“यंदा, शेतकरी-विरोधी कायद्यांच्या प्रती जाळून आम्ही लोहरी साजरी करतोय,” पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातून इथे आलेले सुखदेव सिंग म्हणतात. साठी ओलांडलेले सिंग यांनी त्यांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त काळ शेतीच केलीये. सध्या हरयाणा-दिल्लीच्या सीमेवर सिंघु इथे आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांसोबत तेही आहेत.
“आता, ही लोहरी वेगळीच आहे, म्हणा,” ते सांगतात. “एरवी आम्ही आमच्या घरी आमच्या नातेवाइकांसोबत हा सण साजरा केला असता, मित्रमंडळी घरी आली असती, आनंदीआनंद असता. यंदा मात्र आम्ही आमची घरं आणि रानं सोडून लांब आलोय. तरीही आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि हे कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत आम्ही काही इथून परत जाणार नाही. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत इथे बसावं लागलं तरी बेहत्तर.”
लोहरी हा लोकप्रिय सण मुख्यतः पंजाबमध्ये आणि उत्तरेकडच्या काही भागात साजरा केला जातो. मकर सक्रांतीच्या आदल्या रात्री (पंजाबी कालगणनेनुसार माघ महिन्याच्या शेवटच्या दिवशी, सूर्याचं उत्तरायण सुरू होतं तेव्हा) साजरा केला जातो कारण वसंताचं आगमन आणि दिवस मोठा व्हायला सुरुवात होणार असते. लोक रात्री शेकोट्या पेटवतात, सूर्याला तीळ-गूळ, शेंगदाणे आणि इतर पारंपरिक पदार्थांचं अर्घ्य देतात आणि सोबत सुख समृद्धी आणि चांगल्या पीकपाण्याची प्रार्थना करतात.
या वर्षी सिंघु सीमेवर १३ जानेवारी रोजी आंदोलनाच्या मार्गावर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवल्या गेल्या आणि त्यात तिन्ही कृषी कायद्यांच्या प्रती जाळण्यात आल्या. शेतकऱ्यांनी एकजुटीचे नारे दिले आणि आपल्या ट्रॅक्टर्सशेजारी पेटवलेल्या या शेकोट्यांमध्ये कायद्याच्या कागदांची राख हवेत मिसळत असताना गाऊन-नाचून आपला आनंद व्यक्त केला.
शेतकरी या तीन कायद्यांचा विरोध करत आहेतः शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा, २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०. या कायद्यांमुळे कोणाही भारतीय नागरिकाला कायदेशीर मार्गांचा अवलंब करता येणार नाही आणि या तरतुदीने भारतीय संविधानातल्या अनुच्छेद ३२ चाच अवमान होत असल्याने त्यावर टीका होत आहे.