“सोमवारपासून [१६ मार्चपासून] आम्हाला काहीही काम मिळालेलं नाय. पैसा कुठनं आनायचा?” वंदना उंबरसडा म्हणतात. त्यांची ७ वर्षांची नात ५ रुपये दे म्हणून मागे लागली होती तिच्याविषयी.
पालघर जिल्ह्यातल्या कवटेपाडा गावात आपल्या घरी अंगणात बसलेल्या ५५ वर्षांच्या वंदना वाडा तालुक्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी बांधकामावर मजुरीला जातात. त्या सांगतात, “काय चाललंय ते पन कलत नाय. माजा पोरगा मला सांगतो की तू घरी बस कारन कोनता तर आजार आलाय इकडं आन् सरकार सांगतंय की घराच्या बाहेर पडू नका.”
दुपारचे ४ वाजून गेलेत आणि वंदनाचे अनेक शेजारी पाजारी तिच्या घराबाहेर अंगणात गोळा झालेत. त्यांच्या बोलण्यात अनेक विषय असले तरी मुख्य चर्चा आहे ती कोविड-१९ च्या संकटाची. त्यातली एकच, तीही तरुण मुलगी सांगते की सगळ्यांनी बोलताना एकमेकांपासून लांब थांबा म्हणून. इथल्या लोकांच्या सांगण्यानुसार कवटेपाड्यावर सुमारे ७० घरं आहेत. आणि सगळे जण वारली समुदायाचे आहेत.
लॉकडाउन सुरू व्हायच्या आधी वंदना आणि त्यांच्या शेजारी मनिता उंबरसडा सकाळी ८ वाजताच कामाला लागायच्या. दहा किलोमीटर चालत जाऊन त्या वाडा शहरातल्या बांधकामांवर पोचायच्या. तिथे सकाळी ९ ते संध्याकाळी ६ असं काम करून रोजचे २०० रुपये कमवायचे. वंदना सांगतात की त्यांना महिन्याला ४,००० रुपयांचं तरी काम मिळत होतं. पण सध्या मात्र बांधकामांवरच्या मुकादमांकडे त्यांच्यासाठी कसलंच काम नाही.
“माझ्या पोरांना पण कसलंच काम भेटत नाय. आम्हाला पोटाला काही तरी आणावं लागेल ना. पण कामच नाही तर पैसा कुठून येणार?” त्या विचारतात. “आमचं सगलं राशन संपलंय. आता काय पोरांना कोरडी चटणी खायला घालायची का? लवकर सुटका कर रे बाबा.”
वंदनांना तीन मुलं आणि ११ नातवंडं आहेत. त्यांची मुलं वाडा तालुक्यात वीटभट्ट्यांवर किंवा बांधकामांवर मजुरीला जातात. वाडा तालुक्यात १६८ गावं असून सगळी मिळून लोकसंख्या १,५४,४१६ आहे. वंदनांचे पती गावातल्या एका दुकानात काम करायचे. पंधरा वर्षांपूर्वी दारूच्या व्यसनामुळे तब्येतीच्या तक्रारी निर्माण झाल्या आणि त्यातच ते वारले.
कवटेपाड्यातले अनेक जण कामासाठी ९० किलोमीटरवर मुंबईला स्थलांतर करून येतात. कुटुंबं गावीच राहतात. “माझा पोरगा आन् सून भिवंडीला गेलेत [कवटेपाड्यापासून ४५ किलोमीटरवर], तीन महिने बांधकामावर रोजंदारीवर. त्यांच्या लेकरांना खायला घालायचं काम माज्याकडे. आता शाळा बंद झाल्यात, दुपारचं जेवन पन भेटत नाय,” वंदना सांगतात.
त्यांचा मुलगा मारुती, वय ३२, वाडा शहरात बांधकामावर मजुरी करतो. तो सांगतो, “सरकारने हा आजार कुठे पसरू नये म्हणून सगळंच बंद करून टाकलंय.” १६ मार्चपासून तो देखील काम नाही म्हणून घरी बसून आहे.
“बातम्यांमध्ये दाखवतायत की आजाराचा मुकाबला करण्यासाठी दर तासाला साबणाने हात धुवा आणि भरपूर पाणी प्या,” तो सांगतो. “पण भुकेनंच आधी जीव गेला तर साबण काय आम्हाला वाचवणार.”
मारुती, आई, पत्नी मनीषा, वहिनी वैशाली आणि त्याची दोन लेकरं असे सगळे जण कवटेपाड्याच्या १२ X १२ फुटाच्या घरात राहतात. “माझ्या वहिनीला दर आठवड्याला दवाखान्यात न्यावं लागतं. तिची साखर जास्त आहे आणि इंजेक्शन टोचून आणावं लागतं,” तो सांगतो. इन्शुलिनच्या एका इंजेकश्नला १५० रुपये पडतात. “माझ्या रोजच्या मजुरीत आमचं एरवी देखील कसं बसं भागतं. आता काम नाही तर माझं कुटुंब मी कसं पोसायचं?”
वंदनांच्या शेजारी राहणाऱ्या ४८ वर्षीय मनिता उंबरसडा देखील तिकडे आल्या आहेत. त्याही दिवसाला आठ तास बांधकामावर जड सामान ने-आण करण्याचं काम करतात, त्याची त्यांना २०० रुपये मजुरी मिळते. “शेतीतल्या कामापेक्षा हे काम किती तरी बरं. दिवसभर उन्हात तर राबावं लागत नाही,” त्या सांगतात. “पण आता वाड्यात आम्हाला कामच मिलत नाय. मग काय जवलच्या शेतीत कामाला जावं लागनार.”
एक महिनाभर पुरतील एवढं रेशन आहे त्यात ते भागवतायत, पण येत्या काही दिवसात काम आणि पैसा नसला तर कसं काय करायचं याच चिंतेत ते आहेत
मनितांचे पती बाबू, वय ५० यांचा पाय मधुमेहाचा परिणाम म्हणून १० वर्षांपूर्वी कापावा लागला – ते पूर्वी खंडाने शेती करायचे. त्या दोघांची पाच मुलं आहेत आणि ती सगळी वाड्यातल्या बांधकामांवर किंवा छोट्या कारखान्यांमध्ये मजुरी करतात. त्यांचा सगळ्यात धाकटा मुलगा, २३ वर्षीय कल्पेश एका पाइप बनवण्याच्या कारखान्यात महिन्याला ७,००० रुपये पगारावर काम करतो. “कामाला येऊ नका म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय. आता आमचा पगार कापणार का काय माहित नाय,” त्याच्या आवाजली चिंता जाणवते.
त्यांच्या कुटुंबात नातवंडं वगैरे सगळे धरून १५ लोक आहेत. सध्या कुणाचीच काही कमाई सुरू नाही. एक महिनाभर पुरतील एवढं रेशन आहे त्यात ते भागवतायत, पण येत्या काही दिवसात काम आणि पैसा नसला तर कसं काय करायचं याच चिंतेत ते आहेत.
तीन घरं सोडून राहणारा १८ वर्षांचा संजय तुमडा १७ मार्चपासून बेकार बसून आहे. तो पालघरमध्ये महिन्याचे २० दिवस बिगारीवर कामं करतो आणि ३००-४०० रुपये मजुरी कमवतो. वाड्यातला एक मुकादम त्याला काम असेल तर कळवतो. तो गेला एक आठवडा आलेला नाही. “मी बातम्यांमध्ये पाहिलं की या महिन्यात सगळी दुकानं बंद राहणार आहेत म्हणून. आता पुढचा एक आठवडा पुरेल एवढंच धान्य घरात आहे,” संजय सांगतो. “आमच्याकडे तसंही धान्य कमी आहे. पुढच्या आठवड्यापासून आमच्याकडचं सगळं अन्नधान्य संपून जाईल.”
अजय बोचाल, वय २० बांधकामांवर काम करतो. त्याला देखील हीच चिंता लागून राहिलंय. “माझी आई गेल्या दोन दिवसांपासून नुसती शेवग्याची भाजी बनवतीये. थोड्या दिवसात काम मिळालं नाही तर मला कुणाकडून तरी पैसे उसने घ्यावे लागनार.” अजयची आई सुरेखा, वय ४२ पूर्वी वाडा शहरात घरकामगार म्हणून काम करायची. पण आता झेपत नाही म्हणून त्यांनी ते काम थांबवलंय. त्यांचे पती सुरेश चिक्कार दारू पितात आणि गेल्या काही काळापासून कसल्याच कामावर जात नाहीयेत.
या कुटुंबाकडे असलेलं सामानही आता संपायला आलंय. “आम्हाला रेशनवर दर महिन्याला १२ किलो गहू [२ रु. किलो] आणि ८ किलो तांदूळ [३ रु. किलो] मिळतो,” अजय सांगतो. “आता या महिन्याचं रेशन आणण्यासाठी आमाला पैशाची गरज आहे.” वाड्यातल्या रेशन दुकानावर दर महिन्याच्या १० तारखेला धान्य इत्यादी भरलं जातं. अजय सांगतो की एरवी घरचं रेशन संपत आलं की तो १० तारखेनंतर दुकानात जातो. २० मार्चपर्यंत घरी भरलेलं सगळं सामान संपत आलं होतं. दोन दिवसांपूर्वी रात्री मी अजयशी पोनवर बोलले तेव्हा तरी त्यांना धान्य मिळालेलं नव्हतं. रात्रीच्या जेवणात डाळ भात शिजवलेलला होता. जवळच्या फार्महाउसवर आईला काम मिळेल अशी आजयला आशा होती.
“रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी कोविड-१९ ही मोठी समस्या नाहीये. पोटाला खायला मिळणार नाही ही भीतीच त्यांच्यासाठी मोठी आहे,” पचनविकारतज्ज्ञ आणि मुंबईच्या केईएम रुग्णालयाच शल्यचिकित्सक असणारे डॉ. अविनाश सुपे म्हणतात. “कामगारांना पोट भरण्यासाठी रोजच्या रोज मजुरी मिळणं गरजेचं असतं. पण हेही महत्त्वाचं आहे की आता कामगारांनी आपल्या गावी जाणं टाळायला हवं. सध्याच्या परिस्थितीत गावातून किंवा शहरातून कुणीही कुठेही गेलं तर सामुदायिक संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता वाढणार आहे. लोकांना या विषाणूबद्दल आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल जास्त शिक्षित करणं गरजेचं आहे.”
कवटेपाड्याच्या रहिवाशांसाठी सगळ्यात जवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र वाडा शहरात आहे. “काय चालू आहे तेच आम्हाला कळत नाहीये. आमच्याकडे कोरोना विषाणूच्या तपासणीच्या कसल्याच सोयी नाहीयेत. आम्ही फक्त साधी रक्त तपासणी करू शकतो,” वाड्याच्या सरकारी शासकीय ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या डॉय शैला आढाव सांगतात. “हा विषाणू आणखी पसरू द्यायचा नाहीये आणि त्यासाठी स्वतः दुसऱ्यांशी संपर्क टाळणे हाच एक उपाय आहे.”
पण कवटेपाड्याच्या रहिवाशांसाठी मात्र असा संपर्क टाळण्यापेक्षा सध्या काम, कमाई आणि खाणं जास्त महत्त्वाचं आहे. “मोदी सरकारनी सांगितलंय की विषानू पसरू नये म्हनून सगलं बंद ठेवा आन् घरीच बसा,” वंदना चिंतातुर होऊन म्हणतात. “पन तूच सांग, नुसतं घरी बसून कसं परवडनार?”
अनुवादः मेधा काळे