‘जब प्‍यार किया तो डरना क्‍या… प्‍यार किया कोई चोरी नही की… घुट घुट कर यूं मरना क्‍या…’

साठच्‍या दशकात आलेल्‍या ‘मुघल-ए-आझम’मधलं हे गाणं विधी बराच वेळ गुणगुणत असते. मध्य मुंबईत नव्‍यानेच भाड्याने घेतलेल्‍या खोलीत आम्‍ही बसलोय. गाणं मधेच थांबवत ती म्हणते, ‘‘आम्ही तरी कुठे गुन्‍हा केलाय! मग असं भीत भीत का जगायचं?’’

प्रश्‍नाचं उत्तर तिला नकोच असतं, पण आपल्‍याला मात्र तो सलत राहातो, टोचत राहातो. आपल्‍याला कोणीतरी मारून टाकेल, ही तिची भीती शब्‍दशः खरी असते आणि गेली काही वर्षं हीच भीती सोबत घेऊन ती जगत असते. या भीतीचं कारणही तसंच असतं. विधी आपल्‍या कुटुंबाविरोधात बंड करून आपल्या प्रिय व्‍यक्‍तीबरोबर, म्हणजेच शाळेतली मैत्रीण असलेल्या आरुषीबरोबर पळून गेलेली असते. दोघी एकमेकींवर प्रेम करतायत आणि त्‍यांना लग्‍न करायचंय. पण त्‍यांना एकत्र येण्‍यासाठीचा कायदेशीर रस्‍ता खूप दूरचा आहे, थकवणारा आहे, पावलोपावली नवी आव्‍हानं समोर ठेवणारा आहे. दोघींना भीती वाटतेय की, त्‍यांची कुटुंबं त्‍यांचं हे नातं मान्‍यच करणार नाहीत, समजून घेणार नाहीत. आरुषीचा जन्‍म झाला तो मुलगी म्हणून. पण आपण मुलगी नाही, असं तिला अगदी आतून, प्रकर्षाने वाटतंय आणि तिचा हा झगडा त्‍यांच्‍या घरच्‍यांना समजणं शक्‍यच नाही. आरुषी आता पारलिंगी (ट्रान्‍सजेंडर) पुरुष आहे आणि ती आता आपलं नाव ‘आरुष’ असं लावते.

महानगरात आल्‍यामुळे कुटुंबापासून सुटका होईल आणि आपल्‍याला स्‍वातंत्र्य मिळेल, असं विधी आणि आरुषीला वाटत होतं. विधीचं कुटुंब ठाणे जिल्ह्यातल्‍या एका गावात राहातं आणि आरुषचं कुटुंब विधीच्‍या गावापासून वीसेक किलोमीटरवर, पालघर जिल्ह्यातल्‍या एका गावात. २२ वर्षाची विधी आगरी आहे, तर २३ वर्षांचा आरुष कुणबी. महाराष्ट्रात आगरी आणि कुणबी, दोन्‍ही समाजांचा इतर मागासवर्गीयात समावेश आहे, पण त्‍यांच्‍या गावांमधल्‍या जातीच्‍या उतरंडीत कुणबी सामाजिक दृष्ट्या आगर्‍यांच्‍या ‘खालचे’ आहेत.

आपापली घरं सोडून दोघं मुंबईत आले, त्‍याला आता वर्ष झालं. गावाला परत जायचा विचारही करत नाहीयेत ते. आपलं गाव, कुटुंब याविषयी आरुष खूपच कमी बोलतो. ‘‘मी कच्‍च्‍या घरात राहायचो. मला अज्जिबात आवडायचं नाही ते. आईशी कितीतरी वेळा भांडायचो मी त्‍यावरून,’’ तो सांगतो.

Vidhhi and Aarush left their homes in the village after rebelling against their families. They moved to Mumbai in hope of a safe future together
PHOTO • Aakanksha

आपापल्‍या कुटुंबांविरोधात बंड करून विधी आणि आरुषने गावातली घरं सोडली. भविष्यात एकत्र आणि सुरक्षित जगू या आशेसह

आरुषची आई अंड्यांच्‍या कारखान्‍यात काम करते. तिला महिन्‍याला ६००० रुपये मिळतात. ‘‘बाबांबद्दल विचारू नकोस. मिळेल ते काम करायचे ते. सुतारकाम, शेतमजुरी… अगदी काहीही. जे काही पैसे मिळतील ते दारूत उडवायचे आणि घरी येऊन आईला, आम्हाला मारायचे,’’ आरुष सांगतो. त्‍याचे वडील नंतर आजारी पडले, त्‍यांची कामं बंद झाली. आता घरात एकटी आई कमवत होती. साधारण याच वेळी आरुषने शाळेच्‍या सुटीत काहीबाही कामं करायला सुरुवात केली. कधी वीटभट्टीवर, कधी कारखान्‍यात, कधी औषधांच्या दुकानात तर कधी आणखी कुठे!

*****

२०१४ मध्ये, आठवीत आरुष (तेव्‍हा आरुषी) नवीन शाळेत गेला आणि तिथेच त्‍याला अगदी पहिल्यांदा विधी भेटली. या शाळेत पोहोचण्‍यासाठी त्‍याला चार किलोमीटर पायपीट करावी लागत असे. ‘‘माझ्‍या गावातली जिल्हा परिषदेची शाळा सातवीपर्यंतच होती आणि त्‍यानंतर आम्हाला गावाबाहेरच्‍या शाळेतच जावं लागायचं,’’ तो म्हणतो. आरुषच्‍या त्‍या शाळेतल्‍या पहिल्‍या वर्षात विधी आणि तो एकमेकांसोबत कधी फार बोललेही नाहीत. ‘‘आगरी लोकांबरोबर आम्ही कधी फार संबंध ठेवले नाहीत, कधी त्‍यांच्‍याशी जुळवून घेतलं नाही. त्‍यांचा गटच वेगळा असायचा आणि विधी त्‍या ग्रुपमध्ये होती,’’ आरुष सांगतो.

नववीत असताना त्‍यांची मैत्री फुलायला लागली. आरुषला विधी आवडायला लागली.

एक दिवस खेळत असताना आरुषने विधीला गाठलं आणि आपल्‍या भावना हळूच तिच्‍याकडे व्‍यक्‍त केल्‍या. थोडं बिचकतच त्‍याने तिला सांगितलं, ‘तू मला आवडतेस.’ विधीला कळेचना काय बोलावं. दुविधेत होती ती. ‘‘पूर्वी एका मुलीशी आपले संबंध असल्‍याचं आरुषने मला सांगितलं. चुकीचं नव्‍हतं ते, पण दोन मुली एकत्र असणं मला थोडं विचित्र वाटलं,’’ विधी सांगते.

‘‘पहिल्‍यांदा मी ‘नाही’ म्हटलं, नंतर बर्‍याच दिवसांनी मी कबूल झाले. मी ‘हो’ का म्हटलं मला नाही ठाऊक. घडलं ते, घडत गेलं. मला तो आवडायला लागला. हे चूक की बरोबर, असं माझ्‍या मनात कधी आलंच नाही,’’ विधीच्‍या तोंडून उसासा बाहेर पडतो. आता आरुष म्हणतो, ‘‘बाकीचं जग मात्र दोन खूप चांगल्‍या मैत्रिणी, अशाच दृष्‍टीने आमच्‍याकडे पाहात होतं.’’

पण हे असंही फार काळ चाललं नाही. दोघींच्‍या नातेवाईकांनी त्‍यांची मैत्री, जातीतला फरक याबद्दल टोमणे मारायला सुरुवात केली. ‘‘आमचे लोक (कुणबी) ‘खालच्‍या जातीचे’, ते पूर्वी आगरी घरांमध्ये कामं करायचे. अर्थात ही बर्‍याच काळापूर्वीची गोष्ट, पण काही लोकांच्‍या डोक्‍यात अजूनही हे आहेच,’’ आरुष सांगतो. त्‍याला अजूनही काही वर्षांपूर्वी त्‍यांच्‍या गावात घडलेली ती भयंकर घटना आठवते. त्‍यांच्‍या गावातला एक मुलगा आणि एक मुलगी पळून गेले होते. एक जण कुणबी, तर एक जण आगरी. दोघांच्‍याही कुटुंबांनी त्‍यांचा पाठलाग केला होता आणि त्‍यांना खूप मारलं होतं.

सुरुवातीला विधीबरोबरच्‍या मैत्रीला आरुषच्‍या आईचा आक्षेप नव्हता. तिला या दोन मुलींची घट्ट मैत्री आहे असंच वाटायचं. पण आरुष वारंवार विधीच्‍या घरी जायचा आणि तिच्‍या घरी जाणं कमी कर, असं आई त्‍याला सतत सांगत राहायची.

Aarush's family struggles to accept him as a trans man
PHOTO • Aakanksha

आरुषचं कुटुंब त्‍याला पारलिंगी पुरुष म्हणून स्‍वीकारायला तयार नाही

विधीच्‍या वडिलांचा बांधकामासाठी कच्‍चा माल पुरवण्‍याचा व्‍यवसाय होता. विधी १३ वर्षांची असतानाच तिचे आई-वडील वेगळे झाले होते आणि तिच्‍या वडलांनी पुन्‍हा लग्‍न केलं होतं. वडील, सावत्र आई आणि चार भावंडं असा विधीचा परिवार. मोठा भाऊ, दोन बहिणी आणि धाकटा सावत्र भाऊ. तिच्‍या आईला आरुष (तेव्‍हा आरुषी) अजिबात आवडायचा नाही. ती सतत काहीबाही बोलत राहायची त्‍याला. आता तिशीचा असलेला विधीचा मोठा भाऊ तेव्‍हा वडलांबरोबर काम करायला लागला होता. त्‍यांच्‍या कुटुंबावर त्‍याचंच नियंत्रण होतं. आपल्‍या बहिणींना तो मारायचा, शिव्‍या द्यायचा.

पण विधीला आरुषकडे जायचं असेल तेव्‍हा हाच भाऊ तिला तिच्‍या घरी सोडायचा. ‘‘गाणी म्हणायचा, शिटी वाजवायचा, काहीतरी शेरेबाजी करायचा. असं करतच त्‍याला आरुषी आवडते, असं मला सांगायचा. हे काहीतरी भलतंच! काय करावं, आम्हाला कळायचंच नाही,’’ विधी सांगते. ‘‘आम्हाला भेटता यावं म्हणून आरुष काहीच बोलायचा नाही. माझ्‍या भावाच्‍या बोलण्‍याकडे, इशार्‍यांकडे दुर्लक्ष करायचा.’’

हळूहळू विधीचा भाऊही आरुषच्‍या घरी जायचं नाही, असं तिला सांगायला लागला. ‘‘आरुष त्याला काहीच प्रतिसाद द्यायचा नाही म्‍हणून त्‍याला राग आला की आमची वाढती जवळीक पाहून तो अस्‍वस्‍थ झाला, कोण जाणे,’’ विधी म्हणते. आरुष सतत आपल्‍या घरी का येतो? इतक्‍या वेळा फोन किंवा मेसेज का करतो? असं तिची बहीणही तिला विचारायला लागली होती.

साधारण याच वेळेला आरुष आपला लैंगिक कल उघडपणे व्‍यक्‍त करायला लागला होता. आपल्‍याला पुरुषाचं शरीर हवं आहे असं म्हणायला लागला होता. आपले विचार आणि भावना तो फक्‍त विधीकडेच व्‍यक्‍त करू शकत होता. ‘‘पारलिंगी पुरुष (ट्रान्‍समॅन) म्हणजे काय, हे मला तेव्‍हा ठाऊक नव्‍हतं,’’ आरुष सांगतो. ‘‘पण मला खूप आतून वाटत होतं की मी पुरुषाच्‍या शरीरात असायला हवं.’’

त्‍याला ट्रॅक पँट, कार्गो पँट आणि टीशर्ट असे कपडे घालायला आवडायचं. तो सतत पुरुषासारखे कपडे घालायचा. त्‍याच्‍या या वागण्‍यामुळे आई अस्‍वस्‍थ व्‍हायची, त्‍याचे पुरुषी कपडे लपवून ठेवायचा प्रयत्‍न करायची, कधीकधी तर फाडायचीही. कधी त्‍याला ओरडायची, तर कधी मारायची. ती ‍त्‍याला मुलींचे कपडे आणायची. ‘‘सलवार कमीज घालायला मला अजिबात आवडायचं नाही,’’ आरुष सांगतो. फक्‍त शाळेत जाताना तो सलवार कमीज घालायचा, कारण तो शाळेचा गणवेश होता. तेव्‍हाही सलवार कमीजमध्ये ‘घुसमटल्‍यासारखं’ व्‍हायचं, असं आरुष सांगतो.

Aarush liked to dress up as a boy and felt suffocated when dressed in a salwar kameez his mother had bought him. His family would say, ‘Be more like a girl...stay within your limits.'
PHOTO • Aakanksha

आरुषला मुलासारखे कपडे घालायला आवडायचं. आईने आणलेला सलवार कमीज घातला की त्‍याला घुसमटल्‍यासारखं व्‍हायचं. सगळे त्‍याला म्हणायचे, ‘मुलीसारखा वाग, तुझ्‍या मर्यादेत राहा’

दहावीत असताना आरुषची पाळी सुरू झाली आणि त्‍याच्‍या आईच्‍या जिवात जीव आला. पण तिचं हे समाधानही फार दिवस टिकलं नाही. साधारण वर्षभरानंतर आरुषची पाळी अनियमित झाली आणि नंतर थांबलीच. त्‍याच्‍या आईने त्‍याला बर्‍याच डॉक्टरांकडे नेलं. प्रत्येकाने वेगवेगळी औषधं दिली, वेगवेगळे उपाय सांगितले, पण कसलाच उपयोग झाला नाही.

शेजारपाजारचे लोक, शिक्षक, अगदी शाळेतले मित्रमैत्रिणीही आरुषला टोमणे मारायचे. ‘जरा मुलीसारखं वाग, मर्यादेत राहा,’ असं म्हणायचे. आता लग्‍नाचं वय झालंय, असंही सुचवायचे. आपण वेगळे आहोत हे आरुषला जाणवायचं, पण त्‍याचं कारण कळायचं नाही. त्‍याला आता स्‍वतःबद्दलच शंका यायला लागली. निराशा घेरून यायला लागली. ‘‘आपणच का असे? काही चुकीचं केलंय का आपण? मला प्रश्‍न पडायला लागले,’’ तो सांगतो.

अकरावीत गेल्‍यावर आरुषला मोबाइल फोन मिळाला आणि मग लिंगबदल शस्त्रक्रिया (जेंडर ॲफर्मेशन सर्जरी) करून आपल्‍याला स्‍त्रीचं पुरुष होता येईल का, हे शोधायला त्‍याने सुरुवात केली. त्‍यासाठी तो तासन्‌तास ऑनलाइन असायचा. विधी सुरुवातीला थोडी का कू करत होती. ‘‘मला तो जसा होता तसाच आवडत होता. सुरुवातीपासून तो त्‍याबद्दल प्रामाणिक होता. शरीर बदलायचं होतं त्‍याला, पण याचा अर्थ त्‍याचा स्‍वभाव बदलला असता असं नाही,’’ ती म्हणते.

*****

२०१९ मध्ये, बारावीनंतर विधीने शाळा सोडली. आरुषला पोलिस अधिकारी व्‍हायचं होतं, त्‍यामुळे त्‍याने पालघरला मार्गदर्शन केंद्रात नाव नोंदवलं. त्‍याला महिला उमेदवार म्हणून, आरुषी नावाने अर्ज करावा लागला. २०२० मध्ये पोलिस भरतीची परीक्षा होणार होती, पण कोविडच्या टाळेबंदीमुळे ती रद्द करण्‍यात आली. त्‍यामुळे आरुषने दूरस्‍थ पद्धतीने बीए करायचं ठरवलं.

विधी आणि आरुष, दोघांसाठी लॉकडाऊनचा काळ खूप कठीण होता. विधीच्‍या घरी तिच्‍या लग्‍नाची चर्चा सुरू झाली. मात्र आपल्‍याला आरुषबरोबरच राहायचं आहे, हे विधीला पक्‍कं ठाऊक होतं. घरातून पळून जाणं हा एकमेव पर्याय होता. पूर्वीही एकदा आरुषने विधीला आपण पळून जाऊ सांगितलं होतं, पण तेव्‍हा विधी तयार झाली नव्‍हती. ‘‘भीती वाटत होती मला. नुसतंच निघून जाणं सोपं नव्‍हतं…’’ ती म्हणते.

Running away was the only option and Mumbai seemed to offer dreams, choices and freedom
PHOTO • Aakanksha

पळून जाणं हा एकमेव पर्याय होता. मुंबई स्‍वप्‍न देणार होती , निवड करण्‍याची संधी देणार होती , स्‍वातंत्र्य देणार होती

लॉकडाऊननंतर, ऑगस्‍ट २०२० पासून आरुषने एका औषधनिर्मिती कारखान्‍यात काम करायला सुरुवात केली. तिथे त्‍याला महिन्‍याला ५,००० रुपये मिळत होते. ‘‘मला कसं जगायचं आहे हे कोणालाच कळत नव्‍हतं. घुसमट होत होती माझी. पळून जाणं हा एकच पर्याय होता आणि हे मला माहीत होतं,’’ तो सांगतो. घरगुती हिंसेवर काम करणारे काही गट आणि स्‍वयंसेवी संस्‍थांशी संपर्क साधायला आरुषने सुरुवात केली. तो आणि विधी यांच्‍यासाठी आसरा शोधायचा होता.

ग्रामीण भागात बर्‍याच पारलिंगी व्‍यक्‍तींना भीती, कलंक आणि छळ यामुळे घर सोडावं लागतं आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागतो. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने २०२१ मध्ये पश्‍चिम बंगालमधल्‍या पारलिंगी व्‍यक्‍तींचा अभ्यास केला. त्‍यात त्‍यांना असं आढळलं की, अशा व्‍यक्‍तींची कुटुंबं त्‍यांनी लैंगिक अभिव्‍यक्‍ती उघड करू नये यासाठी त्‍यांच्‍यावर दबाव आणतात. आणि मग कुटुंब, मित्रमंडळी आणि एकूणच समाजाकडून भेदभावाची वागणूक मिळाल्‍यामुळे या व्‍यक्‍ती कुटुंबातून बाहेर पडतात.

आरुष आणि विधीला मुंबईत येणं सहज शक्‍य होतं. आरुषला इथे त्‍याची शस्‍त्रक्रियाही करून घेता आली असती. त्‍यामुळे, मार्च २०२१ मधल्‍या एका दुपारी विधी हॉस्पिटलमध्ये जाते असं सांगून घरातून बाहेर पडली आणि आरुष त्‍याच्‍या कामाला गेला. बस पकडण्‍यासाठी दोघं एका ठिकाणी भेटले. आपल्‍या पगारातून बचत केलेले १५,००० रुपये आरुषकडे होते. त्‍याच्‍या आईची एकमेव सोन्‍याची चेन आणि तिचे कानातलेही त्‍याच्‍याजवळ होते. हे सोनं त्‍याने विकलं, त्‍याचे १३,००० रुपये मिळाले. ‘‘मला वाईट वाटत होतं आईचे दागिने विकताना, पण दुसरीकडे खूप चिंता वाटत होती आणि आमच्‍या सुरक्षिततेसाठी काही पैसे हातात असायला हवे होते. आम्ही पुन्‍हा घरी जाऊ शकणार नव्‍हतो आणि त्‍यामुळे कोणताही धोका पत्‍करू शकत नव्‍हतो,’’ आरुष सांगतो.

*****

मुंबईत एका स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या कार्यकर्त्यांनी विधी आणि आरुषला एका महिलांसाठी असलेल्‍या शेल्‍टरमध्ये नेलं. हा शेल्‍टर ऊर्जा ट्रस्‍टतर्फे चालवला जातो. स्‍थानिक पोलिसांना याविषयी माहिती दिली. ‘‘दोघंही सज्ञान होते, त्‍यामुळे पोलिसांना कळवण्‍याची खरं तर गरज नव्‍हती. पण कधीकधी एलजीबीटीक्‍यूआयए आणि अशा प्रकारच्‍या गुंतागुंतीच्‍या केसेसमध्ये त्‍यांचं कुटुंब त्‍यांना पकडण्‍याचा, मारण्‍याचा प्रयत्‍न करण्‍याची शक्‍यता असते. त्‍यामुळे आम्ही स्‍थानिक पोलिसांनाही यात सामील करून घेतो,’’ अंकिता कोहिरकर म्हणते. ती ऊर्जा ट्रस्‍टची प्रोग्राम मॅनेजर आणि मानवाधिकार कार्यकर्ती आहे.

ऊर्जा ट्रस्‍टने घेतलेली ही काळजी कामी आली नाहीच, ती उलटलीच! पोलिस स्‍टेशनमध्ये पोलिस अधिकार्‍यांनी विधी आणि आरुष, दोघांची चौकशी करायला सुरुवात केली. ‘‘तुमच्‍या गावाला परत जा, असं ते सांगायला लागले आम्हाला. अशी नाती टिकत नाहीत, असं म्हणणं होतं त्‍यांचं. आम्ही जे करत होतो ते त्‍यांना चुकीचंच वाटत होतं,’’ आरुष सांगत होता. पोलिसांनी विधी आणि आरुष, दोघांच्‍या घरच्‍यांना ते मुंबईत आहेत असं सांगितलं. घर सोडल्‍यावर दोघांच्‍याही घरचे लोक घाबरले होते. आरुषच्‍या आईने तर तोवर जवळच्‍या पोलिस स्‍टेशनमध्ये आरुष हरवल्‍याची तक्रारही केली होती. विधीच्‍या घरातले लोक आरुषच्‍या घरी गेले होते आणि त्‍यांना त्‍यांनी धमकी दिली होती.

Vidhhi has put aside her dreams to study further, and instead is helping save for Aarush's hormone therapy and gender reassignment surgeries
PHOTO • Aakanksha

पुढे शिकण्‍याच्‍या आपल्‍या स्‍वप्‍नाला विधीने मुरड घातली. त्‍याऐवजी आता ती आरुषची हार्मोन थेरपी आणि लिंगबदल शस्‍त्रक्रिया यासाठी पैसे साठवायला हातभार लावते आहे

विधी आणि आरुष मुंबईत आहेत हे कळल्‍यावर दोन्‍ही कुटुंबं त्‍याच दिवशी मुंबईत येऊन दाखल झाली. ‘‘भाईने (मोठ्या भावाने) मला शांतपणे घरी परत यायला सांगितलं. मी त्‍याला इतकं शांतपणे बोलताना कधीच बघितलं नव्‍हतं. तो असं वागत होता कारण तिथे पोलिस होते,’’ विधी सांगते.

आरुषच्‍या आईनेही ‘घरी परत या’ असा धोशा दोघांच्‍या मागे लावला. ‘‘पोलिसही या दोघांना घरी घेऊन जा म्हणून आईच्‍या मागे लागले. हे सेंटर महिलांसाठी योग्‍य नव्‍हतं म्हणे,’’ आरुष सांगतो. सुदैवाने तेवढ्यात ऊर्जाचे कार्यकर्ते आले. विधी आणि आरुषला जबरदस्‍तीने घरी नेण्‍यापासून त्‍यांनी दोघांच्‍याही घरच्‍यांना रोखलं. आरुषने आईचं सोनं विकून आलेले पैसेही परत दिले. ‘‘ते पैसे माझ्‍याकडे ठेवणं मला बरं नाही वाटलं,’’ तो सांगतो.

गावाला परतल्‍यावर विधीच्‍या कुटुंबाने आरुषवर काहीबाही आरोप करायला सुरुवात केली. तो देहव्‍यापाराच्‍या जाळ्यात गुंतलेला आहे आणि विधीला जबरदस्‍तीने आपल्‍याबरोबर नेतो आहे. ‘वेळीच आपल्‍या मुलाला रोखा, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील,’ अशी धमकी विधीचा भाऊ आणि इतर नातेवाईक आरुषच्‍या कुटुंबाला देत होते. ‘‘तो (विधीचा भाऊ) माझ्‍या भावाला एकट्याला भेटायला बोलवत होता, आपण प्रश्‍न सोडवण्‍याचा प्रयत्‍न करू या, असं सांगत होता. पण माझा भाऊ गेला नाही, ते लोक काहीही करू शकले असते,’’ आरुष म्हणतो.

*****

मध्य मुंबईत शेल्‍टरमध्ये राहात असूनही आरुष आणि विधीला असुरक्षित वाटायला लागलं. ‘‘कोणावरही विश्‍वास ठेवणं शक्‍य नव्‍हतं. कोणास ठाऊक, गावाहून कधीही कोणीही आलं असतं…’’ आरुष सांगतो. मग दोघांनी एक खोली भाड्याने घेतली आणि तिथे राहायला सुरुवात केली. दहा हजार रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये महिन्‍याचं भाडं. ‘‘घरमालकाला आमच्‍या नात्‍याबद्दल काही ठाऊक नाही, ते त्‍याला कळूही द्यायचं नाहीये. ही खोली सोडायची नाहीये आम्हाला,’’ तो म्हणतो.

आरुषने आता लक्ष केंद्रित केलंय ते आपल्‍या लिंगबदलावर. शस्‍त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार, असा दोन्‍ही गोष्टींचा समावेश असतो त्‍यात. ही सारी प्रक्रिया, ती करणारे डॉक्टर्स आणि त्‍याला येणारा खर्च या सगळ्याची माहिती मिळवण्‍याचा त्‍याचा स्रोत म्हणजे गुगल आणि काही व्‍हॉट्‌सअप ग्रुप्‍स.

आरुष यासाठी एकदा मुंबईतल्‍या एका सरकारी रुग्‍णालयातही गेला होता, पण तिथे परत जाण्‍याची त्‍याला इच्‍छाच झाली नाही. ‘‘मला मदत करणं राहिलं बाजूला, तिथला डॉक्टर ही शस्त्रक्रिया करू नकोस, असंच मला सांगायला लागला. त्‍याला कळतच नव्‍हतं मला काय वाटतंय आणि मला काय हवंय. तो मला सांगत होता, आईवडिलांना फोन कर आणि शस्‍त्रक्रियेसाठी त्‍यांची परवानगी घे. मला प्रचंड राग आला. कठीण करून टाकत होता तो सगळंच माझ्‍यासाठी,’’ आरुष सांगतो.

Vidhhi has noticed changes in Aarush's behaviour. 'There have been fights, but we have also sat down to discuss the issues. It affects me, too, but I am with him'
PHOTO • Aakanksha

आरुषच्‍या वागण्‍यात होणारे बदल विधीने टिपले. ‘आमची भांडणं व्‍हायची, पण आम्‍ही नंतर शांतपणे त्‍याबद्दल बोलायचो. माझ्‍यावरही या सार्‍याचा परिणाम होतोच आहे, पण मी त्‍याच्‍या सोबत आहे’

आरुषने मग खाजगी रुग्‍णालयात उपचार घ्यायचं ठरवलं. काउन्सिलिंग झाल्‍यानंतर आता त्‍याला ‘जेंडर डिस्फोरिया’ असल्‍याचं निदान करण्‍यात आलं. जेंडर डिस्‍फोरिया म्हणजे जन्‍मतः असलेलं लिंग आणि लैंगिक ओळख एकमेकांशी न जुळल्‍यामुळे होणारी कुचंबणा. डॉक्टरांनी आरुषला हार्मोन थेरपी घ्यायला सांगितली. लिंगबदलाची ही प्रक्रिया खूप मोठी आणि खर्चिक आहे.

दर २१ दिवसांनी टेस्‍टोस्‍टरॉन इंजेक्‍शन्‍स घ्यायला लागतात. एका इंजेक्‍शनची किंमत ४२० रुपये आहे आणि ते देण्‍यासाठी डॉक्टरची फी ३५० रुपये. ‍ज्‍या गोळ्या घ्यायच्‍या आहेत, त्‍यांचा दोन आठवड्याचा खर्च २०० रुपये. हार्मोन थेरपीचे काही दुष्परिणाम होत नाहीयेत ना, हे पाहाण्‍यासाठी दर दोन-तीन आठवड्यांनी आरुषची रक्‍ततपासणी केली जाते. या सगळ्या टेस्‍ट्‌सचा खर्च ५००० रुपयाच्‍या घरात जातो. काउन्सिलरचे दर वेळी १,५०० रुपये आणि प्रत्येक व्‍हिजिटला डॉक्टरची फी ८०० ते १,००० रुपये.

मात्र या थेरपीने आपले परिणाम दाखवायला सुरुवात केली. ‘‘माझ्‍यातले बदल मला आतून जाणवायला लागले,’’ आरुष म्हणतो. ‘‘माझा आवाज आता घोगरा झाला आहे. मी खूश आहे. पण कधीकधी मात्र मला खूप वैताग येतो आणि मी उगीचच चिडचिड करत राहातो,’’ औषधांचा चांगला परिणाम आणि त्‍याचबरोबर त्‍याचे दुष्परिणामही आरुष सांगतो.

आरुषला सतत भीती वाटत असते, विधीला कधीतरी आपल्‍याबरोबर पळून आल्‍याचा पश्‍चात्ताप होईल किंवा तिचं आपल्‍यावरचं प्रेमच आटेल. ‘‘ती चांगल्‍या (वरच्‍या जातीच्‍या) घरातून आली आहे,’’ आरुष म्हणतो. ‘‘पण मी खालच्‍या जातीचा आहे असं तिने मला कधीच जाणवून दिलं नाही. आम्हाला लागणारे पैसे मिळवण्‍यासाठी ती कामही करते.’’

आरुषमधले बदल विधीनेही टिपले आहेत. ती म्हणते, ‘‘आमची भांडणं व्‍हायची, पण आम्‍ही नंतर शांतपणे त्‍याबद्दल बोलायचो, चर्चा करायचो. माझ्‍यावरही या सार्‍याचा परिणाम होतोच आहे, पण मी त्‍याच्‍या सोबत आहे.’’ कॉम्‍प्‍युटर किंवा नर्सिंगचा कोर्स करण्‍याची आपली इच्‍छा तिने बाजूला ठेवली आणि आता घर चालवण्‍यासाठी मिळेल ते काम करते आहे. सध्या एका दाक्षिणात्‍य रेस्‍टॉरंटमध्ये ती भांडी घासण्याचं काम करतीये. त्‍या कामाचे तिला महिन्‍याला १०,००० रुपये मिळतात. यातले काही पैसे आरुषच्‍या उपचारांवर खर्च होतात.

Vidhhi in a shy moment
PHOTO • Aakanksha
Aarush is happy to have Vidhhi's support. 'She comes from a better [upper caste] family. But she never makes me feel less'
PHOTO • Aakanksha

डावीकडे : लाजरी विधी. उजवीकडे : विधीचा आधार आहे त्‍यामुळे आरुष खुश आहे. ‘ती चांगल्‍या (वरच्‍या जातीच्‍या) कुटुंबातून आली आहे , पण मला तिने कधीही मी खालच्‍या जातीचा आहे हे भासू दिलं नाही’

आरुष एका इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. महिन्‍याला त्‍याला ११,००० रुपये मिळतात, त्‍यातली काही रक्कम तो मागे टाकतो. त्‍याचे सहकारी त्‍याला पुरुषच समजतात. उभार दिसू नयेत म्हणून तो छाती घट्ट बांधतो, त्‍याचा त्‍याला त्रास होतो.

‘‘आम्हाला दोघांना आता एकत्र खूपच कमी वेळ मिळतो, कारण आम्ही सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडतो. थकून घरी येतो आणि मग वाद घालत राहातो,’’ विधी सांगते.

सप्‍टेंबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या काळात आरुषला त्‍याच्‍या उपचारांवर जवळजवळ २५,००० रुपये खर्च आलाय. हार्मोन थेरपीनंतर लिंगबदल शस्‍त्रक्रिया करायची आहे. त्‍यात छाती आणि जननेंद्रिय यांची पुनर्रचना केली जाईल. याचा खर्च आहे पाच ते आठ लाख रुपये. आरुषला तो परवडणार नाही, कारण सध्याच्‍या उत्‍पन्‍नातून विधी आणि आरुष तेवढे पैसे वाचवू शकणार नाहीत.

शस्‍त्रक्रिया होईपर्यंत आरुषला आपल्‍या घरी आपल्‍या या उपचारांबद्दल काही कळूच द्यायचं नाहीये. एकदा त्‍याने केस बारीक कापले होते आणि हे जेव्‍हा आईला कळलं होतं, तेव्‍हा तिने फोनवरूनच आरुषशी घातलेला वाद अजूनही त्‍याला आठवतोय. ‘‘मुंबईतले लोक माझ्‍या डोक्‍यात काहीबाही भरवतायत, असं तिला वाटत होतं,’’ आरुष सांगतो. गावाच्‍या शेजारी काहीतरी पाहाण्‍याच्‍या बहाण्‍याने तिने त्‍याला एका तांत्रिकाकडे नेलं. ‘‘त्‍या तांत्रिकाने मला मारायला सुरुवात केली. तो माझं डोकं आपटत होता. ‘तू मुलगी आहेस, मुलगा नाहीस,’ असं मोठमोठ्याने ओरडत होता.’’ आरुष खूप घाबरला, पण कसंतरी करून तिथून पळून जाण्‍यात त्‍याला यश आलं.

*****

‘‘सरकारी डॉक्टर चांगला असता, तर मला एवढे महागडे उपचार करण्‍याची गरजच पडली नसती,’’ आरुष म्हणतो. लिंगबदल शस्‍त्रक्रिया आणि हार्मोनल थेरपीसाठी सरकारने वैद्यकीय सुविधा पुरवाव्‍यात, असं ‘ द ट्रान्‍सजेंडर पर्सन्‍स (प्रोटेक्‍शन ऑफराइट्‌स) ॲक्‍ट २०१९ ’ सांगतो. यात शस्‍त्रक्रियेच्‍या आधी आणि नंतर करण्‍याच्‍या काउन्सिलिंगचाही समावेश आहे. हा कायदा पारलिंगी व्‍यक्‍तींच्‍या उपचार आणि शस्‍त्रक्रिया केली जाण्‍याच्‍या आणि नाकारली न जाण्‍याच्‍या हक्‍काचंही संरक्षण करतो.

हा कायदा लागू झाल्‍यावर, २०२२ मध्ये केंद्र सरकारच्‍या सामाजिक न्‍याय आणि कल्‍याण विभागाने पारलिंगी व्‍यक्‍तींसाठी अनेक कल्‍याणकारी योजना तयार केल्‍या आहेत. त्‍यांना कोणत्‍याही सरकारी कार्यालयात न जाता ओळख प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळावं यासाठी २०२० मध्ये ‘ नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्‍सजेंडर पर्सन्‍स ’ हेदेखील सुरू करण्‍यात आलं आहे.

Vidhhi wearing a ring that Aarush gave her as a neckpiece
PHOTO • Aakanksha
Aarush and Vidhhi are full of hope. 'Why should we live in fear?'
PHOTO • Aakanksha

डावीकडे : विधीने गळ्यातल्या साखळीत घातलेली अंगठी. आरुषने तिला ती ‘नेकपीस’ म्हणून दिली होती. उजवीकडे : आरुष आणि विधी आशावादी आहेत. ‘आम्ही भीतीच्‍या छायेत का जगायचं ?’

सरकारी योजनांबद्दल आरुषला फारशी माहिती नाही, पण ओळखीसाठी आवश्यक कागदपत्रं मिळवण्‍यासाठी त्‍याने अर्ज केला आहे. त्‍याला त्‍यातलं काहीच अद्याप मिळालेलं मात्र नाही. पारलिंगी व्‍यक्‍तींनी अर्ज केल्‍यावर जिल्‍हा कार्यालयांनी ३० दिवसांच्‍या आत त्‍यांना ट्रान्सजेण्डर असल्याचं प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देणं अनिवार्य आहे असं या पोर्टलवर म्हटलेलं आहे. २ जानेवारी २०२३ पर्यंत महाराष्ट्राकडे २०८० अर्ज आले होते, त्‍यापैकी ४५२ प्रलंबित आहेत.

आरुषला चिंता वाटतेय ती त्‍याच्‍या बीएच्‍या पदवी प्रमाणपत्राची. जोवर त्‍याच्‍याकडे ओळख प्रमाणपत्र नाही, तोवर बीएची पदवी त्‍याला आरुषी नावाने दिली जाईल आणि नंतर ते बदलून घेण्‍यासाठी प्रचंड गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडावी लागेल. अजूनही पोलिस दलात जाण्‍याची त्‍याची इच्‍छा आहे, पण ते पुरुष म्हणून आणि लिंगबदल शस्‍त्रक्रिया झाल्‍यावरच. दरम्‍यान, बिहारमधून आलेली एक बातमी आरुषला आशादायक वाटते आहे. तिथे राज्‍य पोलिस दलात प्रथमच एका पारलिंगी पुरुषाची भरती करण्‍यात आली. ‘‘हे पाहून मला खूप बरं वाटतं. आतून कुठेतरी आशा वाटते,’’ दिवसभर काम करून आपल्‍या शस्‍त्रक्रियेसाठी पैसे वाचवणारा आरुष म्हणतो.

सगळ्यांचा स्‍वीकार करणं लोकांना शिकवायला हवं, मग त्‍यांना असं आपलं कुटुंब किंवा गाव मागे सोडून पळावं लागणार नाही आणि असं लपतछपत जगावं लागणार नाही, असं त्‍याला मनापासून वाटतं. ‘‘मी खूप रडलो. जगायचंच नव्‍हतं मला. का असं भीतीच्‍या छायेत जगावं? कधीतरी आम्हाला आमची ही गोष्ट आमची नावं न लपवता सांगता आली पाहिजे,’’ आरुष म्हणतो.

‘‘मुगल-ए-आझमचा शेवट दुःखी आहे. आमचा नसेल तसा,’’ हळूच हसत विधी म्हणते.

खाजगीपणा जपण्‍यासाठी विधी आणि आरुष यांची मूळ नावं बदलण्‍यात आली आहेत.

Aakanksha

আকাঙ্ক্ষা পিপলস আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়ার একজন সাংবাদিক এবং ফটোগ্রাফার। পারি'র এডুকেশন বিভাগে কনটেন্ট সম্পাদক রূপে তিনি গ্রামীণ এলাকার শিক্ষার্থীদের তাদের চারপাশের নানান বিষয় নথিভুক্ত করতে প্রশিক্ষণ দেন।

Other stories by Aakanksha
Editor : Pratishtha Pandya

কবি এবং অনুবাদক প্রতিষ্ঠা পান্ডিয়া গুজরাতি ও ইংরেজি ভাষায় লেখালেখি করেন। বর্তমানে তিনি লেখক এবং অনুবাদক হিসেবে পারি-র সঙ্গে যুক্ত।

Other stories by Pratishtha Pandya
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

Other stories by Vaishali Rode