“सब माछ शेष [सगळी मच्छी संपून गेलीये],” मुरली मोडक्या तोडक्या बंगालीत हसत म्हणतो. त्याला दुःखाची किनार असते. “शोब किच्छू डिफरंट [सगळं बदलून गेलंय],”तो म्हणतो. दोन वर्षांपूर्वी आम्ही जालधा गावातल्या मासळी बाजारात भेटलो होतो. मुरलीच्या निरीक्षणानुसार बंगालच्या उपसागरातले मासे गायब व्हायला लागले आहेत.
समुद्राच्या मध्यावर असलेल्या ‘कालो जोन’बद्दल तो बोलतो. २०१७ साली शास्त्रज्ञांनी या सागरामध्ये सुमारे ६०,००० चौरस किलोमीटरचा प्रदेश ‘मृत प्रदेश’ जाहीर केला होता जो वाढत चालला होता. तिथे प्राणवायू अगदी नगण्य प्रमाणात होता, नायट्रोजन कमी झाला होता आणि जवळपास कोणत्याच समुद्री जीवांचं अस्तित्व नव्हतं. काही नैसर्गिक प्रक्रिया आणि सोबत मानवी हस्तक्षेपाचा हा परिणाम असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
मुरली (आडनाव माहित नाही) बेश्ता या मच्छिमार समुदायाचा असून आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातल्या आणि गोवुंदलापालेम (जनगणनेनुसार गुंडालापालेम) गावचा रहिवासी आहे. गेल्या दोन दशकांपासून तो बंगालच्या उपसागराच्या किनारी पट्ट्यातल्या ऑक्टोबर-मार्च मासेमारीच्या हंगामामध्ये पूर्ब मेदिनीपूर जिल्ह्याच्या रामनगर तालुक्यातल्या जालधा गावी येत आहे. इतक्या वर्षांमध्ये त्याने थोडीफार बंगाली भाषा आत्मसात केली आहे. थोडं हिंदी, थोडं इंग्रजी मिसळून ती तो बोलतो.
भारत, बांग्लादेश आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीवर आपलं कुटुंब आणि मित्र परिवार असल्याचं मुरली अभिमानाने सांगतो. “जाफना ते जंबूद्वीप, सगळेच माझे कुटुंबीय आहेत,” तो खुशीत येऊन सांगतो. जास्त काही तपशील देत नाही पण माझी ओळख त्याचा मित्र स्वपन दासशी करून देतो – “एइ आमार भाई [हा माझा भाऊ],” चाळिशीच्या आसपास असणारा मुरली सांगतो.
स्वपन यांनी स्वतः बराच प्रवास केला आहे. रोजंदारीवर मजुरी आणि पोटासाठी हे दोघं मासेमारी बोटींवर काम करतात. इथल्या बाजारातल्या अनेक स्थलांतरित कामगारांपैकी हे दोघं. ऑक्टोबर ते मार्च या हंगामात ते (किती मासळी मिळते त्याप्रमाणे) रु. ३,००० ते रु. १०,००० इतकी कमाई करतात.
आम्ही सावकाश वाट काढत दक्षिण परगणा जिल्ह्यातल्या अब्जाखली गावी पोचतो, सर्वात आधी बस, मग नावेने. वाटेत जंबूद्वीप बेटावर (जनगणनेनुसार जम्मू बेट) आम्ही थांबतो. आम्ही मत्स्य व्यवसाय आणि खास करून लाल खेकडे, ज्यांची मी पाहणी करतीये, ते पाहण्यासाठी अब्जाखालीला चाललो आहोत. शेजारी सागर बेट आणि फ्रेझरगंज मिरवणाऱ्या जंबूद्वीप बेटावर निम्मं वर्षभर कुणीही वस्तीला नसतं. ऑक्टोबर ते मार्च या उपखंडातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले मच्छिमार इथे तळ ठोकतात. मी जेव्हा स्वपनला विचारते की तो घरी परत कधी जाणार, तेव्हा तो म्हणतो, “हेच माझं घर आहे.”
ही हंगामी मासेमारी आणि या मच्छिमारांची हे तात्पुरते निवारे इथे सबर म्हणून ओळखले जातात. किती तरी काळापासून या भटकंती करणाऱ्या मच्छिमारांनी जंबूद्वीपसारख्या खोलगट भागातल्या बेटांवर तात्पुरती गावं वसवली आहेत. या मच्छिमार गावांमध्ये अनेक कुंथी आहेत आणि प्रत्येक कुंथीमध्ये १ ते १० बोटींची जबाबदारी असणारा एक ‘मालक’ आहे. कोणत्याही भागातून आलेले असले तरी इथल्या मासळी कामगारांना इथला प्रत्येक जण माहित आहे, जवळपासच्या भागातून इथे संपूर्ण कुटुंबं बोटीवर काम करण्यासाठी किंवा हिवाळ्यातल्या वाहत्या हवेमध्ये मासळी सुकवण्यासाठी म्हणून येतात.
२००० च्या सुरुवातीपासून मात्र अगदी काही महिन्यांसाठी जरी असेल तरी इथे येऊन मुक्काम करणं अवघड झालंय कारण सीमेवरचा पहारा कडक झाला आहे, मुरली आणि स्वपन सांगतात. बोटींवर काम मिळणं देखील सोपं राहिलेलं नाही. मुरली सांगतो, “मासे संपून गेलेत, आणि आता [गस्त घालणारे] पोलिसही जास्त आहेत, त्यामुळे कामच संपलंय.”
‘मृत प्रदेश’ आणि मासळी कमी होत चाललीच आहे पण मुरली आणि इतर मच्छिमारांना चिनी, सिंगापुरी आणि खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मोठ्या ट्रॉलर्सशी स्पर्धा करणंही अवघड होत चाललंय. आणि १९९० नंतर समुद्रातल्या मत्स्यव्यवसायाचा व्यापार एवढा वाढलाय की मिळालेल्या मासळीचा भावही कमी होत चाललाय. इंधनाच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे छोट्या बोटी चालवणं आता परवडेनासं झालंय. “सगळंच बदललंय... समुद्र, मासळी, आमचं काम... सगळंच,” मुरली सांगतो.
परदेशी ट्रॉलर्स त्यांचे कामगार घेऊन येतात आणि अक्षरशः समुद्राचा तळ ढवळून काढतात आणि जाळ्यात जे येईल ते काढतात. त्याच्या निरीक्षणानुसार माशाच्या काही प्रजाती आता दुर्मिळ झाल्या आहेत. चापिला, मोला, काजली आणि बतासीसारखे गोड्या पाण्यातले मासे जे सुंदरबनमध्ये नेहमी मिळायचे, तेही आता झपाट्याने दिसेनासे व्हायला लागले आहेत.
ॲक्वॅटिक इकोसिस्टिम हेल्थ अँड मॅनेजमेंड या वार्तापत्रातील एका लेखात म्हटलंय की गंगा-ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातल्या नद्या आणि मत्स्योत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या तलावांचं किमान तापमान ०.५ ते १.४ अंश इतकं वाढलं आहे. आणि याचा फक्त मासेमारीवर नाही तर मच्छिमारांच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. आधीच त्यांच्याकडे उपजीविकेचे फार काही मार्ग नाहीत. आता त्यांना इतर कामधंद्यामध्ये उतरावं लागतंय किंवा कामासाठी दुसरीकडे जावं लागत आहे.
हे मच्छिमार काही त्यांच्या आजूबाजूला काय घडतंय त्यासाठी वातावरण बदल अशी संज्ञा वापरणार नाहीत पण त्यांना ते जिथे राहतात, त्यांचं खाणं आणि त्यांचं उत्पन्न यात होणारे बदल समजतात. या वर्षी मुरलीला पुरतं कळून चुकलंय की आता सबर चालणार नाही. त्याला माहितीये की आता मासेमारीसाठी त्याला दुसरीकडे कुठे तरी जावं लागणार आहे. स्वपनलाही माहित आहे की पारंपरिक पद्धतीची मासेमारी हेच त्याच्याकडचं कसब आहे आणि पुढच्या काही वर्षांत त्याच्या जाळ्यात काहीही गावणार नाहीये. पुढच्या वर्षी तो इथे येणार का याचं पक्कं उत्तर त्याच्याकडे नाही. खरं तर पुढचा हंगाम येणार का हे तरी कोण सांगू शकतंय?
अनुवादः मेधा काळे