“तसंही आमची कामं कमीच झाली होती,” जगमोहन सांगतात. गेल्या वर्षी राज्य शासनाने लाकूड आणि भुश्शावर चालणाऱ्या भट्ट्या बंद करण्याचे आदेश काढले त्या संदर्भात दिल्लीच्या पश्चिमेला असलेल्या उत्तम नगर वसाहतीत कुंभारकाम करणारे जगमोहन सांगतात. “त्यामुळे काही जण कमी प्रमाणावर वस्तू बनवतायत, काही फक्त माल विकतायत आणि इतरांनी हे कामच सोडलंय. आणि आता ही महामारी आणि टाळेबंदी आमचा जो खरा विक्रीचा काळ असतो तेव्हाच आमच्या मुळावर आलीये [मार्च ते जुलै].”
जगमोहन (वरील शीर्षक छायाचित्रात, ते आडनाव लावत नाहीत) ४८ वर्षांचे आहेत आणि गेल्या ३० वर्षांपासून कुंभार काम करतायत. “एक चांगली गोष्ट होती ती म्हणजे, या वर्षी माठांना चांगली मागणी होती. कारण लोक फ्रीजमधलं पाणी प्यायला घाबरत होते [कोविडसंबंधी भीतीमुळे]. पण टाळेबंदीच्या काळात आमच्याकडची माती संपली, पुरेसा माल आणता आला नाही.” एक कुंभार घरच्यांच्या मदतीने २-३ दिवसांत मिळून साधारणपणे १५०-२०० माठ बनवतो.
या वस्तीत सगळ्या गल्ल्यांमध्ये मातीचे
ढीग लागलेले दिसतात – आणि काम जोरात सुरू असतं तेव्हा तर कुंभाराची चाकांचे आणि
घरांमधून आकार देण्यासाठी माठांना थापटण्याचे. घराच्या अंगणांमध्ये, छोट्या
कारखान्यांमध्ये हजारो माठ, पणत्या, मूर्ती आणि इतरही अनेक वस्तू सुकायला
ठेवलेल्या असतात. सुकल्यावर त्यांना गेरुचा हात मारला जातो. त्यानंतर आव्यात मडकी
वगैरे भाजली जातात. इथल्या घरांच्या गच्चीवर या भट्ट्या बांधल्या आहेत. बाहेरच्या
बाजूला किती तरी गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत. इथूनच गिऱ्हाईक आणि विक्रेते माल
विकत घेतात.
प्रजापती कॉलनी किंवा कुम्हार गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वस्तीत ४००-५०० कुटुंबं राहत असावीत, या वस्तीचे प्रधान, हरकिशन प्रजापती सांगतात. “उत्तर प्रदेश आणि बिहारचे अनेक कुंभार आणि त्यांचे मदतनीस कामच नाही त्यामुळे गावी परतले आहेत,” ६३ वर्षीय प्रजापती सांगतात. १९९० साली राष्ट्रीय पुरस्कार आणि २०१२ साली शिल्प गुरू पुरस्काराचे मानकरी आहेत.
“गणेश चतुर्थीचे दिवस आहेत, आता दिवाळीची तयारी सुरू होते, सगळे कसे गडबडीत असायचे,” ते सांगतात. “या वर्षी बाजारपेठेची कुणाला काही अंदाजच लावता येत नाहीये. लोक आपला माल खरेदी करणार का याचीच शंका आहे. त्यामुळे [मूर्ती आणि इतर वस्तू बनवण्यासाठी] कोणी जास्त पैसा गुंतवण्याची जोखीम पत्करत नाहीये. कुंभारांचं काम सुरू आहे, पण त्यांच्या मनात कसलीच आशा राहिली नाहीये...”
प्रजापतींच्या पत्नी रामरती, वय ५८ आणि मुलगी रेखा, वय २८ पणत्या बनवतयात, “पण,” ते सांगतात “त्यात काही मजाच राहिली नाहीये.” उत्तम नगरमधल्या कुंभारांच्या घरच्या स्त्रिया शक्यतो माती मळतात, चिकणमाती बनवतात, साच्यामधून मूर्ती आणि पणत्या-दिवे तयार करतात आणि घड्यांचं रंगकाम आणि कोरीव काम करतात.
“टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात [मार्च-एप्रिल] कामच नव्हतं कारण आम्हाला मातीच मिळाली नव्हती. आम्ही जे काही पैसे मागे टाकले होते त्याच्यावर कसं तरी भागवलं,” ४४ वर्षांच्या शीला देवी सांगतात. त्यांचं काम म्हणजे कच्ची माती कुटून त्याची बारीक पूड करायची, ती चाळायची आणि मळून मळून त्याची चिकणमाती बनवायची – आणि सगळं हाताने करायचं बरं.
एरवी त्यांच्या कुटुंबाची कमाई महिन्याला १०,००० ते २०,००० इतकी असते, त्या सांगतात. मात्र एप्रिल ते जून या काळात हाच आकडा ३,००० ते ४,००० इतका खाली घसरला. त्यानंतर आता टाळेबंदी शिथिल व्हायला लागल्यानंतर, हळू हळू त्यांच्या वाड्यात येऊन विक्रेते त्यांच्याकडचा माल खरेदी करू लागले आहेत.
टाळेबंदीच्या परिणामांमुळे जी चिंता शीला देवींना वाटतीये तीच या वाड्यात सगळीकडे कानावर पडतीये – आणि ती इतकी जास्त आहे की तिच्या आवाजात कुंभाराच्या चाकाची घरघरही विरून जावी. “गणेश चतुर्थी २२ ऑगस्टला आहे,” २९ वर्षांचा नरेंद्र प्रजापती म्हणतो. “पण या विषाणूने आमच्या कामाला जबर फटका बसलाय. बघा, दर वर्षी जर आम्ही गणपतीच्या १०० मूर्ती विकत असू तर यंदा तो आकडा फक्त ३० इतका आहे. त्यात टाळेबंदीच्या काळात जळण [लाकूड आणि भुस्सा] महागलंय – पूर्वी एक गाडी [ट्रॅक्टरच्या आकाराची] ६,००० ला मिळायची आता तेवढ्यासाठी ९,००० द्यावे लागतात.” (उत्तम नगरमध्ये मडकी आणि इतर वस्तूंसाठी माती हरयाणाच्या झज्जर जिल्ह्यातून येते.)
“एकीकडे सरकार स्थानिक व्यवसायांच्या विकासाची भाषा करतं आणि दुसरीकडे आम्हाला आमच्या भट्ट्या बंद करायला लावतं. आता भट्टी नसेल तर आम्ही आमचं काम तरी कसं होईल?” नरेंद्र विचारतो. “आमचा धंदा बंद करणं आणि आमची कमाई थांबवणं हा उपाय आहे का?” परंपरागत मातीचा आवा – सध्या हा वादात आहे – तयार करायला २०,००० ते २५,००० रुपये खर्च येतो. आणि त्याला पर्यायी असणारी गॅसवर चालणारी भट्टी उभी करायला एक लाखापर्यंत खर्च येतो. प्रजापती कॉलनीतल्या अनेकांना ही रक्कम परवडणारी नाहीये.
२०१९ साली एप्रिलमध्ये आलेल्या राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाविरोधात याचिका करण्यासाठी वकील करायचा ठरवला असता प्रत्येकी २५० रुपये वर्गणी काढायचं त्यांनी ठरवलं मात्र, “त्यांना तेवढीसुद्धा वर्गणी देणं परवडत नाहीये,” हरकिशन प्रजापती सांगतात. या आदेशात दिल्ली प्रदूषण नियामक मंडळाला लाकडावर चालणाऱ्या भट्ट्यांबाबत सत्यस्थिती काय आहे याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं होतं. त्याच्या आधारावर मंडळाने जुलै २०१९ मध्ये या सगळ्या भट्ट्या मोडण्याचे आदेश काढले. त्याविरोधात कुंभारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ही सगळी अनिश्चितता टाळेबंदीच्या काळात आणखी गहिरी झाली – उत्तम नगरमध्ये जी परिस्थिती आहे तेच चित्र देशभरातल्या कुंभारवाड्यांमध्ये दिसून येतंय.
“दर वर्षी, या काळात [मार्च ते जून, पावसाळ्याअगोदर] आम्ही गल्ले, कुंड्या, पाण्याचे घडे आणि तवे तयार ठेवायचो,” काही आठवड्यांपूर्वी रामजू अलींनी मला सांगितलं होतं. “पण टाळेबंदी लागल्यानंतर, लोक अशा वस्तूंवर आता खर्च करत नाहीयेत, त्यामुळे विक्रेत्यांकडून फारशी मागणी नाहीये. दर वर्षी आम्ही रमझानच्या महिन्यात दिवसा विश्रांती घ्यायचो आणि रात्रभर काम करायचो. रात्रभर मडकी थापटायचा आवाज येत असायचा. पण यावर्षी रमझान [२४ एप्रिल ते २४ मे] नेहमीसारखा नव्हता...”
रामजूभाई, वय ५६ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात भुजमध्ये राहतात. चैत्र महिन्याच्या पहिल्या सोमवारी हाजीपीर मेला भरतो, तिथे अगदी पंचवीस हजारांचा माल विकल्याचं त्यांच्या स्मरणात आहे. मात्र या वर्षी, टाळेबंदीमुळे ही जत्राच रद्द करण्यात आली.
त्यांचा मुलगा, २७ वर्षीय कुंभार अमाद म्हणतो, “कुल्हड आणि वडकी [वाटी] सारख्या मातीची भांड्यांची मागणी कमी झालीये कारण टाळेबंदीमुळे हॉटेल आणि अन्नपदार्थांचा व्यवसाय बंद आहे. आणि इथल्या गावांमधले अनेक कुंभार पोटापाण्यासाठी फक्त कुल्हडच बनवतात.”
रामजू अलींना दुसरीच एक चिंता लागून राहिलीये. ते सांगतात, “आमच्या कामासाठी लागणारी माती मिळणंही सध्या सोपं राहिलेलं नाही. वीट उद्योग हा आमच्यासमोरचा सगळ्यात मोठा धोका आहे कारण ते सगळी माती उकरून नेतात [खासकरून शेजारच्या हरिपूर परिसरातली] आणि मग आमच्यासाठी काहीही उरत नाही.”
भुजच्या लखुराई भागात रामजूभाईंचं घर आहे तिथून काही घरं सोडून पलिकडे कुंभार अलारखा सुमर राहतात. ६२ वर्षीय सुमर अंशतः अंध आहेत. ते सांगतात, “मी [टाळेबंदीच्या काळातली] किराणामालाच्या दुकानातली उधारी चुकवण्यासाठी आणि इतर काही खर्च भागवायला सोन्याची एक साखळी बँकेत तारण ठेवली आणि कर्ज काढलं. आता माझी मुलं बाहेर कामाला जायला लागलीयेत त्यामुळे मी हे कर्ज फेडू शकतोय.” त्यांना तीन मुलं आहेत, दोघं बांधकामावर मजुरी करतात आणि एक जण कुंभारकाम करतो. “टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात [मार्च ते मे], मी गल्ले बनवत होतो, पण त्यानंतर माल विकलाच जात नव्हता आणि घरात काही ठेवायला जागाच राहिली नाही. मग काय, मी हातावर हात धरून काहीही काम न करता नुसता बसून होतो बरेच दिवस.”
भुजहून ३५ किलोमीटरवरचं गाव आहे लोडई, जिथे ५६ वर्षीय कुंभार इस्माइल हुसैन राहतात. ते म्हणतात, “आम्ही शक्यतो स्वयंपाकाची आणि खाणं रांधण्यासाठीची भांडी बनवतो. आमच्या खास कच्छी शैलीतलं नक्षीकाम त्याच्यावर असतं [घरच्या स्त्रियांनी केलेलं]. आमचं काम पहायला येणाऱ्या पर्यटकांकडून आम्हाला ऑर्डर मिळायच्या. पण टाळेबंदीमुळे, गेल्या तीन महिन्यात आमच्या गावात कुणी आलेलंच नाहीये...” इस्माइलभाई सांगतात की एप्रिल ते जून या काळात त्यांचा मालच विकला गेला नाही. एरवी ते महिन्याला सरासरी १०,००० रुपये कमवत होते. पण त्यांचं गाडं काही रुळावर आलं नाहीये. त्यात घरच्या देखील काही गोष्टी आहेत.
यंदाचं वर्ष त्यांच्या कुटुंबासाठी बिलकुल चांगलं नाही असं लोडईचाच रहिवासी असणारा ३१ वर्षीय कुंभार सालेह ममद सांगतो. तो म्हणतो, “टाळेबंदीच्या सुरुवातीलाच आमची बहीण कॅन्सरने गेली. आईची आतड्याची शस्त्रक्रिया झाली, ती काही त्यातनं वाचली नाही... गेले पाच महिने आमच्या कुटुंबाकडे कामच नाहीये.”
त्याची आई, हूरबाई ममद कुंभार, वय ६०, विलक्षण कौशल्य असलेल्या आणि पारंपरिक कच्छी शैलीची जाण असलेल्या कुंभार होत्या. गेल्या वर्षी त्यांचे पती, ममद काकांना झटका आला आणि पक्षाघात झाला, तेव्हापासून त्याच या कुटुंबाचा आधार होत्या.
तिकडे दुसऱ्या टोकाला, अशाच एका कुंभारवाड्यात, पश्चिम बंगालमधल्या बांकुडा जिल्ह्याच्या पंचमुडा गावात, ५५ वर्षांचे बाउलदास कुंभकार मला म्हणतात, “गेली काही महिने या गावात चिटपाखरू नाहीये. टाळेबंदीमुळे गावात कुणी येत नाही, आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. किती तरी लोक आमची कला पाहण्यासाठी इथे यायचे, आमचा माल खरेदी करायचे आणि ऑर्डर द्यायचे. पण यंदा मला नाही वाटत कुणी येईल असं.” कुंभारांनीच आपल्या मातीच्या वस्तूंची विक्री व्हावी या उद्देशाने स्थापन केलेल्या पांचमुडा मृद्शिल्पी समबय समितीचे २०० सदस्या आहेत, त्यातले एक बाउलदास.
तालडांगरा तालुक्यातल्या या गावातला २८ वर्षांचा जगन्नाथ कुंभाकार म्हणतो, “आम्ही जास्त करून मूर्ती घडवतो आणि भिंतीवरच्या टाइल्स, किंवा सजावटीसाठीच्या वस्तू. टाळेबंदीचे सुरुवातीचे दोन महिने काहीच ऑर्डर नव्हत्या. केवळ इथले स्थानिक आदिवासी आमच्याकडून खरेदी करत होते. मडकी, घोडे आणि देवाला वाहण्याचे हत्ती त्यांनी आमच्याकडून बनवून घेतले. पण या वर्षी मानसाचाली देवी आणि दुर्गापूजेसाठी दुर्गा ठाकूर मूर्तींच्या ऑर्डर फारच कमी आहेत. या वर्षी दर वेळसारखं कोलकात्यात किंवा इतर ठिकाणी मोठा उत्सव होणार नाही.”
अनुवादः मेधा काळे