न्यायाचा शेवट असा कसा काय होऊ शकतो?
– बिल्किस बानो
मार्च २००२. बिल्किस याकूब रसूल १९ वर्षांची होती. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि तिच्या कुटुंबातल्या १४ जणांना त्यांनी मारून टाकलं. तिची तीन वर्षांची सलेहा देखील होती त्यात. त्या वेळी बिल्किस पाच महिन्यांची गरोदर होती.
लिमखेडा तालुक्यातल्या रणधिकपूर या गावात बिल्किसच्या कुटुंबावर ज्या पुरुषांनी हा हल्ला केला ते त्याच गावचे होते. ती त्या सगळ्यांना ओळखत होती.
डिसेंबर २००३ मध्ये त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने या खटल्याची चौकशी सुरू केली. एक महिन्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. ऑगस्ट २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेच हा खटला मुंबईला हलवला आणि चार वर्षांनंतर, २००८ साली,सीबीआयच्या विशेष न्यायालयाने वीसपैकी १३ जणांना दोषी ठरवलं. त्यातल्या अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मे २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ज्या सात जणांना सोडून देण्यात आलं होतं त्यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आणि बाकी ११ जणांना देण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.
त्यानंतर पाच वर्षांनी, १५ ऑगस्ट २०२२ रोजी गुजरात सरकारने या ११ गुन्हेगारांना गुजरात सरकारने स्थापन केलेल्या तुरुंग सल्लागार समितीच्या शिफारशीनंतर माफी देऊन मुक्त केलं.
अशा प्रकारे देण्यात आलेल्या माफीच्या कायदेशीर वैधतेबाबत अनेक कायदेतज्ज्ञांनी शंका उपस्थित केली आहे.
या कवितेत कवी बिल्किसशी बोलतोय, स्वतःच्या आतली अस्वस्थता शब्दांत व्यक्त करतोय.
मला तुझं नाव दे बिल्किस!
तुझ्या
नावात असं काय आहे, बिल्किस?
जे माझ्या
कवितेची पार चाळणच करून टाकतं
आणि तिच्या
चिरेबंद कानातून रक्त ओघळू लागतं.
तुझ्या
नावात असं काय आहे, बिल्किस?
ज्यामुळे
वळवळणारी जीभ लकवा मारल्यासारखी लुळी पडते,
शब्दही
थिजून जातात बोलता बोलता.
तुझ्या
डोळ्यांत तेजाळणारे दुःखाचे अगणित सूर्य
दिपवून
टाकतात
तुझ्याच
वेदनेच्या प्रतिमा
भाजून
काढणार्या त्या अंतहीन वाळवंटासारख्या.
आठवणींचा
उफाणता दर्या
एकवटलाय
त्या तीक्ष्ण, स्तब्ध नजरेत
तो करतोय
माझं प्रत्येक मूल्य कोरडंठाक
आणि टराटरा
फाडतोय संस्कृती नावाचं ढोंग
-पत्त्यांच्या
बंगल्यासारखं, हजारदा पचलेलं असत्य.
तुझ्या
नावात असं काय आहे, बिल्किस?
जे या
कवितेच्या उजळ चेहऱ्यावर
काळ्या
शाईचे बुधले रिते करतं?
धमन्यांमधून
सळसळणाऱ्या तुझ्या रक्तात भिजलेल्या
या शरमसार
पृथ्वीचाही स्फोट होईल एक दिवस
सालेहाच्या
कोवळ्या कवटीसारखा.
केवळ
परकर नेसून
तू जी
टेकडी पार करून गेली होतीस
ती
देखील आता असेल उघडीबोडकी,
इथे
गवताचं पातंही उगवणार नाही, युगानुयुगं
या
भूतलावर वाहणारा वारा
शाप
देईल नपुंसकत्वाचा.
तुझ्या
नावात असं काय आहे, बिल्किस?
झरझर
लिहिणारी माझी लेखणी
मध्येच
स्तब्ध होते,
अवघ्या
विश्वात संचार करणार्या तिचं
नीतिमत्तेचं
टोकच मोडून जातं.
कोण जाणे,
या कवितेचंही कदाचित तसंच होईल
ती बुढ्ढी
होईल, जुनी होईल
त्या
दयेच्या अर्जावरच्या धोरणासारखी,
न्यायाच्या
नावाखाली घातलेल्या गोंधळासारखी कालबाह्य होईल,
जोवर तू
तिच्यात प्राण फुंकत नाहीस, तिला हिंमत देत नाहीस.
तिला
तुझंच नाव दे, बिल्किस.
फक्त
नाव नाही,
माझ्या
निराश, उदास विषयांचं‘क्रिया’पद हो,बिल्किस.
माझ्या
अवास्तव नामांना विशेषणांचा डौल दे
लढू
पाहाणार्या क्रियांना क्रियाविशेषणांचे सवाल दे
माझ्या
लंगड्या भाषेला अलंकारांची जोड दे
धैर्यासाठी
रूपक
स्वातंत्र्यासाठी
संवाद
न्यायाचं
यमक
आणि
सूडाचा विरोध!
या सगळ्यात
तुझी दृष्टीही मिसळ बिल्किस.
तुझ्याकडून
वाहत येणारी रात्र
तिच्या
डोळ्यातलं अंजन होऊ दे बिल्किस.
बिल्किस
तिचा नाद, बिल्किस एक झंकार
बिल्किस
आहे तिच्या हृदयातला सुरेल आवाज
या
कवितेला बेशक भेदू देत पानांचे पिंजरे
उडू दे
उंच, तुडवू दे जगभरातले रस्ते;
मानवतेच्या
या पांढर्या कबुतराने
घेऊ दे
या वेड्या पृथ्वीला आपल्या पंखाखाली
बरं करू
दे तिला, वाहू दे मानवता
तुझ्या
नावातच आहे हे सारं बिल्किस.
खरंच,
एकदा ये, मला तुझं नाव दे बिल्किस!
अनुवादः वैशाली रोडे आणि मेधा काळे