“तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला आपले अधिकार आणि स्वातंत्र्य कशामुळे मिळालं? भारत का संविधान.” असं सांगत रामप्यारीनं आपल्या फिरत्या दुकानातली पुस्तकं चाळणाऱ्या एका गिऱ्हाईकासमोर घटनेचं पुस्तक धरलं. हे त्याच्या दुकानातलं सर्वात जाड आणि जड पुस्तक होतं. छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यामधल्या घोटगाव गावात एक हाट (बाजार)भरला होता. यातच त्याचा पुस्तकांचा फिरता ठेला उभारला होता. जोरादाबारी रयत या त्याच्या खेड्यापासून साधारण तेरा किलोमीटरवर, धमतरच्या नगरी तालुक्यात हा आठवडी बाजार भरतो.
लिहिता-वाचता न येणारा रामप्यारी त्याच्या दुकानातल्या वस्तू बघायला येणाऱ्या प्रत्येकाला राज्यघटनेचं महत्व सांगत होता. त्याची संभाव्य गिऱ्हाईकं त्याच्यासारखीच आदिवासी समाजातली होती; आणि तो पुस्तकविक्रेता त्यांना अगदी उत्साहानं भारताच्या राज्यघटनेची ओळख करून देत होता.
रामप्यारी म्हणाला, “हे असं पवित्र पुस्तक आहे, जे प्रत्येकानं घरात ठेवायला हवं आणि त्यातून आपले हक्क आणि कर्तव्य यांच्याबद्दल शिकायला हवं. तुम्हाला माहित आहे का, भारताच्या घटनेतल्या तरतुदी आणि पाचव्या आणि सहाव्या अनुसूचीमुळे [आदिवासी समुदायांना विशेष संरक्षण] आपल्याला (आदिवासी) आणि दलितांना (उच्च शिक्षण आणि सरकारी नोकरी यांमधे) आरक्षण मिळतं” तो घोटगावच्या हाटसाठी म्हणजेच आठवडी बाजारासाठी आलेल्या लोकांना सांगत होता. हे लोक मुख्यतः वाणसामान, भाजी आणि गरजेच्या इतर वस्तू घेण्यासाठी तिथे आले होते.
रामप्यारीकडे पाहिलं तर तो साधारण पन्नाशीचा असल्यासारखा दिसतो. तो गोंड समाजातला आहे. हा छत्तीसगडमधला सर्वात मोठा आदिवासी गट असून या राज्यातली एक तृतीयांश लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे. तो विकत असलेली बहुतेक पुस्तकं हिंदीत लिहिलेली आहेत - तिसरी आझादी की सिंहगर्जना, बिरसा मुंडा - सचित्र जीवनी, भ्रष्टाचार आणि हिंदू आदिवासी नही है. त्याच्याकडची काही पुस्तकं गोंडी भाषेत लिहिलेली आहेत आणि काही मोजकी इंग्लिशमध्ये.. जेव्हा कोणी एखादं पुस्तक उचलून बघायला लागतं, तेव्हा पुस्तकाचं छोटं परीक्षण सांगावं तसं रामप्यारी त्यात काय आहे हे सांगायला लागतो.
रामप्यारी मला सांगतो, “मी कधीच शाळेत गेलो नाही. मला लिहिता आणि वाचता येत नाही.” गावातला निवृत्त झालेला सरपंच सबसिंग मंडावी त्याला मदत करतो. “हा साठीचा माणूस मला पुस्तकात काय आहे ते सांगतो. मी तेच नंतर गिऱ्हाईकांना समजावतो. मला पुस्तकावर लिहिलेली किंमतही वाचता येत नाही. पण एकदा मला ती कळली की मी मुळीच विसरत नाही.”
साधारण पंधरा वर्षांपूर्वी रामप्यारीनं पुस्तकं विकायला सुरवात केली. त्याआधी तो दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करत असे. नंतर त्यानं हाटमधे बियाणं आणि कीटकनाशकं विकायला सुरवात केली. छत्तीसगडच्या मध्यभागात, जोरादाबारी रयतच्या आसपासच्या १० ते १५ किलोमीटर परिसरातल्या आठवडी बाजारांमधे तो अजूनही बियाणं विकतो. त्याच्या पुस्तकांच्या शेजारीच एका भागात भेंडी, टोमॅटो, काकडी, आणि घेवड्याच्या बिया ठेवलेल्या दिसतात. तिथेच कॅलेंडर आणि घड्याळांसारख्या इतर काही वस्तूही दिसतात.
रामप्यारीकडे तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्हाला तो पुस्तकं आणि बिया विकणारा साधासुधा दुकानदार वाटेल. पण तो तेवढ्यापुरता नाही. - तो म्हणतो की तो कार्यकर्ता आहे. आदिवासी लोकांना त्यांचे प्रश्न आणि हक्क यांबद्दल कळावं म्हणून तो पुस्तकं विकायला लागला. पूर्वी जेव्हा तो कुठल्याही मडई त (सुगीचा सण) किंवा जत्रेत जायचा तेव्हा त्याच्या कानावर आदिवासींच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर चाललेली बातचीत आणि चर्चा पडत असत. त्यामुळे तो त्यांबाबत जास्त विचार करायला लागला. पण त्याला अधिक काहीतरी करायचं होतं.
“मी आदिवासी बांधवांमधे जागृती निर्माण करतो आहे. “ पुस्तकांबरोबर रंजक आणि स्फूर्तिदायक पोस्टर विकणारा रामप्यारी सांगतो. एका पोस्टरवर रावण आहे. आदिवासी याला आपला पूर्वज मानतात. “आमच्या लोकांना (बऱ्याच गोष्टींची) जाणीव नसल्यामुळे ते शिक्षण आणि आपल्या हक्कांपासून वंचित राहिले आहेत. आम्हाला जरी घटनेनं ताकद दिली असली तरी आम्ही आमचे हक्क बजावू शकत नाही. आम्हा लोकांच्या साधेपणामुळे आमचं शोषण होतं.” तो मला समजावून सांगतो. मडईमधल्या त्याच्या ठेल्यावर पोस्टर आणि पुस्तकांखेरीज इतर काही वस्तूही विकायला आहेत - आदिवासींचे महत्वाचे दिवस आणि सण-उत्सव दाखवणारं कॅलेंडर, नेहमीच्या घड्याळाच्या उलट दिशेनं चालणारं आदिवासी घड्याळ, आदिवासींची चिन्ह आणि प्रतिकं असलेले हातातले आणि गळ्यातले दागिने.
छत्तीसगडच्या आदिवासी पट्ट्यात रामप्यारी या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे फिरत असतो. छत्तीसगडच्या अगदी दक्षिणेला असलेल्या बस्तर आणि इतर भागांमधेही तो जातो. ओडिसा, महाराष्ट्र आणि तेलंगण अशा शेजारच्या राज्यांमधेसुद्धा त्यानं काही जत्रा आणि कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. तो दर ठिकाणी साधारण ४०० ते ५०० पुस्तकं आणि इतर वस्तू विकायला घेऊन जातो. गेल्या दहा वर्षांमधे मला छत्तीसगड आणि ओडिशामधे तो अनेक वेळा भेटला आहे.
या पुस्तकविक्रेत्यानं बराच काळ त्याच्या मोटारसायकलवरून पुस्तकांची ने - आण केली. रामप्यारी सांगतो “ पूर्वी मी पुस्तकं विकत आणायचो आणि ती वाटून टाकायचो. मी आतापर्यंत तब्बल दहा ते बारा हजार पुस्तकं लोकांना देऊन टाकली असतील.” महाराष्ट्रातलं नागपूर, मध्यप्रदेशातलं जबलपूर, आणि छत्तीसगडमधलं रायपूर इथून तो पुस्तकं आणायचा. त्याचं उत्पन्न ठराविक असं काही सांगता येणार नाही आणि खरं तर तो त्याची काही नोंदसुद्धा ठेवत नाही.
त्याच्याकडे दहा रुपयांपासून ते तीनशे रुपयांपर्यंतची पुस्तकं आहेत. “ही पुस्तकं आपल्या समाजाबद्दल काही तरी सांगतायत, त्यामुळे त्यांचा लोकांमधे प्रचार होण्याची गरज आहे. लोकांनी ती वाचली पाहिजेत. जेव्हा तुमच्यासारखं कोणी (वार्ताहर) त्यांना प्रश्न विचारतं तेव्हा लोक लाजतात, संकोचतात आणि तुमच्याशी बोलू शकत नाहीत. याचं कारण हेच आहे की आमच्या पूर्वजांना त्यांचं म्हणणं सांगायची किंवा त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी नाकारली गेलीये. मला आता हे कळलं आहे.”
काही वर्षांपूर्वी रामप्यारीनं त्याचा गावोगावचा प्रवास थोडा सोपा व्हावा यासाठी एक सेकंड हॅन्ड मल्टियुटिलिटी गाडी विकत घेतली. त्यानं त्याच्या ओळखीच्या एकाकडून व्याजानं पैसे घेतले. पण मार्च २०२० मधे कोविड -१९ च्या लॉकडाऊनपासून त्याला कर्जाचे हप्ते फेडणं कठीण झालं आहे. तो म्हणतो की परिस्थिती अजूनही कठीणच आहे.
त्याच्याकडची पुस्तकं आणि इतर वस्तू ठेवायसाठी गोदामासारखी काहीच जागा नाही. त्याच्या जोरादाबारी या गावी असलेल्या तीन खोल्यांच्या, कौलारू घरातच तो सगळी पुस्तकं ठेवतो. तो आणि त्याची बायको प्रेमाबाई या दोघांनाही त्यांचं वय किती ते माहित नाही. जेव्हा शक्य असतं तेव्हा प्रेमाबाई नवऱ्याबरोबर विक्रीला मदत करायला जाते. पण तिचं मुख्य काम घर सांभाळणं आणि परसात थोडी फार शेती करणं.
“मला हे काम करण्यातून मोठं समाधान मिळतं, त्यासाठीच मी ते करतो.” रामप्यारी सांगतो. “मडई आणि जत्रांमध्येच आम्ही आदिवासी भेटतो आणि आनंद साजरा करतो. कमाई तर मी कुठेही करू शकतो. पण अशा ठिकाणी मी पैसेही मिळवतो आणि मी ज्यासाठी जगतो आहे ते करण्याचं समाधानही मला मिळतं.”
पूर्वी लोक रामप्यारीला कोचिया (विक्रेता) म्हणून ओळखायचे. “नंतर ते मला शेठ (व्यापारी) म्हणायला लागले,” तो सांगतो, “पण आता ते मला साहित्यकार (साहित्यिक) म्हणतात. मला ते खूपच आवडतं!”
अनुवादः सोनिया वीरकर