गाढवाच्‍या एक लिटर दुधासाठी सात हजार रुपये? एक लिटर काहीही असलं तरी एवढे? वेडेपणा वाटतो हा, पण गुजरातेत सौराष्ट्रमध्ये असं घडल्‍याचं सप्‍टेंबर २०२० मधल्‍या वर्तमानपत्रांचे मथळे सांगत होते. त्‍या एका घटनेपुरतं ते खरंही होतं. पण हलारी गाढवं पाळणार्‍या गुजरातमधल्‍या कुणालाही तुम्‍ही विचारलंत, तुम्‍हाला नेहमी एवढाच भाव मिळतो का, तर ते खो खो हसत सुटतील.

हलारी गाढवाच्‍या दुधात दुर्मिळ औषधी गुण असतात. पण तरीही या दुधाला गुजरातमध्ये जास्‍तीत जास्‍त १२५ रुपये लिटर इतका भाव मिळतो. तोही संशोधनासाठी एक संस्‍था ठराविक लिटर दूध नियमितपणे विकत घेते, तिच्‍याकडून!

तर, गेल्‍या सप्‍टेंबरमध्ये वर्तमानपत्रांमध्ये आलेल्‍या या मथळ्यांचा मागोवा घेण्‍यासाठी मी सौराष्ट्रात पोहोचलो. राजकोट जिल्ह्यातल्‍या कपाशीच्‍या एका ओसाड शेतात मला भेटले साठीचे खोलाभाई जुजुभाई भारवाड. जामपर गावचे. देवभूमी द्वारका जिल्ह्यातल्‍या भाणवड तालुक्‍यातलं हे गाव. खोलाभाई आपल्‍या कुटुंबाबरोबर दर वर्षी स्‍थलांतर करतात. आताही ते त्‍याच मार्गावर होते. या पशुपालक कुटुंबाकडे शेळ्यांचे आणि मेंढ्यांचे कळप आहेत आणि पाच हलारी गाढवं आहेत.

“भारवाड आणि रेबारी हे दोनच समाज हलारी गाढवं पाळतात,” खोलाभाई म्हणाले. आणि त्‍यापैकीही खूपच कमी कुटुंबांनी ही “परंपरा सुरू ठेवली आहे. ही गाढवं देखणी असतात. पण आम्‍हाला उपजीविका मात्र पुरवू शकत नाहीत. काहीच उत्‍पन्‍न मिळत नाही त्‍यांच्‍यापासून.” खोलाभाई आणि त्‍यांचे पाच भाऊ यांची मिळून ४५ हलारी गाढवं आहेत.

भटक्‍या पशुपालकांच्या उत्‍पन्‍नाची गणती करणंच मुळात कठीण आणि किचकट. एक तर त्‍यांचं उत्‍पन्‍न स्‍थिर नसतं आणि ठरलेलंही नसतं. इंधन, वीज यासाठीचा त्‍यांचा महिन्‍याचा खर्चही ठराविक नसतो. ‘सहजीवन’ या स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या भुज इथल्‍या पशुपालन केंद्रातल्‍या संशोधकांनी आम्हाला सांगितलं की, पाच जणांच्‍या कुटुंबाचं एकूण वार्षिक उत्‍पन्‍न तीन ते पाच लाख रुपये असू शकतं आणि खर्च वजा जाता ते एक ते तीन लाख रुपये भरतं. अर्थात, त्‍यांच्‍या कळपाचा आकार किती आहे यावर हे अवलंबून असतं. प्राण्‍यांची लोकर, शेळ्या आणि मेंढ्यांचं दूध या सगळ्याच्‍या विक्रीतून मिळालेलं असं हे उत्‍पन्‍न असतं.

गाढवांकडून मात्र फारसं काहीच उत्‍पन्‍न मिळत नाही. मिळालं तर अगदीच तुटपुंजं. गेली अनेक वर्षं सातत्‍याने उत्पन्‍नात होणारी घट पाहाता या भटक्‍या गुराख्यांना हलारी गाढवांचे कळप राखणं खूपच कठीण जाऊ लागलं आहे.

PHOTO • Ritayan Mukherjee

देवभूमी द्वारका जिल्ह्यातल्‍या जामपर गावात खोलाभाई जुजुभाई आपल्‍या हलारी गाढवांना आवरतायत

पशुपालन केंद्राचे रमेश भट्टी म्हणतात, गुराख्यांकडे असणार्‍या गुरांच्‍या कळपाचा आकार त्‍यांच्‍या कुटुंबाच्‍या आकारावर अवलंबून असतो. चार भावांचं कुटुंब गाढवांची पैदासही करत असेल तर त्‍यांच्‍याकडे ३० ते ४५ गाढवं असतात. दर वर्षी दिवाळीनंतर अहमदाबादजवळ जत्रा भरते, तिथे ते ही जनावरं विकतात. दुसर्‍या बाजूला, भटके समाज या गाढवांचा उपयोग ओझं वाहण्‍यासाठी करतात. ते चार ते पाच गाढविणी पाळतात.

पशुपालक असोत की गुरांची पैदास करणारे, त्‍यांना अगदी आताआतापर्यंत गाढवाच्‍या दुधासाठी बाजारपेठ मिळालेली नव्‍हती. “गाढवाचं दूध कुणी रोज पीत नाही, मुळात हा दूध देणारा प्राणी नाही,” भट्टी सांगतात. “२०१२-१३ मध्ये ऑरगॅनिको नावाच्‍या दिल्‍लीच्‍या एका सामाजिक उपक्रमाने गाढवाच्‍या दुधापासून सौंदर्यप्रसाधनं बनवायला सुरुवात केली. पण तरी या दुधाला भारतात अजूनही औपचारिक बाजारपेठ नाही.”

हलारी हा सौराष्‍ट्रमधलीच गाढवांची प्रजाती आहे, गाढवांची देशी जात. हलार या ऐतिहासिक प्रदेशावरून त्‍याचं नाव पडलंय. जामनगर, देवभूमी द्वारका, मोरबी आणि राजकोट हे जिल्हे मिळून बनलेला हा प्रदेश होता. रमेश भट्टींकडूनच मला या जातीची माहिती मिळाली. ही पांढरी शुभ्र, मजबूत आणि काटक गाढवं दिवसाला ३० ते ४० किलोमीटर सहज चालू शकतात. पशुपालक जेव्‍हा स्‍थलांतर करतात, त्‍यावेळी सामान वाहून नेण्‍यासाठी आणि गाडी ओढण्‍यासाठीही या गाढवांचा उपयोग केला जातो.

‘नॅशनल ब्‍यूरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस’ने गाढवांचा स्‍वदेशी वंश म्हणून मान्‍यता दिलेली हलारी ही गुजरातमधली गाढवांची पहिलीच प्रजात आहे आणि देशाच्‍या पातळीवर हिमाचल प्रदेशातल्‍या स्‍पिती गाढवांनंतर दुसरी. गुजरातमधलीच कच्‍छी गाढवं ही अशी मान्‍यता मिळालेली तिसरी प्रजात.

२०१९ मध्ये झालेल्‍या विसाव्‍या पशुगणनेनुसार देशात एकूणच गाढवांची संख्‍या वेगाने कमी झाली आहे. २०१२ मध्ये ही संख्या ३ लाख ३० हजार होती, २०१९ मध्ये ती १ लाख २० हजार झाली आहे... जवळपास ६२ टक्‍क्‍यांनी कमी! गुजरातमध्ये हलारी गाढवं आणि त्‍यांची पैदास करणारे पशुपालक यांच्‍या घटलेल्‍या संख्येतून हे प्रकर्षाने जाणवतं.

‘सहजीवन’ने २०१८ मध्ये एक अभ्यास केला होता. त्‍याचा अहवाल त्‍यांनी गुजरात सरकारच्‍या पशुसंवर्धन विभागाला दिला होता. या अभ्यासानुसार गुजरातमध्ये पाच वर्षांत सर्व जातीच्‍या गाढवांची संख्या ४०.४७ टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. हलारी गाढवं आणि त्‍यांची पैदास करणारे पशुपालक अधिकतर गुजरातमधल्‍या ११ तालुक्‍यांमध्ये राहातात. या ११ तालुक्‍यांतली हलारी गाढवांची संख्या २०१५ मध्ये १,११२ होती, २०२० मध्ये ती ६६२ इतकी कमी झाली. याच काळात त्‍यांची पैदास करणार्‍यांची संख्या २५४ वरून १८९ वर घसरली.

PHOTO • Ritayan Mukherjee

जामपरचे मंगाभाई जाडाभाई भारवाड आपल्‍या हलारींच्‍या कळपाची देखरेख करताना. भटक्‍या जीवनशैलीत होणार्‍या बदलांची त्‍यांना खोलवर समज आहे.

या घसरणीचं कारण काय? “गाढवांना चरण्‍यासाठी कुरणंच कुठेयत?” जामपर गावातले पन्‍नाशीचे मंगाभाई जाडाभाई भारवाड वैतागून म्हणतात. “चरण्‍यासाठी असलेल्‍या बहुतेक सगळ्‍या जमिनी आता शेतीसाठी वापरल्‍या जातात. सगळीकडेच शेतीचं प्रमाण वाढलं आहे. गाढवांना चरायला जंगलातही नेऊ शकत नाही. कायद्याने बंदी आहे त्‍याला,” ते पुढे म्हणतात, “हलारी नर पाळणं कठीण आहे. ते रागीट असतात. त्‍यांची संख्या पटकन वाढत नाही.”

बदलतं हवामान आणि अनियमितपणे होणारा प्रचंड पाऊस हेही गुराख्यांच्‍या चिंतेचं कारण आहे. सौराष्ट्रमध्ये गेल्‍या वर्षी प्रचंड पाऊस झाला आणि त्यात अनेक शेरडं आणि मेंढरं गेली. “जुलैमध्ये सातत्‍याने बरेच दिवस भरपूर पाऊस पडला. आधी तर मला वाटलं, माझं एकही जनावर वाचणार नाही. पण श्रीकृष्णाची कृपा... काही जनावरं वाचली.”

“आधी सगळं समतोल असायचं,” रुराभाई कान्‍हाभाई छाडका सांगतात. चाळीशीतले रुराभाई भावनगर जिल्ह्यातल्‍या गधाडा तालुक्‍यातल्‍या भंडारिया गावचे. “ऊन आणि पाऊस यातलं काहीच असं बेताल नसायचं. जनावरांना चरायला सहज घेऊन जाता यायचं. आता अचानक एक दिवस तुफान पाऊस पडतो, माझ्‍या शेळ्‍या-मेंढ्या मरून जातात. इतर जनावरांपासून मिळणारं उत्‍पन्‍न दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. अशात मग हलारी गाढवांचा मोठा कळप पाळणं कठीण होऊन बसतं.” या पशुपालकांच्या चारणीच्या मार्गावर पशुवैद्यकीय अधिकारीच नाहीत. जनावरं आजारी पडली आणि त्‍यांना वैद्यकीय मदत हवी असेल तर त्यांचे खूपच हाल होतात.

काही कुटुंबांनी त्‍यांचे गाढवांचे कळप चक्क विकून टाकलेत. “आमच्‍या पुढच्‍या पिढीला गाढवं पाळण्‍यात अजिबात रस नाही. आम्‍ही स्‍थलांतर करतो तेव्‍हा सामानाच्‍या गाड्या ओढण्‍यापलीकडे काहीच उपयोग नसतो या गाढवांचा. आणि आमचं सामान नेण्‍यासाठी आता आम्ही बरेचदा छोटे टेम्‍पो भाड्याने घेतो. त्‍यामुळे मग आम्‍हाला आमच्‍या गुरांच्‍या कळपावर लक्ष ठेवता येतं,” गुराख्यांचे नेते आणि हलारींची पैदास करणारे ६४ वर्षांचे राणाभाई गोविंदभाई सांगतात. पोरबंदर जिल्ह्यातलं पारावाडा हे त्‍यांचं गाव.

पाळलेली गाढवं आणि त्‍यांचे पालक यांच्‍याकडे समाजही लांच्‍छनास्‍पद म्हणूनच पाहातो. “ ‘देखो गधा जा रहा है...’ असं ऐकायला कोणाला आवडेल? कोणालाच नको असतं हे शब्‍द कानावर पडणं...” राणाभाई गाढवं पाळण्‍याची एक वेगळीच बाजू पुढे आणतात. राणाभाईंकडे २८ हलारी होते. गेल्‍या दोन वर्षांत त्‍यांची संख्या झाली आहे पाच. बरीच गाढवं त्‍यांनी विकली. एक तर ती पाळणं त्‍यांना शक्‍य होत नव्‍हतं आणि दुसरं, रोजच्‍या खर्चासाठी त्‍यांना रोख रक्‍कम हवी होती.

अहमदाबाद जिल्ह्यातल्‍या ढोलका तालुक्‍यात वौठा गावी दर वर्षी जत्रा भरते. तिथे एका हलारी गाढवाला १५ ते २० हजार रुपये किंमत येते. राज्‍यातली गिर्‍हाईकं असतात किंवा कधीकधी बाहेरचीही. इतर राज्‍यांतले भटक्‍या समाजाचे लोक असतात किंवा कधी कोणी ओझी वाहण्‍यासाठी मजबूत जनावराच्‍या शोधात असतो... गाडी ओढण्‍यासाठी किंवा खाणीच्‍या ठिकाणी वगैरे.

पण अशी परिस्‍थिती असेल तर मग त्‍या ७००० रुपये लिटर दुधाचं काय?... जामनगरमधल्‍या ध्रोळ तालुक्‍यातल्‍या मोटा गरेडिया गावात हलारी गाढवाचं एक लिटर दूध ७००० रुपयांना विकलं गेलं, अशी बातमी स्‍थानिक वर्तमानपत्रात आली आणि ही सनसनाटी सुरू झाली. गाढवाच्‍या दुधासाठी एवढी किंमत मिळणारे नशीबवान पशुपालक होते वश्रामभाई टेढाभाई. त्‍यांनी बातमीदारांना सांगितलं की त्‍यांनी या दुधासाठी एवढी किंमत मिळालेली कधीच ऐकलेली नाही.

‘आमची जनावरं आजारी पडली तर इथे त्‍यांची जबाबदारी घेण्‍यासाठी कोणीच नाही. आम्हालाच त्‍यांना इंजेक्‍शन द्यावं लागतं. जनावरांचे डॉक्टरच नाहीत इथे’

व्‍हिडिओ पहा : ‘आता लोकांनी ही गाढवं विकूनच टाकलीयेत’

वश्रामभाई म्हणाले, “गेल्‍या सप्‍टेंबरमध्ये माझ्‍याकडे मध्य प्रदेशातून एक माणूस आला. त्‍याला हलारी गाढवाचं दूध हवं होतं. जामनगरचे मालधारी गाढवाचं दूध स्‍वतः पीत नाहीत. (गुजरातीत पशुपालकांना ‘मालधारी’ म्हणतात. ‘माल’ म्हणजे पशु आणि ‘धारी’ म्हणजे पाळणारा.) कधीकधी आजारी मुलांसाठी वगैरे औषध म्हणून हवं असेल तर आमच्‍याकडून लोक घेऊन जातात. अशा वेळी आम्ही ते असंच देतो, त्‍याचे पैसे घेत नाही.” पण मध्य प्रदेशातल्‍या या माणसाने दूध कशासाठी हवंय हे वश्रामभाईंना सांगितलंच नाही. त्‍यांनी गाढवाचं दूध काढलं आणि गिर्‍हाईकाने त्‍या एका लिटरचे ७००० रुपये त्‍यांना दिले! अवाक झालेल्‍या वश्रामभाईंनी स्‍थानिक बातमीदारांना हे सांगितलं.

बातमी आल्‍यावर बरेच पत्रकार गरेडियाला पोहोचले. पण मध्य प्रदेशातल्‍या त्‍या माणसाला ते एक लिटर दूध कशासाठी हवं होतं याचा पत्ता लागलाच नाही.

गाईसारखा गाढव हा काही दूध देणारा प्राणी नाही. “गाढव दिवसाला जास्‍तीत जास्‍त एक लिटर दूध देऊ शकतं, तेही त्‍याने पिल्‍लाला जन्‍म दिल्‍यावर पाच-सहा महिन्‍यांपर्यंत! इथली गाय याच्‍या दहा पट जास्‍त दूध देते,” पशुपालन केंद्राचे भट्टी सांगतात.

घोडा आणि घोड्याच्‍या जातीच्‍या प्राण्‍यांवर संशोधन करणार्‍या ‘नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इक्विन्‍स’(एनआरसीई)ने गेल्‍या ऑगस्‍टमध्ये गुजरातमधल्‍या मेहसाणा जिल्ह्यातून काही हलारी गाढवं संशोधनासाठी त्‍यांच्‍या बिकानेरच्‍या फार्मवर आणली. त्‍यांच्‍या संशोधनात असं दिसून आलं की, हलारी गाढवांच्‍या दुधात इतर कुठल्‍याही प्राण्‍याच्‍या दुधापेक्षा वृद्धत्व रोखणारे (अँटी एजिंग) आणि अँटीऑक्‍सिडंट घटक बर्‍याच अधिक प्रमाणात असतात.

‘एनआरसीई’च्‍या या अहवालानंतर हलारी गाढवांच्‍या दुधाची लोकप्रियता प्रचंड वाढली. हलारी गाढवांची पैदास करणार्‍यांचा सगळे शोध घ्यायला लागले. खुद्द भट्टींकडेही देशाच्‍या विविध भागांतून या गाढवांच्‍या जातीबद्दल विचारणा होऊ लागली. दरम्‍यान, २०१६ मध्ये कच्‍छमध्ये १००० लिटर उंटाच्‍या दुधाची डेअरी सुरू केलेल्‍या ‘आद्‌विक फूड्‌स’ या कंपनीने हलारी गाढवांच्‍या १०० लिटर दुधाची डेअरी सुरू करण्‍याचा विचार करत असल्‍याची घोषणा केली. “सौंदर्यप्रसाधनांच्‍या दुनियेत गाढवाचं दूध लोकप्रिय आहे. ग्रीक, अरब, इजिप्‍शियन राजकन्‍या गाढवाच्‍या दुधाने अंघोळ करत असल्‍याच्‍या दंतकथा आहेत,” भट्टी सांगतात. “आणि यामुळेच भारत आणि पाश्‍चात्त्य देशांतल्‍या सौंदर्यप्रसाधनांच्‍या जगात आता या दुधाची बाजारपेठ तयार होते आहे.”

अर्थात, तरीही हलारी गाढवांच्‍या दुधाची किंमत ७००० रुपये लिटरपर्यंत पुन्‍हा पोहोचेल का याबद्दल मात्र भट्टींना शंका आहे... अगदी त्‍याची डेअरी उभी राहाणार असली तरीही. “अलीकडेच आद्विकने संशोधनासाठी बारा ते पंधरा लिटर हलारी गाढवांचं दूध खरेदी केलं. त्‍यांनी गाढवांच्‍या मालकांना लिटरमागे १२५ रुपये दिले,” भट्टींनी सांगितलं.

हलारी गाढवं राखणाऱ्यांच्या स्‍वप्‍नांतले इमले बांधण्यासाठी ही रक्‍कम नक्‍कीच पुरेशी नाही.

PHOTO • Ritayan Mukherjee

सौराष्ट्रमधली पांढरीशुभ्र हलारी गाढवं काटक, सशक्‍त आणि पिळदार असतात. पशुपालक स्‍थलांतर करतात तेव्‍हा पाठीवर ओझं घेऊन ती दिवसाला ३० ते ४० किलोमीटर सहज चालू शकतात.

PHOTO • Ritayan Mukherjee

खोलाभाई जुजुभाई आणि हमीर हजा भुडिया या दोघा भावांची २५ हलारी गाढवं आहेत. सध्याच्‍या काळात एखाद्या कुटुंबाच्‍या गाढवांची ही सगळ्‍यात जास्‍त संख्या असावी

PHOTO • Ritayan Mukherjee

राजकोट जिल्ह्यातल्‍या धोराजी गावातले चणाभाई रुडाभाई भारवाड. सतत स्‍थलांतर करणारा भारवाड समाज हलारी गाढवांसोबतच देशी शेळ्या आणि मेंढ्यांचे कळपही पाळतो

PHOTO • Ritayan Mukherjee

चणाभाई रुडाभाई भारवाड हलारीचं दूध काढून दाखवताना. या दुधामुळे प्रतिकारशक्‍ती वाढते. त्‍यात इतरही बरेच औषधी गुण असतात.

PHOTO • Ritayan Mukherjee

पशुपालक वडाच्‍या पानांपासून बनलेल्‍या द्रोणातून चहा पितात. या भटक्‍या पशुपालकांची जीवनशैली प्‍लास्‍टिकमुक्‍त आणि पर्यावरणस्‍नेही असते.

PHOTO • Ritayan Mukherjee

पोरबंदर जिल्ह्यातल्‍या पारावाडा गावातले राणाभाई गोविंदभाई भारवाड हलारी गाढवांची पैदास करतात. पण त्‍यांनीही आपली वीसेक गाढवं विकली आहेत. त्‍यांच्‍याकडे आता फक्‍त पाच हलारी गाढवं आहेत.

PHOTO • Ritayan Mukherjee

कोणे एके काळी असलेल्‍या आपल्‍या भल्‍यामोठ्या हलारी कळपाच्‍या फोटोंसह राणाभाई गोविंदभाई. हलारी पाळणं कठीण असतं, त्‍यामुळे कळप लहानच असलेला बरा, असं त्‍यांचं म्हणणं आहे.

PHOTO • Ritayan Mukherjee

भारवाड समाजाच्‍या तरुण पिढीचे प्रतिनिधी जिग्‍नेश आणि भावेश भारवाड. जामनगरच्‍या शाळेत त्‍यांचं नाव घातलंय, पण शाळेपेक्षा त्‍यांना पशुपालकांची पारंपरिक जीवनशैलीच आवडते

PHOTO • Ritayan Mukherjee

भावनगर जिल्ह्यातल्‍या भंडारिया गावातले समाभाई भारवाड तात्‍पुरती लाकडी चौकट बांधताना. यावर ठेवलेलं ओझं गाढव वाहून नेतं. तोल सांभाळला जावा यासाठी ही वाकवलेली चौकट गाढवाच्‍या पोटाच्‍या पातळीवर असावी लागते.

PHOTO • Ritayan Mukherjee

कच्‍छ जिल्ह्यातल्‍या बन्‍नी इथे होणार्‍या प्राण्‍यांच्‍या सौंदर्यस्‍पर्धेसाठी सजवलेलं गाढव

PHOTO • Ritayan Mukherjee

राजकोट जिल्ह्यातल्‍या सिंचित गावातले जाणते पशुपालक सावाभाई भरवाड यांचे एके काळी शेळ्या, गाढवं आणि म्‍हशी यांचे मोठेमोठे कळप होते. आता मात्र चराईसाठी कुरणंच कमी झाल्‍यामुळे त्‍यांनी म्‍हशी वगळता सगळी जनावरं विकून टाकली.

PHOTO • Ritayan Mukherjee

देवभूमी द्वारका जिल्ह्यातल्‍या जामपर गावात रात्रीच्‍या वेळी शेतात आपली मुलं, पुतणे, पुतण्‍या यांच्‍यासमवेत बसलेले हमीर हाजा भुडिया

PHOTO • Ritayan Mukherjee

रात्रीची सुरक्षितता. गाढवांचे पाय बांधताना हमीर हाजा. गाढवांना नीट बांधून ठेवलं नाही तर ती पळून जातात, असं ते सांगतात.

PHOTO • Ritayan Mukherjee

या पशुपालक समाजातले लोक सहसा उघड्या आभाळाखालीच झोपतात. स्‍थलांतर करत असताना त्‍यांच्‍यासोबत घोंगड्या असतात. त्‍यांचा ते वापर करतात. शेतात किंवा रस्‍त्‍याच्या कडेला ते तात्‍पुरते निवारे उभे करतात, त्‍यांना ‘नास’ म्हणतात.

PHOTO • Ritayan Mukherjee

हलारी ही दिसायला सुंदर आणि स्‍वभावाला चांगली, नाजुक डोळ्‍यांची गाढवांची जात आहे. ‘ही गाढवं सुंदर आहेत, पण आमच्‍या उपजीविकेसाठी मात्र ती पुरेशी नाहीत,’ जामपर गावातले खोलाभाई जुजुभाई भारवाड म्हणतात.

अनुवादः वैशाली रोडे

Ritayan Mukherjee

ঋতায়ন মুখার্জি কলকাতার বাসিন্দা, আলোকচিত্রে সবিশেষ উৎসাহী। তিনি ২০১৬ সালের পারি ফেলো। তিব্বত মালভূমির যাযাবর মেষপালক রাখালিয়া জনগোষ্ঠীগুলির জীবন বিষয়ে তিনি একটি দীর্ঘমেয়াদী দস্তাবেজি প্রকল্পের সঙ্গে যুক্ত।

Other stories by Ritayan Mukherjee
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

Other stories by Vaishali Rode