जुलै ते नोव्हेंबर २०१७ या काळात विदर्भाच्या कापूस पिकवणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, खासकरून यवतमाळमध्ये अस्वस्थ वाटणे, गरगरणे, दिसायला त्रास होणे आणि पोटदुखी अशा तक्रारी घेऊन दवाखान्यात येणाऱ्यांची संख्या अचानक वाढली. हे सगळे कापूस शेतकरी किंवा शेतमजूर होते आणि सगळ्यांना रानात कीटकनाशक फवारताना विषारी घटकांशी संपर्क आल्याने विषबाधा झाली होती. किमान ५० जण दगावले, हजाराहून अधिक आजारी पडले, आणि काही तर पुढचे कित्येक महिने आजारी होते.

तीन लेखांच्या मालिकेतल्या या दुसऱ्या लेखात या भागात नक्की काय घडलं आणि महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या विशेष तपास पथकाला नक्की काय सापडलं याचा मागोवा घेतला आहे.

त्यानंतर आपण एका मोठ्या कथानकाकडे जाणार आहोत – विदर्भात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर नक्की होतो तरी का? आणि जे बीटी कापसाचं वाण बोंडअळीला प्रतिकारक म्हणून विकसित करण्यात आलं होतं ते या जुन्या अळीच्या हल्ल्यात निष्प्रभ कसं काय ठरलं तेही आपण पाहणार आहोत. गुलाबी बोंडअळीने फारच जोरदार हल्ला चढवला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असं दिसून येतंय.

****

कीटकनाशकांच्या संपर्कातून विषबाधा होऊ शकते या धास्तीतून संजय बोरखाडे अजूनही बाहेर आलेले नाहीत. “माझी दृष्टी जायचीच होती. पण मी वाचलो,” ते म्हणतात. “मला अजूनही डोळ्यात खाजतंय आणि थकवाही गेलेला नाही.”

आंध आदिवासी समाजाचे ३५ वर्षीय संजय बोरखाडे गेल्या १५ वर्षांपासून शेतमजुरी करत आहेत. त्यांची स्वतःची जमीन नाही. रासायनिक औषधांच्या फवारणीचे असे भयंकर परिणाम इतक्या सगळ्या वर्षांमध्ये कधीच पाहिले नसल्याचं ते सांगतात.

ते आजारी पडले त्या दिवशी त्यांनी ५-६ तास फवारणी केली होती. ही गोष्ट आहे २०१७ च्या ऑक्टोबरची. त्या संपूर्ण आठवड्यात त्यांनी त्यांच्याच गावातल्या १० एकरातल्या कपाशीवर मधून मधून रासायनिक कीटकनाशकांचं मिश्रण फवारलं होतं. याच रानात ते वर्षाच्या बोलीवर सालदार म्हणून काम करतात. अशा प्रकारच्या शेतमजुरीला या भागात सालदारी म्हणतात. या कामातून संजय यांना वर्षाला ७०,००० रुपये मिळतात. ते यवतमाळच्या नेर तहसीलमधल्या चिखली (कान्होबा) गावचे रहिवासी आहेत. या गावातल्या १६०० लोकसंख्येपैकी जवळ जवळ ११% लोक आंध आणि इतर आदिवासी जमातींचे आहेत.
The inside of a hut with utensils and clothes
PHOTO • Jaideep Hardikar

संजय बोरखाडेंचं सात माणसांचं कुटुंब चिखली (कान्होबा) गावी या फार काही पसारा नसणाऱ्या एका खोलीत राहतं

“औषधं फवारल्यावर लोक आजारी पडतायत ते गावातल्या बायांकडून माझ्या कानी आलं होतं,” त्यांच्या पत्नी तुळसा सांगतात. जेव्हा संजयसुद्धा आजारी पडले तेव्हा त्या घाबरून गेल्या की आता त्यांचीही दृष्टी जाणार. ते दवाखान्यात होते तो काळ घरच्यांसाठी फार कठीण होता. “माझं भाग्यच म्हणायचं की ते धडधाकट परत आले,” त्या म्हणतात. “नाही तर माझ्या लेकरांना मी कशी वाढवणार होते, सांगा?”

संजय या घरातले एकटेच कमावते सदस्य आहेत. (त्यांचा फोटो लेखाच्या सुरुवातीला आहे) त्यांचं कुटुंब म्हणजे तुळसा, तिघी मुली आणि एक मुलगा आणि त्यांची आई. त्यांचं घर म्हणजे लाकडी खांब, मातीच्या भिंती आणि गवताचं छप्पर असलेली साधी झोपडी. आतमध्ये फार काही नाही – काही भांडीकुंडी, एक दिवाण – घर भरलंय ते त्यांच्या लेकरांच्या हसण्याने.

पन्नास शेतकरी आणि शेतमजुरांचे जीव घेणारा तो सगळा प्रकार आठवायचा म्हटलं तरी संजय अस्वस्थ होतात. हे सगळं पश्चिम विदर्भाच्या कपाशीच्या पट्ट्यात आणि मुख्यकरून यवतमाळ जिल्ह्यात घडलं. (पहा रसशोषक अळ्या, जीवघेणेफवारे) . सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१७ या काळात अपघाताने विषारी घटकांशी संपर्क आल्याने किंवा नाकातोंडात विषारी घटक गेल्यामुळे हे मृत्यू झाले. एक हजाराहून अधिक शेतकरी आणि शेतजमूर आजारी पडले, पुढचे काही महिने. (ही आकडेवारी सरकारनेच सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमधून गोळा केली आहे.)

शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या या भागात कीटकनाशकांमुळे झालेली ही वेगळ्या तऱ्हेची विषबाधा होती.

“आम्ही दर वर्षीप्रमाणे रानातली फवारणी केली, संध्याकाळी सगळं काम संपलं,” शेतकरी आणि गावचे सरपंच असणारे उद्धवराव भालेराव सांगतात. संजय त्यांच्याच शेतात सालदार आहेत. साधारण ५ वाजण्याच्या सुमारास संजय त्यांच्या शेतमालकाकडे आले तेच सुजलेले डोळे घेऊन. उद्धवरावांनी सत्वर त्यांना त्यांच्या मोटरसायकलवरून १० किमीवरच्या अरणीला नेलं. आणि तिथून ४० किमीवर यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात. “औषधांमुळे विषबाधा होतीये असं आमच्या कानावर आलं होतं पण आम्हीच त्या फेऱ्यात अडकू असं काही आम्हाला वाटलं नव्हतं,” उद्धवराव सांगतात. फवारताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांनी पूर्ण हॉस्पिटल भरलेलं होतं.

तो सगळाच प्रकार विचित्र आणि धक्कादायक होता. “आम्ही इतकी वर्षं वापरतो तीच औषधं यंदाही वापरली होती – नॉन लोकलाइज्ड प्लांट पॉयझन आणि इतर काही थेट परिणाम करणारी औषधं.” भालेराव म्हणतात की या वेळी फरक इतकाच होता की हवा प्रचंड दमट होती आणि कापसाची रोपं भरपूर उंच वाढली होती.

मी जानेवारीमध्ये चिखली कान्होबाला गेलो तेव्हाही बोंडअळीसह वेगवेगळ्या अळ्यांनी केलेल्या भयंकर हल्ल्यातून शेतकरी सावरलेले नव्हते. जुलै २०१७ पासूनच ही सुरुवात झाली होती. रासायनिक कीटकनाशकांचं मिश्रण अपघाताने नाकातोंडात गेल्यामुळे आलेल्या आजारपणांमधून शेतमजूरही अजून सावरलेले नाहीत.

चिखलीचे पाच शेतकरी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कपाशीवर फवारल्यानंतर आजारी पडले. यंदा कपाशीची रोपं चांगलीच उंच आणि दाट वाढली होती. संजसह चार जण बचावले. मात्र ४५ वर्षांचे आंध आदिवासी असणारे ज्ञानेश्वर टाळे मात्र दगावले. ते दोन महिने दवाखान्यात होते. त्यांना आधी १ ऑक्टोबर २०१७ रोजी अरणीच्या उपजिल्हा रुग्णालायत नेलं होतं. दुसऱ्याच दिवशी त्यांना यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आलं. तिथे एक महिना उपचार केल्यानंतर त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Two men walk around the village of Chikhli Kanhoba
PHOTO • Jaideep Hardikar
A man talking in the foreground with a man and woman sitting in the background in the village of Chikhli-Kanhoba
PHOTO • Jaideep Hardikar

डावीकडेः ज्ञानेश्वर यांचा फोटो घेतलेले टाळे कुटुंब. उजवीकडेः गावचे सरपंच आणि जमीनदार उद्धवराव भालेराव टाळे कुटुंबीयांच्या घरी

“एखादा दिवस त्यांची प्रकृती जरा सुधारायची की ते परत सिरियस व्हायचे. आम्हाला वाटत होतं की ते वाचतील, पण तसं नाही झालं,” त्यांचे धाकटे बंधू गजानन सांगतात. तेही शेतमजूर आहेत आणि ज्ञानेश्वर यांच्यासोबत पूर्ण वेळ तेच दवाखान्यात होते. त्यांचे दुसरे भाऊ बंडूदेखील दवाखान्यात दाखल होते, त्यांची दृष्टी काही काळ गेली होती मात्र या विषबाधेतून ते बचावले.

संजयप्रमाणेच ज्ञानेश्वर यांना आधी डोळ्यात जळजळ व्हायला लागली आणि मग त्रास वाढला. कीटकनाशकांमुळे त्यांची प्रतिकार शक्तीच संपली आणि महत्त्वाचे अवयव निकामी झाले. त्यामुळे बाकी संसर्ग वाढले असं दवाखान्यातल्या कागदपपत्रांमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या मृत्यूचं अधिकृत कारण – सेप्टिसिमिया – रक्तात विष भिनणे.

त्यांच्या तिन्ही मुलांचं शिक्षण आता अवघड झालंय. आपले वडील या जगात नाहीत हे स्वीकारणंदेखील त्यांच्यासाठी तितकंच अवघड आहे. कोमल, वय १९ - बारावीत, कैलास, वय १७ - दहावीत आणि सगळ्यात धाकटी शीतल, वय १५ - नववीत आहे, तिघंही अरणीला शिकायला आहेत. ज्ञानेश्वर जे स्वतः करू शकले नाहीत ते त्यांच्या मुलांनी करावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती – शाळेत जावं, शिक्षण घ्यावं आणि मोठं व्हावं.

त्यांच्या विधवा पत्नी अनिता शेतमजुरी करतात. त्यांच्या वयोवृद्ध आईचं, चंद्रकलांचं अख्खं आयुष्य दुसऱ्याच्या रानात राबण्यात गेलंय. “सगळ्या गावानी आम्हाला मदत म्हणून पैसा उभा केला,” अनिता सांगतात. “पण त्यांच्या उपचारासाठी आणि इतर खर्चासाठी जे काही थोडं-थोडकं सोनं माझ्यापाशी होतं ते विकावं लागलं, वर शेजाऱ्यांकडून, नातेवाइकांकडून ६०-६५ हजार रुपये उसने घ्यावे लागले.”

A young boy and two young girls, all sblings, stand in their house
PHOTO • Jaideep Hardikar

आपली मुलं, कोमल, कैलास आणि शीतल शिकून मोठी व्हावीत अशी ज्ञानेश्वर यांची इच्छा होती

“सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ आमच्या गावासाठी फार कठिण काळ होता,” भालेराव म्हणतात. चिखली कान्होबामध्ये त्यांना मोठा मान आहे. “आम्ही चौघांचे प्राण वाचवू शकलो, ज्ञानेश्वरना काही आम्ही परत आणू शकलो नाही.”

खरं तर हाच कठीण काळ म्हणजे कपाशीसाठी चांगलं वर्षं ठरणार असंच सुरुवातीला सगळ्यांना वाटत होतं, पण हाच काळ कर्दनकाळ ठरला. अळ्या आणि किडींचा जबरदस्त हल्ला झाला आणि पिकाचं प्रचंड नुकसान. भालेराव यांच्या रानातदेखील पूर्वी प्रादुर्भाव करणारी कीड – गुलाबी बोंडअळी – अनेक वर्षांनंतर पिकांवर आली. १९८० मध्ये या अळीचा प्रादुर्भाव झाला होता, त्यानंतर नाही. १९९० मध्ये कृत्रिम पायरेथ्रॉइड्सचा वापर आणि २००१ नंतर बीटी कापसाच्या वाणामुळे या अळीला अटकाव करण्यात यश आलं होतं. मात्र आता ती कीटकनाशक आणि बीटी वाण या दोन्हीला जुमानत नाहीये. (पुढच्या लेखात याबाबत अधिक विस्ताराने)

या विषबाधा प्रकाराचा तपास करून अशा स्वरुपाची आपत्ती भविष्यात परत येऊ नये यासाठी उपाययोजना सुचवण्याकरिता महाराष्ट्र शासनाने गठित केलेल्या विशेष तपास पथकाने आपला अहवाल सादर केला आहे. इतर उपायांसोबत यामध्ये मोनोक्रोटोफॉस या लोकप्रिय पण घातक औषधावर बंदी आणावी अशी शिफारस करण्यात आली आहे. (विशेष तपास पथकाच्या अहवालाबाबत पुढच्या लेखात जास्तविस्ताराने)

भालेराव म्हणतात की या संकटाचा या भागाच्या अर्थकारणावर फार खोल परिणाम होणार आहे. या वर्षी त्यांचं कापसाचं उत्पादन निम्म्यावर आलं आहे – एरवी त्यांना एकरी १२-१५ क्विंटल कापूस होतो. आठ एकरच्या त्यांच्या रानाला विहिरीचं पाणी आहे. यंदा, २०१७-१८ मध्ये मात्र ५-६ क्विंटलच्या पुढे उतारा व्हायचा नाही. किडीमुळे कापसाच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. उतारा कमी झाला की स्थानिक अर्थव्यवस्थेतले पैशाचे व्यवहारही कमी होतात. आणि पैसा कमी म्हटल्यावर शेतमजुरांना एक तरी मजुरी कमी मिळते किंवा मजुरीचे दिवस कमी होतात. अशा परिस्थितीत शासनाने मनरेगासारख्या योजनांमधून कामं काढली नाहीत तर मग सगळ्याच गोष्टींवर परिणाम होणार – खरेदी विक्री, लग्नसोहळे, पायाभूत सुविधांवरचा खर्च आणि इतरही अनेक खर्च. अशाने आधीच सुमार असणारी गावाची अर्थव्यवस्था अजूनच खिळखिळी होत जाते.

भरीस भर, हे मृत्यू आणि आजारपणं यामुळे जमीन मालक आणि शेतमजुरांमधले संबंधही ताणले जाणार आहेत, जे लवकर निवळतील असं वाटत नाही. कीटकनाशकांची फवारणी – जी कापूस उत्पादनातली महत्त्वाची प्रक्रिया आहे – मुख्यत्वेकरून शेतमजूरच करतात, जे आता फवारणीला धास्तावले आहेत. यवतमाळमध्ये हे सगळं विषबाधेचं अक्रित घडत होतं तेव्हादेखील मजुरांकडून फवारणी करून घेणं शेतकऱ्यांना अवघड गेलं होतं. फवारणी थांबली, अळीचा प्रादुर्भाव वाढला आणि त्याचा परिणाम उताऱ्यावर झाला.

“आम्हाला पुन्हा एकदा आमच्या सालदारांचा, शेतमजुरांचा विश्वास कमवायला लागणार आहे,” भालेराव सांगतात. “आम्ही पैशाचं नुकसान कसं तरी भरून काढू, पण गेलेला जीव परत येणारे का? चौघांचे प्राण आम्ही वाचवू शकलो हे आमचं नशीबच, पण ज्ञानेश्वर यांना काही मी परत आणू शकलो नाही...”

ज्ञानेश्वर वाचू शकले नाहीत याचं संजय यांनाही दुःख आहे. ते म्हणतात, “या सगळ्यातनं एकच चांगलं झालं, समाज म्हणून आम्ही सारे एक झालो.” त्या कठीण काळात गावातला प्रत्येक जण दुसऱ्याच्या पाठीशी ठाम उभा होता. जमीनमालकांनीही मजुरांच्या कुटुंबियांना पैशाची मदत केली आणि धीर दिला. संजय अजून रानात परतले नाहीयेत आणि भालेरावही त्यांनी लगेच कामाला यावं म्हणून मागे लागलेले नाहीत. पण संजय यांचा सगळा आत्मविश्वासच गेलाय. औषधं फवारणं सोडा ते परत रानात काम करू शकतील का हीच शंका त्यांना सतावतीये. किंवा ते शपथेवर सांगतात की “पुढल्या साली मी सगळी काळजी घेतल्याशिवाय औषधं फवारायला उभा रहायचा नाही.”

अनुवादः मेधा काळे

Jaideep Hardikar

জয়দীপ হার্ডিকার নাগপুর নিবাসী সাংবাদিক এবং লেখক। তিনি পিপলস্‌ আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়ার কোর টিম-এর সদস্য।

Other stories by জয়দীপ হার্ডিকর
Translator : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে