बापू खंदारे जनावरांसाठी आणि शेतात लागणाऱ्या रस्स्या, दाव्यासारख्या वस्तू विकतात. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी आणि जत तसंच साताऱ्याच्या माण आणि खटाव तालुक्याच्या आठवडी बाजारांमध्ये आणि आसपासाच्या गावांमध्ये ते या वस्तू विकतात. पण राज्यातला दुष्काळ दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय आणि त्यामुळे जनावरांसाठी चारा आणि पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे. त्यामुळेच गाई-गुरांचा आणि शेरडांचा बाजार मंदीत आहे. आणि अर्थातच खंदारेंच्या धंद्यानेही त्यामुळे मार खाल्ला आहे.
आम्ही म्हसवडच्या बुधवारच्या शेरडांच्या बाजारात खंदारेंना भेटलो. तिशीतले खंदारे या वस्तू बनवणाऱ्या ढोर या अनुसूचित जातीचे आहेत. ते म्हसवडपासून ३५ किमी लांब आटपाडीहून आले होते. सकाळचे १०.३० वाजत आले होते आणि बाजार उठायच्या बेतात होता. लोक आपापल्या गावी शेअर रिक्षा, जीपने परतत होते. मटणाचे व्यापारी बकरे गाड्यांमध्ये लादत होते आणि काही विक्रेते शेवटच्या क्षणी कुणी गिऱ्हाईक मिळेल या आशेने बाजारात घुटमळत होते.
खंदारेचं दुकान ते ज्या टेंपोतून माल घेऊन येतात त्यामध्येच मागच्या बाजूला थाटलं होतं. मागचं शटर उघ़डून आकडे लावून त्यावर त्यांनी त्यांच्याकडच्या वेगवेगळ्या वस्तू अडकवलेल्या होत्या – जनावरांना बांधून घालण्यासाठीचं दावं, कासरे, पिकावरचे पक्षी उडवायला वापरात येणाऱ्या गोफणी, पिकात तोंड घालू नये म्हणून जनावरांच्या तोंडावर बांधायच्या मुसक्या, गळ्यातल्या घुंगुरमाळा, कंडे आणि मोरख्या.
गिऱ्हाइक येण्याचीच ते वाट पाहत बसले होते. “मला इथवर यायलाच ४०० रुपये लागलेत आणि आतापर्यंत फक्त ३५० चा धंदा झालाय, तो पण होलसेल व्यापाऱ्यांकडनं. एखादं एकटं असं गिऱ्हाईकच आलेलं नाही,” जवळ जवळ रिकामी असलेली आपली पैशाची लाकडी पेटी दाखवत खंदारे सांगतात. “आजचा बाजार तर उठला. कसंय, आजकाल बाजारात फक्त बकऱ्यांना मागणी आहे, मटणासाठी. पहायचं, आसपासच्या आठवडी बाजारात तरी यातल्या काही वस्तू विकल्या जातात का.”
शीर्षक छायाचित्रः बिनायफर भरुचा