पूर्ण पीपीई वेशात जणू काही परग्रहावरून आल्यासारखे ते साउथ २४ परगणामधल्या त्याच्या गावी आले. “जनावर पकडावं तसं ते मला धरायला आले,” हरणचंद्र दास सांगतो. त्याचे मित्र त्याला हरू म्हणतात – पण ते काही आता त्याला आपले मित्र वाटत नाहीत. इतक्यात त्यांनी त्याला वाळीत टाकायला सुरुवात केलीये. “लोक माझ्या कुटुंबाला किराणा माल आणि दूध देत नाहीत. आमचा किती तरी प्रकारे छळ मांडलाय रात्र रात्र आमचा डोळ्याला डोळा लागत नाही. आमचे सगळे शेजारी आम्हाला घाबरायला लागलेत.” हरणचंद्र यांना कोविडची लागण झाली नसल्याचा अहवाल असला तरीही.
त्याचा गुन्हाः तो एका रुग्णालयात काम करतो. आणि बहुतेक आरोग्य कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. कुणास ठाऊक त्याला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या जिल्ह्याच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही त्याला संसर्ग झाल्याची शंका असावी.
“सगळ्यांना हीच भीती होती, का तर मी हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि त्यामुळे मला लागण झालीच असणार,” तो म्हणतो.
तिशी पार केलेला हरणचंद्र कोलकात्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ (आयसीएच) मध्ये काम करतो. एका सेवाभावी संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या या रुग्णालयात शहरातल्या तसंच ग्रामीण आणि उपनगरातल्या बालकांवर उपचार केले जातात. १९५६ साली सुरु करण्यात आलेलं हे भारतातलं पहिलं बाल रुग्णालय आहे. पार्क सर्कस भागात असलेल्या २२० खाटांच्या आपल्या बालकांना पालक घेऊन येतात कारण असे उपचार इतर कुठेही, इतक्या परवडणाऱ्या दरात त्यांना मिळत नाहीत.
कोविड-१९ आणि टाळेबंदीमुळे मात्र त्यांना आयसीएचला पोचणंही मुश्किल होऊन गेलं आहे. “इथे पोचणंच अवघड झालंय,” साउथ २४ परगण्यातून इथे नुकताच पोचलेला रतन बिस्वास सांगतो. “मी एका पानमळ्यात रोजंदारीने काम करत होतो. [मे २०२० मध्ये आलेल्या] अम्फान वादळामुळे पानमळा उद्ध्वस्त झाला आणि माझी कमाई बंद पडली. माझ्या धाकट्या मुलाच्या कानामागे काही तरी संसर्ग झालाय म्हणून आम्ही त्याला इथे घेऊन आलोय. रेल्वे बंद आहेत, त्यामुळे इथे पोचणं मुश्किल झालंय.” बिस्वास सारखे लोक मग, रिक्षा, बस आणि बरंचसं अंतर पायी चालत रुग्णालयात येतात.
आयसीएचमधल्या डॉक्टरांना इतरही अनेक समस्यांची चाहुल लागलीये.
सध्या तरी रक्ताचा तुटवडा नाही, मात्र तो निर्माण होऊ शकतो असं रक्तशास्त्र विभागाचे डॉ. तारक नाथ मुखर्जी सांगतात. “टाळेबंदीमध्ये रक्तदान शिबिरांची संख्या कमी झालीये. एरवी, दर महिन्यात [दक्षिण बंगालमध्ये] दर महिन्याला किमान ६० ते ७० शिबिरं होतात. पण गेल्या चार महिन्यात मिळून ६० शिबिरं झालीयेत. आता पुढे जाऊन याचा थॅलिसेमिया रुग्णांना याचा फटका बसणार आहे, तेही खास करून ग्रामीण भागातल्या.”
“बालकांसाठीच्या आरोग्यसेवांसमोर कोविड-१९ ने फार मोठं संकट उभं केलं आहे,” या रुग्णालयात इम्युनॉलॉजी तज्ज्ञ असणाऱ्या डॉ. रीना घोष सांगतात. “टाळेबंदी लागली आणि ग्रामीण आणि शहरी, दोन्ही भागातली अनेक आरोग्य आणि लसीकरण शिबिरं रद्द करावी लागली. मला तर अशी भीती आहे की येत्या काही वर्षांत न्यूमोनिया, गोवर, कांजिण्या आणि डांग्या खोकल्याच्या रुग्णांची संख्या आपल्याला वाढलेली दिसेल. आणि आपण जरी पोलिओचं भारतातून उच्चाटन केलेलं असलं तरी तोही परत एकदा डोकं वर काढू शकेल.
“लसीकरणाचं काम विस्कळीत झालंय कारण सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविडच्या कामी घेतलंय. त्यामुळे संपूर्ण लसीकरणाच्या मोहिमेलाच खीळ बसलीये.”
रुग्णालयातल्या गरजू बालकांकडे पाहिलं की त्यांचं निरीक्षण किती चिंताजनक आहे ते लक्षात येतं. सर्वात जास्त बालरुग्ण १२-१४ या वयोगटातले असले तरी अनेक जण त्याहूनही खूप लहान आहेत.
“माझ्या बाळाला ल्युकिमिया (रक्ताचा कर्करोग) आहे आणि केमोथेरपीच्या किती तरी तारखा चुकल्या आहेत,” निर्मल मोंडोल सांगते (नाव बदललं आहे). ती पूर्व मिदनापूरच्या एका गावातली रहिवासी आहे. “रेल्वेगाड्या बंद आहेत आणि मला गाडीचं भाडं परवडणारं नाही,” ती म्हणते. न येण्याचं आणखी एक कारण म्हणजे “त्याच्या उपचारांसाठी आम्ही हॉस्पिटलला आलो तर आम्हालाही करोनाव्हायरस गाठेल,” ही भीती.
“कोविडचा बालकांवर काय परिणाम झालाय ते थेट दिसून येत नाहीये, आणि मुलंही बहुतेक करून लक्षणविरहित असल्याचं दिसतंय,” आयसीएचचे बाल आरोग्य विशेषज्ञ, डॉ. प्रभास प्रसून गिरी सांगतात. “पण कधी कधी आम्हाला त्यांच्यापैकी काही जणांना कोविडची लागण झाल्याचं दिसून येतं – आणि ते खरं तर वेगळ्याच कारणासाठी दवाखान्यात आलेले असतात. श्वासाचा त्रास असणाऱ्या मुलांसाठी आमच्याकडे स्वतंत्र अलगीकरण कक्ष आहे.”
पण कसंय, डॉक्टरांनाही या आजाराभोवती असणाऱ्या कलंकाची झळ बसली आहे. डॉ. तारक नाथ मुखर्जी यांच्या पलिकडे उभ्या असलेल्या सोमा बिस्वास (नाव बदललं आहे) सांगतातः “माझे पती [दुसऱ्या रुग्णालयात] डॉक्टर आहेत आणि मी इथे कामाला आहे. सध्या आम्ही माझ्या वडलांच्या घरी राहतोय. आमचे शेजारी आक्षेप घेतील या भीतीमुळे आम्हाला आमच्या स्वतःच्या घरीदेखील जाता येत नाहीये.”
अगदी सुरुवातीला, १८ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने असा इशारा दिला होता की “आजाराची भीती आणि त्याभोवतीचा कलंक यामुळे दुर्दैवाची बाब म्हणजे काही आरोग्य कर्मचाऱ्यांना कुटुंबाकडून किंवा त्यांच्या आप्तेष्टांकडून नाकारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच आव्हानात्मक असलेली परिस्थिती आणखीच बिकट होऊ शकते.”
इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे अनुभव ऐकले की हा इशारा अनाठायी नव्हता हे पटतं.
आयसीएचमध्ये काम करणाऱ्यांच्या घरी कायमच काही समस्या येत असतात. आजही त्यांच्यातले काही जवळपासच्या खेड्यांमधून येतात, त्यांचा खडतर प्रवास आणि आता तर त्यांच्या कामामुळे होणारी अवहेलना या सगळ्याचे परिणाम विदारक आहेत.
या सगळ्या विचित्र परिस्थितीमुळे जिथे एकीकडे रुग्णालयात खाटा ओस पडल्या आहेत, रुग्णांची संख्या कमी झालीये, तिथेच ताण मात्र प्रचंड आहे. सध्या, रुग्णालायचे एक व्यवस्थापक सांगतात, “एरवी ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग)मध्ये रोज ३०० रुग्ण येतात, सध्या फक्त ६० आहेत – ८० टक्के घट. दाखल झालेल्या रुग्णांची संख्या २२० वरून ९० वर आलीये, म्हणजे ६० टक्क्यांची घट. पण,” ते पुढे म्हणतात, “आम्हाला ४० टक्के कर्मचाऱ्यांवर भागवावं लागत आहे.”
रुग्णालयाची कर्मचाऱ्यांची पूर्ण क्षमता ४५० आहे, यात २०० परिचारिका, ६१ वॉर्ड मदतनीस, ५६ सफाई कर्मचारी आणि इतर विभागातले १३३ कर्मचारी. रुग्णालयात विविध स्तरावर काम करणारे २५० डॉक्टर आहेत. त्यातले ४०-४५ रुग्णालयात पूर्णवेळ काम करणारे तर १५-२० डॉक्टर दररोज कन्सल्टंट म्हणून काम करतात. बाकीचे शल्यचिकित्सक, (संलग्न वैद्यकीय रुग्णालयात) प्राध्यापक आणि बाह्य रुग्ण विभागात सेवाभावी भूमिकेत काम करतात.
टाळेबंदीमुळे या सगळ्यांसमोरच अडचणी उभ्या केल्या आहेत. इथल्या उप कार्यकारी अधिकारी असणाऱ्या आराधना घोष चौधुरी नमूद करतात, “रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा, वेगवेगळ्या कामांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक, हे सगळंच आता अवघड होतंय. अनेक कर्मचारी एक तर पोचू शकत नाहीयेत किंवा घरी परतू शकत नाहीयेत कारण रेल्वे नाहीत आणि बससेवाही बंद आहे.” काही आरोग्य कर्मचारी रुग्णालयाच्याच आवारात मुक्काम करतायत तर काही जण जे आपापल्या गावी घरी होते त्यांनी “लोकांकडून होणारी अवहेलना टाळण्यासाठी” कामावर न येण्याचं ठरवलंय.
रुग्णालयाला आता आर्थिक संकटाचाही सामना करावा लागतोय. आयसीएच ना-नफा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. इथले डॉक्टर शुल्क घेत नाहीत आणि इतर काही अगदी माफक शुल्क घेतात. (अनेकदा गरीब रुग्णांकडून रुग्णालय कसलंच शुल्क घेत नाही.) आता खाटाच ओस पडल्याने आणि ओपीडीतल्या रुग्णांची संख्या घटल्याने होता तो तुटपुंजा स्रोतही आटला आहे. पण दुसरीकडे कोविडमुळे रुग्णालयाचा खर्च सध्याच्या खर्चाच्या १५ टक्क्यांनी वाढला आहे.
“यात स्वच्छता, पीपीई आणि कोविडसंबंधी इतर खर्चांचा समावेश होतो,” अनुराधा घोष चौधुरी सांगतात. या खर्चाची जुळवाजुळव रुग्णांकडून करणं शक्य नाही कारण, “आमचे बहुतेक रुग्ण ग्रामीण आणि उपनगरातले दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबांमधले आहेत. त्यांना हे कसं परवडेल?” त्यांची जी काही तुटपुंजी कमाई होती तीही या टाळेबंदीमुळे हिरावून घेतलीये. “कधी कधी तर सध्या जो खर्च वाढलाय तो डॉक्टर स्वतः आपल्या खिशातून करतायत. सध्या तरी आम्ही देणग्यांमधून खर्च भागवतोय, पण फार काळ काही यावर आमचं भागणार नाहीये.”
इतक्या सगळ्या वर्षांमध्ये रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आलेलं अपयश आता आमच्या मानगुटीवर बसलंय असं आयसीएचचे उपसंचालक डॉ. अरुणलोक भट्टाचार्य सांगतात. आणि या सगळ्या संघर्षात, ते म्हणतात, “खरी झळ पोचते ती आघाडीचे आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांना.”