चित्रदुर्गच्या सुप्रसिद्ध खानावळीत – श्री लक्ष्मी भवन टिफिन रुमच्या भिंतीवर कन्नडमध्ये एक सूचना लिहिली आहेः
ग्राहकांच्या माहितीसाठी
आमच्याकडे रु. २००० चे सुटे नाहीत. कृपया बरोबर आपल्या बिलाइतके पैसे द्यावेत किंवा कमी मूल्याच्या नोटा द्याव्यात
ही सूचना ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर झाली त्यानंतर लगेचच काही दिवसात लावली गेली. “आम्हाला खरंच त्याचा फटका बसला,” इथले व्यवस्थापक एस मुरली सांगतात. “पहिले ३-४ महिने, आमचा धंदा ५०% कमी झाला. लोक इथे यायचे पण न खाताच परत जायचे. वाईट काळ होता तो.” लक्षात घ्या, कर्नाटकातल्या चित्रदुर्ग जिल्ह्यातल्या त्याच नावाच्या शहरातल्या एका अतिशय सुप्रसिद्ध खानावळीची ही गत होती.
पण, आम्ही विचारलं, “आता तर चलनाची परिस्थिती सुधारलीये, रोकड मिळू लागलीये आणि आता तर वर्ष होत आलं – तरीही ही सूचना कशासाठी?” मुरली हसतात. “खरंय, तेव्हापेक्षा परिस्थिती बरीच बरी म्हणायची, पण ही सूचना अजूनही इथे असावी असं आम्हाला वाटतंय.” त्यांच्या बोलण्यातला गर्भितार्थः कोण जाणे... परत असं काही होईल. आणि आता ते नवीन काय घेऊन येतील कुणाला माहितीये?
आमच्याकडे योग्य त्या नोटा होत्या ते बरं झालं. इथला डोसा अप्रतिम असतो. इथल्या प्रसिद्ध चित्रदुर्ग किल्ल्याला भेट द्यायला येणारे पर्यटक आणि आजूबाजूत्या गावातले लोक खास डोसा खाण्यासाठी इथे येतात. माझं तर म्हणणं आहे तुम्ही इथे नक्की या. फक्त चुकूनही २००० रुपयाची नोट काढू नका म्हणजे झालं.
अनुवाद - मेधा काळे