"तू कुत्र्याला मारलंस का?" त्यांनी विचारलं. आणि सुनंदा साहूनी काही उत्तर देण्याच्या आतच दंडुक्याचा एक प्रहार तिच्या डोक्यावर झालेला होता. त्यानंतर तिला आठवतं तेव्हा ती थेट दवाखान्यात होती.
कुत्र्याचं केवळ निमित्त होतं. त्यांना तो पसंत नव्हता. ज्या भावांनी तिच्या वेण्या घातल्या होत्या आणि जे तिला बाहुली म्हणायचे ते आता निर्दय असे परके झाले होते. सुनंदाने एक भटका गावठी कुत्रा पाळला त्याच्या फार आधीपासून. "तू मर नाही तर इथून दूर निघून जा – रोज ते मला हेच सांगायचे. त्या कुत्र्याला थोपटलं की माझा एकटेपणा जरा कमी व्हायचा. मी काळू म्हणायचे त्याला," ती सांगते.
ही मारहाण झाली २०१० मध्ये, सुनंदा घरी परतली त्यानंतर सहा वर्षांनी, तिचे आजारी, अंथरुणाला खिळलेले वडील कृष्ण नंद साहू वारले त्यानंतर दोन महिन्यांनी. आपली मुलं, सुना आणि त्यांच्या लेकांनी आपल्या मुलीची जी अवहेलना केली ती निमूटपणे त्यांनी पाहिली होती. त्यांची पत्नी, कनकलता, त्यांनीही गप्प राहणंच पसंत केलं होतं.
सुनंदाला हे स्पष्टपणे दाखवून देण्यात आलं होतं की ती कुणालाच नको आहे आणि तिची कुणाला गरजही नाहीये. "ते मला साधा साबण किंवा तेलही देत नसत," ती सांगते. खाणं तर अगदीच मोजून मापून. तेव्हाच कधी तरी तिच्याबद्दलच्या काळजीने एका शेजारणीने एका सामाजिक कार्यकर्तीला तिची परिस्थिती सांगितली, जिने गावाच्या पंचायतीकडून मदत घेण्यासाठी सुनंदाला प्रोत्साहित केलं. राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या निराधार स्त्रियांसाठी महिना रु. ३०० च्या रुपाने काही तरी मदत मिळाली. आणि अंत्योदय योजनेअंतर्गत महिन्याला स्वस्तात २५ किलो तांदूळ मिळू लागला.
निहाल प्रसाद गावात (ता. गोंदिया, जि. धेनकनाल, ओदिशा) अनेकांनी सुनंदाच्या भावांना समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. "पण त्यांनी काहीच केलं नाही," या गावकऱ्यांपैकी एक, ४५ वर्षांचे रमेश मोहंती सांगतात.
या भावांना बहिणीसाठी कसलीच दयामाया नव्हती. त्यांच्या मते तिने घराण्याचं नाव खराब केलं होतं. "माझ्याशी कसलाही संबंध ठेवला तर आम्ही घर सोडून जाऊ असं माझ्या भावजयांनी माझ्या भावांना धमकावलं होतं," सुनंदा सांगते.
सुनंदाने मुळातच जे पातक केलं होतं त्याची ही शिक्षा होती – प्रेम करण्याचं पातक. मात्र जेव्हा तिने यापुढे जाऊन त्याहूनही भयंकर अशी कृती केली तेव्हा मात्र त्यांनी अधिकच क्रूर पद्धतीने तिचा समाचार घ्यायचं ठरवलं.
२०१६ च्या मे महिन्यात, ३६ वर्षांच्या सुनंदाने दिवंगत वडलांच्या नऊ एकर शेतजमिनीतला आपला हिस्सा मागितला. "माझ्या दोन बहिणींच्या लग्नासाठी जमीन विकली होती. पण माझं काही लग्न झालं नव्हतं त्यामुळे उरलेल्या जमिनीवर माझाही समान हक्क होता."
सुनंदाची ही मागणी मान्य होणं अशक्य होतं आणि यासाठी तिला माफी नव्हती. ही अशी भूमी आहे जिथे २०१०-११ च्या जनगणनेनुसार एकूण जमीन मालकीत पुरुषांचा वाटा (सरकारी जागा वगळता) ८७.२% इतका आहे. स्त्रिया १२.८% इतक्या किरकोळ प्रमाणात जमिनीच्या मालक आहेत.
तिने रागाच्या भरात काळूला मारलं हा बहाणा पुढे करत तिच्या भावांनी एक दिवस तिला दुपारी मारहाण केली. "उद्या ती आपल्याला मारायला कमी करणार नाही," लाकडाच्या दंडुक्याने तिला हाणताना तिचे स्वतःचेच भाऊ असं ओरडत होते.
सुनंदाच्या खटल्यासंबंधीची एक पातळशी तपकिरी फाइल आहे, तिच्या घरापासून ९० किलोमीटर अंतरावर. धेनकनालच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातल्या स्त्री सहाय्य केंद्रात. "डोक्यावर आघात. सध्या डोकं गरगरत असल्याची तक्रार. सीटी स्कॅन करण्यात यावा," या फाइलीतल्या वैद्यकीय अहवालात नमूद केलं आहे. धेनकनालमध्ये सुरुवातीचे उपचार झाल्यानंतर तिला कटकच्या एससीबी वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं होतं, तिथला हा अहवाल आहे.
भानुमती पाणी, पंचायतीची मदत घेण्यासाठी सुनंदाला ज्या सामाजिक कार्यकर्तीनी मदत केली त्या कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, २००५ अंतर्गत स्थापन झालेल्या या केंद्रात समुपदेशक म्हणून काम करतात. केंद्रात लावलेल्या पांढऱ्या फ्लेक्स पोस्टरवरच्या नोंदीप्रमाणे एप्रिल २००९ मध्ये स्थापन झालेल्या या केंद्रात मार्च २०१६ पर्यंत १,२१२ महिलांनी मदत घेतली आहे. ही मदत कायद्यातील उद्देशानुसार समुपदेशन आणि तडजोडीच्या स्वरुपात करण्यात आलेली आहे. अगदी मोजक्याच स्त्रिया थेट पोलिसात जातात किंवा कोर्टाची पायरी चढतात. सुनंदाच्या केसमध्ये ज्या तीव्रतेचा शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाला होता त्याची दखल घेऊन भानुमतींनी तिला कायदेशीर मदत मिळवून देण्याचं ठरवलं. आणि मग सुनंदाचे भाऊ आणि त्यांच्या सज्ञान मुलांविरोधात भारतीय दंड विधानाच्या अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले.
या खटल्यामुळे सुनंदा आणि तिच्या आईला त्यांच्या सात खणी घरातल्या सगळ्यात दयनीय स्थितीतल्या दोन खोल्या राहण्यासाठी देण्यात आल्या. तिच्या भावांनी तोंडदेखला समझोता केला होता. दोघी बहिणी कधी भावांची तर कधी सुनंदाची बाजू घ्यायच्या. मिळवलेली शांतता अगदी कुचकामी होती.
"मला आधीच माझ्यासमोर काय पर्याय आहेत हे माहित असतं, तर माझं आयुष्य किती वेगळ्या वळणावर असतं," सुनंदा म्हणते.
आधी म्हणजे मार्च २००७ मध्ये – तेव्हा २७ वर्षांच्या सुनंदाला बिस्वजीत धालाने वाईट मारलं होतं. सुनंदा एक १८ वर्षांची १० वीत शिकणारी विद्यार्थी होती तेव्हापासून हा सुनंदाच्या मागे मागे असणारा सुरुवातीला अगदी मोहक असा, नंतर मागे लागलेला आणि त्यानंतर एक संतापी प्रियकर होता. ती रस्त्यातनं जाऊ लागली की तो शीळ घालायचा, तिच्या दिशेने पत्रं फेकायचा, तिच्या चेहऱ्यावर विजेरीचा झोत मारायचा आणि गाणी गायचा. घाबरलेल्या सुनंदाने आपल्या आईला हे सगळं सांगितलं होतं. मात्र हे सगळं म्हणजे साधी सरळ छेड आहे, त्यात वाईट हेतू नाही असं तिला आईने समजावून सांगितलं. "मला त्याचं तिथे असणं आवडू लागलं. त्याच्यामुळे मला छान वाटू लागलं होतं," सुनंदा सांगते. त्या आनंदाच्या भरात बिस्वजीत तिच्याहून २० वर्षांनी मोठा होता यात तिला काहीच वावगं वाटलं नव्हतं. तो बेरोजगार होता हेही चालून गेलं होतं.
तिच्या घरच्यांनी जेव्हा लग्नाची बोलणी सुरू केली तेव्हा मात्र ती सगळी धुंदी एकदम दुःखात परिवर्तित झाली. "त्याची बहीण म्हणाली की मी कुरुप होते आणि मीच त्याला माझ्या जाळ्यात ओढलं होतं," सुनंदा आठवून सांगते. तोपर्यंत आई-वडलांनी आणि भावंडांनी लाडात मोठं केलेल्या या मुलीला हे पचूच शकलं नाही. "मला मी कस्पटासारखी असल्यासारखं वाटलं," ती हलक्या आवाजात सांगते. बिस्वजीतने तरीही तिचा नाद सोडला नाही, पण सुनंदा मात्र आता ठाम होती.
"त्याने मला वचनं दिली, आणा भाका घेतल्या. तो कायम माझी वाट पाहत राहील अशी मोठमोठाली पत्रं लिहिली. त्याने माझ्यासाठी माझ्या वडलांकडे मध्यस्थी लोक पाठवले. पण माझ्या दिसण्यावरून मला नाकारणाऱ्या या घरात लग्न करायचं नाही असा ठाम निश्चय मी केला होता," सुनंदा सांगते.
आपल्या स्वातंत्र्य सैनिक आजोबांच्या, शौर्य चरण साहूंच्या आठवणीने तिचा निर्धार आणखीच पक्का झाला होता. "त्यांच्या नावाला बट्टा लागेल असं काही करणं कल्पनेच्याही पलिकडचं होतं," ती समजावून सांगते.
ती लग्नाला सारखी नकार देत होती याचा बदला घेण्यासाठीच २००७ साली तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. एका रात्री ती लघवी करण्यासाठी रात्री रानात निघाली होती तेव्हा तिला गळ्याभोवती एकदम घट्ट फास बसल्यासारखं तिला जाणवलं.
दोन दिवसांनी तिला जाग आली तेव्हा ती तिच्या घरापासून चार किलोमीटर अंतरावरच्या सामुदायिक आरोग्य केंद्रामध्ये होती. "माझ्यावर बलात्कार झाला होता का ते मला माहित नाही पण माझे कपडे फाटलेले होते. पण पोलिसांनी काही ऐकूनच घेतलं नाही. माझ्या कोणत्याही तपासण्या करण्यात आल्या नाहीत," ती सांगते. सुनंदाच्या घरच्यांनीही तिच्या ताठ्यामुळे जे घराण्याचं नाव बरबाद झालं होतं त्यावर उपाय म्हणून बिस्वजीतशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता, पोलिसांची मदत घेण्याची कल्पनाही त्यांनी धुडकावून लावली होती. बिस्वजीतने सुनंदाच्या विरोधात जबरदस्ती घरात घुसल्याची आणि त्याच्या मालमत्तेचं नुकसान केल्याची तक्रार केली होती – यामध्ये आपल्यालाही गोवण्यात येईल या भीतीने ते असं सगळं करत होते.
पोलिसांच्या मदतीशिवाय आणि घरच्यांचं सहकार्य नसल्याने सुनंदा बिस्वजीतला कायद्यानुसार शासन करू शकली नाही. तिच्यावरच्या हल्ल्यानंतर दोनच महिन्यांनी त्याने एका १८ वर्षांच्या मुलीशी लग्न केलं.
दरम्यानच्या काळात बहिणींची लग्नं होईपर्यंत तिला घरापासून लांब राहायला सांगण्यात आलं.
पुढची तीन वर्षं ती एका आधारगृहातून दुसऱ्या किंवा एका नातेवाइकाकडून दुसऱ्याच्या घरी जात राहिली. जाजपूर या शेजारच्या जिल्ह्यात एका नातेवाइकाच्या घरी राहत असताना ती शिवण करायला शिकली हा तिच्यासाठी एक मोठा दिलासा होता. एका सामाजिक संस्थेने तिला शिवणयंत्र घेऊन दिलं होतं.
आता गावातल्या सामुदायिक केंद्रातल्या एका धूळभरल्या खोलीत हे मशीन ठेवलेलं आहे. जानेवारी २०१७ पासून पंचायतीने ही केंद्राची जागा वापरण्याची परवानगी दिली आणि तेव्हापासून ही जागाच तिची कार्यशाळा झाली आहे. इथेच ती ब्लाउज आणि सरवार-कमीज शिवते. काही तयार झालेले कपडे भिंतीवर अडकवून ठेवलेले दिसतात. कापडाच्या चिंध्यांपासून अगदी बारकाईने कापडाचे रंग आणि नक्षी जुळवून ती गोल आकाराची पायपुसणीही तयार करते.
एखाद्या दिवशी नशीब चांगलं असेल तर तिची २०० रुपयांची कमाई होते, नाही तर सरासरी रोजचे २५ रुपये मिळतात. सोबत शेरडं विकून महिन्याला ती ३००० रुपयांपर्यंत कमाई करते – आपल्या ७५ वर्षांच्या आईची काळजी घेण्यासाठी पुरेशी मात्र स्वतःसाठी नवे कपडे घेण्याइतकी नाही. आज तिने परिधान केलेला गडद रंगाचा केशरी कुर्ता तिच्या एका बहिणीचाच जुना कुर्ता आहे.
लग्न करायचं नाही यावर ती अगदी ठाम आहे. लग्न केलं तर जरा ‘मान’ वाढतो म्हणून तिची आई कितीही मागे लागली असली तरी. "लग्न झालं म्हणजे सुख मिळतं याची काही खात्री देता येत नाही," ती म्हणते.
कुटुंबाने नाकारल्यामुळे सुनंदाच्या मनात कडवटपणा असला तरी तिच्या मनात अपराधी भाव मात्र बिलकुल नाही. "मी काहीही चुकीचं केलेलं नाही," ती तिच्या म्हणण्यावर ठाम आहे.
एकदा का पोलिस केस निकालात निघाली की ती जमिनीच्या तिच्या हक्कासाठी कायदेशीररित्या लढणार आहे. तिला तिच्या आईला तीर्थयात्रेवर घेऊन जायचंय, दुग्ध व्यवसाय सुरू करायचाय आणि तिला फुलांची, तिच्या आवडत्या निशीगंधाच्या फुलांची शेती करायचीये. "किंवा मी अंगणवाडीत मदतनीस म्हणून कामाला लागेन," ती पुष्टी जोडते.
आणखी काय?
तिला एक कुत्रा पाळायचाय. "अगदी काळूसारखा. गेल्या वर्षी वारला तो," तिच्या चेहऱ्यावर हसू रेंगाळतं.
अनुवादः मेधा काळे