“या आधी कोणीच माझी मुलाखत घेतली नाही. मी सारं काही सांगते...” या ‘सारं काही’ मध्ये७० वर्षं मुंबईच्या खार (पश्चिम) या उपनगरातील घरांत शौचालय साफ करणं, पोछा मारणं, धुणी भांडी करणं आणि त्याच्या मोबदल्यात कवडी मोल मिळवणं हे सगळं आलं. १९८० ते १९९० च्या सुरुवातीला एका इमारतीतील १५-१६ घरं साफ करण्याचे भटेरी सरबजीत लोहट यांना महिन्याला ५० रुपये मिळत असत. आणि सोबत त्यांच्या स्वयंपाकघरातील शिळंपाकं.
“मी भटेरी देवी. मी मूळची हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील संघी गावची. मुंबईत कधी राहायला आले मला ठाऊक नाही, पण तेंव्हा माझं नुकतंच लग्न झालेलं. सासूने माझ्याकरिता एक काम शोधून काढलं होतं, आमच्याच एका नातेवाईकाच्या बदली. माझा नवरा (तोसुद्धा सफाई कर्मचारी) काही वर्षांनी मरण पावला. माझा मुलगा तेंव्हा दोन-तीन वर्षांचा असेल. तो दादरमध्ये काम करत असे. एकदा लोकलने घरी परतत असताना तो दरवाजात उभा होता अन् विजेच्या खांबावर आदळला. तो जागच्या जागीच मरण पावला.”
वर्षं उलटली तरीही हे सांगत असताना त्यातली वेदना आजही ताजी आहे. भटेरी देवींचा ऊर भरून आलाय. त्या पूर्व वांद्र्यातील वाल्मिकीनगर येथे राहतात. त्यांच्या आधारकार्डावर त्यांचा जन्म १९३२ सालचा असल्याचं लिहिलं आहे, म्हणजे त्या आता ८६ वर्षांच्या असायला हव्यात. पण त्यांचा सुरकुतलेला चेहरा पाहून वाटतं त्यांनी नव्वदी पार केली असेल – त्या सुद्धा हे मान्य करतात. त्यांचा मुलगा हरीश या वर्षी ३० जूनला मरण पावला, तो वयाच्या सत्तरीत होता. भटेरी १२-१३ वर्षांच्या असतानाच त्यांचं लग्न झालं, ज्यानंतर त्या आपले पती सरबजीत लोहट यांच्यासोबत मुंबईत राहायला आल्या.
त्यांचं अख्खं कुटुंब (आणि सासरची बरीचशी मंडळी) हरयाणातून स्थलांतरित होऊन मुंबईतच राहत होतं. जवळपास सगळेच खासगी सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. या वस्तीत राहणारे बहुतांश लोक, भटेरीप्रमाणेच, वाल्मिकी समुदायाचे दलित असून कालांतराने कामाच्या शोधात हरयाणातून मुंबईला स्थलांतरित झालेत. भटेरीप्रमाणेच ते घरी हरियाणवी बोलतात. मुंबईत हरयाणातून आलेल्या लोकांच्या अशा बऱ्याच वाल्मिकी वस्त्या आहेत. विशेष करून भांडुप टँक रोड, डोंबिवली, माटुंगा मजदूर कँप, विक्रोळी आणि चेंबूर येथे.
या जातीच्या वाट्याला हे सफाईचं काम कसं काय आलं? “हा सगळा नशिबाचा खेळ आहे. आमच्या जातीत हेच एक काम, सगळे तेच करतात,” भटेरी म्हणतात.
काही विशिष्ट जातीच्या लोकांचं होणारं स्थलांतर आणि वाळीत टाकल्यासारखं त्यांचं राहणीमान देशभरात सारख्याच स्वरूपाचं आहे. जातीवर आधारित हीन दर्जाची कामं आणि त्यांचा पिढ्या न पिढ्या राहिलेला पगडादेखील सारखाच – मुंबईत किंवा देशात इतरत्र कुठेही. ही वस्तुस्थिती शहराच्या झगमगाटात लपून गेली आहे, अदृश्य झाली आहे.
अनेक वर्षं राबून (काम करते करते) पाठीतून वाकलेल्या भटेरींना स्वतःच्या परिस्थितीचं फारसं काहीच वाटत नसल्याचं दिसून येतं. वास्तविक, आम्ही मुंबईत त्यांच्या घरी भेटलो असता त्या मोठ्या उत्साहानं आम्हाला आपली जीवनगाथा सांगू लागल्या. घरातील इतर मंडळी अचंबित होऊन पाहत राहिली. त्यांनी भटेरींना आपल्याविषयी इतकं मनमोकळं बोलताना या आधी पाहिलं नव्हतं. त्याच वेळी भटेरी म्हणाल्या की यापूर्वी कोणीच त्यांची मुलाखत घेतली नव्हती – आणि आता त्यांना बोलायचं होतं.
मग त्या बोलू लागल्या. त्यांच्या पतीच्या निधनाबद्दल: “तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. माझे थोरले, धाकटे दीर एकाच घरी राहत होते. मी त्या वेळी कमावत होते. सासरचे बरेचदा मला बदडून काढायचे. एखाद्या दिराशी लग्न करण्यासाठी त्यांनी माझ्यावर दबाव टाकला. मी नाही म्हटलं. म्हटलं मला एक मुलगा आहे, त्याच्यासोबत मी उरलेलं आयुष्य घालवीन. मला ठाऊक होतं, जर का मी एखाद्या दिरासोबत लग्न केलं असतं तर माझी कोणीच इज्जत केली नसती. मी स्वतःपुरतं कमावलं, मुलाला मोठं केलं आणि आपली इज्जत टिकवून ठेवली. माझ्या आयुष्याबाबत मी फार आनंदी आहे.” (काही जाती आणि समुदायांमध्ये विधवेचं तिच्या पतीच्या धाकट्या नाही तर थोरल्या भावाशी लग्न लावून देण्याची प्रथा आहे.)
“लग्न झाल्यावर मी माझा नवरा, सासू-सासरे आणि एका धाकट्या दिरासोबत इथे राहायला आली. अगोदर आम्ही खारमध्ये राहायचो, तिथे खाटिक लोकं [आणखी एक दलित समुदाय] राहतात.”
“मी आयुष्यभर खारमध्येच काम केलं. त्या वेळी [सुरुवातीचे दशक], इथे फार कमी इमारती होत्या. मुंबई बरीच मोकळी आणि रिकामी वाटायची.” काम करत असताना किती कमाई व्हायची हे भटेरींना नीटसं माहित नाही. ना त्यांना त्या काळच्या शहरात कांदे-बटाट्यांचा भाव किंवा कपड्यांची किंमत माहिती आहे. त्यांच्या सासूची सर्व गोष्टींवर नजर असे, वस्तू विकत घेण्यापासून त्यांच्या कमाईपर्यंत. भटेरींना त्यांच्या कधीच हातात पैसा मिळत नसे.
आयुष्यभर भटेरी पश्चिम खारमधील इमारतींच्या अवतीभवती फिरायच्या. तिथेच त्या शौचालय साफ करणं आणि धुणी-भांडी, पोछा मारणं शिकल्या. त्यांनी ८० वर्षांच्या झाल्यावरही हे काम सोडलं नाही. त्यांची नात सून, तनू लोहट, ३७, संजय हरीश लोहट यांच्या पत्नी म्हणते ,“फार तंटे अन् वादावादी केल्यावर माझ्या आजेसासूचं काम कुणा दुसऱ्याला देण्यात आलं. अजूनही, आम्ही नाही म्हणत असलो तरी, तिथल्या लोकांना भेटायला त्या पश्चिम खारमध्ये जातात.”
संजय काही काळ गटार सफाई करत होते, मात्र यकृताचा आजार झाल्यापासून त्यांनी ते काम सोडून दिलं. मी भटेरीला भेटले असता संजय यांची नुकतीच इस्पितळातून उपचार करून रवानगी झाली होती. मात्र दोन महिन्यांतच, वयाच्या ४० व्या वर्षी त्यांचा यकृताच्या विकाराने मृत्यू झाला. संजय एक उत्साही व्यक्ती होते, आणि मरणाच्या काही दिवसांपूर्वीच ते आम्हाला म्हणाले होते: “मी माझ्या दादी [आजी]ला लहानपणीच झाडू मारताना आणि गटारं साफ करताना पाहिलं होतं. आम्ही तिच्याच कृपेनं जिवंत आहोत. तिनेच आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि या घाणीपासून आम्हाला दूर ठेवायचा प्रयत्न केला. ती सुरुवातीपासूनच मेहनती होती.”
“माझे वडील ऑटोरिक्षा चालवायचे. नंतर त्यांनी ते काम सोडून दिलं आणि घरीच बसले. नंतर त्यांना सचिवालयात सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली, मात्र जातीच्या मुद्द्यावरून संकट आलं. कोणीतरी भडकाऊ शिवीगाळ केली, हातापायी झाली आणि त्यांना हाकलून लावण्यात आलं. तेव्हापासून, मरेस्तोवर ते घरीच राहिले.
“मी लहान असताना दादी मला सांगायची की सात मजली इमारत साफ करण्याचे तिला ५० रुपये मिळायचे. त्या इमारतीतील १५-१६ घरची कामं करून तिला महिन्याला ५० रुपये मिळत असत. घराचा महिन्याचा खर्च कसा काय व्हायचा, ते पण सांगतो. ज्या घरी आजी काम करायची, तिथे तिला शिळंपाकं अन्न देत असत. बऱ्याच दिवशी तेच आमचं जेवण असायचं. अगदी अलीकडच्या काळात दादी ला महिन्याला ४,००० रुपये मिळायला लागले.”
हे वर्ष भटेरी यांच्यासाठी दुःखाचं ठरलं आहे. संजयच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडलांचं, भटेरींच्या मुलाचं निधन झालं. भटेरींना याचा मोठा धक्का बसला आहे.
त्यांच्या कष्टाच्या दिवसांबद्दल बोलताना त्या आनंदी दिसून येतात. “माझं लक्ष फक्त कामावर असायचं. काम करणारे आम्ही सगळे एकत्र जायचो, गप्पा मारायचो, आपलं सुख-दुःख एकमेकांत वाटायचो. काम असं असायचं की सुटीची फुरसत नसायची, म्हणून मी आपल्या गावी परत कधीच जाऊ शकली नाही.पण मी सारं आयुष्य तिथून बरोबर आणलेलेच कपडे घातले.” आताही, राहणीमान आणि बोलणं पाहता त्या हरयाणातील महिलाच वाटतात.
आयुष्यभर तेच ते हीन दर्जाचं काम केल्यावरही, याचं खापर कोणावर फोडायचं हे भटेरींना माहित नाही. त्यांच्या मनात कुणाविरुद्ध रागही दिसून येत नाही.“हा नशिबाचा खेळ होता. आमच्या जातीत हेच एक काम, सगळे तेच करतात,” भटेरी म्हणतात. आणि असंच हे अमानुष, हीन दर्जाचं काम भटेरींसारख्या लाखो महिलांचं जिणं होऊन जातं. एका अदृश्य भिंतीप्रमाणे जात त्यांना चिरडून टाकत असते.
मग त्यांच्या जातीची माणसं अजूनही या घृणास्पद व्यवसायात का गुंतले आहेत? भटेरी भाबडं उत्तर देतात: “मला नाही ठाऊक. आमच्याकडे सगळी माणसं हेच काम करतात, म्हणून मीपण हेच काम करते. हातात फडा पकडून मनगट वाकडं झालंय, पण मला पेन्शनसुद्धा मुळात नाही. आमच्याकडे गरिबीवालं [बीपीएल] कार्डदेखील नाही.”
“पण मी खुश आहे. मला चांगलं खायला मिळतं. आणि हो, मला एका गोष्टीचं समाधान आहे – आयुष्यभर मी माझ्या मेहनतीच्या कमाईवर जगले. आणि घराबाहेर पडल्याने मला मोकळा श्वास घेता यायचा. मला बाहेर हिंडणं पसंत आहे. मी काम करायचं कधीच थांबवलं नाही आणि मी मनसोक्त विड्या ओढल्यायत.” त्या हसतात, आणि ते बोळकं हसू त्यांचं सर्व दुःख परतून लावतं.
हिंदीतून मूळ भाषांतर - नमिता वाईकर
मराठी भाषांतर - कौशल काळू