"एरवी मी माझ्या सायकलवर ४०-५० किमी चालत प्लास्टिकच्या बादल्या आणि भांडी विकत असतो," ए. शिवकुमार सांगतो. नागपट्टिणम जिल्ह्यातील आरासुर या आदिवासी पाड्यात राहणाऱ्याया ३३ वर्षीय शिवकुमारचा रोजचा दिवस पहाटे ५:०० ला सुरु होत असे. एका विशेष सायकलवर स्वार होऊन, सायकलवर रंगीबेरंगी प्लास्टिकच्या वस्तू टांगून ते निघतात. त्यांचा उदरनिर्वाह यांच्या विक्रीतून होतो. एरवी ३००-४०० रुपयांचा नफा होत असल्याचं तो सांगतो – जेमतेम आपल्या घरातल्या सहा सदस्यांचं पोट भरण्यापुरता.
पण हे काही एरवीचे दिवस नाहीत.
टाळेबंदीमुळे मात्र त्याचं हे काम थांबलंय – आणि सोबतच, त्याच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत. पण शिवकुमार यांना कोविड-१९ च्या काळ्या ढगांमध्ये आशेचा एक किरण सापडला. "वनविल नसतं ना," ते म्हणतात, "तर आम्ही उपाशीच राहिलो असतो."
वनविल म्हणजे तमिळ भाषेत इंद्रधनुष्य. जिल्ह्यातल्या नागपट्टिणम तालुक्याच्या सिक्कल गावातल्या प्राथमिक शाळेचं नाव आहे वनविल. २१ एप्रिलपर्यंत ४४ लोक कोरोनाबाधित झाल्याने नागपट्टिणम तमिळनाडूतील कोविड-१९ हॉटस्पॉट पैकी एक आहे.
ही शाळा प्रामुख्याने भटक्या जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी काम करते आणि सध्या – वर्ग बंद असले तरी - आरासुर आणि आसपासच्या गावातील कुटुंबांसाठी किराण्याची व्यवस्था करत आहे. लॉकडाऊनचा प्रभाव वाढायला लागला आणि शाळेने मदत पुरवलेल्या कुटुंबांची संख्या १,२२८ वर पोहोचली – यातली जवळपास १,००० कुटुंबं अत्यंत मागासलेल्या गटातून आहेत. येथील हजारो गरिबांसाठी ही शाळाच त्यांच्या अन्नसुरक्षेचा आधार आहे.
वानविलने ती ज्यांच्यासाठी कार्यरत आहे अशा भटक्या समूहांना मदत करायला सुरुवात केली. पण, इतरही लोक अडचणीत सापडले होते, ४३ वर्षीय प्रेमा रेवती सांगतात. त्या शाळेच्या संचालिका आणि वानविलच्या व्यवस्थापक विश्वस्त आहेत. "आणि त्रिची [तिरुचिरापल्ली] सारख्या दूरच्या जिल्ह्यातील गावांमधूनही मदतीची मागणी येऊ लागली." शाळेचे शैक्षणिक उपक्रम नागपट्टिणम आणि थिरुवरुर जिल्ह्यांत चालतात.
२४
मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा झाल्यावर शाळेने बहुतांश मुलांना आपल्या घरी राहून बरं
वाटेल असा विचार करून घरी पाठवून दिलं. २० मुलांचा मात्र अपवाद होता, त्यांच्यासाठी वानविल हेच
घर आहे. शाळेच्या आवारात पाच कर्मचारी राहतायत. लॉकडाऊनचा काळ जाता जाईना, तेंव्हा शाळेच्या
पदाधिकाऱ्यांना जाणवलं की घरी गेलेली मुलांची तब्येत काही चांगली राहणार नाही, शिवाय हे दिव्य संपल्यावर
ती शाळेतही परतणार नाहीत. त्यामुळे, आता त्यांचं लक्ष केवळ विद्यार्थी आणि त्यांच्या
कुटुंबांपुरतं मर्यादित नसून एका मोठ्या, अतिवंचित समूहावर आहे.
शैक्षणिक कामासाठी वानविलने कायमच दोन अनुसूचित जमातींवर लक्ष केंद्रित केलं आहे: आदियन आणि नरिकुरवर. आदियन लोक सहसा बूम बूम माट्टुक्कारर (बी.बी.एम.; 'बूमबूम' हा वाक्प्रचार माट्टुक्कारर म्हणजेच गुराख्यांनी आपल्या उरूमी अर्थात डमरूवर केलेल्या नादातून रूढ झालाय) म्हणून ओळखले जातात. हे लोक पूर्वी साज चढवलेला नंदी सोबत नेऊन भविष्य सांगत असत, त्यातून हे नाव आलंय. हल्ली त्यांच्यापैकी फारच थोडे लोक हे काम करतात.
खरं तर २०११ च्या जनगणनेत नमूद केलेल्या ९५० कुटुंबांपेक्षा जास्त लोक तामिळनाडूत राहत असल्याचं आढळून येतं. सामाजिक संस्थांच्या अनुमानानुसार राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मिळून अंदाजे १०,००० लोक वास्तव्य करतात. त्यांपैकी बहुतांश लोक स्वतःची ओळख आदियन म्हणून सांगत असले, तरी पुष्कळ जणांकडे आदिवासी असल्याचे दाखला नाही. आरासुरमध्ये शिवकुमारला धरून किमान १०० बी.बी.एम. कुटुंबं राहतात – आणि हा समूह आज केवळ वानविलच्या मदतीनेच तगून आहे.
परंपरेने शिकार आणि वनसंपत्ती गोळा करणाऱ्या नरिकुरवर यांची बराच काळ सर्वात मागास समुदाय म्हणून नोंद होती आणि त्यांना अगदी अलीकडे, म्हणजे २०१६ मध्ये अनुसूचित जमातीचा दर्जा मिळालाय. वानविलचे विद्यार्थी मात्र बहुतांशी बूमबूम माट्टुक्कारर आहेत.
वानविल ट्रस्ट बी.बी.एम. समाजाच्या मुलांसाठी शाळेच्या आवारातच एक बालकेंद्र चालवते जेणेकरून या मुलांवर भीक मागायची पाळी येणार नाही. "इतर भटक्या जमातींप्रमाणे ही मुलं गंभीर कुपोषणाला बळी पडण्याची बरीच कारणं आहेत – भीषण दारिद्र्य, कमी वयात लग्न, बरीच बाळंतपणं, आहाराच्या सवयी. म्हणून आम्ही त्यांच्या तब्येतीकडेही लक्ष देतो."
इयत्ता ११वीत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या एम. आरतीसाठी वानविल वसतिगृह हेच तिचं घर आहे. "आणखी दुसरे शब्दच नाहीत," ती म्हणते. पण इयत्ता ११वीत शिकणारी विद्यार्थिनी प्राथमिक शाळेत काय करतेय? वानविलमध्ये इयत्ता ५वी पर्यंतचं शिक्षण – पर्यायी शिक्षणविचारातून – मिळत असलं तरी ती एक निवासी शाळा म्हणूनही कार्यरत आहे. आणि सरकारी उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या भटक्या समुदायांच्या विद्यार्थ्यांना सामावून घेते. आरती इयत्ता ५वी पर्यंत वानविलमध्ये शिकली. ती आता एका सरकारी शाळेत जाते – पण रोज सायंकाळी आपल्या 'घरी' परत येते.
शाळा स्थापन होऊन फार तर १५ वर्षं झाली असतील, तरी एव्हाना आरतीच्या समुदायामध्ये तिचे चांगले परिणाम दिसून यायला लागलेत. पूर्वी इयत्ता ५वी नंतर बहुतेक मुलांचं शिक्षण संपुष्टात यायचं, पण इथल्या चार विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण करून, पुढील शिक्षण घेतलं, पदवीधर झाले आणि आता ते नोकरी करतायत. आणखी तिघे चेन्नईच्या विविध महाविद्यालयात शिकतायत.
"माझी गत माझ्या समुदायातल्या इतर महिलांप्रमाणेच झाली असती," पी. सुधा सांगते. "पण, वानविलने माझं आयुष्य बदलून टाकलं." ती अभियांत्रिकी पदवीधर असून चेन्नई स्थित एका आय.टी. कंपनीत काम करते. सुधा तिच्या समुदायातील पदवी घेणाऱ्या वानविलच्या पहिल्या चार विद्यार्थिनींपैकी एक आहे. "इथे वैयक्तिक लक्ष मिळाल्याने मला अशक्यही प्राप्त करण्यास मदत मिळाली."
लॉकडाऊनपूर्वी ८१ मुलं इथे शिकत होती – ज्यातली ४५ निवासी होती. आणि सरकारी शाळांमध्ये शिकणारी १०२ मुलं या आवारात राहत होती. संस्थेने गावांमध्ये इतर ५०० मुलांना रोज संध्याकाळी पोषक खाऊ मिळावा म्हणून 'आफ्टर-स्कूल सेंटर' (शाळेनंतरचं केंद्र) सुरु केले होतं. मात्र, आता या केंद्रांमध्ये हॅन्ड सॅनिटायझरच्या बाटल्याच ठेवण्यात येतात - कारण किराणामाल अधिकाधिक पीडित कुटुंबांना थेट पुरवण्यात येतोय.
"बऱ्याच गावांमध्ये लोकांना एका वेळेचंच जेवण मिळतंय," रेवती म्हणतात. "सर्वांत मोठा फटका मुलांना बसलाय कारण त्यांना पोषण आहार मिळणं बंद झालंय. त्यांना इथे वानविलमध्ये जेवण पुरवणं शक्य नव्हतं कारण – बहुतेक मुलं घरी गेलीयेत." आणि म्हणून त्यांनी एक आपत्कालीन मोहीम सुरु केली, कदाचित एका शाळेला हाताळण्यास फारच अवघड. ती जोमाने वाढत गेली आणिल आता बऱ्याच गरजूंना किराणा मिळू लागलाय.
तयारी म्हणून वानविलने नागपट्टिणम आणि तिरुवरुरमधील नऊ गावं आणि तंजावर जिल्ह्यातील एका गावातील प्रामुख्याने भटक्या जमातीच्या १,२८८ कुटुंबांच्या गरजा भागवण्यासाठी निधी गोळा करायला सुरुवात केली आहे. आता ते त्रिची जिल्ह्यातील काही कुटुंबांना देखील मदत करणार आहेत. नागपट्टिणम मधील २० किन्नर आणि नगरपालिकेच्या २३१ सफाई कर्मचाऱ्यांना देखील संस्था अन्न पुरवण्याचा प्रयत्न करत आहे.
नंदी बैलांना सोबत घेऊन भविष्य सांगणाऱ्या बूमबूम माट्टुक्कारर जमातीचा उगम कसा झाला त्याबद्दल एक दंतकथा आहे. के. राजू, तामिळनाडू आदियन आदिवासी कल्याण संस्थेचे सरचिटणीस म्हणतात: "असं म्हणतात आमचे पूर्वज शेकडो वर्षांपूर्वी सरंजामी जमीनदारांकडे वेठबिगारी करीत. एकदा दुष्काळ पडला असता जमीनदारांनी आपल्या आश्रितांना हाकलून लावलं, त्यांना घालवण्यासाठी गुरंढोरं दिलीत." इतर लोक मात्र सांगतात की बी.बी.एम. समुदायाचे लोक कधीच शेतीशी निगडित नव्हते.
"आम्ही बहुतेक करून प्लास्टिकच्या वस्तू, किंवा दुष्टांना दूर ठेवणाऱ्या बाहुल्या विकणं, नाही तर अशीच हलकी कामं करू लागलो, पण हल्ली शिक्षणावर लक्ष देत आहोत," राजू म्हणतात. त्यांना वानविलने या क्षेत्रात त्यांच्या समुदायासाठी केलेल्या कामाचं कौतुक वाटतं.
"साधं जमात प्रमाणपत्र मिळवणं देखील आमच्या लोकांसाठी मोठ्या संघर्षाचं काम आहे," राजू म्हणतात. "काही गावांमध्ये त्यांना कुठलं प्रमाणपत्र मिळेल हे तेथील महसूल विभागीय अधिकाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून असतं."
२००४ च्या त्सुनामीनंतर बचावकार्यात भटक्या जमातींविरुद्ध होणारा उघड भेदभाव पाहता एका वर्षात वानविल स्थापन करण्यात आली होती. सुरुवातच अशी झाल्यामुळे आपत्ती काळात मदतकार्यांमध्ये त्यांचा सहभाग चालू राहिला, जसं की २०१५ मधील चेन्नई महापूर आणि २०१८ मधील गजा वादळ.
के. अँटनी, २५, हा नागपट्टिणम् मधील अप्पर कुडी पाडातील एकमेव शिकलेला, अभियांत्रिकी पदविका घेतलेला माणूस असून तो टेलिकॉम क्षेत्रात कामाला आहे. त्याच्या मते, वानविल नसती तर अवघ्या पाडावर उपासमारीची वेळ आली असती. "आमच्या येथे काही नादस्वरम आणि तविळ वाजवणारे लोक आहेत. पण, तेही रोजीवर जगायचे. त्यामुळे, अशा काळात दिवस काढणं आम्हाला फारच कठीण जातंय." तो म्हणतो, शाळेमुळे त्याचा आत्मविश्वास दुणावतो.
तसंच लहानशा आरतीला देखील वाटतं. ती म्हणते: "मी इयत्ता ११वीची परीक्षा दिलीये आणि मला खात्री आहे की मी पास होणार. शाळा शिकून मला शिक्षक प्रशिक्षण घ्यायचंय." बहुतेक वानविलच्या शिक्षकवर्गात आणखी एकीची भर पडणार आहे.
शीर्षक छायाचित्र: एम. पलानीकुमार
अनुवाद: कौशल काळू