पुतुल दलोईचा नवरा, चंदन मरण पावला त्याला आता सहा महिने झालेत. नवी दिल्लीच्या वसंत कुंजमधल्या बंगाली मोहल्ल्यातल्या तिच्या घराकडे जाणारी गायी-म्हशींसह नुसती गर्दीची होती. दुधाच्या धंद्याचं हे केंद्रस्थान, त्यामुळे शेणाचा वास हवेत सगळीकडे भरून राहिलाय. या मोहल्ल्यात राहणारे बहुतेक सगळे बंगालहून स्थलांतरित झालेले आहेत.

२६ वर्षांच्या पुतुलच्या घरी भिंतीवर दुर्गेची कालीच्या अवतारातली तसबीर लावलेली आहे. तिच्या शेजारीच तिच्या नवऱ्याचा एक जुना फोटो. आणि त्याचा इतक्यातला एक फोटो, टेबलावर ठेवला आहे, समोर उदबत्ती पेटवलीये.

PHOTO • Bhasha Singh

पुतुल दलोई नवी दिल्लीतल्या बंगाली मोहल्ल्यात (डावीकडे) राहते, तिचा नवरा काम करायचा त्या मॉलपासून जवळच

चंदन दलोई, वय ३०, सात वर्षांपासून वसंत स्क्वेअर मॉलमध्ये काम करत होता. वर्ल्ड क्लास सर्विसेस प्रायवेट लिमिटेड या कंपनीतर्फे सफाईच्या कामासाठी पुरवण्यात आलेल्या हाउसकीपिंग चमूत तो होता. ११ नोव्हेंबर २०१६ रोजी चंदन आणि आणखी एका कामगाराला मॉलच्या आवारातला सेप्टिक टँक साफ करायला सांगण्यात आलं. चंदन टाकीत खाली उतरला – कुठल्याही संरक्षक अवजारांशिवाय – आणि विषारी वायूंमुळे गुदमरून पडला. त्याच्या साथीदाराने, इझ्राइले त्याला मदत करण्यासाठी आत उडी टाकली पण तोही पडला. नंतर आलेल्या बातम्यांमध्ये असं म्हटलंय की एका बीट हवालदाराने दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढलं आणि दवाखान्यात दाखल केलं. चंदनला आणलं तेव्हाच मृत घोषित करण्यात आलं. इझ्राइल बचावला.

“मला ही बातमी समजली तेव्हा मी पळत मॉल गाठला,” पुतुल सांगते. “पण मला आत येऊच दिलं नाही. त्यांनी सांगितलं की चंदनला फोर्टिस रुग्णालयात पाठवलंय. बंगाली मोहल्ल्यातले शेकडो लोक रुग्णालयापाशी जमा झाले पण आम्हाला त्यांनी हाकलून लावलं. तो नवरा आहे माझा, मला त्याला पहायचंय म्हणून मी त्यांच्या मिनतवाऱ्या केल्या. माझ्या मुलालाही त्यांनी आत घेतलं नाही. आम्ही गुन्हेगार असल्यासारखं त्यांनी आम्हाला हाकलून लावलं तिथनं.”

व्हिडिओ पाहा: 'माझं जे हिरावलं ते हिरावलं, ते तर गेले...'

“त्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये मी त्याला पाहू शकले नाही ही वेदना आजही माझ्या मनात घर करून बसलीये,” बोलता बोलता पुतुलचे डोळे भरून आले. “माझ्या नवऱ्याला त्यांनी बेकायदेशीर काम करायला लावलं होतं,” ती सांगते. जेव्हा तिला समजलं की त्याला वेळोवेळी सेप्टिक टँक साफ करायला लावतात, पुतुलने त्याला ती नोकरी सोडून द्यायला सांगितलं होतं. चंदननी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. टाक्या साफ करायला नकार दिला तर त्याची नोकरी जाईल असं त्याला वाटत होतं आणि दुसरी नोकरी मिळणं सोपं नाही याची त्याला कल्पना होती.

“त्याला असलं काम करायला लावणारे पकडले गेलेच पाहिजेत. सगळ्यांना माहितीये की त्या टाक्यांमध्ये जीवघेणा वायू तयार झालेला असतो, तरी माझ्या नवऱ्याला आत जायला सांगितलं. का? आमच्याच जातीच्या लोकांना गटारी आणि चेंबर साफ करायची कामं का दिली जातात? भारताच्या “विकासा”च्या एवढ्या गप्पा झोडता मग मॉलच्या गटारांमधला मैला अजूनही माणसं कशी काय साफ करतायत? या गटारांमध्ये अजूनही माणसांचे जीव जातायत, ते का? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत.”

PHOTO • Bhasha Singh

‘सगळ्यांना माहितीये की त्या टाक्यांमध्ये जीवघेणा वायू तयार झालेला असतो, तरी माझ्या नवऱ्याला आत जायला सांगितलं,’ आपला नवरा, चंदन दलोई (उजवीकडे) कसा वारला हे सांगताना पुतुल

दुर्दैव या गोष्टीचं की न्यायाची ही लढाई एकट्या पुतुलची नाहीये. ती दबावाला बळी पडलेली नाहीये. पुतुल जिच्या घरी घरकाम करत होती त्या माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकेने तिला पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी मदत केली. सामाजिक संस्था आणि मोहल्ल्यात राहणारी एक नातेवाइक जिच्याकडे काम करते त्यांनीही तिला पाठिंबा दिला.

“शवविच्छेदनाच्या अहवालातून सत्य बाहेर पडलं – मृत्यूचं कारण होतं विषारी वायूंमुळे गुदमरून मृत्यू,” पुतुलची नातेवाइक, दिपाली दलोई पुष्टी देते. “कंपनीने अहवालाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याचं भासवण्यात आलं. पण खरं काय ते सगळ्यांनाच माहितीये. जेव्हा कोठीच्या साहेबांनी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तेव्हा त्यांनी अहवाल दुरुस्त केला.” या यंत्रणेला आमची काहीही कदर नाही, दिपाली सांगते. “दिल्लीत जर ही हालत असेल, तर दूरवरच्या खेड्यापाड्यात काय परिस्थिती असेल, तुम्ही विचार तरी करू शकता का?”

एक महिना पाठपुरावा केल्यानंतर चंदनला कामावर ठेवणाऱ्या कंपनीने पुतुलला दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली (२७ मार्च २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की १९९३ नंतर गटारं आणि सेप्टिक टँक साफ करताना मरण पावलेल्या सर्वांना रु. १० लाख नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत) आणि तिला नोकरी देण्याचंही आश्वासन दिलं.

खेदाची बाब ही की त्यांनी तिला तेच हाउसकीपिंगचं काम देऊ केलं ज्याने तिच्या नवऱ्याचा बळी घेतला होता.

“शेवटी काय,” पुतुल कडवटपणे म्हणते, “जातीचाच खेळ आहे. माझा नवरा काही मला परत मिळणार नाहीये. पण दुसऱ्या कुणालाच हे दिव्य पार करावं लागू नये अशी माझी इच्छा आहे. कुणाचंच आयुष्य असं गटारात संपू नये.

पुतुल आणि चंदन बगाडी या अनुसूचित जातीचे आहेत. पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातल्या सुंदरबनमधल्या कांदिकपूर गावाहून ते दिल्लीला आले. गावात काही कामच नव्हतं.  मॉलमध्ये चंदनला रु. ९,८०० पगार होता आणि ते ३,५०० रुपये खोलीचं भाडं भरत होते.

आता अगदी निराश झालेल्या आणि जवळपासच्या बंगल्यांमध्ये स्वयंपाकाचं काम परत मिळणार नाही याची जाणीव असणाऱ्या पुतुलला सुंदरबनला परतणंही शक्य नाहीये. परत जाणार तरी कशासाठी? त्यांच्या २-२.५ बिघा रानाच्या भरोशावर तिची सासू, दीर आणि त्याचं कुटुंब कसं बसं तग धरून होते.

तिला अगदी मनापासून तिटकारा वाटत असला तरी पुतुल हे जाणून आहे की अखेर तिला सफाईचं काम स्वीकारावं लागणार आहे. “आता दुसरा काही पर्याय नाही. ही नोकरी घेतली तर मी माझ्या मुलाला चांगल्या पद्धतीने मोठं करू शकेन असं सगळे जण सांगतायत.”

अमित, पुतुलचा नऊ वर्षांचा मुलगा शाळेतून स्ट्रॉबेरी आइस्क्रीम घेऊन घरी आला. तो वसंत पब्लिक स्कूलमध्ये अपर केजीला आहे. त्याचे बाबा त्याला मॉलमध्ये पिझ्झा आणि बर्गर खायला घेऊन जायचे ते त्याला आठवतंय. आणि मग, नोव्हेंबर महिन्यातल्या त्या दिवशी अचानक त्याच्या बाबांना घरी आणलेलं त्यामे पाहिलं होतं, डोक्यापासून ते बेंबीपर्यंत संपूर्ण टाके घातलेले होते.

PHOTO • Bhasha Singh

त्यांचा मुलगा, अमित, वय ९ आपल्या वडलांच्या फोटोसहः ‘मी इंजिनियर होऊन असं तंत्रज्ञान तयार करणारे की माणसांना गटारं साफ करावी लागणार नाहीत’

“त्यांनी बाबांना त्या गलिच्छ गटारात जायला लावलं आणि मग ते गेले,” अमित संतापून म्हणतो. “संरक्षक पट्टा त्यांनी नंतर अडकवलाय, लोकांना फसवण्यासाठी. आधीच बेल्ट घातलेला असता, तर पापा गटारात उतरले, तेव्हा तो घाण झाला नसता का. तो बेल्ट एकदम चकाचक होता.”

जातीच्या आधारावर होणारा भेदभाव अमितला फार झटकन कळालाय. “माझ्या शाळेतल्या मित्रांना जेव्हा माझ्या वडलांच्या मृत्यूबद्दल कळालं तेव्हा त्यांनी मला विचारलं, की ते गटारात काय करत होते, असलं घाणेरडं काम कशाला करत होते ते? माझे बाबा असं काम करतात हेच मला माहित नव्हतं, त्यामुळे मग मी गप्प राहिलो.”

अमितने एक मोबाइल फोन घेतला आणि त्याच्यावरचे त्याच्या वडलांचे फोटो मला दाखवले. प्रत्येक फोटोची काही तरी कहाणी होती. “पापा गटारात उतरले तेव्हा त्यांनी त्यांचे कपडे काढून ठेवले होते आणि फोनही तिथेच ठेवला होता. ते गेल्यानंतर मी त्यांचा फोन घेतलाय,” तो सांगतो. “शाळेतून घरी आल्यावर रोज मी त्यांचे फोटो पाहतो आणि मग फोनवर थोडा वेळ खेळतो.”

व्हिडिओ पाहा:  'बाबांनी असं जायला नाही पाहिजे होतं'

अमित टुणकन उडी मारतो आणि भिंतीवर फ्रेम केलेला पावलाचा एक लाल ठसा दाखवतो. हा चंदनच्या पायाचा ठसा आहे, तो गेल्यानंतरचा. सणावाराला हातापायाला आलता लावतात त्याचा लाल रंग आहे हा. या समाजातल्या लोकांची श्रद्धा आहे की हा पावलांचा ठसा असला की मग आत्मा कधीच आपल्याला सोडून जाणार नाही. अमित म्हणतो, “बघा, माझे बाबा इथेच आहेत.”

पुतुल सांगते की त्यांचे ५०-६० नातेवाइक दिल्लीत राहतात. अख्खीच्या अख्खी गावंच शहरात आलीयेत असं दिसतं. बहुतेक सगळे काही ना काही सफाईच्याच कामात आहेत, तेही कंत्राटी कामगार म्हणून. त्यांनी गाव सोडलं पण त्यांच्या आयुष्याला आणि उपजीविकांना मर्यादा घालणारी जातीची ओळख मात्र त्यांना पुसता आलेली नाही. “हाउसकीपिंग” – फक्त नाव बदललंय, त्यांची कामाची स्थिती काही बदललेली नाही. पुतुलचे वडील, प्रदीप दिल्लीच्या चित्तरंजन पार्कमध्ये झाडलोट आणि सफाईचं काम करतायत. चंदनचा थोरला भाऊ, निर्मल आणि बहीण सुमित्रा त्याच्या अगोदर दिल्लीला आले होते. त्यांच्या समाजाच्या पुरुषांना शक्यतो हाउसकीपिंग आणि बागकाम मिळतं आणि बाया घरकामाला लागतात.

दीपक, चंदनचे मामा त्याच्याच गावाहून, कांदिकपूरहून सुमारे २० वर्षांपूर्वी दिल्लीला आले. अनेक वर्षं कंत्राटी कामगार म्हणून झाडलोट आणि सफाईची कामं केल्यानंतर आता त्यांनी मटण आणि मच्छीचं दुकान थाटलंय. ­“हाताने मैला साफ करण्याचं काम सर्रास चालू आहे,” दीपक सांगतात. “हे थांबायलाच पाहिजे. कधी तरी असा मृत्यू झाला की त्याच्या बातम्या येतात. पण खरंच गंभीरपणे या मुद्द्याचा विचार करण्यासाठी आपल्याला एखादा जीव जायलाच पाहिजे का?”

PHOTO • Bhasha Singh

‘शेवटी काय जातीचाच खेळ आहे सारा , पुतुल कडवटपणे म्हणते . माझा नवरा काही मला परत मिळणार नाहीये . पण दुसऱ्या कुणालाच हे दिव्य पार करावं लागू नये अशी माझी इच्छा आहे’

आठवीपर्यंत बंगाली माध्यमातून शिक्षण घेतलेल्या पुतुलने दिल्लीतच राहून तिच्या मुलाला ‘मोठा माणूस’ करण्याचा निर्धार केला आहे. झाडलोट आणि सफाईच्या कामापासून ती त्याला दूर ठेवणारे. “जातीच्या या बेड्या तोडण्यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढेन,” ती ठामपणे सांगते.

अमित त्याच्या आईला बिलगतो आणि म्हणतो, “मी मोठेपणी इंजिनियर होऊन असं तंत्रज्ञान तयार करणार आहे की माणसांना गटारं साफ करण्याची गरजच पडणार नाही.”

ता.क. : या कुटुंबाला मी भेटले त्यानंतर काही काळातच पुतुल तिच्या नवऱ्याच्या जागी त्याच मॉलमध्ये लागली. तिला ती कल्पनाच सहन होत नव्हती पण स्वतःचा आणि आपल्या मुलाचा विचार करून तिला तसा निर्णय घ्यावा लागला.


अनुवादः मेधा काळे

Bhasha Singh

ভাষা সিং স্বাধীনভাবে কর্মরত সাংবাদিক এবং লেখক। তিনি ২০১৭ সালের পারি ফেলো। সাফাই কর্মের উপর তাঁর বই ‘অদৃশ্য ভারত’, (হিন্দি) ২০১২ সালে পেঙ্গুইন থেকে প্রকাশিত হয় (ইংরেজি, ‘আনসিন’, ২০১৪)। উত্তর ভারতে কৃষি সংকট, পারমাণবিক প্রকল্পগুলির পেছনের রাজনীতি তথা এই সংক্রান্ত বাস্তব অবস্থা, এবং দলিত, লিঙ্গ, ও সংখ্যা লঘু অধিকার ইত্যাদি তাঁর সাংবাদিকতার প্রধান প্রধান বিষয়।

Other stories by Bhasha Singh
Translator : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে