'बाहेरून येणाऱ्या लोकांना प्रवेश बंद' सियादेही गावाच्या वेशीवर असा फलक लावण्यात आला होता. छत्तीसगड मधील धमतरी जिल्ह्याच्या नगरी तालुक्यातील सियादेही गावात भेट देण्यासाठी गेलो असता जवळ बसलेले काही लोक वेशीपाशी लावलेल्या आडकाठ्यांजवळ येऊन माझ्याशी बोलू लागले – अर्थात अंतर राखूनच.
"आम्ही गावकऱ्यांनी, सगळ्यांच्या सहमतीने वेशीवर केलेली बंदी ही आम्हा सर्वांना कोरोनापासून वाचवण्यासाठी केलेली आहे," असं शेजारच्या कांकेर जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयात व्याख्याता असणारे भरत ध्रुव म्हणाले. सियादेही हे ९०० लोकसंख्येचं, मुख्यतः गोंड आदिवासी असलेलं गाव असून ते छत्तीसगडची राजधानी रायपूर पासून ८० किलोमीटरवर आहे.
"आम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, त्यासाठी आम्ही बाहेरून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली आहे, तसंच आम्हाला सुद्धा इथून बाहेर जाऊन लॉकडाऊनचे नियम मोडायचे नाहीत. त्यासाठी आम्ही ही बंदी केली आहे." शेती आणि मजुरी करणारे राजेश कुमार नेताम सांगत होते.
"संपर्क टाळण्यासाठी बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही अडवत आहोत. जर कोणी आलं तर आम्ही त्यांना 'तुमच्या गावात निघून जा' अशी विनंती करतो," शेतमजुरी करणारे सज्जीराम मंडावी म्हणाले. "आमच्या गावातील काही तरुण कौशल विकास योजनेखाली महाराष्ट्रात गेले होते, पण ते होळीच्या आधीच गावात परत आलेत. तरीही, आरोग्य विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची माहिती घेतली आहे."
परतत असलेल्या इतर स्थलांतरित कामगारांचं काय? त्यांना तुम्ही आत घेणार का? "हो," पंचायत अधिकारी मनोज मेश्राम म्हणाले. "पण सरकारी नियमानुसार त्यांचं विलगीकरणं केले जाईल."
मात्र, देशभर, राज्या- राज्यांमध्ये जिल्हा पातळीवर आणि आणि स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये सरकारने जाहीर केलेल्या विलगीकरणाच्या नियमांचा अर्थ कसा लावावा याबद्दल संभ्रम आहे.
सियादेहीच्या लोकांना या कोरोना विषाणूच्या धोक्याबद्दल माहिती कोठून मिळते? "अगोदर टीव्ही, वर्तमानपत्रातून आणि मग शासनाकडून आम्हाला याची माहिती मिळाली," मेश्राम सांगतात. "आम्ही स्वतःला वाचवलं तर आमचं कुटुंब आणि सोबत आमचं गावसुद्धा वाचेल," ते पुढे म्हणतात.
त्यांच्या रोजच्या कमाईवरसुद्धा प्रचंड परिणाम झाल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. "सर्वात पहिलं, आम्हाला स्वतःला विषाणूपासून वाचायचं आहे. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. जगलो वाचलो तर मजुरी वगैरेचं पाहता येईल."
केंद्र सरकाने दिलेल्या 'पॅकेज' बद्दल त्यांनी ऐकलं आहे. तितक्यात दोघं-तिघं एकदमच बोलले, पण "जोपर्यंत आमच्या हातात काही येत नाही तोपर्यंत आम्ही त्याबद्दल काही सांगू शकत नाही."
एका गावातील माणूस झाडावर चढून काहीतरी वायरिंगचं काम करत होता. काय विचारताच तो म्हणला, "आम्ही इथे रात्री ९ पर्यंत पहारा देणार आहोत त्यासाठी उजेडाची सोय म्हणून लाईटचं काम चालू आहे."
सियादेही पासून दोन किलोमीटर दूर असणाऱ्या, अगदी जेमतेम ५०० लोकसंख्या असलेल्या लेहसुनवाही या गावाने देखील सियादेही सारखीच नाकेबंदी केली होती. हे सुद्धा गोंड लोकांचं गाव आहे. इथे एका फलकावर लिहिलं होतं - 'कलम १४४ लागू आहे - २१ दिवस प्रवेश करण्यास सक्त मनाई.' दुसऱ्या फलकावर लिहिलं होतं: 'बाहेरून येणाऱ्यांस सक्त मनाई'.
"आम्ही बाहेरून येणाऱ्या, मुख्यतः शहरातून येणाऱ्या लोकांना गावात येण्यापासून रोखत आहोत," नाकेबंदी जवळ उभे असलेले, शेतमजुरी करणारे घासीराम ध्रुव सांगतात. शहरातीलच का? कारण "शहरातले लोकच देशाबाहेर जातात आणि त्यांच्यामुळेच विषाणूचा फैलाव होतोय," ते म्हणतात.
संपूर्ण बस्तरमध्ये बऱ्याच भागात अशी नाकेबंदी पहावयास मिळते.
पण, धमतरी-नगरी रस्त्यावर, खडदाह नावाचं एक गाव आहे जिथे अशी नाकेबंदी नव्हती. तिथे आम्हाला मेहतरिन कोर्रम ह्या एक मितानीन (इतर भागात यांना आशा कार्यकर्त्या) भेटल्या. त्या नुकत्याच अनुपा बाई मंडावींच्या घरातून बाहेर पडल्या होत्या.अनुपा यांना मलेरिया झाला आहे त्यामुळे मेहतरीन त्यांना औषधं देण्यासाठी गेल्या होत्या.
"आम्हाला कोरोना संसर्गाबद्दल माहिती देण्यात आली आहे, मी स्वतः सर्व घरांमध्ये जाऊन लोकांना सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाबद्दल आणि नियमित हात धुवायला सांगते." या गोष्टी मिटिंग घेऊन सांगतात का? "नाही, जर मिटिंग घेतली तर लोक एकत्र येतील... आमचं ३१ घरांचं छोटंसं गाव आहे त्यामुळे मी घरोघरी जाऊन माहिती देतीये."
मेहतरीन आणि तिचे सहकारी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांबद्दल जागरूक आहेत. एका प्रसंगाबद्दल ती सांगते, "अशोक मर्कम यांच्या घरातील सदस्याचा मृत्यू झाल्यामुळे अंतिम संस्काराचा विधी पार पडत होता. तेव्हा बनरौड, कुम्हड आणि मर्दापोटी येथील मितानीन ताईंना सोबत घेऊन, तिथे जाऊन त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायला सांगितलं आणि नियम पाळले जात आहेत हे पाहत आम्ही पूर्ण वेळ तिथेच उभे होतो."
आणि या काळात त्या स्वतः काय काळजी घेतात? "आम्ही स्कार्फ किंवा टॉवेलने आमचं तोंड झाकून घेतो आणि डेटॉल साबण किंवा लिक्विडने हात धुतो."
पण, तिने एक गोष्ट स्पष्ट सांगितली, त्यांच्याजवळ मास्क नाहीयेत.
मितानीन किंवा आशा कार्यकर्त्या या गावपातळीवर आरोग्य सेवा यंत्रणेचं आघाडीवर काम करणारं पायदळ आहेत. ज्या गावात डॉक्टर नाहीत किंवा आरोग्य कर्मचारी क्वचितच दिसतात अशा गावात त्यांचं महत्त्व अधिक आहे. या साथीच्या काळात त्यांच्याकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणतीही साधनं नसणं हे जास्त धोकादायक आहे.
पण मेहतरीन कोर्रम घाबरत नाही. ती म्हणते, "जर मी घाबरले तर काम कोण करेल? जरी कोणी आजारी असेल तर मला त्याच्याकडे जावंच लागेल."