आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यात विविध वाहनांतून बकरे आणि मेंढे बाजारात आणले जात असतात. मेंढपाळांकडनं ही जनावरं विकत घेऊन व्यापारी किंमत पाहून या-त्या बाजारात त्यांची ने-आण करत असतात. हा टेंपो कादिरीहून अनंतपूरच्या दिशेने जात होता तेव्हा मी हे छायाचित्र घेतलं होतं.
मला वाटत होतं की हा वर बसलेला बाप्याच या जनावरांचा मालक असणार म्हणून. म्हणून मग मी दर शनिवारी भरणाऱ्या अनंतपूरच्या बकऱ्याच्या बाजारात जाऊन हा फोटो तिथल्या लोकांना दाखवला. काही व्यापारी म्हणाले की तोही एखादा व्यापारीच असावा किंवा त्याने पाठवलेला माणूस. पण मला बाजारात भेटलेले मेंढपाळ असलेले पी. नारायणस्वामी मात्र खात्रीने म्हणाले की हा या जनावरांचा मालक नक्कीच नाही. “तो कदाचित मजूर असेल. एखादा मजूरच असा वर [बिनधास्त] बसू शकतो. जनावरांचा मालक असता ना तर त्याने बाजारात नेताना त्यांचे पाय नीट आत सरकवले असते. जो एकेका बकऱ्यावर ६,००० रुपये खर्च करतो, तो त्यांच्या पायाला इजा होणार नाही एवढी काळजी तर नक्कीच घेईल.”
अनुवादः मेधा काळे