भाटवडगावच्या शिवाराशेजारनं कच्च्या सडकेनं चालत आम्ही एका छोट्याशा घरी येऊन पोचलो. सपाट सीमेंटचं छत आणि भिंतींना गुलाबीसर रंग. घराचं नाव काहीसं न्यारं – ठिणगी. गडद जांभळ्या रंगात भिंतीवर रंगवलेलं, सहसा घरांना न दिलं गेलेलं नाव. त्याच नावाचा ८-१० कवनांचा संग्रहदेखील आहे. “इतरही गीतं आहेत,” प्रदीप साळवे आम्हाला सांगत होते. “माझ्या वडलांची गीतं लिहिलेली नाहीत, पण माझ्या स्मृतीत जतन केली आहेत.”
प्रदीप आमच्याशी त्यांचे वडील, शाहीर आत्माराम साळवेंच्या थोर वारशाबद्दल बोलत होते. शाहीर साळव्यांनी ३०० कविता रचल्या आहेत. “हुंडा बंदी, दारू आणि तिच्या घातक परिणामांबद्दल आहेत ही गीतं,” त्यांनी सागितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलित, स्त्रिया, शेती, शिक्षण आणि सामाजिक क्रांतीबद्दलही त्यांनी कवनं रचली आहेत. शाहिरांच्या ठिणगी या घराशेजारी (जिथे आता त्यांचा दुसरा मुलगा दीपक राहतो) असलेल्या राजरत्न या आपल्या घरी त्यांनी शाहिरांच्या हुंडाविरोधी कवितेतील एक ओळ उद्धृत केलीः
“हुंड्याची पद्धत सोडा, समतेशी नाते जोडा”
आम्ही बीडच्या माजलगावमध्ये होतो. जात्यावरच्या ओव्या या प्रकल्पाअंतर्गत २१ वर्षांपूर्वी इथे ज्या स्त्रियांच्या ओव्या ध्वनीमुद्रित केल्या होत्या त्यांना भेटायला आम्ही आलो होतो. या ओव्या आता पारीवर क्रमाने प्रसिद्ध होत आहेत.
प्रदीप साळवे (उजवीकडे), त्यांची पत्नी ज्योती आणि मुलगा राजरत्न. मागे ललिताबाई खळगे, प्रदीप यांच्या मावशी . डावीकडे त्यांची वहिनी आशा आणि त्यांचा मुलगा अमितोदन
आम्हाला ओव्या गाणाऱ्या स्त्रियांपैकी कमल साळवे, प्रदीप यांची आई, यांना भेटायचं होतं. त्या पाव्हण्याकडे दुसऱ्या गावी गेल्या होत्या. त्यांची नाही तरी त्यांच्या कुटंबाची आमची गाठ पडली. शाहीर आत्माराम म्हणजे कमलताईंचे पती.
आत्माराम साळव्यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९५६ चा. त्यांनी औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून शिक्षण घेतलं होतं. वडलांची २५ एकर शेती, दोन विहिरी, पण आत्माराम यांचं मन शेतीत नव्हतं. त्यांना कवितेचं वेड होतं. “ते शीघ्रकवी होते. क्षणात कविता रचत आणि गात. त्यांची अनेक कवनं शोषणाविरुद्ध सामाजिक बंडाबाबत आहेत.”
ते हयात असेपर्यंत जरी त्यांच्या कामाची आवश्यक दखल घेतली गेली नसली तरी त्यांची गाणी विरन गेली नाहीत. महाराष्ट्राच्या गावागावांमधून, शहरांमधून त्यांच्या कविता आणि गाणी सादर होत राहिली. राजकीय आंदोलनांमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि राजकीय उपहास असणारी गाणी गायल्याबद्दल त्यांच्यावर शंभराहून जास्त खटले दाखल करण्यात आले होते.
“त्यांना अटक झाली की दर बारीला माझे आजोबा जमिनीचा एखादा तुकडा विकायचे आणि खटल्याचा खर्च भागवायचे,” प्रदीप सांगत होते. पोलिसांनी त्यांना माजलगाव तालुक्यातून चारदा आणि बीड जिल्ह्यातून दोनदा हद्दपार केलं होतं. या सगळ्यात हळू हळू कुटुंबाच्या हातनं मालकीची जमीन जायला लागली.
शाहिरांचे मित्र, माजलगावचे पांडुरंग जाधव, राज्य शासनाच्या सिंचन विभागात कारकून होते. साळवेंनी तरुणपणी जे अनेक मोर्चे काढले त्यात बऱ्याचदा जाधव त्यांच्या सोबत असत. “जिथं कुठं दलितावर अत्याचाराची घटना व्हायची, मग ती मराठवाड्यात कुठेही असो, कुठल्याही गावात असो, आत्माराम त्याच्या निषेधात मोर्चा काढायचा. निषेध करणारी गीतं गायचा. तो खरंच लोक शाहीर होता,” जाधव सांगतात.
साळवे दलित पँथरचे सदस्य होते. १९७२ च्या सुमारास नामदेव ढसाळ, ज. वि. पवार हे विद्रोही कवी आणि इतर कार्यकर्त्यांनी दलित पँथर ही एक जहाल राकीय संघटना स्थापन केली. या संघटनेचे सुरुवातीचे सदस्य आणि आता रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाचे सदस्य असणारे सत्तरीतले लेखक-कवी राजा ढाले आत्माराम साळवेंना ओळखत असत. मुंबईत वास्तव्याला असणारे ढाले सांगतात, “तो फार चांगला कवी होता. अनेक वर्षं तो पँथरसबत होता. तो मराठवाड्यात आमच्या बैठकींना येत असे आणि आमच्या कार्यक्रमांमध्ये त्याची गीत सादर करत असे.”
१९ जानेवारी १९९१ रोजी वयाच्या ३५व्या वर्षी शाहीर आत्माराम साळवे यांना मरण आलं. प्रदीप तेव्हा १२ वर्षांचे होते. जवळ जवळ दोन दशकं साळवेंचे कुटुंबीय १९ जानेवारीला त्यांचा स्मृतीदिन साजरा करत असत, एकत्र येऊन त्यांची गीतं, कवनं गात असत.
भाटवडगावमध्ये प्रदीप यांच्या घरी शाहीर आत्माराम साळवेंचा पुष्पहार घातलेला फोटो
२०१४ च्या जानेवारीत माजलगाव तालुक्यात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेल्यांच्या कुटुंबांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या समारंभामध्ये शाहिरांच्या कुटुंबियांनी त्यांच्या कविता गायल्या. माजलगावच्या नागरिकांनी शाहिरांच्या स्मृती सन्मानार्थ त्यांच्या पत्नी कमलताईंचा सत्कार केला. तेव्हापासून या भूमीपुत्राची थोरवी गाण्यासाठी दर वर्षी ते एक कार्यक्रम आयोजित करतात.
अजूनही, सरकारने मात्र शाहीर आत्माराम साळवेंची दखल घेतलेली नाही ना त्यांना सन्मान दिला आहे.
भूमीपुत्र शाहीर आत्माराम साळवेंच्या स्मृतीत कमलताईंना सन्मानार्थ देण्यात आलेल्या स्मृतीचिन्हाशेजारी कुटुंबियांचे फोटो
प्रदीप, शाहिरांचा मुलगा, वय ३८, आठवीपर्यंत शाळेत गेले. धाकट्या भावंडांना शिक्षण घेता यावं आणि कुटुंबाला हातभार लावावा यासाठी त्यांनी शाळा सोडली. शेतात मजुरी आणि माजलगावच्या मोंढ्यात (बाजारात) हमालीचं काम त्यांनी केलं. पाच वर्षांमागे त्यांनी भाटवडगावमध्ये तीन एकर जमीन घेतली आहे. घरच्यापुरती ज्वारी आणि बाजरी त्यात होते. कापूस आणि सोयाबीन बाजारात विकता येतो. प्रदीप यांच्या दोघी मुली दहावी शिकल्या आहेत तर मुलं, एक आठवीत आणि एक सातवीत आहे. ज्योती साळवे, त्यांची पत्नी स्वैपाकाची काम करते आणि बीड जिल्ह्यात अंगणवाडी कार्यकर्ती आहे.
प्रदीप आम्हाला सांगत होते की त्यांनी आता वडलांच्या आठवतात त्या कविता लिहून काढायला सुरुवात केली आहे. नंतर ठिणगी संग्रहातलं एक कवन त्यांनी आमच्यासाठी गायलं.
व्हिडिओ पहा – प्रदीप साळवे त्यांच्या वडलांच्या क्रांतीकारी गाण्यांपैकी एक सादर करताना – अन्यायाच्या काळजाला ही बसू द्या डागणी...
ठिणगी
क्रांतीच्या ठिणग्या झडूद्या, तोफ डागा रे रणी
आग बदल्याची भडकूद्या, चीड येऊ द्या मनी
बाळ हा गर्भातला, काळ पुढचा पाहुनी
गाडण्या अवलाद मनुची चालला रे धाऊनी .... तो धाऊनी
अन्यायाच्या काळजाला ही बसुद्या डागणी ..... ही डागणी
क्रांतीच्या ठिणग्या ....
आग बदल्याची.....
वाघिणीचे दूध तुम्ही, पिऊन असे का थंड रे
घोट नरडीचा तुम्ही घ्या उठा पुकारून बंड रे .... हे बंड रे
मर्द असताना तुम्ही का, थंङ बसता या क्षणी.... तुम्ही या क्षणी
आग बदल्याची.....
आज सारे एक मुखाने, क्रांतीचा गरजू गजर
साळवे त्या दुबळ्यांचा शत्रूवर ठेवीन नजर
का भीता तुम्ही तो असता, पाठीशी तुमच्या भीमधनी*.... तो भीमधनी
आग बदल्याची.....
क्रांतीच्या ठिणग्या झडू द्या, तोफ डागा रे रणी
आग बदल्याची भडकू द्या, चीड येऊ द्या मनी
*भीमधनी – भीमराव आंबेडकरांची शिकवण हेच धन मानणारा
फोटो – नमिता वाईकर व संयुक्ता शास्त्री
अनुवाद: मेधा काळे