गेल्या आठवड्यात सूर्य कलला आणि गणपती बाळा यादवांच्या सायकलचं चाक शांत झालं. भूमीगत क्रांतीकारकांसाठी निरोप्या म्हणून काम केलेल्या गणपा दादांनी नुकतीच वयाची शंभरी पार केली होती. १०१ नॉट आउट खेळणाऱ्या दादांनी अगदी शेवटच्या काही महिन्यांपर्यंत सायकल चालवणं काही सोडलं नव्हतं. एका दिवसात ५ ते २० किलोमीटर अंतर ते सहज पार करत. पण अखेर छोटंसं आजारपण आलं आणि १०१ वर्षांचा हा म्हातारा सायकलवर पाय मारत दिगंतात गेला.

२०१८ साली आम्ही त्यांना भेटलो तेव्हा त्यांचं वय होतं ९७ वर्षं. आम्हाला शोधत शोधत ते ३० किलोमीटर सायकल मारत आले होते. आम्हाला म्हणजे पारीच्या आमच्या गटाला पोचायला उशीर झाला होता, पण कसंही करून आम्हाला त्यांची झपाटून टाकणारी कहाणी ऐकायचीच होती. मे महिन्याच्या मध्यावर उन्हाच्या कारात चार तास ते सायकल चालवत होते आणि त्यांची सायकलही एखाद्या वस्तू संग्रहालयात शोभावी अशीच होती. पण या कशाचाही त्यांना काडीमात्र फरक पडत नव्हता. आता ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आयुष्याची गोष्ट मात्र चिरंतन आहेः गणपती यादवांची झपाटून टाकणारी जीवनकहाणी .

गणपती बाळ यादवांचा जन्म १९२० साली झाला. १९४३ साली इंग्रजांपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा करणाऱ्या सातारा संस्थानातल्या भूमीगत प्रति सरकारची सशस्त्र सेना म्हणजे तूफान सेना. त्या सेनेचे स्वातंत्र्य सेनानी होते गणपती यादव. इंग्रज राजवटीविरोधात तुफान सेनेने केलेल्या चढायांमध्ये त्यांचा सहभाग होता. १९४३ साली जून महिन्यात साताऱ्याच्या शेणोलीमध्ये इंग्रज अधिकाऱ्यांचे पगार घेऊन जाणारी रेल्वे लुटण्याची रोमांचक कामगिरी फत्ते करणाऱ्या क्रांतीकारी गटातही गणपा दादा होतेच. ही चढाई जी. डी. बापू लाड आणि कॅप्टन भाऊंच्या नेतृत्वात करण्यात आली होती.

ते आम्हाला म्हणाले होते, किती तरी वर्षं “मी (रानानी लपलेल्या) आमच्या पुढाऱ्यांना जेवण पोचवायचो. रातीच्या वेळी मी त्यांना भेटाया जायाचो. त्यांच्यासोबत १०-२० मानसं असायची.” त्यांचा पत्ता लागला असता, तर त्यांना आणि बाकी सगळ्या २० जणांनाही इंग्रजांनी देहदंड केला असता. त्या काळात सायकल चालवणारे यादव म्हणजे घरपोच अन्न पुरवणारी आधुनिक सेवाच होते म्हणा ना. वेगवेगळ्या क्रांतीकारक गटांमध्ये आपापसात कळीचे निरोप पोचवण्याचं काम देखील गणपा दादा करत.

The day we met him in 2018 – he was then 97 – he had cycled close to 30 kilometres in search of the PARI team
PHOTO • P. Sainath
The day we met him in 2018 – he was then 97 – he had cycled close to 30 kilometres in search of the PARI team
PHOTO • P. Sainath

२०१८ साली आम्ही त्यांना भेटलो तेव्हा त्यांचं वय ९७ आणि पारीच्या गटाचा शोध घेत ते ३० किलोमीटर सायकल चालवत आले होते

त्यांची ती सायकल आणि त्यांना मी कधीच विसरू शकणार नाही. मी किती तरी वेळ ती सायकल निरखत होतो. आजही अशा सायकली अंडीवाले, पाववाले, धोबी आणि इतर सेवादाते खेड्यात आणि शहरात घरोघरी सामान पोचवण्यासाठी वापरतात. आमच्या गप्पांमध्ये एकदाच त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. ते म्हणाले, ही सायकल “फक्त” पंचवीस वर्षं जुनी असेल. त्यांची आधीची, अगदी लाडकी सायकल कुणी तरी लांबवली. ती जवळपास ५५ वर्षं तरी त्यांनी चालवली होती. तो चोर पुरातन वस्तू विकणारा कुणी तरी भामटा असणार, माझ्या मनात येऊन गेलं.

गणपती यादवांची आमची गाठ घालून देण्याचं काम केलं आमचे मित्र, पत्रकार संपत मोरे यांनी. सांगली जिल्ह्याच्या शिरगावात त्यांच्याच आजोबांच्या घरी आमची त्यांची भेट झाली. त्यानंतर आम्ही गणपा दादांच्या गावी, ५ किलोमीटरवर रामपूरला गेलो. नंतरचे किती तरी तास आमच्या गप्पा सुरूच होत्या. वयाच्या ९७ व्या वर्षी ते सायकल चालवतायत यात आश्चर्य वाटण्यासारखं ते काय हे काही त्यांना समजत नव्हतं. पण आमच्या विनंतीवरून त्यांनी पुढचा अर्धा तास सायकल चालवली. आमचा पारी फेलो संकेत जैन आणि व्हिडिओ एडिटर सिंचिता माजी त्यांची सायकलस्वारी कॅमेऱ्यात टिपून घेण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते. गणपा दादा रोज ज्या रस्त्याने सायकलवर जायचे त्या दगडामातीच्या रस्त्यावर संकेत चक्क आडवा झाला. सिंचिता एका स्कूटरवर मागे बसली, तीही उलटी. गणपा दादा सायकल चालवत असताना स्कूटर त्यांच्या पुढे होती आणि त्यांच्या रोजच्या वाटेवर त्यांची रोजची सायकल वारी तिला चित्रित करता आली.

त्या मुलाखतीसाठी पारीचे भारत पाटील आणि नमिता वाईकर यांनी दुभाष्याचं काम अगदी चोख बजावलं. त्या मुलाखतीचा एक न् एक क्षण माझ्या स्मृतीत कोरला गेला आहे.

संपतने मला सांगितलं की पुढची दोन वर्षं जेव्हा जेव्हा त्याची यादवांशी गाठ पडायची, तेव्हा दर वेळी ते म्हणायचे की मी आणि पारीच्या गटाने “त्यांच्यावर उपकारच केलेत. मी कुणी नाही हो. स्वातंत्र्याच्या लढ्यातला एक निरोप्या फक्त. पण माझं काम त्यांना मोलाचं वाटलं. किती सन्मान दिला हो.” त्यांच्या मनाला आमचं काम खोल स्पर्शून गेलं होतं. आणि त्यांच्यासाठी ते फार मोलाचं होतं. आम्ही त्यांची गोष्ट सांगितली आणि त्या गोष्टीमुळे त्यांना त्यांच्याच गावात, परिसरात ओळख मिळाली होती.

When it was time to part, Dada (Ganpati Bal Yadav) knew only from the body language that this man is now going. Dada was overcome with emotion
PHOTO • P. Sainath
When it was time to part, Dada (Ganpati Bal Yadav) knew only from the body language that this man is now going. Dada was overcome with emotion
PHOTO • Sanket Jain

निघण्याची वेळ झाली आणि नुसत्या हालचालींवरून दादांना (गणपती बाळा यादव) कळलं की हा माणूस निघालाय. त्यांना भडभडून आलं

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या या अखेरच्या काही सैनिकांमध्ये मला कायम एक गुण दिसून आलाय. त्यांच्यातील विनम्रता. त्यांच्यातल्या प्रत्येकाला माहित आहे की ते, त्यांचा काळ आणि त्यांचं जग फार वेगळं, विशेष आहे. पण दुसरीकडे मात्र ते इतकंच म्हणतात, की जे करण्याची गरज होती ते आम्ही केलं, बस्स. कसल्याही फळाची अपेक्षा नाही. १९७२ साली भारत सरकारने स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन जाहीर केलं. पण गणपा दादांसारख्या अनेकांनी ते स्वीकारायलाही नकार दिला.

मला फार मनापासून असं वाटतं की भारतातल्या या हयात असलेल्या अखेरच्या काही स्वातंत्र्य सैनिकांबद्दलचं आमचं वार्तांकन वाचकांनी आवर्जून वाचावं, पहावं. पुढच्या पाच वर्षांत यांच्यातलं कुणीही हयात नसेल. आजच्या तरुणाईला यानंतर कधीही इंग्रजांच्या साम्राज्यवादी पकडीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या कुणाला पाहता येणार नाही, त्यांच्याशी बोलता येणार नाही, त्यांच्याकडून काही ऐकता येणार नाही.

आणि आता तेही गेले. भारताच्या या लखलखत्या ताऱ्यांपैकी आणखी एक तारा निखळला. आम्हाला, पारीला त्यांनी त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगितली हे आम्ही आमचं भाग्य समजतो. त्यांच्या निधनाचं दुःख आहेच पण आम्ही त्यांचं आयुष्यं साजरं करणार आहोत. वयाच्या शंभरीपर्यंत आपली शेती कसणारा हा गडी. आम्ही निघालो तेव्हा आपल्या वावरातल्या एका खोलीच्या त्या घरात आपल्या स्वतःच्या हाताने मला द्यायला ते काही तरी घेऊन आले. चिनीमातीच्या कपात ताजं दूध होतं. आम्हा दोघांनाही तेव्हा भरून आलं होतं.

संपत मोरेंनी तो क्षण जसा टिपला तसा कुणीच नाही. ते लिहितात: “साईनाथ सर इंग्रजीत बोलत होते आणि गणपा दादा मराठीत. पण जेव्हा निघण्याची वेळ आली, तेव्हा दादांना भाषा समजत नसली तरी हालचालींवरून त्यांना कळून चुकलं की हा माणूस आता निघालाय. दादांना भडभडून आलं. ते उठले आणि त्यांनी सरांचा हात घट्ट आपल्या हातात धरून ठेवला. त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. सरांनी देखील दादांचा हात किती तरी वेळ आपल्या हातात धरून ठेवला. दोघं गडी एकमेकांशी बोलत राहिले. भाषेची गरजच उरली नाही.”

अनुवादः मेधा काळे

P. Sainath

পি. সাইনাথ পিপলস আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়ার প্রতিষ্ঠাতা সম্পাদক। বিগত কয়েক দশক ধরে তিনি গ্রামীণ ভারতবর্ষের অবস্থা নিয়ে সাংবাদিকতা করেছেন। তাঁর লেখা বিখ্যাত দুটি বই ‘এভরিবডি লাভস্ আ গুড ড্রাউট’ এবং 'দ্য লাস্ট হিরোজ: ফুট সোলজার্স অফ ইন্ডিয়ান ফ্রিডম'।

Other stories by পি. সাইনাথ
Translator : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে