आकर्षित झाले होते. त्या हिरव्या कंच भाताच्या खाचरात काम करत असताना ते तिच्याकडे पाहत रहायचे. एक दिवस सगळा धीर गोळा करून ते तिला भेटले. पण याचा भलताच परिणाम झाला. ती पळून गेली आणि दुसऱ्या दिवशीपासून कामावर यायची बंद झाली.
“मी परत तिला पाहण्यासाठी तरसत होतो, पण ती आलीच नाही,” ते सांगतात. “अखेर मी माझ्या मेहुण्यांपाशी विषय काढला आणि त्यांनी माझ्यासाठी स्थळं पहायला सुरुवात केली.” शेजारच्याच गावातल्या एका हलवायच्या मुलीशी, बाली खातून यांच्याशी त्यांचं लग्न ठरलं. त्या आता ३५ वर्षांच्या आहेत. (ते जिच्यावर भाळले होते ती बाली खातून यांची मावशी निघाली!)
लग्न झालं आणि त्यांना आपल्या सासरच्यांकडून मिठाई बनवण्याचं कौशल्य शिकण्याची संधीच खुली झाली. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी तीन लिटर दुधापासून सुरुवात केली – १०० रसगुल्ले बनवले, आणि एक रुपयाला नग या भावाने घरोघरी जाऊन विकले. त्यांना ५० रुपयांचा नफा झाला.
लवकरच त्यांनी कमाईसाठी हाच व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. हळू हळू या कमाईतून घरचं कर्ज फेडलं गेलं आणि सततच्या पूर आणि दुष्काळाच्या चक्रात शेतीचं होणार नुकसान भरून येऊ लागलं.
२००५ साली नोसुमुद्दिन मेघालयाच्या साउथ वेस्ट गारो हिल्स या जिल्ह्यातल्या महेंद्रगंज या सीमेवरच्या गावी गेले. त्यांच्या गावापासून हे गाव ३५ किलोमीटरवर आहे. तेव्हा ते २५ वर्षांचे होते. मिठाईचा धंदा या भागात चांगला चालेल असं त्यांच्या कानावर आलं होतं. पण परक्या गावात, कुणाच्या ओळखी पाळखी नसताना हे काही सोपं नव्हतं. त्या काळात तिथे सारखे दरोडे पडायचे त्यामुळे सगळीकडे असुरक्षिततेचं वातावरण होतं. लोक साशंक होते. तिथे नीटशी भाड्याची जागा शोधायला नोसुमुद्दिन यांना तीन महिने लागले. आणि गिऱ्हाईक जोडायला पुढची तीन वर्षं.
त्यांच्याकडे कसलंच भांडवल नव्हतं. त्यामुळे त्यांनी उधारीवर धंदा सुरू केला. माल आणायचा आणि हळू हळू पैसे फेडायचे. २०१५ साली त्यांची पत्नी बाली खातून देखील महेंद्रगंज इथे रहायला आली. या दोघांना एक मुलगी आणि दोन मुलं आहेत – रजमीना खातून, वय १८, फोरिदुल इस्लाम, वय १७ आणि सोरिफुल इस्लाम, वय ११. दोघंही मुलं शाळेत जातात.
गेल्या काही वर्षांपासून नोसुमुद्दिन यांना महिन्याला १८,००० ते २०,००० रुपयांचा नफा होत होता. कुटुंबाचा धंदा वाढत होता. रसगुल्ल्यासोबतच ते आणि बाली खातून जिलबी देखील बनवतात.
नोसुमुद्दिन आठवड्यातले सहा किंवा सात दिवस काम करायचे. जसा हंगाम असेल तसं. ते आणि बाली खातून दुपारी किंवा संध्याकाळी रसगुल्ले बनवून ठेवायचे. १०० रसगुल्ल्यांसाठी ५ लिटर दूध आणि २ किलो साखर लागते. पहाटे पहाटे ते जिलबी बनवायचे. कारण ती ताजी ताजीच विकावी लागते. सगळं झालं की नोसुमुद्दिन दोन्ही मिठाया घेऊन घरोघरी, गावातल्या चहाच्या दुकानांमध्ये फिरून माल विकायचे आणि दुपारी २ वाजेपर्यंत घरी यायचे.
मार्च २०२० मध्ये देशभरात टाळेबंदी जाहीर झाली आणि त्यांचं हे छोटेखानी (आणि मिठ्ठास) जग अचानक ठप्पच झालं. पुढचे काही आठवडे या कुटुंबासाठी खडतर होते. घरी असलेला थोडा भात, डाळ, सुकट आणि तिखट एवढ्यावर त्यांनी कसं तरी भागवलं. त्यांच्या घरमालकाने त्यांना भात आणि भाजी देऊन मदत केली. (नोसुमुद्दिन स्थलांतर करून महेंद्रगंजला आले असल्याने त्यांचं रेशन कार्ड इथे सरकारने देऊ केलेल्या मदतीसाठी वापरता येत नाही.)
काही दिवसांनंतर त्यांनी घरी बसून कंटाळून गेलेल्या शेजार-पाजारच्या लोकांना रसगुल्ले विकले. आणि त्यातून ८०० रुपयांचा धंदा झाला. पण हे वगळता कसलीच कमाई नव्हती.
टाळेबंदी लागून एक महिना झाला. एक दिवस दुपारी त्यांच्या घरमालकांना जिलबी खाण्याची इच्छा झाली. नोसुमुद्दिन यांनी घरी जे काही सामान होतं त्यातून जिलबी बनवली. हळू हळू शेजारी पाजारी देखील जिलबी मागायला लागले. नोसुमुद्दिन यांनी जवळच राहत असलेल्या एका किराणावाल्याकडून उधारीवर मैदा, साखर आणि पामतेल घेतलं. मग रोज दुपारी त्यांनी जिलबी बनवायला सुरुवात केली. त्यातून दिवसाचे ४००-५०० रुपये सुटायला लागले.
एप्रिल महिन्यात रमझान महिना लागला आणि जिलबीची मागणी परत थंडावली. टाळेबंदीच्या काळात पोलिसांचा बंदोबस्त चुकवून ते आठवड्यातून एखाद दुसरा दिवस गावात फिरून माल विकत असत, नीट मास्क घालून आणि हाताची वगैरे स्वच्छता राखत, ते सांगतात. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचं जे काही नुकसान झालं आणि कर्जदेखील होतं ते फेडायला याचा आधार झाला.
टाळेबंदी शिथिल झाली आणि त्यानंतर त्यांचा रसगुल्ला आणि जिलबीचा व्यवसाय आधीसारखाच सुरू झाला. पण येणाऱ्या पैशातल्या बराचसा त्यांच्या वडलांच्या, बायकोच्या आणि मुलीच्या आजारपणावर खर्च होत गेला. गंभीर काही नसलं तरी सतत दवाखाना सुरू होता.
२०२० सरत आलं तेव्हा नोसुमुद्दिन यांनी आसाममधल्या आपल्या गावी, उरारभुईमध्ये स्वतःचं घर बांधायला काढलं. त्यातही बरीच बचत खर्चली.
आणि मग पुन्हा एकदा २०२१ मधली टाळेबंदी सुरू झाली. नोसुमुद्दिन यांचे वडील आजारी होते (ते जुलै महिन्यात वारले). सध्या त्यांचा धंदा बऱ्याचदा बंदच असतो. “या काळात माझी कमाई काही धड नाहीये,” ते सांगतात. “मी जवळच्या गावांना चालत जाऊन मिठाई विकतो. २०-२५ किलो माल घेऊन कधी कधी २०-२५ किलोमीटर अंतर चालत जावं लागतं. पूर्वी आठवड्यातले ६-७ दिवस काम होतं, ते आता २-३ दिवसांवर आलंय. मी थकून जातो. सध्या जिणं कष्टाचं झालंय. तरीही माझ्या लहानपणीइतकं नाही. तो काळ आठवला ना तर आजही डोळे भरून येतात.”
लेखिकेची टीपः नोसुमुद्दिन शेख आणि त्यांचं कुटुंब २०१५ सालापासून महेंद्रगंजमध्ये माझ्या आई-वडलांच्या जुन्या घरी भाडेकरू म्हणून राहत आहेत. सदैव हसतमुख असणारे नोसुमुद्दिन आईवडलांना लागेल ती मदत करतात आणि अधून मधून आमच्या परसबागेकडेचीही काळजी घेतात.