“लोक घासाघीस करतात ना तेव्हा मला मजा वाटते,” कुप्पा पप्पला राव म्हणतात. आंध्र प्रदेशातल्या विशाखापटणम जिल्ह्यात ते थाटी मुंजालु म्हणजेच ताजे ताडगोळे विकतात. “अनेक जण मोठ्या गाड्यांमधनं येतात, तोंडावर छानसा मास्क असतो, आणि तेच मला ५० रुपयांवरून ताडगोळ्यांची किंमत ३०-४० वर आणायला सांगतात,” हसत हसत ते सांगतात.
त्या वाचवलेल्या २० रुपयांचं हे लोक काय करत असतील असा प्रश्न पाप्पला रावांना पडतोच. “त्यांना बहुधा हे लक्षातच येत नाही की त्यांच्यापेक्षा मला या पैशाची किती जास्त गरज आहे ते. एरवी तेवढ्या पैशात घरी जायचं बसचं तिकिट घेऊ शकतो मी.”
तोंडाला खाकी रंगाचं ‘संरक्षक’ कापड बांधलेले ४८ वर्षांचे पाप्पला राव इतर अनेक ताडगोळा विक्रेत्यांप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग १६ वर, विशाखापटणम शहरातल्या इंदिरा गांधी झूऑलॉजिकल पार्कजवळ ताडगोळे विकत होते. गेली २१ एप्रिल आणि मे हे दोन महिने ते ताडगोळे विकायचं काम करतायत. “गेल्या वर्षी आम्ही दिवसाला ७००-८०० रुपये कमावलेत – ताडगोळे कधीच आम्हाला निराश करणार नाहीत,” ते म्हणतात.
यंदा मात्र ताडगोळे विक्रेत्यांना चांगलाच फटका बसला कारण हे मोलाचे दोन महिने कोविड-१९ च्या टाळेबंदीमुळे त्यांच्या हातून गेले. मेच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना त्यांचा धंदा सुरू करता आला. “आम्हाला फळंही विकता आली नाहीत आणि कुठे कामालाही जाता आलं नाही,” पाप्पला रावांच्या पत्नी, ३७ वर्षांच्या कुप्पा रमा सांगतात. त्या एका ग्राहकाला डझनभर ताडगोळे बांधून देतायत. रमा आणि पाप्पला विशाखापटणम जिल्ह्यातल्या आनंदपुरम मंडलातल्या त्यांच्या गावाहून एकत्र २० किलोमीटर प्रवास करून इथे येतात.
“यंदा विक्री फार काही बरी झाली नाहीये. आम्ही दिवसाला कसेबसे ३०-३५ डझन ताडगोळे विकू शकतोय,” रमा सांगतात. “दिवस अखेर, खायचा, प्रवासाचा खर्च वगळता आमच्या हातात २०० ते ३०० रुपये येतात,” पाप्पला राव सांगतात. गेल्या वर्षी दिवसात ४६ डझन फळं विकल्याचं त्यांना लक्षात आहे. या वर्षी ते आणि रमा फक्त १२ दिवस, १६ जूनपर्य़ंत ताडगोळे विकू शकले. हंगाम संपत आला तसं जून महिन्यात दिवसाला फक्त २० डझनापर्यंत धंदा उतरला.
एप्रिल आणि मे महिन्यात ताडाच्या झाडांवर (Borassus flabellifer) ताडगोळ्यांचे घडच्या घड लागतात. त्यांच्या गोड रसापासून ताडी बनते, त्यासाठी ते सर्वात प्रसिद्ध. पाप्पला रावांसारखे ताडी गोळा करणारे, ही उंच झाडं – ६५ फूट किंवा त्याहूनही उंच – चढतात आणि ताडरस गोळा करतात तसंच हंगामात ताडगोळे उतरवतात.
ताडगोळा आणि नारळात बरंच साधर्म्य आहे. ताडाच्या झाडावर याचे घड लागतात. जरा चपट्या पण गोलसर, हिरव्या-काळ्या सालीच्या आत पारदर्शी आणि जेलीसारखी फळं असतात आणि त्यात पाणी. ताडगोळे शरीरासाठी थंड असतात. त्यामुळे उन्हाळ्यात या फळांना खूप जास्त – ताडीपेक्षाही जास्त – मागणी असते.
ताडगोळ्यांच्या हंगामात पाप्पला राव दिवसातून दोनदा फळं काढण्यासाठी किमान चार झाडं चढतात. “वेळखाऊ काम आहे हे,” ते सांगतात. “आम्ही पहाटे ३ वाजताच ताडगोळे लागलेली झाडं शोधायला निघतो.”
लवकर निघाल्यामुळे ते आणि रमा विशाखापटणला सकाळी ९ वाजता पोचू शकतात. “जास्त फळ असलं तर आम्ही रिक्षा करतो [टाळेबंदी शिथिल केल्यावर त्या सुरू झाल्या]. सध्या आनंदपुरम ते विशाखापटणम यायला-जायला मिळून आम्ही ६०० रुपये देतोय. नाही तर आम्ही बसने प्रवास करतो,” ते सांगतात. गेल्या वर्षी रिक्षाचं भाडं कमी होतं, ४००-५०० रुपये, ते सांगतात. आनंदपुरमहून इथे शहरात यायला फारशा बसेस नाहीत. आणि टाळेबंदीच्या काळात तर अजिबातच नव्हत्या.
“३-४ दिवसात फळ उतरायला लागतं,” रमा सांगतात. “मग कामही नाही आणि पैसाही नाही.” या वर्षी त्यांचा पुतण्या गोरलु गणेश याने त्यांना फळविक्रीत मदत केली. त्यांना मूलबाळ नाही.
दर वर्षी जानेवारी ते मार्च, पाप्पला राव ताडाच्या झाडावरून ताडीही गोळा करतात. ते आणि रमा विशाखापटणम शहराजवळच्या कोम्मडा जंक्शनजवळ छोटा ग्लास १० रुपये आणि मोठा ग्लास २० रुपयाला विकतात. कधी कधी फक्त ३-४ ग्लास विकले जातात तर कधी कधी ते दिवसाला ७०-१०० रुपयांची कमाई करतात. दर महिन्यात ताडी विकून त्यांची १००० रुपयांची कमाई होते. जुलै-डिसेंबर या काळात ते शहरात बांधकामांवर रोजंदारीने काम करतात.
विशाखापटणमचा वाहता राष्ट्रीय महामार्ग पाप्पला आणि रमासाठी ताडगोळे विकण्यासाठी एकदम मोक्याचा ठरतो. ते ५-६ तास इथे थांबतात आणि दुपारी ३ वाजेपर्यंत घरी पोचतात.
पाप्पला राव आणि रमा बसलेत तिथे जवळच एन. अप्पाराव, गुंथला राजू आणि गन्नेमल्ला सुरप्पाडू बसलेत, जणू काही शारीरिक अंतराचा नियम पाळतायत. सगळे जण रिक्षातून ताडगोळे घेऊन आलेत आणि आता प्रत्येक जण ताडगोळे सोलतोय. वाहनांची वर्दळ आहे, काही जण थांबतात.
प्रत्येक फळविक्रेता रिक्षातून आणलेली ताडाची फळं सोलून त्यातून ताडगोळे काढतोय. वाहनांची वर्दळ आहे, काही जण थांबतायत
“आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून तीन वर्षांपूर्वी ही घेतली,” पाच-आसनी रिक्षाकडे बोट दाखवत सुरप्पाडू सांगतात. “यात ताडफळं आणणं सोपं जातं.” २९ मे उजाडला तरी ताडगोळे विक्री सुरू करून दोनच दिवस झाले होते. “आम्ही कमाई समान वाटून घेतो. काल सगळ्यांना ३०० रुपये मिळाले,” अप्पाराव सांगतात.
अप्पाराव, राजू आणि सुरप्पाडू आनंदपुरममध्ये एकाच वसाहतीत राहतात. बँकेचं कर्ज काढून त्यांनी रिक्षा विकत घेतली. “खरं तर आमचा हप्ता [७५०० रुपये] चुकत नाही, पण गेले तीन महिने आम्ही हप्ता भरू शकलो नाही आहोत,” सुरप्पाडू सांगतात. “बँकेतून सारखे फोन येतायत, एका महिन्याचा हप्ता तरी भरा असं म्हणतायत. आम्ही कमावणार कुठून हेच त्यांना बहुतेक समजत नाहीये.”
जेव्हा ताडगोळ्यांची विक्री नसते तेव्हा ते रिक्षा चालवतात आणि मिळणारं भाडं तिघांमध्ये समान वाटून घेतात – टाळेबंदीच्या आधी त्यांना महिन्याला प्रत्येकी ५,००० ते ७,००० रुपये मिळायचे, तेही कर्जाचा आपापला हिस्सा वगळून.
“मागच्या वर्षी आम्ही रिक्षातूनच शहराच्या वेगवेगळ्या भागात ताडगोळे विकले. तशी आमची भरपूर कमाई झाली,” अप्पाराव सांगतात. “यंदा मात्र काही फारसं बरं चालू नाहीये. पण आम्ही यातून मार्ग काढू अशी आशा आहे, हे काही आमचं शेवटचं वर्ष नसेल बहुतेक.”
इतक्या साऱ्या अडचणी असल्या तरीही गेली १५ वर्षं ताडगोळ्यांचा व्यवसाय करणारे सुरप्पाडू जमेल तेव्हापर्यंत ताडगोळे विकणार आहेत. “मला ताडगोळा कोरून काढायला फार आवडतं. एक प्रकारची शांती मिळते,” जमिनीवर बसून एक ताडफळ फोडत ते म्हणतात. “मला विचाराल तर ती एक कला आहे, नुसतं काम नाही.”
महामार्गापासून सात किलोमीटरवर, एमव्हीपी कॉलनीमध्ये, २३ वर्षांचा गंदेबुला ईश्वर राव त्याचा भाऊ, आर. गौतमबरोबर २९ मे रोजी ताडफळं भरलेली रिक्षा घेऊन चालला होता. ईश्वर आनंदपुरम मंडलातल्या कोलावनिपालेम गावचा रहिवासी आहे. तो ३० किलोमीटर प्रवास करून ताडगोळे विकायला जातो आणि या वर्षी इतर विक्रेत्यांप्रमाणे त्यानेही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात केली.
ईश्वर गेली १० वर्षं, अगदी १३ वर्षांचा असल्यापासून ताडी गोळा करायचं काम करतोय. “गेल्या साली एप्रिल महिन्यात ताडी गोळा करण्यासाठी मी झाडावर चढलो होतो तेव्हा कोंडाचिलुवा म्हणजे अजगराने माझ्यावर हल्ला केला. मी पडलो आणि पोटाला चांगला मार लागला,” तो सांगतो. त्याच्या आतड्याला इजा झाली आणि शस्त्रक्रिया करावी लागली. एक लाख रुपये खर्च आला.
“त्यानंतर मी कधी ताडाच्या झाडावर चढलो नाही, मी इतर मजुरीची कामं केली,” ईश्वर सांगतो. विशाखापटणमच्या रुषीकोंडा भागातल्या भीमुनीपटणम मंडलातल्या बांधकामांवरचा राडारोडा आणि वाढलेला झाडोरा साफ करायचं काम करायचा.
“सुरुवातीला मला भीती वाटत होती, पण मला माझ्या कुटुंबाला मदत करायची होती,” तो सांगतो. तो दिवसातून तीन वेळा सहा-सात झाडं चढतो-उतरतो. त्याचे वडील, ५३ वर्षीय गंदेबुला रमणा, ३-४ झाडं चढतात. ईश्वरचा भाऊ बांधकामावर काम करतो, त्याच्या घरी, आई आहे ती गृहिणी आहे आणि धाकटी बहीण.
या वर्षी जानेवारी महिन्यात, ऑटोरिक्षा घेण्यासाठी ईश्वरच्या नावावर बँकेतून कर्ज मिळालं. (साडेतीन वर्षांसाठी) महिना ६,५०० रुपयांचा हप्ता ठरला. “मी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रिक्षा चालवून ३०००-४००० रुपयांची कमाई केली. मार्चमध्ये तोच आकडा १,५०० वर आला होता. आणि आता तर असं वाटतंय की मला परत ताडी गोळा करायचं आणि मजुरीचं काम करावं लागणार,” ईश्वर सांगतो. एप्रिल महिन्यापासून तो हप्ता भरू शकला नाहीये.
कोविड-१९ ची साथ फार पसरली नव्हती तोपर्यंत ईश्वरच्या कुटुंबाची महिन्याची एकूण कमाई ७,००० ते ९,००० इतकी होती. “तेवढ्यातच भागवायचा आमचा आटापिटा असतो,” तो म्हणतो. आणि गरज पडलीच तर ते नातेवाइकांकडून पैसे उसने घेतात. त्यांनी मार्च महिन्यात त्याच्या काकांकडून १०,००० रुपये कर्जाने घेतलेत.
१८ जूनपर्यंत १५-१६ दिवस ईश्वरने ताडगोळे विकले. “मला तर वाटत होतं की हे वर्ष चांगलं जाईल. माझ्या बहिणीचं नाव परत शाळेत घालायचं होतं,” तो म्हणतो. २०१९ साली घरच्या आर्थिक अडचणींमुळे त्याच्या बहिणीला २५ वर्षांच्या गंदेबुला सुप्रजाला शाळा सोडावी लागली होती.
२९ मे रोजी या हंगामातली त्याची सर्वात जास्त कमाई झाली, ६०० रुपये. “पण, तुम्हाला एक सांगू, त्यातली शंभराची एक नोट फाटलेली होती,” हळू आवाजात तो सांगतो. “ती नसती तर, खरंच.”
अनुवादः मेधा काळे