अख्खा वर्ग शांत बसलाय. जीवशास्त्राच्या पुस्तकातला मानवामध्ये लिंग निर्धारित करणाऱ्या गुणसूत्रांचा विषय सुरू आहे. “मादीमध्ये दोन x गुणसूत्रं असतात. नरामध्ये एक x आणि एक y गुणसूत्र असतं. जर xx आणि एक y असा संयोग झाला तर जन्माला येणारं बाळ तिथे बसलेल्या विद्यार्थ्यासारखं होणार,” एका विद्यार्थ्याकडे निर्देश करत शिक्षक म्हणतात. अख्खा वर्ग खिदळायला लागतो. उभ्या राहिलेल्या विद्यार्थ्याला पुरतं कानकोंडं होतं.
ट्रान्स किंवा पारलिंगी व्यक्तींनी सादर केलेल्या संदकारंग (लढ्यासाठी सज्ज) या नाटकातला हा अगदी पहिला प्रसंग. वर्गामध्ये किंवा एरवी देखील मान्य लैंगिक साच्यांमध्ये न बसल्यामुळे एखाद्या मुलाला किंवा मुलीला किती अवमान, खिल्ली, चेष्टा सहन करावी लागते हे नाटकाच्या पहिल्या अंकात दाखवण्यात आलं आहे. दुसऱ्या अंकामध्ये हिंसेचा सामना करणाऱ्या ट्रान्स स्त्रिया आणि पुरुषांच्या कहाण्या आपल्याला पहायला मिळतात.
ट्रान्स राइट्स नाऊ कलेक्टिव्ह (टीआरएनसी) भारतभरातल्या दलित, बहुजन आणि आदिवासी ट्रान्स व्यक्तींचं म्हणणं मुखर करण्यावर भर देतं. त्यांनी संदकारंगचा पहिला प्रयोग २३ नोव्हेंबर २०२२ रोजी चेन्नईमध्ये केला. एक तासाच्या प्रयोगाचं दिग्दर्शन, निर्मिती नऊ ट्रान्स साथींनी केली असून. तेच त्यात अभिनयही करतात.
“२० नोव्हेंबर हा दिवस ज्या ट्रान्स व्यक्ती मरण पावल्या आहेत त्यांच्या स्मृतीत इंटरनॅशनल ट्रान्स डे ऑफ रिमेंमबरन्स – आंतरराष्ट्रीय ट्रान्स व्यक्ती स्मृती दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यांचं जगणं सोपं नसतं. अनेकदा घरच्यांकडून त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं, समाज त्यांना वाळीत टाकतो. अनेकांचा खून पडलाय आणि कित्येकांनी आत्महत्या केली आहे, टीआरएनसीच्या संस्थापक ग्रेस बानू सांगतात.
“घटना वाढतच चालल्या आहेत. ट्रान्स समुदायावर हिंसा होते तेव्हा कुणीच त्याविरोधात आवाज उठवत नाही. आपल्या समाजात या विषयी पूर्ण चुप्पी असल्याचं आपल्याला दिसतं,” कलाकार आणि कार्यकर्त्या बानू आपल्याला सांगतात. “आम्हाला कुठे तरी संवाद सुरू करायलाच लागणार होता. आणि म्हणूनच आम्ही या प्रयोगाचं नाव संदकारंग ठेवलं आहे.”
२०१७ साली, हा प्रयोग संदकारई या नावाने सादर करण्यात आला होता. पण त्याचं नाव बदलून ते संदकारंग करण्यात आलं. “आम्हाला सगळ्या ट्रान्स व्यक्तींना समाविष्ट करून घ्यायचं होतं,” ग्रेस बानू सांगतात. या प्रयोगात काम करणारे नऊ जण जगण्यातल्या वेदना आणि यातनांविषयी बोलतात. ट्रान्स समुदायावर होणाऱ्या शारीरिक आणि शाब्दिक हिंसेविषयी आजूबाजूचा समाज कसा काय गप्प राहू शकतो हा प्रश्नही ते विचारतात. “ट्रान्स पुरुष आणि ट्रान्स स्त्रिया पहिल्यांदाच या प्रयोगाच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत,” संदकारंगच्या लेखक आणि दिग्दर्शक नेघा म्हणतात.
“आमचा सगळा संघर्ष केवळ जगण्यासाठी असतो. महिन्याची बिलं कशी भरायची, घरचा किराणा कसा भरायचा याची भ्रांत असते. या प्रयोगाच्या पटकथेचं काम सुरू होतं तेव्हा खूप मजा येत होती पण ट्रान्स स्त्रिया आणि पुरुषांना नाटक किंवा सिनेमामध्ये काम करण्याची संधी का मिळत नाही हा विचार करून रागही येतो. मग मी विचार केला आपण फक्त जिवंत राहण्यासाठी एवढा धोका पत्करतो, मग एक नाटक उभं करण्यासाठी जोखीम घ्यायला काय हरकत आहे?” नेघा सांगतात.
ट्रान्स समुदायाचा इतिहास पुसून टाकला गेला ते क्षण, जगण्याचा त्यांचा अधिकार, शरीराविषयी आवश्यक तो आदर आणि सन्मान अशा सगळ्याचा वेध घेणाऱ्या या प्रयोगाची काही क्षणचित्रं टिपण्याचा हा प्रयत्न.