नव्याने बाळंत झालेल्या लेकीला तिची आई काय सल्ले देतीये हे या नव्या ओव्यांमधून गातायत पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या जाई साखळे. तब्येतीची काळजी घेत घेत समाजाच्या चालीरितीदेखील सांभाळायच्या असं ही आई सांगतीये

“गर्भिणी नारी, तुझ्या पोटऱ्या गोऱ्या गोऱ्या, सांगते बाई तुला, तू तर घोळाच्या सोड मिऱ्या.” गरोदर मुलीची आई हळूच तिला सल्ला देतीये. गरोदर असलीस तरी समाजाच्या चालीरिती सोडता नये हेच तिचं सांगणं आहे.

पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या लव्हार्ड्याच्या जाई साखळे एका आईच्या ओव्या गातायत. आपल्या लेकीचं पहिलं गरोदरपण आणि पहिलं बाळंतपण आई साजरं करतीये. तिच्या तब्येतीसाठी ती काही खास युक्त्या सांगते आणि काही घरगुती उपचारही.

बाळंतपणात दमून गेल्याने आपल्या लेकीच्या टाचा पिवळ्या पडल्याचं पाहून आई तिला शेपांचा आणि हळदीचा शेक घ्यायला सांगते. “तुझा नवा जन्म झालाय, उब येण्यासाठी तुझ्या कांताची घोंगडी अंगावर घे,” असंही ती सांगते.

'सांगते माझ्या बाई, माझी पिवळी जाई जशी.' चित्रः लाबोनी जांगी

आपल्या आई-वडलांना, नातेवाइकांना भेटल्यावर पहिल्यांदाच दिवस राहिलेली आपली मुलगी लाजून चूर झाली होती हे आईला स्मरतं. आपल्या जावयाने गरोदरपणात नऊ महिने तिचे लाड पुरवलेत. तिला सकाळी मळमळत होतं तेव्हा तो तिला चिकनी सुपारी द्यायचा. डोहाळे लागले तर पाडाचा आंबा उतरून आणायचा. दिवस भरत गेले आणि तिची काया “पिवळ्या जाई” सारखी उजळली. आईला आपली मुलगी आणि जावई, दोघांचा अभिमान वाटतोय.

जाई साखळेंच्या गोड आवाजात या नऊ ओव्या ऐका

अशी बाळंतिणी बाई, तुला देखिली न्हाणी जाता
माझ्या बाईच्या हाये, पिवळ्या तुझ्या टाचा

अशी बाळंतिणी बाई, घ्यावी शापूची शेगयडी
अशी तुझ्या ना अंगावरी, तुझ्या कंथाची घोंगयडी

बाळंतिणी बाई, घ्यावी हळदीची हवा
माझ्या बाईचा, तुझा जलम झाला नवा

गर्भिणी नारी लाज माहेर गोताला
वाणीची माझी बाई, पदर लाविती पोटाला

अशी गर्भिणी नारी, तुला गर्भाच्या वकायऱ्या
अशी हौशा तुझा चुडा, देतो चिकन सुपायऱ्या

अशी गर्भिणी नारी, तुझा गर्भ लाडायाचा
अशी हौशा तुझा चुडा, आंबा उतयरी पाडायाचा

गर्भिणी नारी, तुझ्या पोटऱ्या गोऱ्या गोऱ्या
सांगते बाई तुला, तू तर घोळाच्या सोड मिऱ्या

गर्भिणी नारी, तुझी गर्भ साया कशी
सांगते माझ्या बाई, माझी पिवळी जाई जशी

गर्भिणी नारी, तुझ्या तोंडावरी लाली
सांगते बाई तुला, कोण्या महिन्याला न्हाली


कलावंत – जाई साखळे

गाव - लव्हार्डे

तालुका - मुळशी

जिल्हा - पुणे

जात - नवबौद्ध

वय – २०१२ साली निधन

शिक्षण - नाही

अपत्य – एक मुलगी (लीलाबाई शिंदे – जात्यावरच्या ओव्या संग्रहासाठी लीलाबाईंनी देखील ओव्या गायल्या आहेत)

दिनांक – या ओव्या ५ ऑक्टोबर, १९९९ रोजी ध्वनिमुद्रित केल्या आहेत.

पोस्टर - ऊर्जा

हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.

নমিতা ওয়াইকার লেখক, অনুবাদক এবং পিপলস আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়া, পারির নির্বাহী সম্পাদক। ২০১৮ সালে তাঁর ‘দ্য লং মার্চ’ উপন্যাসটি প্রকাশিত হয়েছে।

Other stories by নমিতা ওয়াইকার
PARI GSP Team

পারি গ্রাইন্ডমিল সংগস্ প্রজেক্ট টিম: আশা ওগালে (অনুবাদ); বার্নার্ড বেল (ডিজিটাইজেশন, ডেটাবেস নির্মাণ, রূপায়ণ এবং রক্ষণাবেক্ষণ); জিতেন্দ্র মেইদ (প্রতিলিপি এবং অনুবাদ সহায়ক); নমিতা ওয়াইকার (প্রকল্প প্রধান এবং কিউরেশন); রজনী খলাদকর (ডেটা এন্ট্রি)

Other stories by PARI GSP Team
Translator : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে