यंदा हिवाळा चांगलाच कडक असल्यामुळे अब्दुल माजीद वनी खूश आहेत. जास्तीत जास्त लोकांना कांगरी हवी असणार अशी त्यांना आशा आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काश्मीरच्या काही भागात तापमान -१० अंशाखाली गेलं होतं.
५५ वर्षीय वनी मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात चरार-इ-शरीफमध्ये राहतात आणि तिथेच काम करतात. श्रीनगरहून ३२ किलोमीटर दूर असणाऱ्या या गावात कांगरी बनवणारे अनेक कारागीर आहेत. फुललेले निखारे ठेवण्यासाठीचं मातीचं मडकं वेताच्या टोपलीत ठेवतात, त्याला म्हणतात कांगरी. काश्मीरमध्ये अनेक जण या टोपलीची कडी हातात धरून फिरनच्या (गुडघ्यापर्यंत येणारा लोकरीचा अंगरखा) आत कांगरी ठेवतात. कांगरीतले फुललेले निखारे काश्मीरच्या गोठवणाऱ्या लांबलचक हिवाळ्यांमध्ये ऊब देतात. (काही अभ्यासांमध्ये फक्त काश्मीरमध्ये आढळणाऱ्या ‘कांगरी-कॅन्सर’चा उल्लेख आढळतो. दीर्घ काळ निखारे त्वचेच्या जवळ धरल्यामुळे होणारा हा विशिष्ट स्वरुपाचा कॅन्सर आहे. पण त्याविषयी परत कधी तरी.)
“आम्ही वेताच्या सुंदर कांगऱ्या बनवतो, त्यासाठी आमचा हा भाग प्रसिद्ध आहे,” चरार-इ-शरीफच्या कानिल मोहल्ल्यात राहणारा ३० वर्षीय उमर हसन दार म्हणतो. इथले कारागीर आणि कामगार कांगरी बनवण्याच्या उद्योगात आहेत. विलो म्हणजेच वाळुंजीचं लाकूड जवळपासच्या जंगलांमधून मिळतं आणि त्याच्या फांद्या काढून त्यापासून टोपल्या विणल्या जातात. कधी कधी शेतकऱ्यांकडून विकत घेऊन हे लाकूड उकळून मऊ करतात, त्याची साल तासून काढून टाकतात. यासाठी हातानंच तयार केलेल्या एका अवजाराचा वापर होतो (याला छाप्पून म्हणतात. लाकडाचे दोन दांडके काटकोनात बसवून जमिनीत घट्ट रोवलेले असतात) आणि मग हे फोक भिजवून, सुकवून नंतर रंगवले जातात. त्यानंतर या वेताच्या टोपल्या विणल्या जातात.
या सगळ्याला एक आठवड्याचा काळ लागतो, कारण या काड्या पूर्ण वाळाव्या लागतात. हिवाळा सुरू होण्याआधी ऑगस्ट महिन्यात शक्यतो कांगऱ्या विणायला सुरुवात होते. आणि कधी कधी मागणी असेल त्याप्रमाणे अगदी हिवाळा सुरू असतानाही कांगऱ्या विणल्या जातात. फेब्रुवारी संपेपर्यंत हिवाळा उतरतो.
पूर्वी कांगऱ्या म्हणजे फक्त मातीची मडकी असायची, त्याभोवती टोपली नसायची. गावातल्याच कुंभारांकडून ही मडकी विकत घेतली जायची. पण कालांतराने काही कारागिरांनी मडक्यांभोवती विविध प्रकारच्या टोपल्या विणायला सुरुवात केली, यांची किंमत जुन्या कांगऱ्यांपेक्षा जास्त असते. स्वस्त कांगरी घ्यायची तर आता १५० रुपये पडतात आणि ती विणण्यासाठी ३-४ तास लागतात, नाजूक नक्षीकाम असणारी रंगी-बेरंगी कांगरी – जी विणण्यासाठी ३-४ दिवस लागू शकतात – घ्यायची तर अगदी १८०० रुपयांपर्यंत किंमत जाऊ शकते, उमर मला सांगतो. त्यात त्याला १००० ते १२०० रुपयांपर्यंत नफा मिळतो.
कांगरीचा व्यवसाय जरी केवळ हंगामी असला तरी हे काम करणाऱ्या कारागिरांची आणि त्यांना वाळुंज पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची त्यातून वर्षभराची बेगमी होते. चरार-इ-शरीफमधले कारागीर मला सांगतात की दर हिवाळ्यात ते सुमारे ५०,००० ते ६०,००० कांगऱ्या विकताता आणि त्यातून एकूण १ कोटीची कमाई होत असावी. सध्याच्या कडाक्याच्या हिवाळ्यामध्ये तर धंदा चांगला होण्याची आशा आहे. “या हंगामात एक कोटीहून जास्त धंदा करण्याची आमची इच्छा आहे, कारण कांगरीची मागणी थांबण्याचं नाव नाहीये,” वनी सांगतात. जून ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या काळात महिन्याला रु. १२,००० ते रु. १५,००० इतकी कमाई होत असल्याचं ते सांगतात.
कांगरीचं जवळ जवळ सगळं काम पुरुष करतात, मात्र वाळुंजीच्या फांद्या तासण्याचं काम मात्र बायांचं असतं. “मी बारावीत असतानाच लाकडाची साल काढायचं काम करायला लागले,” निघत अझीझ (तिच्या विनंतीवरून नाव बदललं आहे) सांगते, ती आता पदवीधर आहे. “वाळुंजीच्या फांदीची साल नीट काढायला फार कसब लागतं. नाही तर ती तुटून वाया जाते.” निघतसारख्याच अनेक तरुण मुली गंदरबलच्या उमेरहेरे भागात तासण्याचं काम करतात. वाळुंजीची एक मोळी तासण्याचे त्यांना ४० रुपये मिळतात. अशा ७-८ मोळ्या त्या ३-४ तासात सोलू शकतात.
पण काही बायांचं मात्र असं म्हणणं आहे की त्यांना हे काम आता करायचं नाहीये. “वाळुंज तासण्याच्या कामाकडे गावातले लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत. त्यांना असं वाटतं की हे गरिबांचं काम आहे. त्यांच्या टोमण्यांमुळे मला हे कामच सोडून द्यावंसं वाटतंय,” उमेरहेरेची परवीना अख़्तर सांगते.
घरच्यांच्या कांगरीसाठी निखारे फुलवण्याचं कामही घरच्या बायाच करतात. बाजारातून कोळसा विकत आणला जातो – शक्यतो जर्दाळू आणि सफरचंदांच्या लाकडापासून कोळसा पाडतात. “सकाळी आणि सूर्य मावळल्यावर मी कांगऱ्या भरून ठेवते. अख्ख्या काश्मीरमध्ये बाया हिवाळ्यात हे काम करत असतात,” श्रीनगरच्या अली कादल भागात राहणाऱ्या ५० वर्षीय हाजा बेगम सांगतात. त्या त्यांच्या एकत्र कुटुंबासाठी म्हणून रोज १० कांगऱ्या भरून ठेवतात. भाजी विकणाऱ्या आपल्या पतीसाठीही.
ऊब मिळवण्यासाठी आता इतर पर्याय वापरात येऊ लागले आहेत – घरभर उष्णता निर्माण करणारी यंत्रं आहेत किंवा मध्य आशियातून आलेल्या बुखारी (लाकडाच्या शेकोट्या) आहेत. पण काश्मीरच्या शून्याखाली तापमान जाणाऱ्या गोठवणाऱ्या थंडीत, खास करून गावपाड्यांवर गरिबासाठी आजही कांगरीच ऊब देतीये. आपल्या अंगरख्यांच्या आड कांगरीतले फुललेले निखारे मोठ्या हिवाळ्यांमध्ये तासंतास ऊब निर्माण करतात.
अनुवादः मेधा काळे