कला ही केवळ
मनोरंजन नाही,
ती युद्धाचे शस्त्र आहे
- पाब्लो पिकासो
मराठी भाषेत एक म्हण आहे. "बामणा घरी लिहिणं, कुणब्या घरी दाणं आणि मांगा-महारा घरी गाणं". पारंपारिक गावगाड्यात मांग-हलगी, गोंधळी-संबळ, धनगर-ढोल आणि महार-एकतारी वाजवायचे. ज्ञान, शेती आणि कला संगीत यांचीही संस्कृतीने अशी जातीनिहाय वाटणी केलेली. शिवाय गाणे वाजवणे हे अस्पृश्य ठरवलेल्या जातींचे उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन होते. दलितांनी शतकानुशतकांच्या दमन, भेदभावाला तोंड देत आपला इतिहास, आपले शौर्य, आपली वेदना, आपला आनंद, आपले तत्वज्ञान हे सर्व जात्यावरच्या ओव्या, मौखिक कथा, गाण्यात आणि लोकसंगीताच्या रूपात, त्यांच्या जीवन संघर्षाचा इतिहास पिढीजात जतन केला आहे. डॉ. आंबेडकर यांचा भारतीय चळवळीत उदय होण्यापूर्वी महार लोक कबीरांचे दोहे, विठ्ठलाची भक्ती, आणि ईश्वराची आराधना करणारी भजने एकतारीवर म्हणायची.
१९२० नंतर
डॉ. आंबेडकरांचा दलितांच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला. आणि त्यांनी जी
प्रबोधनाची चळवळ सुरू केली त्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यात सर्वात
महत्त्वाची भूमिका या कलांनी आणि कलावंतांनी निभावली. डॉ.आंबेडकरांच्या चळवळीच्या
आधारे समाजात होणारी स्थित्यंतरे, क्षणोक्षणी
घडणाऱ्या प्रत्यक्ष घटना, डॉ.आंबेडकरांची
भूमिका, त्यांचे
संदेश, संघर्ष
आणि एकूणच त्यांचे जीवन त्या अशिक्षित आणि अडाणी समाजाला समजेल अशा त्यांच्या
ग्रामीण भाषेत समजावून सांगितले. खुद्द डॉ आंबेडकरांनी
भीमराव कर्डक
आणि
कलाकारांचा जलसा मुंबईच्या नायगाव येथील वेलफेअर मैदानावर पाहिला. तेव्हा
"माझ्या १० सभा- मीटिंग आणि कर्डक मंडळीचा एक जलसा बरोबर आहे" असे विधान
केले होते.
शाहीर भेगडे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुढ्यातच गीत सादर केलं,
महाराचा पोरगा बिट्या लई हुशार
बिट्या लई हुशार
साऱ्या जगात नाही असं होणार
अंधारात आम्हास्नी वाट दाखविली
भोळी जनता त्याने जागृत केली
डॉ.आंबेडकर यांच्या प्रबोधन चळवळीची लाटच दलितांमध्ये आली होती. या प्रबोधन चळवळीचे साधन होते जलसे, शाहिरी तर माध्यम होते. असे हजारो ज्ञात अज्ञात कलावंत.
आंबेडकरांची चळवळ ज्या भागात पोहचली त्या भागातील गावागावात त्यावेळी एक चित्र दिसायचे. दलित वस्तीमधील काही पत्र्यांची तर अर्धी घरं पालापाचोळा टाकलेल्या छपराची. वस्तीच्या मधोमध फक्त एका ओट्यावर एक निळा झेंडा रोवलेला, आणि या निळ्या झेंड्याखाली लहान मुलं, बाया, गडी आणि वृद्ध माणसे जमायची. बैठक घ्यायची, आणि या बैठकीत बुद्ध- भीम गीते म्हटली जायची. चैत्यभूमी, दीक्षाभूमी अथवा कुठल्या मोठ्या शहरातून छोट्या-मोठ्या शाहिरांच्या गीतांचे छापील पुस्तक आणली जायची. दलित वस्तीमधील काही बाया-माणसं बिलकुल अडाणी असल्या तरी, त्यांच्या नुकत्याच शाळेत जाऊन वाचन, लेखन शिकलेल्या मुलाकडून गीतांचे बोल वाचून घेऊन पाठांतर करायचे. अथवा कोणा शाहिरांच्या तोंडून ऐकलेले गाणे आठवणीत ठेवून तेच गाणे आपल्या वस्तीत म्हणायचे. कोणाच्या तरी शेतातून मजुरी करून थकून-भागून आलेल्या आयाबाया "भीम राजा की जय! बुद्ध भगवान की जय !!" अशी घोषणा करत गाण्याला सुरुवात करायच्या. आणि एक उत्साही, उत्स्फूर्त आणि आनंदी वातावरण बनून जायचे. गावातील दलितांसाठी हेच विद्यापीठ होतं. याच गाण्याच्या ओळी ओळीतून पुढच्या पिढीला बुद्ध आंबेडकर मिळाले. याच गाणाऱ्या आयाबायांनी, शाहिरांनी तोडक्या-मोडक्या भाषेत पण मोठ्या ताकदीने त्यांच्याच भाषेत बुद्ध-फुले-आंबेडकर नव्या पिढीच्या सचेत मेंदूत उतरवला. जिथून तो पुन्हा विसरणे शक्यच नव्हते. एक सबंध पिढीची सामाजिक, सांस्कृतिक चेतना या शाहिरांनी घडवली. मराठवाड्यात ही सामाजिक आणि सांस्कृतिक चेतना घडवण्यात शाहीर आत्माराम साळवे हे एक महत्त्वाचे नाव आहे.
बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथे ९ जून १९५३ साली जन्मलेला हा शाहीर विद्यार्थी म्हणून १९७०च्या दशकात औरंगाबादला शिक्षणासाठी आला.
मराठवाड्यात निजाम राजवटीमुळे शिक्षणासह अनेक गोष्टीचा विकास कुंठित झालेला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकरांनी १९४२ साली 'पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या' वतीने औरंगाबादमधील नागसेनवन परिसरात मिलिंद महाविद्यालय सुरू केले. नागसेनवन परिसर हा दलित विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचं केंद्र म्हणून विकसित होत होता. मिलिंद कॉलेजच्या पूर्वी संपूर्ण मराठवाड्यात केवळ औरंगाबादलाच एक सरकारी गव्हर्मेंट कॉलेज होते, व ते सुद्धा इंटरपर्यंतच! मिलिंद हे मराठवाड्यातील पहिलेच पदवीपर्यंतचे कॉलेज. या कॉलेजच्या स्थापनेमुळे मराठवाड्यात मोठे शैक्षणिक वातावरण तयार झाले. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठे परिवर्तन घडून येऊ लागले. एका मृतप्राय समाजाला व प्रदेशाला एक प्रकारचा जिवंतपणा आला. अस्मितेची जाणीव झाली. आत्मसन्मानाचे भान आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यांतूनही मुले मिलिंदमध्ये येऊ लागली. याच काळात आत्माराम साळवेही मिलिंद परिसरात विद्यार्थी म्हणून दाखल झाले. याच परिसरातून सुरू झालेली मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ दोन दशके आपल्या शाहिरी प्रबोधनाने ढवळून काढली. एक प्रकारे नामांतराची, पँथरची सांस्कृतिक चळवळ एकहाती लढवली!
१९७० चे दशक हे एक अस्वस्थ दशक आहे. भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतरच्या पहिल्या तरुण तरुणींचा हा काळ! स्वातंत्र्य अगदी तरुणाईत आहे. शिक्षण घेतलेली तरुणाई खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडली आहे. पण ती स्वातंत्र्याने केलेल्या भ्रमनिरासाने अस्वस्थही आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणीबाणी, पश्चिम बंगालमध्ये नक्षलबारी, तेलंगणामध्ये स्वतंत्र तेलंगणा निर्मितीची चळवळ, बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांचे नवनिर्मानं आंदोलन, गुजरात, बिहारमध्ये ओबीसी आरक्षणाच्या चळवळी, महाराष्ट्रात नुकतीच संयुक्त महाराष्ट्रची चळवळ संपलीये, मुंबईत गिरणी कामगारांचा संघर्ष, शहादा चळवळ, हरित क्रांती, मराठवाड्यात 'मराठवाडा विकास आंदोलन', मराठवाड्यातला दुष्काळ आणि त्याचे परिणाम याने एक प्रकारे सारी तरुणाई आणि देश ढवळून निघाला आहे. देशभर विकास आणि अस्मितेचे संघर्ष टोकदार बनले आहेत.
नागसेनवन परिसरात येऊन आत्मभान आलेल्या विद्यार्थ्यांनी २६ जून १९७४ साली डॉ. मच्छिंद्र मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली 'मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघाने' मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, मराठवाड्यातील दोन विद्यापीठांपैकी एकाला डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली. मात्र या नामांतराच्या मागणीला संघटित स्वरूप आले ते 'भारतीय दलित पँथरच्या' भूमिकेमुळे. नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांच्यातील संघर्षामुळे राजा ढाले यांनी पँथर बरखास्तीची घोषणा केली. परंतु प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर गाडे, एस. एम. प्रधान यांच्या नेतृत्वाखाली 'भारतीय दलित पँथर' ही संघटना स्थापन करून, दलित पँथरचे कार्य महाराष्ट्रात जोमाने चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या नव स्थापित 'भारतीय दलित पँथरचे' आत्माराम साळवे लिहितात,
मी पॅंथरचा सैनिक,
कांबळे अरुण सरदार
आम्ही सारे जय भीम वाले
अन्यायाशी लढणार
सैनिक भियाचे
नाही कुणा भिणार
अन्याय संपवून
पुढे पुढे जाणार
दलित, शेतकरी, कामगारा उठ,
करूनी एकजूट, उगारून मूठ
साळवेंनी या गीताने नव्या पॅंथरचं स्वागत केलं. आणि या नव्या पँथरची 'मराठवाडा उपाध्यक्ष' म्हणून संघटनात्मक जबाबदारी घेतली. या नवस्थापित भारतीय दलित पँथरचे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी ७ जुलै १९७७ रोजी मराठवाडा विद्यापीठास डॉ. आंबेडकरांचे नाव द्यावे अशी प्रथम जाहीर मागणी केली.
१८ जुलै १९७७ रोजी सर्व महाविद्यालयं बंद ठेवत सर्वपक्षीय विद्यार्थी कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी व मराठवाडा विद्यापीठास डॉ. आंबेडकरांचे नाव द्यावे यासाठी एक मोठा मोर्चा विद्यापीठावर काढण्यात आला. तर २१ जुलै १९७७ रोजी नामांतरास विरोध करणारा पहिला मोर्चा इंजीनियरिंग, सरस्वती भुवन, देवगिरी व विवेकानंद कॉलेजच्या सवर्ण विद्यार्थ्यांनी काढला. मराठवाडाभर नामांतरवादी व नामांतरविरोधी, बंद- प्रतिबंद, मोर्चे -प्रतिमोर्चे, सत्याग्रह-प्रतिसत्याग्रह याची एकच लाट उसळली. दलित - दलितेतर वादाने प्रक्षोभक स्वरूप धारण केले. पुढील दोन दशके मराठवाडा दलित-दलितेतर वादाची रणभूमी बनला. या रणभूमीत आत्माराम साळवे आपल्या शाहिरीला, आवाजाला, आणि शब्दाला शस्त्र बनवत दलितांवर "लादलेल्या जातीय युद्धा विरुद्ध" लढत राहिला.
डॉ. आंबेडकर आणि त्यांची चळवळ पाहिलेली, अनुभवलेली शाहीर अण्णाभाऊ साठे, भीमराव कर्डक, शाहीर घेगडे, भाऊ फक्कड, राजानंद गाडपायले आणि वामन कर्डक यांसारखे शाहीर सामाजिक अवकाशातून बाहेर होण्याच्या काळात आत्माराम साळवे हे शाहीर म्हणून पुढे येतात.
आंबेडकरोत्तर काळात येणाऱ्या शाहीर विलास घोगरे, दलितानंद, मोहनाजी हटकर, विजयानंद जाधव यांनी डॉ. आंबेडकर आणि त्यांची चळवळ, धर्म परिवर्तनाचा काळ पाहिलेला नाही. ती त्या अर्थाने कोरी आहेत. हे खेड्यापाड्यातून आलेले शाहीर आहेत. त्यांना बाबासाहेब आणि त्यांची चळवळ केवळ पुस्तकातून भेटलेली आहे. त्यामुळे या शाहिरीत उद्रेक जास्त दिसतो. तो आत्माराम साळवे यांच्याही शाहिरीत अधिकच येतो.
नामांतराचा मुद्दा केवळ नाव बदलण्याचा मुद्दा नव्हता. तो त्यांच्या अस्मितेचा, आणि माणूस म्हणून आलेल्या नव्या आत्मभानाचाही होता.
नामांतराच्या भूमिकेपासून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी फारकत घेतल्यानंतर आत्माराम साळवे लिहितातः
वसंत दादा, पॅंथरच्या लागू नको नादा
अन्यथा तू मुकशील गादीला
हे दलित आता घेतील सत्ता
आणि तू पडशील सांदीला
तुला सत्तेचा चढलाय माज
सोड तुझी ही तानाशाही
नाही चालणार हे तुझे जुलमी राज
सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या आरोपाखाली अनेकदा पोलिसच त्यांचे कार्यक्रम बंद पाडायचे, पण आत्माराम कधीच थांबायचे नाहीत
आत्माराम साळवे केवळ हे गाणं लिहून थांबले नाहीत तर, नांदेडला वसंतदादा पाटील आले तेव्हा त्यांच्या पुढ्यातच त्यांचा ताफा अडवत हजारो लोकांसमोर त्यांनी हे गाणे गायले. त्यासाठी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. आणि या राजकीय गुन्ह्याचा सिलसिला नंतरच्या सबंध आयुष्यात चालू राहिला. १९७८ ते १९९१ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यँत त्यांच्यावर हद्दपारी, मारामारी, शासकीय कामात अडथळा, दंगल घडवणे, सामाजिक वातावरण बिघडवल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातील विविध पोलिस स्टेशनअंतर्गत अनेक गुन्हे नोंदवले गेले. आणि अनेक कार्यक्रमांत त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले. आत्माराम साळवे यांचे मित्र आणि चळवळीतील त्यांचे देगलूरचे सहकारी चंद्रकांत ठाणेकर याबाबतची आठवण सांगताना म्हणतात, “१९८० साली देगलूर तालुक्यातील मरखेल या गावी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होता. बेन्नाळ या गावातील काळे या दलित मजुराच्या हत्येप्रकरणी मृत्यूच्या कारणाचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉ. नवल यांना जाब विचारल्याने आत्माराम साळवे यांच्यावर डॉक्टर नवलचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात आत्माराम साळवे यांच्यासह रामा खर्गे आणि मला दोन वर्षे सक्तमजुरी आणि पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पुढे हा खटला वरच्या न्यायालयात निकाली निघून आमची निर्दोष मुक्तता झाली.”
याच मरखेल गावातील नागरबाई सोपान वझरकर या ७० वर्षांच्या महिलेने चाळीस वर्षानंतर आत्माराम साळवे यांच्या गाण्याची हस्तलिखित वही उतरंडीच्या गाडग्यातून मला काढून दिली. मरखेलच्या जीवघेण्या हल्ल्यातून नागरबाई यांनीच साळवे यांना वाचवले होते. दुसऱ्या एका प्रकरणात पॅंथरने पुकारलेल्या बंदमुळे माजलगावच्या व्यापाऱ्यांनी आत्माराम साळवे यांच्यावर हद्दपारीची कारवाई करावी या मागणीसाठी मोर्चा काढला. त्यामुळे बीड जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करण्यात आले. आत्माराम साळवे यांच्या सोबत हार्मोनियम वाजवणारे मुखेडचे तेजेराव भद्रे याबाबतची आठवण सांगताना म्हणतात, "आत्माराम साळवे हे अत्यंत जहाल बोलायचे. आक्रमक अशा आशयाची गाणी म्हणायचे. त्यामुळे दलित लोक प्रभावित व्हायची, पण सवर्ण लोक दुखावली जायची. ते कार्यक्रम बंद पाडायचे. अनेक वेळा तर दगडफेकही करायचे. आत्माराम यांनी गाणे सुरू केले की गाणे संपल्यावर समोर बसलेले लोक स्टेजच्या दिशेने पैसे फेकायचे तर गाण्याने दुखावलेले लोक दगड फेकायचे. एकाच वेळी प्रेम आणि द्वेष मिळवणारा तो शाहीर होता. आणि हे नेहमीचं झालेलं होतं. परंतु दगडफेकीमुळे आत्माराम यांनी आपले गाणे कधीच थांबवले नाही. ते पुन्हा तेवढ्याच त्वेषाने नवनवीन गाणी गायचे. लोकांच्या आत्मसन्मानाला साद घालायचे, अन्यायाविरुध्द लढण्याचे आवाहन करायचे.”
सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या आरोपाखाली अनेक वेळा पोलिसच त्यांचे कार्यक्रम बंद पाडायचे. आत्माराम कधी थांबायचे नाहीत. आत्माराम साळवे यांची सोबत करणारे फुले पिंपळगावचे शाहीर भीमसेन साळवे याबाबतची आठवण सांगताना म्हणतात की, "आत्माराम साळवे यांना बीड जिल्ह्यातून हद्दपार केले होते. आणि एका रात्री बीड जिल्ह्याच्या हद्दीतच साळवे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम होता. कोणीतरी पोलिसांना कळवले. पोलीस आले. आणि त्यांनी कार्यक्रम बंद करावयास लावला. तेव्हा आत्माराम यांनी त्याच गावच्या नदीपलीकडे परंतु जिल्हा हद्दीबाहेर जाऊन नदीच्या काठावर टेंभ्याच्या उजेडात गायला सुरुवात केली. आणि सर्व लोक नदीपात्राच्या अंधारात बसून कार्यक्रम ऐकू लागले. गाणे गाणारा जिल्ह्याच्या हद्दीबाहेर आणि गाणे ऐकणारे जिल्ह्याच्या हद्दीत. त्या मुळे पोलीस हतबल झाले! असा तो मजेशीर प्रसंग होता.” असे अनेक प्रसंग त्यांच्या वाट्याला आले. परंतु त्यांनी कधीच गाणे थांबवले नाही. गाणे हीच त्यांची ऊर्जा होती.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा दोन दशकांहून अधिक काळ चाललेला लढा आत्माराम साळवेंच्या जहाल शाहिरीने झळाळून गेला
मानवी हक्क अभियानाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. एकनाथ आव्हाड यांनी 'जग बदल घालुनी घाव' या आपल्या आत्मचरित्रात आत्माराम साळवे यांच्याबद्दल एक आठवण सांगितली आहे. "आत्माराम साळवेला हद्दपारी झाली होती. नामांतरासाठी लोकभावना भडकवतो, प्रक्षोभक भाषण, शाहिरी करतो म्हणून बीड जिल्ह्यातून तडीपार होता. आत्मारामला जिल्ह्यात यायला बंदी त्यामुळे तो नांदेड जिल्ह्यात गेलेला. पँथरची शाखा स्थापन केल्या केल्या आम्ही आत्मारामचा शाहिरी जलसा आयोजित केला. अंबाजोगाईतील परळी वेस हा परिसर म्हणजे दलितांची मोठी वसाहत. याच ठिकाणी जलसा ठेवला. आत्माराम तडीपार असल्याने या कार्यक्रमावर पोलीस लक्ष ठेवून होते. कदम नावाचे फौजदार त्यांनी आत्मारामला अटक करण्याची तयारी केली. आम्ही फौजदार कदम यांना भेटून ‘कार्यक्रम पार पडू द्या, मग हवं तर अटक करा’ असं सांगितलं. त्यांनी विनंती मान्य केली. आत्मारामने जोरदार गाणी सादर केली. नेहमीप्रमाणे त्याच्या गाण्यांमध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आग्रह होता. फौजदार कदम मान डोलवून कार्यक्रम ऐकत होते. ‘वा! काय जहाल शाहीर आहे!’ असं म्हणत फौजदार कदम यांनी आत्मारामला अशी दाद दिली खरी, पण आत्मारामला अटक करण्याची हालचाल सुरू केली. हे आत्मारामच्या लक्षात आले. आत्मारामने आपल्या जागी दुसऱ्या माणसाला बसवून तो कार्यक्रमामधून मधेच गायब झाला. कार्यक्रम संपल्याबरोबर फौजदार कदम अटक करायला आले पण त्यांना आत्माराम सापडला नाही."
२७ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्र विधिमंडळात मराठवाडा नामांतराचा ठराव पास होताच संपूर्ण मराठवाडा दलितांसाठी 'होलोकॉस्ट' बनला. एका दिवसात दळणवळणाची सर्व साधने बंद करून हजारो दलितांची घरे जाळण्यात आली. काही ठिकाणी लहान मुलं, स्त्रियांसह झोपड्या पेटविण्यात आल्या. नांदेड जिल्ह्यातील सुगाव येथे जनार्दन मवाडे, टेंभुर्णी येथील उपसरपंच पोचीराम कांबळे, परभणी जिल्ह्यातील धामणगाव येथील संभाजी सोमाजी, गोविंद भुरेवार या दलित पोलिस अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली. हजारो दलित जखमी झाले. लाखोची संपत्ती लुटली गेली. शेत जमीन आणि त्यामधील पिके उद्ध्वस्त करण्यात आली. त्यांचे गावातील राशन पाणी बंद करण्यात आले. बहिष्कार टाकला गेला. हजारो लोक गाव सोडून शहरात स्थलांतरित झाले. खाजगी व सार्वजनिक स्वरूपाच्या दीड कोटी रुपयांच्या मालमत्तेचे होळी केली. खेड्यापाड्यातून डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा फोडल्या. मराठवाडा एका जातीय युद्धाची रणभूमी बनला.
मराठवाड्यातील जातीय हिंसा कोणत्या स्तरापर्यंत पोहोचली आहे, क्रूरतेच कोणते स्वरूप घेतले आहे याचे उघडे-नागडे दर्शन घडवणारे गाणे लिहले,
खेडोपाडी भडकला जाळ
नळगीरला जाळली बाळ
जीव घेऊन रानोमाळ
दलितांची झाली पळापळ
जातिवाद्यांनी केला छळ
दलितांना काम नाही, पेटेना चूल
थोडंसं शरीर झिजवा की रं
पेटलेली घरं ती विझवा की रं
पाट रक्ताचे भले वाहू द्या
मला उभं रक्ताने न्हाऊ द्या
अखेरची लढाई लढवा की रं
जरा क्रांतीचे बीज हे रुजवा की रं
हे दलित विरोधी वातावरण काही एका दिवसात बनलेले नव्हते. त्याला निजामाच्या काळापासूनची पार्श्वभूमी होती. निजाम आंदोलनाच्या विरोधात स्वामी रामानंद तीर्थ हे अग्रेसर होते. ते आर्यसमाजी होते. आर्य समाज हा ब्राह्मणी व्यवस्थेच्या जुलमाला कंटाळून वेगळा झाला असला तरी, त्याची सर्व लीडरशिप ब्राह्मणी होती. आणि या लीडरशिपने रझाकार विरोधी आंदोलनात दलितांच्या बाबतीत अनेक पूर्वग्रह पेरून ठेवलेले होते. ‘दलित हे निजामाच्या बाजूचे आहेत’, ‘दलित वस्त्या या रझाकारांच्या छावण्या आहेत’ असा अपप्रचार करून आंबेडकर विरोधी तथाकथित सवर्ण लोकांच्या मनात राग ठासून भरून ठेवलेला होता. त्यामुळे रझाकार पोलीस कारवाईवेळीही दलितांना अशाच अत्याचाराला सामोरे जावे लागले होते. त्यावेळच्या दलित अत्याचाराबाबतचा रिपोर्ट तत्कालीन 'मराठवाडा शेड्युल कास्ट फेडरेशन'चे अध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी डॉ. आंबेडकर व भारत सरकार यांना पाठवला होता.
डॉ. आंबेडकर यांच्यानंतर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली "कसेल त्याची जमीन, नसेल त्याचे काय?" हा जमिनीचा लढा लढला गेला. या लढ्यात मराठवाड्यातील दलित सर्वात जास्त आघाडीवर होता. लाखो स्त्री-पुरुष या लढ्यात तुरुंगात गेले. आणि त्यांनी लाखो हेक्टर जमिनीवर आपल्या उपजीविकेसाठी ताबा मिळवला. हे सरकारी गायरान अतिक्रमण तथाकथित सवर्ण समाजाला आवडले नव्हते. त्याचाही राग त्यांच्या मनात साचून राहिलेला होता. वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्यामधील संघर्षही यामध्ये काम करत होता. तो नामांतराच्या निमित्ताने गावागावात द्वेष आणि हिंसेच्या स्वरूपात अभिव्यक्त होत राहिला. नामांतराच्या काळात ‘विद्यापीठाचा रंग निळा होणार’, ‘डिग्रीवर डॉ. आंबेडकरांचा फोटो येणार’, ‘डॉ. आंबेडकर म्हणतात, आंतरजातीय विवाह करा, तेव्हा शिकलेली ही दलित मुलं आपल्या मुलींना पळवणार’, अशा प्रकारची कथने, अफवा गावागावात पसरवल्या गेल्या.
"मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न हा नवबौद्ध चळवळीच्या सर्वसामान्य दृष्टिकोनाच्या एक भाग असल्याने, त्यांच्या विलगाववादी स्वतंत्र दलित स्थानाच्या मागणीवरून व त्यासाठी बौद्ध धर्म देशाकडून मदत घेण्याच्या व भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्याच्या त्यांच्या भूमिकेवरून स्पष्ट होते व त्यासाठी या बाबतीत स्पष्ट व कणखर भूमिका लवकरात लवकर घेणे आवश्यक आहे" अशा पद्धतीचा ठराव नामांतर विरोधी कृती समितीने लातूरच्या झालेल्या बैठकीत पास करून दलितांना देशापासूनही वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला. नामांतराच्या प्रश्नाला हिंदू विरुद्ध बौद्ध अशी चिथावणी देणारे अनेक पूर्वग्रह पसरवण्यात आले. परिणामत: नामांतर होईपर्यंत आणि त्यानंतरही कायम मराठवाडा धगधगत राहिला. या नामांतर काळात २७ दलितांना शहीद व्हावे लागले.
नामंतर हा केवळ अस्तित्वाचा, अस्मितेचा मुद्दा न राहता, त्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक भावविश्वाचा भाग बनला. अगदी जन्म, लग्न आणि मृत्यूच्या समारंभातही त्याचा परिणाम दिसू लागला. लोक लग्न आणि मृत्यूच्या प्रसंगी "डॉ. आंबेडकरांचा विजय असो! मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झालेच पाहिजे!!" अशा घोषणा देऊ लागले. ही नामांतराची सामाजिक व सांस्कृतिक चेतना घडवण्यात शाहीर आत्माराम साळवे यांची महत्त्वाची भूमिका राहिली.
आत्माराम साळवे यांचे जीवनच आंबेडकरमय आणि नामांतरमय झाले होते. "विद्यापीठाचे नामांतर झाले की मी माझे घर, शेत विकून विद्यापीठाच्या कमानीवर सोन्याच्या अक्षराने आंबेडकरांचे नाव लिहणार" असं ते म्हणायचे. आपल्या आवाजाने, शब्दाने, शाहिरीने प्रबोधनाची मशाल घेऊन अत्याचाराच्या विरोधात, नामांतराचे ध्येय आणि त्यासाठी कष्ट ही दोन पावले घेऊन ते महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात कोणत्याही साधनाशिवाय आयुष्याची दोन दशके सतत फिरत राहिले. औरंगाबादचे डॉ. अशोक गायकवाड शाहिराची आठवण सांगताना म्हणाले की, "माझ्या नांदेड जिल्यातील बोंडगव्हाण या गावी आजही मोटर वाहन येऊ शकत नाही, त्या गावात शाहीर साळवेंनी १९७९ साली येऊन शाहिरीचा कार्यक्रम केला होता. ते आपल्या शाहिरीतून प्रबोधनाचा प्रकाश दाखवत राहिले. आपल्या शाहिरीतून, गाण्यातून दलितांना लढण्याचे बळ द्यायचे. तर जातीयवाद्यांना खुले आव्हान द्यायचे. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात गाणी सुरु केली की माणसं मोहळासारखी जमायची, कानात जीव आणून गाणं ऐकायची, त्याच्या शब्दाने माणसं पेटायची, मेलेली मनं त्वेषाने लढायला तयार व्हायची."
किनवटचे दादाराव कयापाक या बाबतची आठवण सांगताना म्हणतात की, “१९७८ साली गोकुळ-कोंडेगावमध्ये दलितांवर बहिष्कार टाकण्यात आला. त्याला विरोध म्हणून पँथरच्या एस. एम. प्रधान, सुरेश गायकवाड, मनोहर भगत, ॲड. मिलिंद सरपे, दादाराव कयापाक यांनी मोर्चा काढला. गावात १४४ जमावबंदीचे कलम लागू असताना आत्माराम साळवे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम ठेवला गेला. वातावरण तंग झाले. सवर्ण समाजाकडून शाहीर आत्माराम साळवे यांच्यासह पँथरच्या कार्यकर्त्यांच्या अटकेची मागणी केली जाऊ लागली. बंदोबस्ताला हजर असलेले पोलीस अधीक्षक शृंगारवेल आणि पोलीस उपअधीक्षक खान यांना सवर्ण कार्यकर्त्यांनी घेराव घातला. त्यांच्या विश्रामगृहाच्या संरक्षक भितीला आग लावण्यात आली. वातावरण अधिकच प्रक्षुब्ध बनले. शेवटी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यामध्ये कोंग्रेसचे खासदार उत्तमराव राठोड यांचे जवळचे सहकारी जे. नागोराव आणि एक दलित सफाई कामगार अशा दोन लोकांचा मृत्यू झाला."
मानवता, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय यासाठी लढाई, ठिणगी, क्रांती, आग, रण, शस्त्र, तोफ, युद्ध, नवा इतिहास अशा शब्दांनी त्याची गाणी अलंकृत झाली आहेत. परंतु प्रत्यक्ष मैदानातही ते याच जीवनाला सामोरे गेले. त्याच्या प्रत्येक गाण्यात युद्धाची ललकारी असायची.
डागुनी तोफ, घेतली ही झेप
मनूची अवलाद गाडायला
चला नवा इतिहास घडवायला
क्रांतीचे रुजवूनी रोप
बंदुकीची गोळी, आज पेटविल होळी
मनूचा हा किल्ला उडवायला
मनोरंजन, पैसा, प्रसिद्धी किंवा कुठल्या तरी वैयक्तिक स्थानासाठी ते कधीच गायले नाहीत. त्यांच्यासाठी कला तटस्थ किंवा केवळ मनोरंजनासाठी नसून बदलाच्या युद्धातील महत्वाचे हत्यार होती
कलाकार, शाहीर म्हणून ते तटस्थ नव्हते. आणि संकुचित प्रांतवादी ही नव्हते. १९७७ साली बिहारमध्ये बेलचीला दलित हत्याकांड घडले. ते बेलचीला भेट देऊन आले. तिथे आंदोलनही केले. त्यासाठी त्यांना दहा दिवसांचा तुरुंगवासही झाला. बेलची हत्याकांडावर त्यांनी लिहिले,
हिंदू देशात या, बेलचीला इथे
बंधू माझे जळालेले मी पाहिले
आया-बहिणी सवे, लहान बाळे
जीव घेऊन पळालेले मी पाहिले
याच गाण्यात दलित पुढाऱ्यांच्या स्वार्थी आणि तत्त्वहीन राजकारणावरही त्याने आपल्या शब्दांचे शस्त्र चालवलेः
कोणी काँग्रेसची झाली इथे बाहुले
कोणी “जनताला” तनमन वाहिले
वेळ आल्यावर ढोंगी गवई परी
त्या शत्रूशी मिळालेले मी पाहिले
पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देताना एस.सी./एस. टी. या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागे विरोधात गुजरात मध्ये विद्यार्थ्यांच्या अडून आरक्षण विरोधकांनी १९८१ साली गुजरात पेटवला. जाळपोळ, लुटालूट, भोसकाभोसकी, अश्रुधूर, गोळीबार होत राहिला. या सर्वात हल्ल्यांचा रोख दलितांवर होता. अहमदाबादमधील दलित कामगारांच्या वस्त्यांना आगी लावण्यात आल्या. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरात मधील खेडोपाडी सवर्णानी दलितांच्या वस्त्यांवर हल्ले केले. असंख्य दलितांना गाव सोडून स्थलांतरित व्हावे लागले.
त्यावर आत्माराम साळवे लिहितातः
आज राखीव जागेमुळे
दीन-दुबळ्यांना छळता कशाला
लोकशाहीचे पाईक तुम्ही
नीच मार्गाने वळता कशाला
आज गुजरात हे पेटले
देश पेटेल सारा उद्या
हा भडकलेला वणवा
त्या आगीत जळता कशाला!"
आत्माराम साळवे यांनी केवळ मनोरंजनासाठी, पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी किंवा कुठल्यातरी वैयक्तिक स्थानासाठी कधीच गायले नाही. कला ही तटस्थ आणि मनोरंजनासाठी नसून ती सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय बदलाच्या युद्धातील एक महत्वाचे हत्यार आहे. ही त्यांची भूमिका होती. तीनशेपेक्षा अधिक गाणी त्यांनी लिहिली. आज लिखित स्वरूपात दोनशे गाणी उपलब्ध आहेत.
भोकरचे लक्ष्मण हिरे, मरखेलच्या नागरबाई वजरकर, मुखेडचे तेजेराव भद्रे, आणि फुले पिंपळगावचे शाहीर महेंद्र साळवे यांच्या संग्रही असलेली गाणी मिळाली. तर अनेक अर्धवट गाणी लोकांच्या “सार्वजनिक स्मरणात” आहेत. त्या गाण्याचा कर्ता कोण आहे? हे माहीत नाही. पण लोक ती गाणी गुणगुणत राहतात.
आम्ही सारे जयभीम वाले
आमचा सरदार राजा ढाले
त्या काळी प्रत्येक पँथरच्या गळ्यात असणारे दलित पँथरचे 'लीड साँग' आत्माराम साळवे यांनीच लिहिले होते किंवा आजही मराठवाड्यातील जनतेच्या मेंदूत आणि गळ्यात असणारे
क्रांतीच्या या पेरून ठिणग्या
भडकू दे ही आग
कुठवर सोसू आबाळ
ह्रदयी भडकला जाळ
देऊ लागले ढुसण्या आईला
गर्भामधले बाळ
पाहून पुढचा काळ
भीमबाच्या शूर जवाना
येवू दे रे तुला जाग
हे लोकप्रिय गाणंही त्यांचंच. मराठवाडा नामांतर पोवाडाही त्यांनी लिहिला होता. त्यांच्या हस्तलिखित वहीच्या अनुक्रमणिकांमध्ये त्याची नोंद आहे. पण तो आज लिखित स्वरूपात उपलब्ध नाही. त्या पोवाड्याच्या काही ओळी मात्र पुण्यातील आर. पी. आय.चे नेते रोहिदास गायकवाड आणि आंबेडकरी चळवळीचे अनुभवी मिशनरी कार्यकर्ते वसंत साळवे यांनी गाऊन दाखवल्या! बावडा इंदापूर बहिष्कार प्रकरणात त्यांनी पुण्यात येऊन पुण्याच्या अनेक वस्त्यांमध्ये त्यांनी कार्यक्रम केले होते. सामूहिकता आणि संवेदनशीलता हाच त्यांचा गाण्याचा आशय राहिला. ज्या गावात आत्माराम साळवे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम असायचा त्या ठिकाणी आसपासच्या गावचे दलित बांधव भाकरी बांधून अनेक किलोमीटरची वाट तुडवत कार्यक्रमाला यायचे. त्यांच्या शाहिरीनंतर जमलेल्या जमावापुढे पँथरच्या सभा व्हायच्या. तो पँथर आणि नामांतर लढ्याचा "क्राउड पुलर"च बनला होता. नामदेव ढसाळ जसा पँथर काळाचा प्रातिनिधिक कवी आहे तसा आत्माराम पँथर काळाचा प्रातिनिधिक शाहीर आहे. नामदेव जसा कवितेत "पाथ ब्रेकिंग" काही करतो तसा आत्मराम पोस्ट आंबेडकरी चळवळीच्या शाहिरीत करतो. ढसाळांची कविता जशी पँथर काळ समजावून सांगते तशी आत्माराम साळवेची शाहिरीही पँथर काळ समजावून सांगते. नामदेवची कविता जशी जात वर्गाला एकत्र भिडते तशी आत्मारामची शाहिरी एकाच वेळी जात, वर्ग, स्त्री शोषणाला समर्थपणे भिडण्याचा प्रयत्न करते. पँथरचा प्रभाव त्याच्यावर आहे. आणि त्याचा प्रभाव पँथर आणि लोकांवर आहे. याच प्रभावात त्यांनी आपलं उच्च शिक्षण, नोकरी, घर आणि सर्वस्वाचा त्याग करून स्वतःहून निवडलेल्या मार्गाने "निर्भय आणि निस्वार्थपणे" चालत राहिला.
नामदेव ढसाळ जसा पँथर काळाचा प्रातिनिधिक कवी आहे तसा आत्माराम पँथर काळाचा प्रातिनिधिक शाहीर आहे
आत्माराम साळवे यांचे दोन दशकाहून अधिक काळ मित्र राहिलेले आमदार विवेक पंडित म्हणतात, "भीती आणि स्वार्थ हे दोन शब्द आत्मारामच्या शब्दकोशात कधीच नव्हते." आवाज आणि शब्दावर जशी त्याची हुकमत होती. तशी त्याची ज्ञानावरही हुकुमत होती. मराठी भाषेबरोबरच त्याची हिंदी, उर्दू, आणि इंग्रजीवरही हुकमत होती. त्याने आपल्या काही रचना हिंदी आणि ऊर्दूमध्येही केल्या आहेत. त्याने काही हिंदी कव्वाली लिहल्या आणि गायल्या. पण आपली कला कधीच बाजारू बनवली नाही, तिला कधी बाजारात आणले नाही. आपल्या कलेला, शब्दाला आणि आपल्या पहाडी आवाजाला शस्त्र बनवून "जात-वर्ग- स्त्री"अत्याचाराच्या विरोधात एक सैनिक म्हणून तो उतरला, आणि आपल्या मृत्यूपर्यंत भूमिका घेत एकाएकी लढत राहीला.
कुटुंब, चळवळ आणि व्यवसाय ही व्यक्तीची मानसिक आधाराची केंद्रं असतात. या सगळ्याची सांगड घालत कार्यकर्ता, जनेतचे कलावंत यांच्या जगण्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत, त्यांच्या जीवनात पोकळी निर्माण होणार नाही अशा पद्धतीने चळवळीने एक पर्यायी अवकाश निर्माण करण्याची गरज असते.
चळवळीचा कार्यकर्ता, कलाकार मानसिक दृष्ट्या कधीही नैराश्यात जाणार नाहीत किंवा अश्या नैराश्यातून बाहेर काढणारी आधारव्यवस्था राहील असे रचनात्मक आणि संस्थात्मक काम आंबेडकर चळवळीत झाले नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे आत्माराम साळवे सारख्या कलाकाराचे जे व्हायचे तेच झाले!
आयुष्याच्या उत्तरार्धात तो या तीनही पातळीवर निराश झाला. कुटुंब, चळवळ यापासून तुटला. व्यसनाधीनता वाढली होती. शेवटच्या काळात तो भ्रमिष्टासारखे कुठेही आणि कोणीही गाणे म्हण म्हटले की भर रस्त्यावर, चौकात, कुठेही शाहिराची पोझ घेऊन गाणे म्हणायचा! याच व्यसनाधीनतेत नामांतरासाठी प्रचंड आग्रही आणि त्यासाठी राबलेला हा शाहीर विद्यापीठाचे नामांतर झाल्यानंतर सुवर्ण अक्षराने विद्यापीठाच्या कमानीवर नवीन नाव न लिहताच १९९१ साली शहीद झाला!
हा लेख लिहिताना आत्मराम साळवे यांची गाणी, त्यांच्या व्यक्तिगत आठवणी सांगणाऱ्या भोकरचे लक्ष्मण हिरे, नांदेडचे राहुल प्रधान आणि दयानंद कनकदांडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.
हा लेख आणि चित्रफिती 'Influential Shahirs, Narratives from Marathwada’ ( मार्गदर्शक शाहीर, मराठवाड्याची गीते-कथने) या मालिकेतील असून इंडिया फौंडेशन फॉर द आर्ट्स तर्फे राबवण्यात येणाऱ्या संग्रह व वस्तूसंग्रह कार्यक्रमाचा भाग आहेत. पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियासोबत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पास गोइथ इन्स्टिट्यूट/मॅक्स मुलर भवन दिल्ली यांचे आंशिक अर्थसहाय्य लाभले आहे.