“मला आठवतंय वरच्या छपरातून उंदीर खाली घरात पडायचे आणि मरायचे. आजवर तितकं अभद्र मी काही पाहिलेलं नाही. आज तुम्हाला हसू येईल पण छपरातनं उंदरं पडणं म्हणजे घर सोडायचं इतकंच आम्हाला कळत होतं. परत कधी येणार, माहित नाही.”
तेव्हाच्या स्मृती इतक्या जिवंतपणे सांगणाऱ्या या आहेत ए. कुळंधइअम्माल. कोइम्बतोरच्या कळपट्टीच्या रहिवासी. आज ऐंशी वर्षं पार केलेल्या अम्मल तेव्हा नुकत्याच किशोरवयात आल्या होत्या. तेव्हा म्हणजे १९४० च्या दशकाची पहाट होत होती तेव्हा. तमिळ नाडूच्या या शहराला तेव्हा बसलेला प्लेगचा विळखा शेवटचा.
कोइम्बतोर शहराला साथींनी - अगदी देवीपासून ते प्लेग आणि कॉलरापर्यंत- ग्रासल्याच्या या नकोशा काही आठवणी आहेत. अशा साथींनंतर या भागात एक विशिष्ट अशी प्रथा सुरू झाली. राज्याच्या इतरही भागात हे घडलं, पण कोइम्बतोरमध्ये खचित अधिकच. ‘प्लेग मारिअम्मन’ म्हणून ओळखली जाणारी मंदिरं (ही ‘ब्लॅक मारिअम्मन’ म्हणूनही ओळखली जातात). या शहरात अशी किमान सोळा मंदिरं आहेत.
आणि अर्थातच कोविड-१९ ची साथ आल्यावर एक ‘करोना देवी’ मंदिरही उभं राहिलंय. पण आजही प्लेग मारिअम्मनकडेच लोकांचा ओढा जास्त आहे. शेजारच्या तिरुप्पुर जिल्ह्यात देखील अशी काही देवळं आहेत आणि तिथेही काही उत्सव होतात, भाविक येतात.
१९०३ ते १९४२ या काळात कोइम्बतोरमध्ये किमान १० वेळा प्लेगची साथ आल्याच्या नोंदी आहेत. या साथींनी हजारो लोकांचा बळी घेतला. प्लेगने इथून काढता पाय घेतला असला तरी आज इतक्या वर्षांनंतरही लोकांच्या स्मृतीतून मात्र तो गेलेला नाही. कुळंधइअम्माल यांच्यासारख्या ज्येष्ठांना आजही प्लेगचा उल्लेख केला असता गतकाळात या शहराने काय भोगलं त्या कडुजार आठवणींनी अंगावर शहारा येतो.
टाउन हॉल परिसरातलं प्लेग मारिअम्मन मंदीर यातलं सगळ्यात प्रसिद्ध आहे. या देवळाबाहेर फुलं विकणारी कन्नम्मल संध्याकाळच्या तयारीत मग्न आहे. “आज शुक्रवार आहे. भरपूर भाविक येणार,” चाळिशीची कन्नम्मल सांगते. तिचं लक्ष हातांवर, कारण हार तयार करणारे हात बोलतनाही थांबलेले नाहीत.
“तिची शक्ती तुम्हाला माहित नाहीये. आता करोना देवीचं देऊळ बांधा नाही तर काहीही करा, ब्लॅक मारिअम्मन आमची स्वतःची आहे. आम्ही तिचीच पूजा करणार. आजारी पडल्यावर तर करणारच. पण एरवीसुद्धा.” 'एरवी' म्हणजे भाविक नेहमी ज्या कारणांसाठी देवीचा धावा करतात तेव्हा – सुखसमृद्धी येऊ दे, यश मिळू दे आणि दीर्घायुष्य लाभू दे. कन्नम्मलचा जन्म झाला तेव्हा प्लेगचा काळ जाऊन चाळीस वर्षं उलटली होती. पण तिच्या पिढीचे अनेक जण आजही मारिअम्मनची कृपा रहावी म्हणून या देवळांमध्ये गर्दी करतात.
प्लेगने या भागावर अशी काही अमिट छाप सोडली आहे की कोइम्बतोरचा सांस्कृतिक इतिहास प्लेगविना पूर्ण होऊ शकत नाही. “या शहराचे मूळ रहिवासी प्लेगने केलेल्या विध्वंसाचे केवळ साक्षीदार नव्हते. ते त्याचे बळी होते. तुम्हाला इथे असं एकही कुटुंब सापडणार नाही, ज्यांना प्लेगचा प्रसाद मिळालेला नाही,” कोइम्बतोर स्थित लेखक सी. आर. एलंगोवन सांगतात.
१९६१ सालच्या जिल्हा जनगणना माहितीपुस्तकातील नोंदींनुसार कोइम्बतोर शहरात प्लेगच्या वेगवेगळ्या साथीत १९०९ साली ५,५८२ आणि १९२० साली ३,८६९ मृत्यू झाले. इतर अहवाल सांगतात की १९११ साली प्लेगची साथ येऊन गेली आणि कोइम्बतोर शहराची लोकसंख्या ४७,००० वर घसरली. १९०१ साली या शहराची लोकसंख्या ५३,००० होती. प्लेगच्या साथी खरंच जीवघेण्या होत्या.
एलंगोवन सांगतात की त्यांचं स्वतःचं कुटुंब कोइम्बतोर सोडून काही काळ “जंगलात राहिलं” होतं. “जिवाला धोका नाही” अशी खात्री पटत नाही तोपर्यंत शहरात परतणं अशक्य होतं. ही खात्री कशामुळे पटत होती, परतण्याची आशा कशातून तयार होत होती? आज अतर्क्य वाटेल अशी एक गोष्ट होती.
“तेव्हाच्या काळोखात, कुठलीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना लोक देवाकडे वळले,” पी. सिव कुमार सांगतात. ते कोइम्बतोर स्थित कीटकशास्त्रज्ञ असून जिल्ह्याच्या संस्कृतीवर्णनात, मानववंश अभ्यासात त्यांना रस आहे.
मनातल्या या आशेला भय आणि दुःखाची किनार होती. १९२७ साल होतं. प्लेगची साथ जोरावर होती. याच काळात बर्ट्रांड रसेल म्हणतात की धर्म “मुळात आणि प्रामुख्याने भयावर आधारित होता. एकीकडे अज्ञाताची दहशत होती आणि दुसरीकडे कुठल्याही संकटात तुमच्या पाठीशी उभा राहील असा कुणी थोरला भाऊ असावा ही सुप्त इच्छा होती. या दोहोंचा तो मिलाफ होता.”
अशा विविध कारणांचा परिपाक म्हणजे या देवीची १६ देवळं. आणि या देवीचं नावसुद्धा बदललं बरं का. “लोक प्लेग मारिअम्मनचा उल्लेख ब्लॅक मारिअम्मन असा करायला लागले,” एलंगोवन सांगतात. “तसंही तमिळमध्ये मारि म्हणजे काळा, त्यामुळे हा बदल अगदी सहज रुळला.”
कालांतराने प्लेग काळाच्या पडद्याआड गेला पण एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे आलेल्या त्या आजाराच्या आठवणी मात्र विविध पद्धतीने व्यक्त होत राहिल्या.
“मला आठवतंय, मी कधीही आजारी पडले तरी माझे आई-वडील मला देवळात घेऊन जायचे,” कोइम्बतोरची रहिवासी, ३२ वर्षीय निखिला सी. सांगते. “माझी आजी अगदी नेमाने देवळात जायची. देवळातल्या पवित्र पाण्यामुळे माझा आजार बरा होईल असं माझ्या आई-वडलांना वाटायचं. ते देवळात पूजा करायचे. आज माझी मुलगी आजारी पडली तर मी देखील तेच करते. मी तिला तिकडे घेऊन जाते आणि देवीची पूजा करते. तिथलं पवित्र पाणी तिला देते. माझे आई-वडील जितके नेमाने जायचे तितकी मी जात नाही, पण मी जाते. मी शहराची आहे ना, त्यामुळे या गोष्टी आपसूक येतात.”
*****
“इथल्या देवळात पुजारी म्हणून काम करणारी माझी चौथी पिढी आहे. आजही कांजिण्या किंवा त्वचेचे काही आजार झाले, कोविड-१९ किंवा इतर काही विषाणूजन्य आजार झाले तर उपाय म्हणून इथे देवळात येतात,” ४२ वर्षीय एम. राजेश कुमार सांगतात. ते टाउन हॉल परिसरातल्या प्लेग मारिअम्मन देवळात पुजारी आहेत. “ही देवी अशा आजारांपासून तुमचं संरक्षण करते, ते आजार पळवून लावते असं मानलं जातं.”
“१५० वर्षं झाली, हे देऊळ इथेच आहे. कोइम्बतोरमध्ये प्लेग आला [१९०३-१९४२], तेव्हा माझ्या खापर पणजोबांनी इथे प्लेग मारिअम्मनची मूर्ती बसवायचा निर्णय घेतला. आणि त्यांच्यानंतर माझे आजोबा आणि माझ्या वडलांनी तिचे पूजापाठ केले. आज मी करतोय. तेव्हापासून या देवीच्या अधिपत्याखाली असलेल्या कोणत्याही भागात प्लेगचा शिरकाव झालेला नाही. आणि त्यामुळेच लोकांचा विश्वासही दुणावला आहे.”
कोइम्बतोरच्या साईबाबा कॉलनीतल्या देवळाची देखील अशीच काहीशी कथा आहे. “हे देऊळ पार १५० वर्षांपूर्वी बांधलं गेलंय,” ६३ वर्षीय व्ही. जी. राजसेकरन सांगतात. ते या परिसरातल्या प्लेग मारिअम्मन देवळाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत. प्लेगची साथ आली आणि हे देऊळ बांधलं गेलं.
गंमतीचा भाग हा की ही दोन्ही देवळं आणि अशीच इतर अनेक मंदिरं आधीपासूनच मारिअम्मनची देवळं होती. तिला वेगळ्या रुपात किंवा अवतारात पूजलं जात होतं. पण या भागात प्लेगची साथ पसरली आणि तिने लोक मरायला लागले. तेव्हा आधीच्या मूर्तीशेजारी दगडात कोरलेल्या नव्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या गेल्या. ही होती प्लेग मारिअम्मन.
राजसेकरन आज ज्या देवळात पुजारी आहेत ते उभारल्यानंतर तीस एक वर्षांनी प्लेगची साथ आली होती. ते सांगतात, “प्रत्येक घरातले किमान पाच ते सहा जण साथीत मरण पावले होते. घरची लोकं जायला लागली किंवा प्लेग जास्त पसरायला लागला तेव्हा बाकीची लोकं घर सोडून निघून गेली. पुढचे चार पाच महिने तरी ती मंडळी परतू शकली नाहीत.”
साईबाबा कॉलनीचा भाग तेव्हा एक छोटं खेडं होतं. तिथल्या रहिवाशांनी प्लेगपासून रक्षण करण्यासाठी एका वेगळ्या देवीची मूर्ती तयार केली आणि तिचं नाव त्यांनी प्लेग मारिअम्मन असं ठेवलं. “आमच्या घरात दोघांचा मृत्यू झाला होता. माझा चुलता आजारी पडला तेव्हा माझ्या आजीनी त्याला इथे देवळात आणलं आणि प्लेग मारिअम्मनच्या पायावर घातलं. त्याच्या अंगाला कडुनिंब आणि हळदीचा लेप लावला. तो बरा झाला.”
तेव्हापासून या आणि आसपासच्या इतरही गावातल्या (जी आता कोइम्बतोर शहराचा भाग आहेत) लोकांची श्रद्धा तयार झाली की मारिअम्मनची पूजा केली तर प्लेगपासून त्यांचा जीव वाचणार.
एलंगोवन म्हणतात की कदाचित याच कारणामुळे या भागात प्लेग मारिअम्मनची इतकी जास्त देवळं बांधली असावीत, आणि तीही इतक्या जवळ जवळ. “साईबाबा कॉलनी, पीलामीडु, पाप्पनाइकेनपालयम, टाउन हॉल आणि इतरही भाग शंभर वर्षापूर्वी वेगवेगळी गावं होते. आणि आज सगळी गावं कोइम्बतोर शहरात आलीयेत.”
तमिळ सांस्कृतिक इतिहासाचा मागोवा घेणारे लेखक, स्टालिन राजंगम म्हणतात की प्लेग मारिअम्मनची आराधना “ज्या आजाराने एवढा हैदोस घातला त्यावरची अगदी नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. या श्रद्धेमागचा विचार काय आहे? तर तुमच्यासमोर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी, तुमच्या चिंता दूर व्हाव्यात यासाठी तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा. आणि मानवजातीवरचं सगळ्यात मोठं संकट म्हणजे आजारपण. आणि त्यामुळेच देवावरच्या श्रद्धेचा मोठा भाग आजारांभोवती गुंफलेला आहे.”
“ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मामध्ये देखील आपल्याला हेच दिसतं,” राजंगम सांगतात. “लहान मुलं आजारी पडली तर त्यांना दर्ग्याला घेऊन जातात. ख्रिश्चन धर्मातही आम्ही आरोग्य मादाची (आरोग्य माता) पूजा करतो. बौद्ध भिख्खु देखील वैद्यकीय उपचार करायचे हे सर्वश्रुत आहे. तमिळ नाडूमध्ये आमच्याकडे सिद्धर होते, वैद्यकीय उपचारांची सुरुवात त्यांच्यापासून झाली. त्यातूनच सिद्ध ही वैद्यक परंपरा आपल्याकडे उदयाला आली आहे.”
तमिळ नाडूच्या जवळ जवळ प्रत्येक गावात मारिअम्मनचं देऊळ आहे. काही भागात तिचं नाव कदाचित वेगळं असू शकेल, पण तिची देवळं मात्र आहेत. एखादी देवता, तिचा कोप किंवा आजार बरा करण्याची तिची शक्ती हा विश्वास काही एका धर्मापुरता किंवा एका देशापुरता सीमित नाहीये. आणि जगभरातले तज्ज्ञ गेल्या काही दशकांपासून प्लेग किंवा तत्सम साथींवरच्या धार्मिक उपायांची किंवा प्रतिक्रियांची जास्त गांभीर्याने दखल घेऊ लागले आहेत.
ड्वेन जे ऑशेम या इतिहासकाराने २००८ साली प्रकाशित झालेल्या ‘ रिलीजन अँड एपिडेमिक डिसीझ ’ (धर्म आणि साथरोग) या आपल्या निबंधामध्ये म्हटलं आहे की, “एखाद्या साथरोगाला धर्माच्या पातळीवर विशिष्ट, एका प्रकारचीच प्रतिक्रिया येईल असं काहीही सांगता येत नाही. किंवा अशी प्रतिक्रिया विनाशकारीच असेल असंही आपण म्हणू शकत नाही. लिंगभाव, वर्ग किंवा वंश या संकल्पनांप्रमाणेच धर्म हा देखील विश्लेषणाचा एक प्रवर्ग असू शकतो या प्रकारे आपण विचार केलेला जास्त चांगला. साथरोगांना मिळणाऱ्या धार्मिक प्रतिसादांकडे आपण एखाद्या चौकटीप्रमाणे पाहू. ही चौकट सातत्याने बदलते. मानवजातीवर परिणाम करणारे आजार आणि त्यांना मिळालेला मानवी प्रतिसाद याचा अभ्यास करण्यासाठी ही चौकट आपल्याला मदत करू शकेल.”
*****
दर वर्षी भरणारे अम्मन थिरुविळा (मारिअम्मनचे उत्सव किंवा जत्रा) आजही तमिळ नाडूमध्ये सर्रास आढळून येतात. आणि आजही सार्वजनिक आरोग्य आणि धार्मिक श्रद्धा यांच्यामध्ये काय नातं आहे हे समजून घेण्याची गरज हे उत्सव अधोरेखित करतायत, स्टालिन राजंगम सांगतात. आदि या तमिळ महिन्यामध्ये (जुलैच्या मध्यापासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत) राज्यभरातल्या अम्मनच्या देवळांमध्ये हे उत्सव भरतात.
“या आधीचे तीन महिने – चिथरई, वैगसी व आणि [एप्रिल मध्य ते मे-मध्य, मे मध्य-जून मध्य आणि जून-मध्य ते जुलै-मध्य] तमिळ नाडूमध्ये प्रचंड उष्मा असतो,” राजंगम सांगतात. “जमिन शुष्क असते आणि शरीरातही शुष्कता आलेली असते. या कोरडेपणामुळे या काळात अम्मई (कांजिण्या/देवी) नावाचा आजार येतो. आणि या दोन्हीवरचा उपाय म्हणजे थंडावा. थिरुविळ उत्सवांमध्ये हेच केलं जातं.”
खरं तर मुथु मारिअम्मनची भक्ती (याच देवतेचा आणखी एक अवतार) म्हणजे कांजिण्या आणि देवीसारख्या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठीची आराधना आहे. “या आजारांमध्ये त्वचेवर फोड आणि पुटकुळ्या येतात आणि म्हणूनच या देवीचं नाव आहे, मुथु मारिअम्मन. तमिळमध्ये मुथुचा अर्थ होतो, मोती. कांजिण्यांसारख्या आजारांवर वैद्यकामध्ये शोध लागून प्रगत उपचार उपलब्ध आहेत. तरीही या देवळांची गर्दी हटलेली नाही.”
या उत्सवांमध्ये जे रिवाज आहेत त्यांचं शास्त्रीय मूल्य नसलं तरी वैद्यकीय मोल तपासून पहायला हवं. “एकदा का थिरुविळाची घोषणा झाली की एक प्रथा पाळायला लागते, कापु कट्टुथल . यामध्ये गावातलं कुणीही वेस ओलांडून बाहेर जाऊ शकत नाही. लोकांना आपापल्या घरात, गल्लीत आणि गावात स्वच्छता ठेवावी लागते. अशा उत्सवांमध्ये जंतुनाशक मानला गेलेला कडुनिंबाचा पाला मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.”
कोविड-१९ बद्दल शास्त्रज्ञ मंडळींना फारसं काही उमगलं नव्हतं तेव्हा देखील जी नियमावली जाहीर झाली होती ती अशीच काहीशी होती, राजंगम म्हणतात. “एकमेकांपासून अंतर राखणे आणि स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना होत्या. कोविड आला तेव्हा लोकांना नक्की काय करायचं ते समजलं नसल्यामुळे कधी कधी तर लोकांनी कडुनिंबाचा पाला वापरल्याचंही दिसून आलं आहे.”
विलगीकरण आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारचं जंतुनाशक वापरण्याची कल्पना सार्वत्रिक आहे. कोविडची साथ पसरल्यावर ओडिशातल्या अधिकाऱ्यांनी विलगीकरण आणि एकमेकांपासून अंतर राखण्याचं महत्त्व लोकांच्या गळी उतरवण्यासाठी पुरीच्या जगन्नाथाचं उदाहरण लोकांपुढे ठेवलं. दर वर्षी येणाऱ्या रथयात्रेच्या आधी जगन्नाथ अनासार घरा मध्ये (विलगीकरण खोली) स्वतःला बंद करून घेतो त्याकडे लक्ष वेधून घेण्यात आलं .
एखादी देवी-देवता आजार पळवून लावते ही कल्पना सगळ्याच ठिकाणी आढळत असल्यामुळे “कर्नाटकातलं एक अम्मन देऊळ एड्सवर उपायांसाठी प्रसिद्ध आहे,” एस. पेरुनदेवी सांगतात. त्या न्यू यॉर्कच्या सिएना विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक असून लेखक आहेत.
त्या पुढे म्हणतात की मारिअम्मनची आराधना “ही सर्वांगीण संकल्पना आहे... खरं तर तमिळ भाषेत मारि म्हणजे पाऊस. मुलइपरीसारख्या (एक शेतीसंबंधी सण) काही प्रथांमध्ये मारिअम्मनची पूजा पिकांच्या रुपात बांधली जाते. काही वेळा ती रत्नांच्या रुपात पूजली जाते. आजार निर्माण करणारी, स्वतःच आजार असलेली आणि आजारावरती उपाय अशा सगळ्या रुपात मारिअम्मन आपल्याला भेटते. आणि प्लेगबाबतही हे असंच घडलेलं आहे.” पण या आजाराला फार गोंजारू नका असा इशारा पेरुनदेवी देतात. “मारिअम्मनची लोककथा काय सांगते तर एखाद्या आजाराकडे आयुष्याचा एक भाग म्हणून पहा आणि त्याच्यावर उपाय शोधा,” त्या म्हणतात.
*****
तर, मारिअम्मन नक्की आहे तरी कोण?
या द्रविडी देवतेने संशोधक, इतिहासकार आणि लोककथाकारांना कायम भुरळ घातली आहे.
मारिअम्मन ही तमिळ नाडूतली कदाचित सगळ्यात लाडकी देवता होती आणि आजही आहे. तिला रक्षक रुपात पाहिलं गेलं आहे. तिच्याबद्दलच्या कहाण्यांना अंत नाही, आणि त्या कहाण्या कुठून आल्या त्या उगमांनाही.
काही इतिहासकारांच्या मते ती नागपट्टिणम इथली एक बौद्ध भिख्खुणी होती. आजारी लोक, खास करून देवीची बाधा झालेले लोक तिच्याकडे उपचारांसाठी यायचे. बुद्धावर श्रद्धा ठेवण्याचा सल्ला ती आलेल्यांना देत असे आणि कडुनिंबाचा लेप लावून आणि प्रार्थना म्हणून त्यांच्यावर उपचार करत असे. स्वतःची नीट काळजी घेण्याचा, स्वच्छता राखण्याचा आणि दानधर्म करण्याचा सल्लाही ती देत असे. तिला निर्वाण प्राप्त झाल्यानंतर लोकांनी तिचा पुतळा उभारला आणि तिथूनच मारिअम्मनची गोष्ट सुरू झाली असा एक समज आहे.
पण या गोष्टीची इतरही अनेक रुपं आहेत. एक समज असा की जेव्हा पोर्तुगीज नागपट्टिणमला आले तेव्हा त्यांनी तिचं नाव मरयम्मन असं केलं आणि ती एक ख्रिस्ती देवता असल्याचा दावा केला.
आणि इतर काहींचं असं मत आहे की उत्तरेकडे देवी आणि इतर संसर्गजन्य आजारांसाठी ज्या शितळामातेची पूजा केली जाते तिचंच दक्षिणी रुप म्हणजे मारिअम्मन. शितळा (जिचा संस्कृत आणि इतर भारतीय भाषांमध्ये शब्दशः अर्थ आहे, ‘थंडावा देणारी’) ही शंकराची पत्नी पार्वतीचा अवतार मानली जाते.
मात्र, गेल्या काही दशकांमध्ये झालेलं संशोधन असं सांगतं की ही ग्रामीण लोकांची देवता आहे जिची पूजा जास्तकरून दलित आणि इतर खालच्या मानल्या गेलेल्या जाती करतात. आणि ही खरं तर दलित मूळ असलेली देवता आहे.
आणि नेहमीप्रमाणे, मारिअम्मनचा प्रभाव आणि शक्ती पाहून कालांतराने वरच्या मानल्या गेलेल्या जातींनी तिला आपल्यात सामावून घेतलं आणि तिला वेगळं रुप देण्याचा प्रयत्न केला.
इतिहासकार आणि लेखक, के. आर. हनुमंतन यांनी १९८० साली आपल्या ' द मरिअम्मन कल्ट ऑफ तमिळ नाडू ' (तमिळ नाडूतील मरिअम्मन पंथ) निबंधात म्हटलं होतं, मारिअम्मन ही अतिशय पुरातन द्रविडी देवता आहे आणि तमिळ नाडूचे आदिम रहिवासी तिची पूजा करत असत... या देवतेचा आणि पूर्वी अस्पृश्य मानल्या गेलेल्या आणि तमिळ नाडूमधील द्रविडी लोकांचे आद्य प्रतिनिधी असलेल्या पराया [परैयार, अनुसूचित जात] समाजाचा जो सहसंबंध आहे त्यातून हे सिद्ध होतं.”
हनुमंतन लिहितात की या देवीच्या अनेक देवळांमध्ये परैयार लोक “फार पूर्वीपासून पुजारी होते. उदाहरणार्थ, चेन्नईजवळच्या तिरुवेरकडूमधलं कारुमारिअम्मन देऊळ. इथले मूळचे पुजारी परैयार होते. पण धार्मिक अधिकार कायदा, [१८६३] अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्या जागी ब्राह्मण पुजारी नेमण्यात आले.” वंचित समाजांच्या देवळांवर ताबा मिळवण्याचं काम वरच्या जाती करतच होत्या. त्याला यामुळे कायद्याचा आधार मिळाला. स्वातंत्र्यानंतर तमिळ नाडूसारख्या राज्यांनी हा अन्याय दूर करण्यासाठी स्वतःचे वेगळे कायदे आणले.
*****
आणि आता काय तर ‘करोना देवी’ मंदीर? खरं सांगताय की काय?
हं. खरंय, कोइम्बतोरच्या इरुगुर या उपनगरात असलेल्या या मंदिराचे व्यवस्थापक असलेले आनंद भारती सांगतात. “प्लेग मारिअम्मनची आराधना केली जाते, त्याच धर्तीवर हे मंदीर उभं आहे,” ते म्हणतात. “आम्ही ज्या वेळी [आहे त्या देवळात] करोना देवीची मूर्ती ठेवण्याचं ठरवलं तेव्हा साथ खूपच जोरात होती. इतकी की आम्हाला वाटू लागलं होतं की आता केवळ देवाचा धावा केला तरच आपण वाचू शकू.”
आणि मग कोविड-१९ ची साथ आली तेव्हा देशभरातल्या कोइम्बतोरसारख्या फार मोजक्या ठिकाणी या आजारावर उपाय म्हणून देवळं, प्रार्थनास्थळं उभी राहिली.
पण देवी का? कोरोना मारिअम्मन का नाही? आम्ही विचारलं. भारती यांच्या मते हे दोन शब्द एकमेकांशी सुसंगत नाहीत. “मारिअम्मन हा शब्द प्लेगबरोबर योग्य वाटतो, पण कोरोनासोबत नाही. म्हणून आम्ही या देवतेला देवी म्हणायचं ठरवलं.”
तमिळ नाडूच्या जवळ जवळ प्रत्येक गावात मारिअम्मनचं देऊळ आहे. काही भागात तिचं नाव कदाचित वेगळं असू शकेल, पण तिची देवळं मात्र आहेत
वैद्यकीय क्षेत्रात कितीही प्रगती होवो, आजारपण आलं की देवाचं करणं आणि त्यासंबंधीच्या प्रथा परंपरा आजही लोकव्यवहाराचा भाग आहेत.
पण प्लेग मारिअम्मनच्या देवळांमध्ये जसा लोकांना प्रवेश होता तसा करोना देवीच्या मंदिरात नाही. याला कारण म्हणजे लॉकडाउन. त्यामुळे एका जीवघेण्या विषाणूबद्दलच्या या देवळात फक्त देवीच नाही महासाथीचे सगळे यमनियमही दैवी होतात. देवळाच्या व्यवस्थापनाचा असा दावा आहे की त्यांनी ४८ दिवस एक यज्ञ केला आणि त्यानंतर करोना देवीची मातीची मूर्ती नदीमध्ये विसर्जित करून टाकली. आता हे देऊळ लोकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. मात्र इथे आराध्य देवतेची मूर्तीच नसल्याने आलेल्या भाविकांसाठी ते थोडं विचित्र आहे.
प्लेग मारिअम्मनची देवळं ज्या प्रकारे कोइम्बतोरच्या लोकस्वभावाचा अतूट हिस्सा आहेत त्या पद्धतीने करोना देवी मंदिराचा विचारच करता येणं शक्य नाही असं एलंगोवन यांच्यासारखे लेखक म्हणतात. “प्रसिद्धीसाठीची खटपट याहून जास्त काही नाही. प्लेग मारिअम्मनच्या देवळांशी यांचा सुतराम संबंध नाही, त्यामुळे तुम्ही या दोन्हींची तुलनाच करू शकत नाही. प्लेग मारिअम्मन देवळं कोइम्बतोरच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य हिस्सा आहेत.”
या शहराच्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्लेग मारिअम्मन देवळांमध्ये आजही भरपूर गर्दी असते. प्लेग मात्र या शहराच्या गतस्मृतीची दुखरी नस इतकाच काय तो उरला आहे. २०१९ साली कोविड-१९ ची सुरुवात होण्याच्या काहीच दिवस आधी पाप्पनाइकनपालयममधलं प्लेग मारिअम्मन देऊळ एकदमच चर्चेत आलं. इथल्या उत्सवादरम्यान मारिअम्मनच्या डोक्यावर एक पोपट बसला आणि भाविकांमध्ये एकच खळबळ माजली.
स्थानिकांच्या सांगण्यानुसार हा प्रकार काही तास सुरू होता. आणि त्यामुळे देवळात भाविकांची गर्दी आणखीच वाढली. “मारिअम्मन ही ग्रामदेवता आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातलं या देवळांचं स्थान कधीही कमी होणार नाही,” एलंगोवन म्हणतात. “आता हेच पहा, टाउन हॉलमधल्या कोनियम्मन मंदिरातल्या उत्सवासाठीचा होम त्याच परिसरातल्या प्लेग मारियम्मन देवळात केला जातो. त्यांचे विधी एकमेकींशी संबंधित आहेत. कोनियम्मन कोइम्बतोरची रक्षणकर्ती देवता मानली जाते.”
आजच्या पिढीला मात्र इतिहासातले हे बारकावे आणि त्यांच्याशी संबंधित मिथकं माहित असतीलच असं नाही. त्यांच्यासाठी आजही ही देवळं महत्त्वाची आहेत. “खरंच या देवळाचा असा काही इतिहास असेल याची मला बिलकुल कल्पना नव्हती,” कोइम्बतोरमध्ये व्यवसाय करणारा २८ वर्षीय आर. नारायण सांगतो. “पण मी या देवळात नेमाने येतो, माझ्या आईबरोबर येतो. आणि मी इथे येत राहीन. माहिती असो, नसो तसा काही फरक पडत नाही. झालंच तर मला या स्थानाबद्दल जास्तच आश्चर्य वाटत राहील, इतकंच.”
कविता मुरलीधरन सार्वजनिक आरोग्य आणि नागरी स्वातंत्र्यावर वार्तांकन करतात ज्यासाठी त्यांना ठाकूर फॅमिली फौंडेशनकडून स्वतंत्र आर्थिक सहाय्य मिळाले आहे. ठाकूर फॅमिली फौंडेशनचे या वार्तांकनातील मजकूर किंवा संपादनावर नियंत्रण नाही.