चारुबाला कालिंदींच्या हातातला रंगीत गमजा एखाद्या वीजप्रमाणे लककन् चमकून जातो. झुमुर गीतावरती लाल आणि निळ्या रंगाचा घागरा थिरकतो. या खेळातले साथीदार एका वाद्यांवर एक ठेका धरतात.
खेळ पहायला ८०-९० लोक – आबालवृद्ध, स्त्रिया, पुरुष – जमलेत. पश्चिम बंगालच्या अर्शा तालुक्यातल्या सेनाबाना गावी हा खेळ सुरू आहे. वयाची पासष्टी गाठली असली तर चारुबाला झोकात नाचतायत.
असं म्हणतात की ‘झुमुर’ हा शब्द नर्तकींच्या पायातल्या पैंजणांच्या आवाजावरून आलाय. नाचाचा हा प्रकार पश्चिम बंगालच्या नैऋत्येकडच्या भागात आणि शेजारच्या झारखंडमध्ये लोकप्रिय आहे (आसाममध्ये याचाच वेगळा प्रकार सादर केला जातो). पारंपरिक झुमुर गीतं लिहिणारे बहुतेक सगळे कवी दलित जातींमधले होते आणि त्यांची काही पदं सामाजिक मुद्द्यांबद्दल, दुष्काळ, पूर, राजकारण आणि इतर समस्यांबद्दल असतात. राधा आणि कृष्णामधलं प्रेम हा तर झुमुर गीतांमधला नेहमीचा विषय असतो.
चारुबालाचं स्वतःचं आयुष्यही या सगळ्या गोष्टींना स्पर्शून जातं. त्या पूर्वी पुरुलिया जिल्ह्याच्या पुरुलिया २ तालुक्याच्या बेल्मा गावी रहायच्या. त्या १६-१७ वर्षांच्या असताना त्यांचे वडील मोहन कालिंदी यांनी त्यांचं लग्न जवळच्याच डुमडुमी गावातल्या शंकर कालिंदींशी लावून दिलं. चारुबालांचं कुटुंब कालिंदी समुदायात येतं ज्यांची नोंद काही राज्यांमध्ये अनुसूचित जातींमध्ये केली गेली आहे.
शंकर विशीत होते आणि ते मिळेल ती कष्टाची कामं करायचे. मात्र त्यांचा स्वभाव हिंसक निघाला. त्यांची मारहाण इतकी प्रचंड वाढली की चारुबाला त्यांना सोडून आपल्या वडलांकडे परत आल्या. मात्र मोहन यांनी गरिबीमुळे त्यांना पोसणं शक्य नाही हे कारण देत त्यांना घरी घ्यायला नकार दिला. चारुबाला बेघर झाल्या, काही काळ अगदी रस्त्यावरही राहिल्या.
अशातच त्यांची गाठ श्रावण कालिंदींशी पडली (दोघांपैकी कुणालाच वर्ष स्मरत नाही). झुमुर कलावंत असलेल्या श्रावण यांनी त्यांना सहारा दिला. त्यांनी चारुबाला यांना नचनी व्हायचं प्रशिक्षण दिलं, त्यासाठी शेजारच्याच गावी राहणाऱ्या बिमला सरदार यांची मदत घेतली. कालांतराने आता ७५ वर्षांचे असणारे श्रावण चारुबालांचे ‘रसिक’ बनले म्हणजेच त्यांचे व्यवस्थापक, एजंट आणि त्यांच्या खेळांचे समन्वयक. ते बाउल, भादु, छाउ, करम कीर्तन, तुसु, कीर्तन असे कार्यक्रम सादर करणाऱ्या इतर गटांसोबतही काम करतात. ते अधून मधून शेतमजुरीही करतात.
एक रसिक म्हणजे काव्याचा आणि संगीताचा आस्वाद घेणारा व्यक्ती मानला जातो. बहुतेक वेळा नचनी आणि रसिक यांच्यामध्ये शरीरसंबंधही असतात. आणि ज्यात अनेकदा स्त्रीचं शोषणही होतं. इतर रसिकांप्रमाणे श्रावण यांचंही लग्न झालंय आणि त्यांचं मोठं कुटुंब आहे ज्यात त्यांच्या पत्नी सरला, मुली, सुना आणि नातवंडांचा समावेश आहे. चारुबाला आणि त्यांची एक मुलगी आहे, २४ वर्षांची कमला. तिचं लग्न झालंय आणि ती उत्तर प्रदेशात राहते.
एवढं मोठं कुटुंब पोसायचं असल्यामुळे चारुबालांनी या वयातही खेळ सादर करणं थांबवलेलं नाही. असं असूनही श्रावण यांच्या पत्नी सरला यांच्या लेखी त्यांना आजही मान नाही, त्यांनी आजही त्यांना स्वीकारलेलं नाही.
राज्य शासनाने आयोजित केलेल्या खेळाचे चारुबाला यांना रु. १,००० मिळतात. एक खेळ साधारण एक ते दीड तास चालतो. महिन्याला चारुबाला एक किंवा दोन खेळच सादर करू शकतात. त्यांना राज्याच्या सांस्कृतिक खात्याकडून लोक कलावंतांना मिळणारं महिना एक हजार रुपये मानधनही मिळतं.
झुमुरचा हंगाम असतो ऑक्टोबर ते मे. अनेक मंडळं आणि पूजा समित्यांकडून खाजगी खेळ ठेवले जातात. हे खेळ अगदी रात्रभर चालू शकतात ज्यात नचनीला किमान पाच तास नाचगाणं करावं लागतं. एका खेळासाठी पाच ते सात जणांच्या गटाला मिळून रु. ६,००० ते रु. ८,००० दिले जातात जे ते एकमेकांत वाटून घेतात. साथ देणारे कलाकार ढोल, मादोल (ढोलकी), ढामसा (नगाऱ्यासारखं वाद्य), खुळखुळा आणि सनई ही वाद्यं वाजवतात.
चारुबालांनी हे काम आपलं नशीब म्हणून स्वीकारलं आहे. “अजून काय करणार? आता भगवंतानंच माझ्या कपाळावर मी नचनी होणार असं लिहिलं असेल तर त्याच्यापुढे कुणाचं चालतं का? आणि हे काम सोडलं तर मी खाऊ काय?” त्यांच्या चेहऱ्यावर सखेद हास्य उमटतं.
या चित्रकथेची अन्य आवृत्ती २५ ऑक्टोबर २०१८ रोजी Sahapedia वर प्रसिद्ध झाली आहे.
अनुवादः मेधा काळे