वेनमनी गावातल्या कीळवेनमनी वस्तीवर जुलमी जमीनदारांच्या विरोधात बऱ्याच काळापासून कामगार संघर्ष करत होते. १९६८ साली डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याच त्याचा कडेलोट झाला. तमिळ नाडूच्या नागपट्टिणम जिल्ह्यातल्या या गावातले दलित मजूर संपावर गेले होते. जास्त वेतन, शेतजमिनीची मालकी आणि सरंजामी अत्याचाराचा अंत या त्यांच्या मागण्या होत्या. जमीनदारांचा प्रतिसाद काय असावा? त्यांनी या वस्तीवरच्या ४४ दलित मजुरांना जिवंतपणी जाळून टाकलं. या धनदांडग्या जमीनदारांना दलितांमधली ही राजकीय चेतना सहन झाली नाही आणि त्यांनी आसपासच्या गावातल्या मजुरांना काम द्यायचं ठरवलंच पण जोरकसपणे संपाला उत्तर देण्याचाही निर्णय घेतला.
२५ डिसेंबरच्या रात्री या जमीनदारांनी वस्तीला वेढा
घातला आणि बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद करून टाकले. ४४ मजूर एका झोपडीत शिरले
होते, त्या झोपडीला बाहेरून कुलुप घालण्यात आलं आणि त्यानंतर तिला आग लावण्यात
आली. या सगळ्यांमध्ये निम्मे – ११ मुली आणि ११ मुलं – १६ वर्षांखालची होती. दोघांनी
सत्तरी पार केली होती. २९ स्त्रिया आणि १५ पुरुष होते. सगळे दलित आणि मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक.
१९७५ साली मद्रास उच्च न्यायालयाने या खुनाच्या सर्व २५
आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पण मैथिली सिवरामन यांनी या अत्याचाराच्या सखोल
नोंदी ठेवणं थांबवलं नाही. हे हत्याकांड तर त्यांनी उजेडात आणलंच पण त्या आड
दडलेले जात आणि वर्गाधारित दमनाचे मुद्देही त्यांच्या सखोल विश्लेषणाने पुढे आणले.
या आठवड्यात वयाच्या ८१ व्या वर्षी मैथिली सिवरामन कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी
पडल्या. ही कविता त्यांच्यासाठी...
चव्वेचाळीस वज्रमुठी
बिनछताची
घरं.
बिनभिंतीची
घरं.
जमीनदोस्त
केलेली
बेचिराख घरं.
४४ वज्रमुठी
चेरीमधल्या,
जशी काही क्रुद्ध आठवण,
किंवा इतिहासातल्या युद्धाची ललकारी,
गोठून गेलेले, पेटून उठलेले अश्रू
जणू,
२५ डिसेंबर १९६८ च्या काळरात्रीचे साक्षीदार.
हो, नाताळ काही साजरा झाला नाही त्या
वर्षी.
चव्वेचाळिसांची कहाणी ऐका तर
या रे या, सारे या.
बिनछताची
घरं.
बिनभिंतीची
घरं.
जमीनदोस्त
केलेली
बेचिराख घरं.
चार पायल्या भात.
नाही पुरेसा, ते म्हणतात,
भूमीहीन भुकेल्यांचा पोटाला कसा
पुरावा?
भूक अन्नाची, भूक जमिनीची.
भूक बीजाची आणि कंदाचीही.
पिळवटून गेलेलं शरीर स्वतःच्या
ताब्यात घेण्याची
भूक आपले कष्ट, आपला घाम आणि त्या
कष्टाच्या फळाची.
भूक शेजारपाजारच्या सवर्णांना,
त्यांच्या जमीनदारांना सत्य कळावं याची.
बिनछताची घरं.
बिनभिंतीची घरं.
जमीनदोस्त केलेली
बेचिराख घरं.
काहींच्या शरीरावर लाल बावटा
विळा आणि कोयता
आणि विचार डोक्यामध्ये.
सगळीच गरीब आणि सगळीच वेडी
कष्टकऱ्यांच्या पोटी जन्मलेली
दलित बाया आणि गडी.
म्हणाले, आम्ही सगळे संघटना बांधू,
कापणीच नको मालकाच्या शेताची.
आपली धून गाणाऱ्यांना कुठे होतं माहित
पीक कुणाचं होतं आणि कणगी कुणाची.
बिनछताची घरं.
बिनभिंतीची घरं.
जमीनदोस्त केलेली
बेचिराख घरं.
मालक कायमच चलाख,
हिशोबी आणि निष्ठुर.
आसपासच्या गावातनं आणले त्यांनी
मजूर.
“माफी मागा,” केली घोषणा.
“कशापायी?” केला कष्टकऱ्यांनी सवाल.
मग, जमिनदारांनी केलं त्यांना बंद-
भयभीत गडी, बाया आणि लेकरं
सगळे मिळून चव्वेचाळीस, एका झोपडीत
कुलुपबंद.
मारलं त्यांना, दिलं पेटवून.
बंदिस्त सारे
रात्रीच्या त्या किर्ऱ अंधारात
पेटले ज्वाळा होऊन.
२२ लेकरं, १८ बाया आणि ४ गडी
कीळवेनमनीच्या हत्याकांडात
दिलेले हे बळी.
आज उरलेत वर्तमानपत्रातल्या कात्रणांमध्ये
कादंबऱ्या आणि संशोधनाच्या मासिकांमध्ये.
बिनछताची घरं.
बिनभिंतीची घरं.
जमीनदोस्त केलेली
बेचिराख घरं.
*चेरीः पूर्वापारपासून तमिळ नाडूमध्ये गावांची विभागणी सवर्णांची वस्ती असलेले ऊर, दलित राहतात ते चेरी अशी करण्यात आलेली आहे.
* बिनछताची घरं/बिनभिंतीची घरं/जमीनदोस्त केलेली/बेचिराख घरं हे ध्रुवपद मैथिली सिवरामन यांनी १९६८च्या हत्याकांडावर लिहिलेल्या एका लेखाच्या सुरुवातीच्या ओळी आहेत. ‘कीळवेनमनीचे सभ्य मारेकरी (Gentlemen Killers of Kilvenmani )’ हा त्यांचा लेख इकनॉमिक अँड पोलिटिकल वीकली मध्ये प्रकाशित झाला, २६ मे, १९७३. व्हॉल्यूम ८, क्र. २३, पृष्ठ ९२६-९२८.
*या ओळी मैथिली सिवरामन यांच्या हॉण्टेड बाय फायरः एसेज ऑन कास्ट, क्लास, एक्सप्लॉइटेशन अँड इमॅन्सिपेशन, लेफ्टवर्ड बुक्स, २०१६ या पुस्तकातही समाविष्ट आहेत.
कवितेचा स्वरः
सुधन्वा देशपांडे जन नाट्य मंचातील अभिनेते व दिग्दर्शक आणि लेफ्टवर्ड बुक्सचे संपादक आहेत.
अनुवादः मेधा काळे