धमतरी जिल्ह्याच्या नगरी तहसिलात १० जणांच्या एका घोळक्याचं काही तरी चाललं होतं. मी थांबलो आणि त्यांना कशानी खिळवून ठेवलंय ते पहायला त्यांच्यापाशी चालत गेलो.
काही तरुण मुलं स्थानिक सरकारी रुग्णालयाच्या इमारतीला लागलेल्या मधमाशांच्या पोळ्यातनं टपटपणारा मध विकत होती. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने त्यांना पोळं काढायला सांगितलं होतं.
मी त्यांना ते कुठचे आहेत ते विचारलं. सैबलने आपल्या गावाबद्दल आपुलकीने सांगितलं, “कोलकाता, पश्चिम बंगाल!” म्हणजे कोलकात्याचा, मी विचारलं? “तुम्हाला सुंदरबन माहितीये?” तो उत्तरतो. अर्थात, मी म्हणतो. ते सुंदरबनमध्येही मध गोळा करत असतील का असा प्रश्न माझ्या मनात डोकावून जातो.
“मध गोळा करणं काही आमचा व्यवसाय नाहीये, आम्ही रंगकाम करतो. कधी कुणी विचारलं तर आम्ही हेही काम करतो. पण गावातही आम्ही मधमाशा पाळतो त्यामुळे मध गोळा करतो. आणि त्यामुळे आम्हाला मधाचं पोळं कसं काढायचं ते माहितीये. परंपरेने आलेलं कसब आहे ते. आमचा आजा, त्याचा आजाही हेच करत होता.”
त्यानंतर
घोंघावणाऱ्या माशांचा मुकाबला कसा करायचा ते सैबल मला सांगतो. सुरुवातीला ते
गवताचा पेंढा करून त्याचा धूर करतात आणि माशांना पोळ्यातून पळवून लावतात. “आम्ही
धूर करून राणी माशीला पकडतो,” तो सांगतो. “आम्ही मधमाश्या मारतही नाही आणि त्यांना
जाळतही नाही. एकदा का राणी माशी पकडून पिशवीत टाकली की बाकीच्या माश्यांपासून
कसलाच धोक नसतो.” माश्या निघून जातात आणि पोळं काढणारे त्याचे पोळ्याचे तुकडे करून
मध गोळा करतात. “त्यानंतर आम्ही राणी माशी जंगलात सोडून देतो. म्हणजे त्यांना
त्यांचं नवं घर बांधायला सुरुवात करता येते.”
नगरीमध्ये रस्त्याच्या कडेला ते ३०० रुपये किलो दराने मध (आणि मधाने भरलेली पोळी) विकतायत. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून २५ किलो मध मिळालाय. ते पोळ्याचं मेणही विकतात, ४०० रुपये किलो दराने. छत्तीसगडमध्ये घडवा समुदाय त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण धोकरा वस्तू बनवण्यासाठी याचा वापर करतात.
त्यांच्या गटातल्या सर्वात तरुण रणजीत मंडलला मी विचारलं की त्याने आजवर किती वेळा हे काम केलंय. त्यावर तो म्हणतोः “आजपर्यंत मी साधारणपणे ३०० तरी पोळी काढलीयेत तीही वेगवेगळ्या ठिकाणी, जगदलपूर, बिजापूर, दांतेवाडा, सिक्किम, झारखंड, आणखीही कुठे कुठे.”
दोन वर्षांपूर्वी, दुष्काळावर काही लिहीत असताना मी धमतरी जिल्ह्याच्या याच तहसिलातल्या जबररा गावाजवळच्या जंगलातून चाललो होतो. तिथे अंजुरा राम सोरीशी माझी भेट झाली. कमार जमातीचा सोरी वनोपज विकून गुजराण करतो. त्याने सांगितलं, “जंगलात जेव्हा कधी दुष्काळ पडतो, तेव्हा हे जंगल सोडून जाणारी पहिली मधमाशीच असते.” तेव्हा माझ्या ध्यानात आलं की लोकांप्रमाणेच मधमाश्यांनाही हिरव्या वाटांच्या दिशेने जावंच लागणार.
अनुवादः मेधा काळे