मंगळवार, २७ नोव्हेंबर, दुपारचे चार वाजून गेलेत, मध्य दिल्लीच्या राजीव चौक मेट्रो स्टेशनच्या बाहेर काही लोक जमलेत. रिक्षाचालक, विद्यार्थी, विक्रेते काही मध्यमवर्गीय व्यावसायिक आणि इतरही बरेच कोण कोण. रस्त्याच्या कडेला उभं राहून ते चर्चा करतायत शेतकऱ्यांच्या समस्यांची. २९-३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या किसान मुक्ती मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या नेशन फॉर फार्मर्स आणि आर्टिस्ट्स फॉर फार्मर्स या गटांचे सेवाभावी कार्यकर्ते कृषी संकटावर चर्चा करण्यासाठी संसदेचं २१ दिवसांचं संयुक्त सत्र बोलावण्यात यावं या मागणीला समर्थन देण्यासाठी फलक घेऊन उभे होते, पत्रकं वाटत होते. शेजारच्या सेंट्रल पार्कमध्ये उभे असलेले काही जण आले आणि त्यांनी काही प्रश्नं विचारायला सुरुवात केली – मोर्चाविषयी आणि शेतीवरच्या अरिष्टाविषयी. आणि मग गप्पा सुरू झाल्या. त्यातले काही जण काय म्हणत होतेः
अनुवाद - मेधा काळे