संपादकांची टीपः तमिळ नाडूच्या सात पिकांवर आधारित ‘लेट देम ईट राइस (त्यांच्या तोंडी भात पडो)’ या मालिकेतला हा पहिला लेख. पुढील दोन वर्षांमध्ये या मालिकेअंतर्गत पारी २१ बहुमाध्यमी लेख-कहाण्या प्रकाशित करणार आहे. शेतकऱ्यांची आयुष्यं त्यांच्या पिकांच्या परिप्रेक्ष्यातून पाहण्याचा आमचा प्रयत्न असेल. या लेखमालेसाठी अपर्णा कार्तिकेयन यांना अझीम प्रेमजी युनिवर्सिटी, बंगळुरू यांचे अर्थसहाय्य लाभले आहे.
थूथुकुडीमध्ये सूर्य उगवतो तोच मुळी सोनेरी आणि सुंदर. आणि तो वर येण्याआधीच राणी आपल्या कामावर पोचल्यासुद्धा. हातातल्या लाकडी वल्ह्यासारख्या अवजाराने त्या स्वयंपाकातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात सहज आढळणारा पदार्थ गोळा करतायत. अर्थात, मीठ.
आयताकार जमिनीच्या एका खाचरात राणी सध्या काम करतायत. खालचा तळ कधी खरबरीत तर कधी ओलसर मऊ. वल्ह्याने तळ खरवडून त्या पांढऱ्या रंगाचे मिठाचे स्फटिकासारखे खडे एका कोपऱ्यात सारून ठेवतात. दर वेळी कोपऱ्यात मीठाचा ढीग रचणं दमवणारं काम आहे. मीठाचा ढीग उंच होत चाललाय. आणि त्यांचं काम अधिक अवघड. कारण दर वेळी मीठाच्या ढिगात भर घालायची म्हणजे १० किलो मीठ रचायचं. त्यांच्या एकूण वजनाच्या एक चतुर्थांश वजन दर वेळी उचलायचं.
क्षणभरही न थांबता त्या १२० फूट बाय ४० फूट आकाराच्या या खाचरात काम करत राहतात. शेवटी त्या तुकड्यात सकाळच्या धूसर आकाशाचं प्रतिबिंब तेवढं उरतं आणि राणींची स्वतःची हलती सावली. आपल्या आयुष्याची ५२ वर्षं त्यांनी या मिठागरात काम केलंय, त्यांच्या आधी त्यांच्या वडलांनी आणि आता त्यांचा मुलगाही याच ठिकाणी काम करतोय. आणि इथेच एस. राणी मला त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगतात. आणि ती सांगत असताना तमिळ नाडूच्या थूथुकुडी जिल्ह्यातल्या २५,००० एकरावर पसरलेल्या मिठागरांची देखील.
समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या जिल्ह्यात मार्च ते ऑक्टोबरचा मध्य हा काळ मीठ तयार करण्यासाठी सगळ्यात योग्य काळ असतो. कारण हवा उष्ण आणि कोरडी असते. सहा महिने सलग मीठ तयार होतं. तमिळ नाडूमध्ये सर्वात जास्त मीठ याच जिल्ह्यात तयार होतं. आणि भारतामध्ये तयार होणाऱ्या एकूण मिठापैकी ११ टक्के मीठ एकट्या तमिळ नाडूत तयार होतं. मिठाच्या उत्पादनात सगळ्यात मोठा वाटा गुजरातचा आहे. १.६ कोटी टन. देशात दर वर्षी सरासरी २.२ कोटी टन मीठ तयार होतं, त्यापैकी ७६ टक्के वाटा गुजरातचा आहे. १९४७ साली देशात मिठाचं उत्पादन १.९ मिलियन टन इतकं होतं, तिथपासून आज आपण फार मोठी मजल मारली आहे.
२०२१ साली सप्टेंबरच्या मध्यावर थूथुकुडीच्या राजा पांडी नगरजवळच्या मिठागरांवर आम्ही पोचलो. पारीची ही तिथे जाण्याची पहिलीच वेळ होती. राणी आणि त्यांच्या सहकारी संध्याकाळी आमच्याशी गप्पा मारायला गोळा झाल्या. कडुनिंबाच्या झाडाखाली गोलात खुर्च्या मांडून आम्ही सगळे बसलो होतो. आणि तिथे मागेच या सगळ्यांची घरं होती. काही घरं विटांची, सिमेंटचे पत्रे असलेली तर काही नुसत्या गवताने शाकारलेल्या झोपड्या. मिठागरं रस्त्याच्या पलिकडेच. गेल्या अनेक पिढ्यांपासून हे सगळे इथेच काम करतायत. आमचं बोलणं सुरू होतं आणि अंधारून यायला लागतं. आमच्या गप्पा थोड्याच वेळात शिकवणीत रुपांतरित होतात. मीठ म्हणजेच रासायनिक भाषेत सोडियम क्लोराइड (NaCl ) नक्की कसं तयार होतं याचा तासच म्हणा ना.
थूथुकुडीतल्या
या ‘पिकाचं’ उत्पादन मातीच्या खालच्या खाऱ्या पाण्यापासून केलं जातं. समुद्राच्या
पाण्यापेक्षा हे जास्त खारं असतं. बोअरवेलद्वारे हे पाणी वर खेचलं जातं. राणी आणि
त्यांच्या सहकारी ८५ एकरांच्या मिठागरात काम करतात. तिथे सात बोअरवेल जमिनीखालचं
पाणी वर खेचतात आणि अंदाजे चार इंच पाणी मिठाच्या खाचरात भरतात. साधारणपणे एका
एकरात अशी नऊ खाचरं तयार केली जातात आणि या जमिनीत एकू चार लाख लिटर इतकं पाणी
मावू शकतं. १०,००० लिटरच्या ४० टाक्यांमध्ये मावेल, तितकं.
उप्पळम किंवा मिठागराची रचना कशी असते ते बी. अँथनी सामी यांच्याकडूनच जाणून घ्यावं. ५६ वर्षांचे सामी आयुष्यभर मिठागरातच काम करतायत. त्यांचं काम म्हणजे विविध मिठागरात पाण्याची पातळी व्यवस्थित आहे का ते तपासणं. सामी या मिठागरांचं वर्णन 'आन पाती' (नर खाचरं) असं करतात. या आगरांमधून पाण्याचं बाष्पीभवन होतं. ही उथळ खाचरं असतात इथे नैसर्गिकरित्या पाण्याचा अंश निघून जातो. दुसऱ्या प्रकारच्या खाचरांना 'पेण्ण पाती' (मादी खाचरं) म्हणतात. इथे मीठ तयार होतं, म्हणजेच पाण्याचं मिठाच्या स्फटिकांमध्ये रुपांतर होतं.
“खारं पाणी पंपानी वर खेचलं जातं आणि त्यानंतर आधी बाष्पीभवन करणाऱ्या खाचरात भरलं जातं,” ते सांगतात.
त्यानंतर ते एकदम तंत्रज्ञानाच्या जगात शिरतात.
पाण्याची क्षारता बॉम हायड्रोमीटर (Baume Hydrometer) या उपकरणाच्या मदतीने मोजली जाते. पाणी किती जड आहे ते या उपकरणाद्वारे समजतं. शुद्ध पाण्याची ‘बॉम डिग्री’ शून्य असते. समुद्राच्या पाण्याची २ ते ३ अंश तर बोअरच्या पाण्याची बॉम डिग्री ५ ते १० अंश असू शकते. साधारणपणे २४ अंशाला मीठ तयार होतं. “पाण्याचा अंश उडून जातो आणि क्षारता वाढते,” सामी सांगतात. त्यानंतर, “मीठ पाडण्याच्या खाचरात पाणी सोडलं जातं.”
आता पुढचे दोन आठवडे इथे काम करणाऱ्या बाया पंजासारखं एक लोखंडाचं भलं मोठं आणि अवजड खोरं घेऊन दर सकाळी खाचरांमधलं पाणी ढवळून काढतील. एकदा उभ्या दिशेने आणि एकदा आडव्या दिशेने पाणी ढवळलं जातं. असं केल्याने मिठाचे कण तळाशी किंवा वर जमा होत नाहीत. १५ दिवस उलटले की बाया आणि गडी दोघं मिळून वल्ह्यासारखं लाकडाचं एक मोठं अवजार घेऊन तयार मीठ गोळा करतात. त्यानंतर ते खाचरांच्या मधल्या बांधावर – 'वरप्पु'वर मीठ रचून ठेवतात.
आता खरं जड काम सुरू होतं. बाया आणि गडी दोघंही वरप्पुवरून मीठ डोक्यावरून वाहून नेतात आणि उंचावरच्या मोकळ्या जागी त्याचे ढीग लावतात. प्रत्येक कामगाराला वरप्पुचा ठराविक हिस्सा नेमून दिला जातो आणि त्या हिश्शातून हे कामगार दररोज तब्बल ५-७ टन मीठ डोक्यावरून वाहून नेतात. म्हणजे ३५ किलो मिठाच्या दररोज १५० च्या आसपास फेऱ्या. आणि प्रत्येक खेप १५०-१५० फूट अंतराची. त्यांच्या अशा खेपा सुरू झाल्या की लवकरच तयार मीठ ओतण्याच्या जागेवर मिठाचा एक डोंगरच तयार व्हायला लागतो. आणि तळपत्या उन्हामध्ये मिठाचे खडे हिऱ्यांप्रमाणे लकाकू लागतात. आसपासच्या विटकरी, करड्या परिसरात एखादा खजिना असावा तसे.
*****
“प्रियकराशी भांडण जणू मिठाचा खडा. थोडंच ठीक, अतिरेक टाळा”
थिरुक्कुरल (पवित्र ओव्या) मधल्या दोन ओळींचा चेंथिल नाथन यांनी केलेला हा अनुवाद (त्यांच्या स्वतःच्या शब्दांत). थिरुवल्लुवर हे एक संत कवी होते. इसवी सन पूर्व चौथ्या आणि पाचव्या शतकादरम्यान त्यांनी १,३३० ओव्या किंवा दोन ओळींची काव्यं रचली असावीत असं इतिहासकार मानतात.
थोडक्यात काय तर, तमिळ साहित्यामध्ये उपमा किंवा रुपक म्हणून मिठाचा उल्लेख दोन हजार वर्षांपूर्वीपासून झालेला आहे. आणि कदाचित आज तमिळ नाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात मिठाची निर्मिती त्या आधीपासूनच होत असावी.
चेंथिल नाथन यांनी २००० वर्षांपूर्वीच्या संगम काळातील एक कविता अनुवादित केली आहे. त्यामध्ये मिठाच्या देवाणघेवाणीचा उल्लेख सापडतो. आणि यामध्येही मिठाचा उल्लेख प्रेमिकांच्याच संदर्भात येतो.
हिंस्त्र
शार्कमाशांनी हल्ला करून केलेल्या जखमा
आता
कुठे बऱ्या होतायत,
पण,
माझे वडील निळ्याशार दर्यावर परतलेत.
माझी
आई मिठाच्या बदल्यात भात आणण्यासाठी
मिठागरांवर
गेलीये.
लांबचं
अंतर आणि थकवणाऱ्या प्रवासाला नाकं न मुरडणारी
अशी
कुणी मैत्रीण असावी
जी शांतशा,
निवलेल्या समुद्रकिनाऱ्यावर त्या गड्याला जाऊन सांगेल की
मला भेटायचं असेल तर यापरती चांगली घडी मिळणार नाही
बरं.
लोककथा आणि म्हणींमधून मिठाबद्दल बरंच काही जाणून घेता येतं. राणी मला तमिळमधलं एक लोकप्रिय वचन सांगतात, उप्पिल पांडम कुप्पयिले – बिगरमिठाचं खाणं म्हणजे अक्षरशः कचरा. त्यांच्या संपूर्ण समुदायात मिठाला धनाच्या देवतेचं, लक्ष्मीचं स्थान आहे. “कुणी नवीन घरात रहायला जात असेल तर आम्ही आधी नवीन वास्तूत मीठ, हळद आणि पाणी ठेवून येतो. ते शुभ असतं,” राणी सांगतात.
लोकसंस्कृतीत मीठ हे निष्ठेचं प्रतीक मानलं जातं. लेखक ए. सिवसुब्रणियम म्हणतात, पगारासाठी तमिळ शब्द आहे सम्बळम – संबा (म्हणजे भात) आणि उप्पुआळम (मिठागर) या दोन शब्दांचा मिळून हा शब्द तयार झाला आहे. उप्पिटवरई (तमिळ संस्कृती आणि मीठ यावरील प्रबंधिका) मध्ये ते तमिळमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका म्हणीचाही उल्लेख करतात – उप्पिटवरई उळ्ळळवुम नेनई – तुम्ही खाताय त्या मिठाला जागा. म्हणजेच तुमच्या मालकाला, कामावर ठेवणाऱ्याशी निष्ठा ठेवा.
सॉल्टः ए वर्ल्ड हिस्टरी (मिठाचा जागतिक इतिहास) या आपल्या उत्कृष्ट आणि झपाटून टाकणाऱ्या पुस्तकात मार्क कुर्लान्स्की म्हणतो, मीठ “आंतरराष्ट्रीय व्यापार झालेली पहिली वस्तू म्हणजे मीठ. मीठ उत्पादन अगदी सुरुवातीच्या उद्योगांपैकी एक असून त्यामुळे साहजिकच ते राज्याच्या मक्तेदारीत गेलं.”
रोजच्या वापरातल्या याच पदार्थाने भारताच्या इतिहासाला मात्र वेगळंच वळण मिळालं. १९३० च्या मार्च-एप्रिल महिन्यात महात्मा गांधींनी इंग्रजांनी मिठावर लादलेल्या जुलमी कराचा धिक्कार करत गुजरातच्या दांडीमधल्या मिठागरांमधलं मीठ घेण्यासाठी पदयात्रा काढली. त्याच काळात एप्रिल महिन्याच्या शेवटी सी. राजगोपालाचारी यांनी तमिळ नाडूमध्ये तिरुचिरापल्ली ते वेडराण्यम असा मीठ सत्याग्रह सुरू केला होता. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात दांडीचा मिठाचा सत्याग्रह हे फार महत्त्वाचं आणि मोलाचं पान आहे.
*****
“
अतिशय
खडतर
कामासाठी
अगदी
तुटपुंजी
मजुरी”
-
अँथनी
सामी,
मिठागर
कामगार
राणीचा पहिला पगार होता दिवसाला सव्वा रुपये. बावन्न वर्षांपूर्वी, वयाच्या आठव्या वर्षी, परकर नेसून लहागनी राणी मिठागरात काम करायची. अँथनी सामी यांना देखील त्यांचा पहिला पगार लक्षात आहेः पावणे दोन रुपये. काही वर्षांनी त्यात वाढ होऊन मजुरी २१ रुपयांवर गेली. आणि आज, अनेक दशकं कामगारांच्या अथक संघर्षानंतर पुरुषांसाठी ४०५ रुपये तर स्त्रियांसाठी ३९५ रुपये रोजगार मिळू लागला आहे. आणि तरीही, ते म्हणतात, हा रोजगार “अतिशय खडतर कामासाठी अगदी तुटपुंजा” आहे.
“नेरम आयिट्टु,” उशीर होतोय, राणींचा मुलगा कुमार आवाज देतो. दुसऱ्या दिवशीची सकाळ. ६ वाजलेत. खास थूथुकुडीत बोलली जाणारी तमिळ भाषा कानावर पडते. आम्ही मिठागरांवर पोचलोय आणि कामाला उशीर होतोय त्यामुळे तो चिंतित आहे. दुरून पाहिलं तर ही मिठागरं एखाद्या चित्रासारखी दिसतात. आभाळाची लाल, जांभळी आणि सोनेरी छटा, खाचरांमधलं चमचमणारं पाणी, अलवार वाहणारा वारा, दूरचे कारखाने सुद्धा किती निष्पाप दिसतायत. देखणं निसर्गचित्र. पण अर्ध्याच तासात, इथे काम करायला सुरुवात केली की त्यातले निर्मम कष्ट तुमच्या लक्षात येतील.
मिठागरांच्या मध्यावर असलेल्या जुन्या आडोश्यामध्ये बाया आणि गडी गोळा होतात आणि कामाच्या तयारीला लागतात. बाया आपल्या साड्यांवर शर्ट घालतात आणि डोक्यावर कापडाची चुंबळ ठेवतात. त्यानंतर पत्र्याची टोपली, बादल्या आणि पाण्याच्या बाटल्या व जेवणाचे डबे – स्टीलच्या थूक (कडीच्या डब्यात) भाताची कांजी – घेऊन सगळे कामाला सज्ज होतात. “आज आम्ही उत्तरेच्या दिशेने निघालोय,” कुमार सांगतो. तो त्या दिशेने हात दाखवतो आणि सगळ जत्था त्याच्या मागे निघतो. पुढच्या काही तासांत त्यांना इथल्या दोन रांगांमध्ये असलेल्या खाचरांमध्ये काम करायचं आहे.
लागलीच सगळे कामाला लागतात. बाया परकर आणि साड्या तर आणि गडी धोतरं गुडघ्यापर्यंत वर खोचून घेतात. नारळीच्या खोडांच्या साध्या पण कामचलाऊ फळकुटावरून आणि दोन फूट खोल पाणी असलेला एक नाला ओलांडून जायचं आणि त्यानंतर हातातल्या बादल्यांनी पाणी सट्टी म्हणजेच टोपल्यांमध्ये भरायचं. एकदा का टोपलं भरलं की आपल्या सहकाऱ्यांच्या डोईवर लादायचं. आणि त्यानंतर दोरीवर कसरती करणाऱ्यांच्या सफाईने चिंचोळ्या वाटेने ये-जा सुरू होते. दोन्ही बाजूला पाणी, डोक्यावर ३५ किलो मीठ, नारळीच्या फळकुटावरून जपून पावलं टाकत... एक, दोन, तीन, चार...
पूल ओलांडला की अगदी लयीत ते डोक्यावरच्या सट्टीतून जमिनीवर मीठ ओततात, जणू मिठाचा पांढरा पाऊस पडावा. आणि पुन्हा पुन्हा डोक्यावर मीठ घेऊन पुढच्या १५०-२०० खेपा होतात. जवळ जवळ १० फूट उंच आणि १५ फूट रुंद अम्बारम म्हणजेच ढीग लागतो. समुद्राची आणि सूर्याची भेट, राणी आणि तिच्या लोकांनी आपल्याला दिलेली भेटच.
मिठागरांच्या पलिकडच्या बाजूस ५३ वर्षांची झांसी रानी आणि अँथनी सामी कामात गुंतलेले आहेत. खोऱ्याने पाणी ढवळायचं आणि लाकडाच्या वल्ह्याने मीठ गोळा करायचं. पाण्याची हळुवार हालचाल होते, सळ-सळ आवाज होतो आणि मीठ कुस्करलं जातं. दिवस तापत जातो आणि सावल्या गडद होत जातात. तरीही कुणीही थांबत नाही, कुणी पाठ ताणून देत नाही तर क्षणभर श्वास घ्यायचीही कुणाला उसंत नसते. अँथनी यांच्याकडून मी ते वल्हं घेते आणि तयार मीठ बांधावर सारायचा प्रयत्न करते. हे काम बिलकुल साधं सोपं नाही. पाचदा मीठ सारल्यानंतरच माझे खांदे भरून येतात. पाठ दुखायला लागते. आणि घामाने डोळे चुरचुरायला लागतात.
अँथनी परत एकदा वल्हं घेऊन जातात आणि खाचरातलं सगळं मीठ भरून घेतात. मी परत एकदा राणींच्या खाचरात जाते. त्यांचंही काम उरकत आलंय. स्नायू पिळवटले जातायत, ताणले जातायत, खेचले जातायत, पुन्हा पुन्हा. सगळं मीठ राणीसोबत एका बाजूला जातं आणि मिठाचं खाचर ओकंबोकं, तपकिरी दिसायला लागतं. आता नवीन पाणी येण्याची आणि नव्याने मीठ तयार होण्याचीच ते वाट पाहत राहणार.
लाकडाच्या वल्ह्याने मिठाचा ढीग सारखा करत करत राणी मला इकडे येऊन बस म्हणून बोलावतात. आणि मग आम्ही दोघी पांढऱ्या शुभ्र मिठाच्या ढिगाशेजारी खाली टेकतो. दूरवर एक मालगाडी जाताना दिसते.
“कधी काळी या मिठागरांमधून मीठ घेऊन जाण्यासाठी मालगाड्या यायच्या,” राणी सांगतात. आणि कधीकाळीचा तो मार्ग हवेत बोटांनी चितारतात. “काही डबे रुळावरच मागे ठेवून जायचे. नंतर इंजिन यायचं आणि डबे घेऊन जायचं.” बैलगाड्या, घोड्याचे टांगे आणि जुना मिठाचा कारखाना असलेली शेड अशा सगळ्या आठवणी त्यांच्या बोलण्यात येतात. सूर्याची उष्णता, मीठ आणि श्रम, इतकंच. राणी कंबरेला खोचलेला बटवा काढतात. त्यात अमृतांजनच्या पत्र्याच्या डब्यात ठेवलेलं दोन रुपयांचं नाणं आणि एक व्हिक्स इनहेलर असतो. “याच्या [आणि मधुमेहावरच्या औषधांच्या] जोरावर सगळं सुरू आहे.” त्या हसतात.
*****
“एका दिवसाचा पाऊस म्हणजे आठवडाभराचा रोजगार बुडाला.”
-
थूथुकुडीतले मिठागर कामगार
कामाचे तासही काळाप्रमाणे बदलत गेले आहेत. पूर्वी सकाळी ८ ते संध्याकाळी ५, एक तास जेवणाची सुटी अशा वेळा असायच्या. आता काही गट सकाळी मध्यरात्री २ ते सकाळी ८ अशा पाळीत काम करतात. आणि इतर काही जण पहाटे ५ ते सकाळी ११. याच वेळांमध्ये सगळ्यात जास्त काम उरकतं. आणि या वेळांच्या पलिकडे जाऊन इतर कामं असतात. आणि ही कामं करण्यासाठी काही कामगार मागे थांबतात.
“सकाळी १० वाजल्यानंतर ऊन इतकं तापतं की तिथे उभं राहणं अशक्य होतं,” अँथनी सामी सांगतात. तापमान आणि वातावरणातले लहरी बदल त्यांनी स्वतः अनुभवले आहेत. जागतिक तापमानवाढीवर न्यू यॉर्क टाइम्सने तयार केलेल्या संवादी पोर्टलवरची आकडेवारी आणि त्यांना जाणवलेले वातावरणातले बदल एकमेकांशी जुळतात.
१९६५ साली अँथनी यांचा जन्म झाला. तेव्हा थूथुकुडीमध्ये (तेव्हा तुतिकोरीन म्हणून ओळखलं जायचं) वर्षभरात ३२ अंश सेल्सियसहून अधिक तापमान असलेल्या दिवसांची संख्या १३२ होती. आज, याच पोर्टलवरची आकडेवारी सांगते की दर वर्षी अशा दिवसांची संख्या २५८हून अधिक झाली आहे. म्हणजे आपल्या आयुष्यभरात उष्ण दिवसांच्या संख्येमध्ये तब्बल ९० टक्के वाढ.
त्यासोबतच अवकाळी पावसामध्ये देखील वाढ झाली आहे.
“एका दिवसाचा पाऊस म्हणजे आठवडाभराचा रोजगार बुडाला,” सगळे कामगार एका सुरात सांगतात. पाऊस आला की मीठ धुऊन जातं, गाळ वाहून जातो, खाचरं मोडतात आणि परत अनेक दिवस रिकाम्या हाती बसावं लागतं.
लहरी हवामान आणि वातावरणासोबत स्थानिक स्तरावरचे इतरही अनेक घटक भर घालत असतात. पूर्वी थोडी थोडी सावली देणारी झाडंसुद्धा तुटली आहेत आणि आता उरलंय केवळ ओसाड जमीन आणि निळंशार आभाळ. छायाचित्र काढायला अतिशय सुंदर पण कामासाठी तितकंच खडतर. आजकाल तर मिठागरांमध्ये फारच्या सोयी-सुविधा देखील नाहीत. “पूर्वी मालक आमच्यासाठी पिण्याचं पाणी भरून ठेवायचे. आता मात्र आम्हाला घरून पाण्याच्या बाटल्या भरून न्याव्या लागतात,” झांसी सांगतात. आणि संडासचं काय? मी विचारते. बाया उपहासाने हसतात. “मिठागरांच्या मागच्या रानात आम्ही जातो,” त्या सांगतात. कारण जिथे संडास आहेत, तिथे वापरायला पाणीच नाहीये.
बायांना घरी वेगळ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. आणि त्या असतात, मुलांसंबंधी. राणी सांगतात की मुलं लहान होती तेव्हा त्या त्यांना सोबत घेऊन जायच्या आणि शेडमध्ये त्यांच्यासाठी 'थूली' म्हणजेच झोळी बांधून त्यात मुलांना टाकून कामाला जायच्या. “पण आता माझ्या नातवंडांना मात्र घरीच ठेवून जावं लागतं. मिठागरं काही लहान मुलांना नेण्याची जागा नाही असं म्हणतात.” यात काही वावगं नाही, पण याचा अर्थ मुलांना घरी किंवा शेजाऱ्यांकडे सोडून यावं, त्यांना सांभाळायला कुणीच नसावं असा मात्र होत नाही. “मुलांना बालवाडीत सोडता येतं, पण ३ वर्षांची झाल्यावर. आणि तसंही बालवाडी उघडते ९ वाजता. आमच्या कामाच्या वेळांशी त्यांच्या वेळा कधीच जुळत नाहीत.”
*****
“बघ, माझे हात हातात घेऊन बघ, गड्यासारखे वाटतात की नाही?”
- मिठागरातल्या महिला कामगार
या बाया आपल्या शरीराबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटत असतात. या कामात त्यांच्या शरीराची जी काही हानी होते त्याचं मोल करणं अवघड आहे. राणी आपल्या डोळ्यांपासून सुरुवात करतात. चमचमत्या पांढऱ्या रंगाकडे सतत पहावं लागत असल्यामुळे डोळ्याला सतत पाणी येतं, डोळे चुरचुरतात. ऊन जास्त असलं की डोळे मिचकवले जातात. “आम्हाला पूर्वी काळे चष्मे द्यायचे,” त्या सांगतात. “पण आता फक्त थोडेफार पैसे मिळतात.” कामगारांना चष्मा आणि चपलांसाठी वर्षाला ३०० रुपयांच्या आसपास पैसे दिले जातात.
काही बायका काळे मोजे घालतात, त्यांच्या तळाला काळ्या टायरचा तुकडा शिवलेला आहे. पण अख्ख्या मिठागरात एकानेही गॉगल किंवा काळा चष्मा काही घातलेला नाही. “चांगला गॉगल १,००० रुपयांच्या आत काही येत नाही आणि स्वस्तातल्या चष्म्यांचा फायदा तर नाहीच उलट अडचणच होते,” काही कामगार सांगतात. अगदी चाळिशीतच दृष्टी कमजोर होत असल्याचंही ते सांगतात.
राणींसोबत इतरही काही जणी त्यांच्या अडचणी सांगू लागतात. कामातून सुटी नाही, पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नाही, वरती तळपता सूर्य, उन्हाची तलखी आणि खाऱ्या पाण्यामुळे त्वचेला होणारे त्रास अशा अनेक तक्रारी या महिला जोमाने मांडू लागतात. “बघ, माझे हात हातात तर घेऊन बघ, गड्यासारखे वाटतात की नाही?” आणि मग सगळ्या मला त्यांचे तळवे, पावलं आणि बोटं दाखवू लागतात. नखं काळी पडलेली, सुरकुतलेले, रापलेले रांगडे हात. पायही डागाळलेले, कुठे कापलेलं, खरचटलेलं, बऱ्या न होणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या जखमा. दर वेळी खाऱ्या पाण्यात गेलं की सगळ्या जखमा झोंबणारच.
आपल्या अन्नाला चव देणारा हा पदार्थ त्यांचे हातपाय सडवतोय.
आता यादी सुरू होते डोळ्याला न दिसणाऱ्या इजांची. गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया, मुतखडे, हर्निया, इत्यादी. राणींचा मुलगा कुमार २९ वर्षांचा आहे. धिप्पाड आणि दांडगा. पण अवजड माल उचलून त्याला हर्निया झाला. ऑपरेशन झालं, तीन महिने आराम केला. सध्या तो काय करतोय? “मी जड सामान डोक्यावरून वाहून नेतो,” तो सांगतो. त्याच्यासमोर दुसरा पर्याय नाही. तसंही या गावात बाकी कुठे दुसरं काही कामही मिळत नाही.
इथल्या काही तरुणांना कोळंबीच्या किंवा फुलांच्या कारखान्यांमध्ये कामं मिळतात. पण मिठागरातले बहुतेक कामगार तिशीच्या पुढचे आहेत आणि आजवर त्यांनी मिठागरांमध्येच काम केलेलं आहे. कुमारची तक्रार आहे ती पगाराबद्दल. “पॅकर कंत्राटी कामगारासारखे असतात. आम्हाला साधा बोनससुद्धा मिळत नाही. हाताने एक किलो मिठाचे २५ पुडे भरायचे बायांना १.७० रुपये मिळतात. [एका पाकिटामागे ७ पैशाहून कमी]. दुसऱ्या बाईला ते २५ पुडे सीलबंद करण्याचे १.७० रुपये मिळतात. आणि तिसऱ्या कामगाराला, हा शक्यतो पुरुष असतो, २५ पुडे एका पोत्यात भरून ती हाताने शिवून थप्पी लावण्याचे २ रुपये दिले जातात. थप्पी जितकी उंच होत जाईल तितके कष्ट जास्त. पण मजुरी तितकीचः २ रुपये.”
डॉ. अमालोर्पावनादन जोसेफ रक्तवाहिन्यांचे शल्यचिकित्सक आहेत आणि तमिळ नाडू नियोजन आयोगाचे सदस्य. ते म्हणतात, “आरोग्याच्या दृष्टीने विचार करता ते पायामध्ये जे काही चपला-बूट घालतायत त्यातून काहीच पाणी आत शिरणार नाही किंवा विषारी घटकांचा संपर्क येणार नाही असं होणं अवघड आहे. एखाद-दुसरा दिवस अशा परिस्थितीत काम करणं ठीक आहे. पण जर आयुष्यभरासाठी तुम्ही हेच काम करणार असाल तर तुम्हाला शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले बूट घालायला हवेत आणि तेही नियमितपणे बदलायला पाहिजेत. आणि हे होणार नसेल तर तुमच्या पायाचं आरोग्य राखणं कुणाच्याच हातात नाही.”
मिठावरून परावर्तित होणारा, डोळे दीपवून टाकणारा पांढरा शुभ्र उजेड तर आहेच, पण, ते सांगतात “गॉगल न घालता काम केलं तर डोळ्याला त्रासदायक ठरतील असे बरेच घटक इथल्या वातावरणात असतात.” या भागात नियमित आरोग्य शिबिरं आयोजित करायला पाहिजेत आणि सगळ्या कामगारांचा रक्तदाब वारंवार तपासायला हवा अशी त्यांची शिफारस आहे. “एखाद्याचा रक्तदाब १३०/९० असेल तर मी तरी अशा व्यक्तीला मिठागरात काम करू देणार नाही.” अशा परिसरात काम करत असताना आपल्या नकळत मीठ आपल्या शरीरात शिरत असतं. त्यात हे कामगार ज्या प्रकारे डोक्यावरून मीठ वाहून नेतात त्या शारीरिक हालचाली हृदयावर ताण आणणाऱ्या असतात. “या कामासाठी किती ऊर्जा लागते याचा हिशोब केला तर तुम्हाला अचंबा वाटेल.”
हे कामगार गेली चाळीस-पन्नास वर्षं या कामात आहेत. सामाजिक सुरक्षा नाही, पगारी रजा नाही, बालसंगोपन किंवा मातृत्वासाठीच्या लाभदायी योजना नाहीत अशा स्थितीत मिठागर कामगारांच्या मते त्यांची स्थिती ‘कूलीं’पेक्षा (कमी मजुरीवरचे कामगार) फार काही बरी नाही.
*****
“मिठाचे पंधरा हजारांहून जास्त
उपयोग आहेत.”
- एम. कृष्णमूर्ती, जिल्हा
समन्वयक, थूथुकुडी, असंघटित कामगार संघटना
“मिठाच्या उत्पादनात भारत अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे,” कृष्णमूर्ती सांगतात. “मिठाशिवय जगणं अशक्य आहे, आणि तरीही या कामगारांचं आयुष्य मात्र त्यांच्या ‘पिकासारखंच’ आहे, खारं!”
कृष्णमूर्तींच्या अंदाजानुसार थूथुकुडी जिल्ह्यात सुमारे ५०,००० मिठागर कामगार आहेत. जिल्ह्यात एकूण ७.४८ लाख कामगार असून दर पंधरा कामगारांपैकी एक मिठागरात काम करत आहे. पण फेब्रुवारी ते सप्टेंबर या उन्हाळ्याच्या-उकाड्याच्या ६-७ महिन्यांमध्येच त्यांच्याकडे काम असतं. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार मात्र संपूर्ण तमिळ नाडूमध्ये मिळून केवळ २१,५२८ मिठागर कामगार आहेत. कृष्णमूर्तींची असंघटित कामगार संघटना इथे महत्त्वाची भूमिका पार पडते. अधिकृत आकडेवारीतून मोठ्या प्रमाणात वगळल्या गेलेल्या कामगारांची नोंद संघटना ठेवते.
इथे काम करत असलेला प्रत्येक मीठ कामगार – मग तो मीठ तयार करण्याचं काम करत असेल किंवा ते इथून तिथे वाहून नेण्याचं – एका दिवसात तब्बल ५ ते ७ टन मिठाची वाहतूक करत असतो. आणि या मिठाचं मूल्य किती आहे? १६०० रुपये टन या भावाने ८,००० रुपयांहूनही जास्त. पण अवकाळी पावसाची एखादी सरसुद्धा आठ-दहा दिवसांसाठी सगळं काम बंद पाडू शकते.
पण या कामगारांना याहून जास्त फटका कशाचा बसला असेल तर तो १९९१ नंतर देशाने स्वीकारलेल्या आणि आता अधिकच गतिमान झालेल्या उदारीकरणाच्या धोरणांचा. “याच काळात बड्या कंपन्यांना बाजारपेठ खुली करून देण्यात आली होती,” कृष्णमूर्ती सांगतात. “मागच्या किती तरी पिढ्यांपासून या रुक्ष जमिनीतून मीठ काढण्याचं काम दलित आणि स्त्रियाच करत आले आहेत. एकूण कामगारांपैकी किमान ७० ते ८० टक्के वंचित गटांमधले आहेत. मिठागरं त्यांनाच भाड्यावर चालवण्यासाठी का दिली जात नाहीत? खुल्या बाजारपेठांमध्ये सौदे केले जात असतील तर ते धनाढ्य कॉर्पोरेट कंपन्यांशी स्पर्धा तरी कसे करू शकतील?"
जेव्हा मोठ्या कंपन्या यात येतात आणि मिठागरांचं क्षेत्र काही एकर न राहता हजारो एकरापर्यंत वाढायला लागतं तेव्हा इथलं काम यंत्रांनीच होणार याची कृष्णमूर्ती यांना खात्री आहे. “मग या ५०,००० मिठागर कामगारांचं काय होणार?”
तसंही दर वर्षी १५ ऑक्टोबर ते १५ जानेवारी नंतर काम नसतं. ईशान्य मोसमी पाऊस या दरम्यान सुरू होतो. या तीन महिन्यांत घरची परिस्थिती बिकट असते. उसनवारी करून, मनातली स्वप्नं मनातच मिटवून टाकत लोक कसे तरी दिवस काढतात. ५७ वर्षीय एम. वेलुसामी मिठागरांमध्ये काम करतात. ते म्हणतात की मीठ निर्मितीत खूप बदल झाले आहेत. “माझ्या आई-वडलांच्या जमान्यात छोटे मीठ उत्पादक स्वतःच मीठ काढायचे आणि विकायचे.”
धोरणांमध्ये करण्यात आलेल्या दोन बदलांमुळे याला खीळ बसली. २०११ साली केंद्र सरकारने जाहीर केलं की घरगुती खाण्याचं मीठ आयोडिनयुक्त असायला हवं. आणि त्यानंतर काही वर्षांतच मिठागरांच्या भाडेकरारांमध्ये बदल करण्यात आले. असं करण्याचा अधिकार त्यांना होता कारण मीठ हे राज्यघटनेच्या युनियन लिस्ट म्हणजेच संघराज्य-केंद्र सरकारच्या सूचीत समाविष्ट आहे.
२०११ साली भारत सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार “ आयोडिनची प्रक्रिया केल्याशिवाय कुणीही व्यक्ती मानवी सेवनासाठी रोजच्या वापरातलं मीठ आपल्या आवारात विकू शकत नाही, विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकत नाही.” याचा अर्थच असा झाला की रोजच्या वापरातलं मीठ केवळ कारखान्यातच तयार होऊ शकतं. (सैंधव, काळं मीठ आणि हिमालयातील गुलाबी मीठ यातून वगळण्यात आलं). याचा परिणाम असाही झाला की पारंपरिक मीठ उत्पादकांना यामध्ये कुठेच स्थान देण्यात आलं नाही. या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले होते - पण तरीही ही बंदी आजही लागू आहे . खाण्यासाठी वापरण्यात येणारं मीठ आजही आयोजायइझाशेन केल्याशिवाय विकण्यास बंदी आहे.
दुसरा महत्त्वाचा बदल झाला २०१३ साली ऑक्टोबरमध्ये . केंद्राच्या एका अधिसूचनेनुसारः “केंद्र सरकारच्या मालकीच्या जागा निविदा मागवल्याशिवाय मीठ उत्पादनासाठी देण्यात येणार नाहीत.” शिवाय, सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कराराचं नूतनीकरण करण्यात येणार नाही. नव्या निविदा बोलावण्यात येतील. सध्या ज्यांच्यासोबत करार करण्यात आले आहेत त्यांनी “नव्याने निविदा करण्यास हरकत नाही.” हे अर्थातच मोठ्या उत्पादकांच्या पथ्यावर पडणारं होतं, कृष्णमूर्ती सांगतात.
झांसी सांगतात की चाळीस वर्षांपूर्वी त्यांच्या आई-वडलांनी जमिनीचा एक तुकडा दुसऱ्याकडून भाड्याने घेतला होता. साध्या विहिरीतून रहाटाने पाणी शेंदून (आणि झापांची बादली करून) १० छोट्या छोट्या खाचरांमध्ये मीठ काढलं होतं. दररोज त्यांची आई डोक्यावर चाळीस किलो मीठ लादून (तेदेखील झापांच्या टोपल्यात) शहरात ते विकायला जायची. “बर्फाचे कारखाने तिच्याकडचा सगळा माल २५-३० रुपयांना विकत घ्यायचे,” त्या सांगतात. आणि आईला जमणार नसेल तेव्हा छोट्या झांसीला छोटी टोपली घेऊन पाठवलं जायचं. १० पैशाला एक माप मीठ विकल्याचंही त्यांच्या लक्षात आहे. “ज्या जागेत आमची खाचरं होती, तिथे आता मोठमोठ्या इमारती उभ्या आहेत – निवासी संकुलं झालीयेत,” झांसी सांगतात. “आमची जमीन आमच्या हातून कशी काय गेली ते काही मला माहित नाही,” त्या उदासपणे सांगतात. झांसींच्या आवाजात खेद आणि हवेत खारेपणा भरून राहिलाय.
मिठागरांमधले कामगार सांगतात की जिणं तसंही खडतरच होतं. वर्षानुवर्षं उलटली तरी त्यांचं खाणं म्हणजे कप्पा आणि नाचणीसारखी तृणधान्यं, सोबत माशाचं कोळम्बं म्हणजेच कालवण. आणि आता सर्रास मिळणारी इडली तेव्हा वर्षातून एकदा, दिवाळीला बनायची. झांसी सांगतात की दिवाळीच्या आदल्या दिवशी झोपताना सगळे एकदम खुशीत असायचे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सणाला इडली त्यांची वाट पाहत असायची.
दिवाळी आणि पोंगल या दोन सणांच्या दिवशीच नव्या कपड्यांची खरेदी व्हायची. तोपर्यंत जुने, विटलेलेच कपडे घालायला लागायचे. मुलांना तर नक्कीच. त्यांच्या “विजारींना १६ ठिकाणी भोकं पडलेली असायची, आणि टाके घालून काम चालवलं जायचं,” झांसी म्हणतात. बोलता बोलता त्यांची बोटं हवेत फिरत राहतात. पायात झापांचं पायताण असायचं. आई-वडलांनी हाताने तयार केलेल्या या वहाणा तागाच्या धाग्याने बांधलेल्या असायच्या. या वहाणांमुळे पावलाला पुरेसं संरक्षण मिळू शकायचं, कारण मिठागरातलं पाणी देखील आताइतकं खारं नसायचं. आता तर मीठ हे औद्योगिक उत्पादन झालं आहे आणि घरगुती वापराचं प्रमाण अगदी कमी उरलं आहे.
*****
“मला
माझं नाव लिहिता येतं, बसच्या पाट्या वाचता येतात आणि एमजीआरची गाणी गाता येतात”
-
एस.
रानी, मिठागर कामगार आणि नेत्या
संध्याकाळी काम संपल्यावर राणींनी आम्हाला त्यांच्या घरी बोलावलं. एक छानशी खोली, आतमध्ये बसायला सोफा, बाहेर एक सायकल उभी आणि वळणीवर कपडे वाळत घातलेले. गरम चहा घेता घेता त्या आम्हाला त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगतात. रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये त्यांचं लग्न लागलं होतं. त्या २९ वर्षांच्या होत्या. गावाकडे इतक्या उशीरापर्यंत कुणी थांबत नाही. त्यांच्या घरचं अठरा विश्व दारिद्र्य हेच त्यासाठी कारणीभूत असावं. राणींना तीन मुली आणि एक मुलगा आहे – थंगम्मल, संगीता आणि कमला या तिघी आणि कुमार, ज्याच्यासोबत त्या राहतात.
लग्न झालं तेव्हासुद्धा त्यांच्यापाशी “विधी वगैरे सोपस्कारांसाठी फारसा पैसा नव्हताच,” त्या म्हणतात. नंतर त्या आम्हाला त्यांच्याकडचे फोटोंचे अल्बम दाखवतात – त्यांची मुलगी वयात आली तेव्हाचा कार्यक्रम, दुसरीचं लग्न, चांगल्या कपड्यात सजलेले घरचे लोक, मस्त नाचणारा आणि गाणारा कुमार... आणि हे सगळं त्या मीठाच्या जोरावर.
आम्ही हसत खिदळत होतो तेवढ्या वेळात राणींनी हिरव्या वायरची एक टोपली तयार केली. कडा दुमडल्या आणि हात छान ताणून, ओढून घेतले. कुमारने सुरुवात केली होती, यूट्यूबचा एक व्हिडिओ पाहून त्याने गूझबेरीची नक्षी तयार केली होती. कधी कधी हे सगळं करायला त्याच्याकडे बिलकुल वेळ नसतो. थोडे जास्तीचे पैसे मिळावेत म्हणून तो मिठागरात जास्तीची पाळी करतो. पण बायांना घरी दुसरी पाळी करावीच लागते, तो सांगतो, “त्यांना आराम असा मिळतच नाही.”
राणींना तर आराम काय ते माहितच नाहीये, अगदी लहान होत्या तेव्हाही नाही. त्या फक्त तीन वर्षांच्या होत्या तेव्हा आई आणि बहिणीबरोबर त्यांची रवानगी सर्कसवर करण्यात आली होती. “त्या सर्कशीचं नाव होतं, तुतिकोरिन सोलोमन सर्कस आणि माझी आई ‘हाय-व्हील’ म्हणजेच एकचाकी सायकल चालवण्यात पटाईत होती.” राणी बारवरती सफाईने कसरती करायच्या आणि त्यांची बहीण जगलिंग म्हणजेच एका वेळी अनेक वस्तू झेलण्यात पटाईत होत्या. “माझी बहीण दोरीवर चालू शकायची. मी मागे कमान टाकून तोंडाने कप उचलायचे.” त्या सर्कशीबरोबर मदुराई, मनप्पराई, नागरकॉइल आणि पोल्लाचीला जाऊन आल्या होत्या.
राणी आठ वर्षांच्या होत्या तेव्हा सर्कस गावी परतली की त्यांना मिठागरात कामावर धाडलं जायचं. तेव्हापासून ही मिठागरं हीच राणींची दुनिया आहे. तेव्हा त्या शाळेत गेल्या, ते अखेरचं. “मी तिसरीपर्यंत शिकले. मी माझं नाव लिहू शकते, मला बसच्या पाट्या वाचता येतात आणि हो, मला एमजीआरची गाणी गाता येतात ना.” त्याच दिवशी दुपारी रेडिओवर एमजीआर यांचं एक जुनं गाणं लागलं होतं ते त्या गाऊ लागल्या होत्या. भली कामं करा, असं काहीसं गाणं होतं ते.
ती भारी नाच करते, त्यांच्या मैत्रिणी त्यांना चिडवतात. अलिकडेच थूथुकोडीच्या खासदार कन्निमोळी करुणानिधी एका कार्यक्रमाला आलेल्या असताना राणींनी करगट्टम नृत्य सादर केलं होतं ते त्या सांगतात आणि राणी एकदम लाजतात. राणी आजकाल सर्वांसमोर स्टेजवर जाऊन बोलायला शिकतायत. त्यांच्या कुळु म्हणजेच बचत गटाच्या त्या प्रमुख आहेत आणि मिठागर कामगारांच्या सुद्धा. त्या सरकारपुढे आपले प्रश्न मांडण्यासाठी कुठे कुठे प्रवास करून जातात. जेव्हा त्यांच्या मैत्रिणी म्हणतात की “ती मिठागरांची राणी आहे”, तेव्हा मात्र त्या छानसं हसतात.
असंच एकदा, म्हणजे २०१७ साली कृष्णमूर्तींनी आयोजित केलेल्या एका बैठकीसाठी त्या चेन्नईला गेल्या होत्या. “आम्ही इतके सारे लोक तिथे गेलो होतो, फार धमाल आली होती. आम्ही एका हॉटेलात राहिलो, एमजीआर यांच्या समाधीला गेलो, अण्णा समाधीला गेलो. आम्ही नूडल्स खाल्ल्या, चिकन खाल्लं. इडली आणि पोंगलसुद्धा. मरीना बीचला गेलो तोपर्यंत अंधार झाला होता. पण फार मजा आली!”
घरी त्यांचं खाणं तसं साधंच असतं. भात आणि कोळंब (कालवण) – मच्छी, कांदा किंवा कुठल्या तरी शेंगांचं. सोबत करिवाडू (खारवलेलं सुकट) आणि काही तरी भाजी असते, कोबी किंवा बीट. “खिसा रिकामा असला की फक्त कोरी कॉफी.” पण त्या कुरकुर करत नाहीत. ख्रिश्चन असलेल्या राणी चर्चला जातात आणि तिथली देवाची गाणी गातात. त्यांचे पती सेसू एका अपघातात मरण पावले, त्यानंतर, त्या म्हणतात त्यांची मुलं, खास करून त्यांचा मुलगा त्यांच्याशी फार चांगला वागलाय. “ओण्णुम कुरइ सोल्ल मुडियाद,” तक्रारीला जागाच नाही. “देवाने माझ्या पोटी चांगली लेकरं जन्माला घातलीयेत.”
सगळ्याच गरोदरपणात त्यांनी अगदी बाळंतपणाच्या आदल्या दिवसापर्यंत काम केलंय. मिठागरातून थेट हॉस्पिटलमध्ये. गुडघ्याच्या वर मांडीवर थापटत त्या म्हणतात, “माझं पोट हे इथे टेकायचं.” बाळंत झाल्यावर १३ दिवसांत त्या परत कामावर, मिठागरात. आणि बाळ भुकेने रडू नये म्हणून त्या आरारुटची पातळ कांजी करायच्या. दोन चमचे पिठाची पुरचुंडी करायची आणि पाण्यात उकळून ते पाणी ग्राईप वॉटरच्या रबरी बूच असलेल्या बाटलीत भरायचं. बाळाला अंगावर पाजायला त्या परत येईपर्यंत कुणी तरी बाळाला हे पाणी पाजायचं.
पाळीच्या काळात देखील खूप त्रास व्हायचा, अंग घासलं जायचं. आग व्हायची. “संध्याकाळी अंघोळ झाली की मी मांडीला खोबऱ्याचं तेल लावायचे. मग कुठे दुसऱ्या दिवशी कामावर जाऊ शकायचे...”
इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे राणी आता नुसती नजर टाकून आणि हात लावून सांगू शकतात की मीठ चांगल्या दर्जाचं आहे किंवा कसं. चांगल्या खडेमिठाचे दाणे एकसारखे असतात आणि ते हाताला चिकटत नाही. “ते जर 'पिसु-पिसु' (चिकट) असलं तर ते चवीला चांगलं नसतं.” शास्त्रीय पद्धतीने, बॉम हायड्रोमीटर आणि पाण्याचे पाट-कालवे काढून तयार केलेल्या उत्पादनाचा एकच उद्देश असतो - मोठ्या प्रमाणात उत्पादन. तसं होतं देखील, पण अशी रितीने तयार केलेलं मीठ जास्तकरून औद्योगिक वापरासाठीच ठीक असतं.
*****
“मिठागरांकडे
उद्योग म्हणून नाही तर शेती म्हणून पाहिलं पाहिजे”
- थूथुकुडी
लघुस्तरीय मीठ उत्पादक संघटनेचे अध्यक्ष, जी. ग्रहदुराई
तप्त अशा मिठागरांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या थूथुकुडीतल्या न्यू कॉलनी परिसरातल्या आपल्या वातानुकुलित कचेरीत बसलेले जी. ग्रहदुराई मला या जिल्ह्याच्या मीठ उद्योगाचं व्यापक चित्र काय आहे ते समजावून सांगतात. त्यांच्या संघटनेत केवळ १७५ सदस्य आहेत आणि प्रत्येकाकडे १० एकर जमीन आहे. जिल्ह्यामध्ये एकूण २५,००० एकर क्षेत्रामध्ये तब्बल २५ लाख टन मिठाची निर्मिती होते.
सरासरी पाहिलं तर वर्षाला एकरी १०० टन मीठ तयार होतं. एखाद्या वर्षी पाऊस जास्त झाला तर हाच आकडा ६० टनावर येतो. “जमिनीखालचं खारं पाणी तर आहेच, पण त्याशिवाय पाणी उपसण्यासाठी पंपाला वीज लागते, मजुरी असते... तेव्हा कुठे मीठ तयार होतं,” वाढत्या मजुरीविषयी ग्रहदुरई बोलत होते. “वाढतच चाललीयेय. आणि कामाचे तास मात्र कमी. पूर्वी आठ तासाची पाळी होती, आता फक्त चार तास. पहाटे ५ वाजता हे येणार आणि ९ वाजता परत जाणार. मिठागरांचे मालक जरी तिथे गेले ना तरी मजुरांचा पत्ता नसतो.” अर्थात कामाच्या तासांचा कामगारांचा हिशोब मात्र थोडा वेगळा असतो.
मिठागरांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कामाच्या ठिकाणी जास्त सोयी सुविधा हव्यात हे मात्र त्यांना मान्य आहे. “पाणी आणि संडासची सोय करायलाच पाहिजे. पण ते करणं तितकंसं सोपं नाही. कारण मिठागरं १०० किलोमीटरच्या परिसरात पसरलेली आहेत.”
थूथुकुडीच्या मिठाची बाजारपेठ देखील दिवसेंदिवस आकसत चालली आहे, ग्रहदुरई सांगतात. “पूर्वी हे सगळ्यात चांगलं खायचं मीठ म्हणून ओळखलं जायचं. पण आता केवळ दक्षिणेकडच्या चार राज्यात त्याचा खप होतोय. थोडं फार मीठ सिंगापूर आणि मलेशियाला निर्यात होतं. पण बहुतेक मिठाचा वापर उद्योगांमध्येच होतोय. हां, पावसाळ्यानंतर खाचरातून जे जिप्सम सॉल्ट खरवडून काढतात त्यातून थोडी कमाई होते. पण मिठाच्या उत्पादनावर बदलत्या वातावरणाचाही परिणाम व्हायला लागलाय. एप्रिल आणि मेमध्ये पाऊस पडतोय ना.”
गुजरातची कडवी स्पर्धा आहेच. “थूथुकुडीपेक्षा तिथली हवा जास्त उष्ण आणि कोरडी आहे. पश्चिमेकडच्या या राज्यात देशभरातल्या उत्पादनाच्या ७६ टक्के मीठ तयार होतं. त्यांच्याकडे प्रचंड मोठी मिठागरं आहेत. उत्पादन थोडं यंत्रांद्वारे आणि थोडं [तुटपुंज्या मजुरीवर काम करणाऱ्या] बिहारच्या स्थलांतरित कामगारांकडून केलं जातं. खाचरांमध्ये भरतीचं पाणी भरून घेतात. त्यामुळे पाणी उपसण्यासाठी लागणारी वीज देखील वाचते.”
थूथुकुडीमध्ये एक टन मिठाचं उत्पादन करण्याचा खर्च ६०० ते ७०० रुपये इतका येतो, “तर गुजरातमध्ये हाच खर्च ३०० रुपये इतका आहे,” ते म्हणतात. “मग आम्ही त्यांच्याशी स्पर्धा तरी कशी करायची? २०१९ मध्ये तर मिठाचा भाव टनाला ६०० रुपये इतका घसरला होता. आता बोला.” या सगळ्या बाबी विचारात घेता ग्रहदुराई आणि इतरांचीही अशी मागणी आहे की मीठ उत्पादनाकडे उद्योग म्हणून नाही, तर शेती म्हणून पाहिलं जावं. [म्हणूनच मिठाचा विचार ‘पीक’ म्हणून केलाय.] लघुस्तरीय मीठ उत्पादकांना कमी व्याजावर कर्ज, माफक दरात वीज हवीये. तसंच फॅक्टरी आणि कामगार कायद्यातून सूट.
“या वर्षी गुजरातहून जहाजानी मीठ आलं आणि थूथुकुडीत विक्रीसुद्धा झाली.”
*****
“काही तरी विपरित झाल्यावरच ते आमच्याबद्दल लिहितात.”
- मिठागरातल्या महिला कामगार
मिठागर कामगारांच्या उपजीविकांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी असंघटित कामगार संघटनेचे कृष्णमूर्ती अनेक मागण्या मांडतात. पाणी, सांडपाण्याची व्यवस्थी आणि आराम करायला जागा यासारख्या अगदी गरजेच्या मागण्यांसोबतच प्रलंबित मुद्दे मार्गी लावण्यासाठी कामगार प्रतिनिधी, मालक आणि शासनाची एक समिती स्थापन करण्याची मागणीही ती उचलून धरतात.
“आम्हाला लहान मुलांची काळजी घेणारी पाळणाघरं तातडीने हवीयेत. सध्या तरी अंगणवाड्या फक्त ऑफिसच्या वेळात (९ ते ५) सुरू असतात. मिठागरातले कामगार सकाळी ५ वाजता घर सोडतात आणि काही ठिकाणी तर त्याही आधी. मग काय, घरातलं थोरलं मूल, आणि खास करून मुलगी आपल्या आईच्या बदल्यात तीच मुलांना सांभाळते. तिच्या शिक्षणाचा पुरता बट्ट्याबोळ होतो. या मुलांची काळजी घेण्यासाठी अंगणवाड्या पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत चालायला हव्यात की नको?”
कृष्णमूर्ती सांगतात की त्यांना जे काही छोटं-मोठं यश मिळालंय, मग मजुरीतली वाढ असो किंवा बोनस, ते केवळ कामगारांच्या एकजुटीमुळे आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याच्या त्यांच्या जिद्दीमुळे शक्य झालं आहे. २०२१ साली तमिळ नाडूच्या द्रमुक सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात पावसाळ्याच्या काळात ५,००० रुपयांची मदत देण्याची त्यांची बराच काळ प्रलंबित असणारी मागणी मंजूर करण्यात आली आहे. कृष्णमूर्ती आणि सामाजिक कार्यकर्त्या उमा माहेश्वरी यांना माहित आहे की असंघटित कामगार इतक्या सहज संघटित होऊ शकत नाहीत. त्यांच्या आरोग्याच्या समस्या त्यांच्या व्यवसायामुळे निर्माण झालेल्या आहेत. “सामाजिक सुरक्षेचे काही साधे उपाय तरी कामगारांना मिळू शकतात की नाही?” त्यांचा सवाल रास्त आहे.
महिला कामगार एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधून घेतात. ती म्हणजे मालकांचा नेहमीच फायदा होत असतो. झांसी मिठागरांची तुलना माडाशी करतात – चिवट, तळपत्या उन्हातही टिकून राहणारी आणि कायम उपयोगी. ‘धुद्दू’ त्या म्हणतात. पैसा या अर्थाने वापरला जाणारा हा शब्द वारंवार त्यांच्या बोलण्यात येतो. मिठागरं मालकांना पैसा मिळवून देतातच.
“आम्हाला नाही बरं. आमची आयुष्यं कशी आहेत हे कोणालाही माहित नाही,” काम संपल्यावर कागदी कपांमध्ये चहा पिता पिता या महिला कामगार सांगतात. “सगळीकडे शेतकऱ्यांबद्दल लिहून येतंय. माध्यमं आमच्याबद्दल कधी लिहिणार? जेव्हा आम्ही काही निदर्शनं करू, तेव्हा.” आणि करवादलेल्या, त्रस्त आवाजात त्या म्हणतात, “काही तरी विपरित घडलं तरच आमच्याबद्दल लिहून येणार. पण मला सांग, सगळे जण मीठ खातात का नाही?”
या संशोधन प्रकल्पास अझीम प्रेमजी युनिवर्सिटी, बंगळुरूकडून संशोधन सहाय्य कार्यक्रम २०२० अंतर्गत अर्थसहाय्य मिळाले आहे.