लडाखमधल्या त्सो मोरीरी सरोवराकडे जात असताना , बाजूच्या कुरणांमध्ये जागोजागी लोकरीचे तंबू नजरेस पडतात. - ही चांगपांची घरं.. ते चंगथांगी (पश्मिना) शेळ्या पाळतात. उत्तम दर्जाची अस्सल काश्मिरी लोकर पुरविणारे फार कमी लोक आहेत. त्यातले हे एक.
चांगपा ही प्रामुख्याने पशुपालन करणारी भटकी जमात आहे. अभ्यासकांच्या मते, ही जमात ८ व्या शतकात तिबेटमधून भारतातल्या चंगथांग प्रदेशात स्थलांतरित झाली. – चंगथांग हा हिमालयांमधला तिबेटी पठाराच्या पश्चिमेचा भूभाग. भारत-चीन सीमेजवळच्या या भागात परदेशी नागरिकांना प्रवेश नाही. आणि भारतीयांनादेखील प्रवेशासाठी लेहमधून विशेष परवानगी मिळवावी लागते.
ह्या चित्र निबंधात पूर्व लडाखमधील हॅन्ले दरीखोऱ्यातील चांगपांचं आयुष्य टिपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, या परिसरात त्यांची सुमारे ४०-५० घरं आहेत. .
हॅन्ले खोर्याचा प्रदेश विस्तीर्ण आणि खडतर आहे - येथे मोठा हिवाळा आणि अगदी कमी काळ उन्हाळा असतो. या प्रदेशातील माती कठिण, क्षारपड असल्यामुळे इथे फारसं काही उगवत नाही. त्यामुळे भटके चांगपा उन्हाळ्यात हिरव्या कुरणाच्या शोधात समुदायाच्या प्रमुखाने ठरवून दिलेली कुरणं सोडून दुसरीकडे जातात.
मी, २०१५च्या फेब्रुवारीमध्ये, हिवाळ्यात हॅन्ले खोऱ्यात गेलो होतो. बऱ्याच शोधानंतर, गावकऱ्यांच्या मदतीने, माझी ओळख चांगपा कार्मा रिचेन यांच्याशी झाली. हिवाळ्यात चांगपांचं काम स्थायी, एका ठिकाणीच असतं, म्हणून मी पुन्हा २०१६ च्या उन्हाळ्यात हॅन्लेला गेलो. त्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये, दोन दिवस वाट पाहिल्यानंतर, एकदाची कार्मा रिंचंनची भेट झाली. दुसऱ्या दिवशी, ते मला हॅन्ले गावापासून तीन तासाच्या अंतरावर बज त्यांचा समुदाय उन्हाळ्यात जनावरं चारण्यासाठी जिथे मुक्काम ठोकतो तिथे घेऊन गेले.
कार्माचं उन्हाळ्यातलं घर खरोखरच खूप उंचावर - ४,९४१ मीटरवर होतं. इथे कधी कधी उन्हाळ्यातही बर्फ पडतो. पुढचे सात दिवस मी कार्मा आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत राहिलो. अंदाजे ५० वर्षांचे कार्मा गोबा किंवा समुदायाचे वरिष्ठ, प्रमुख आहेत. चार चांगपा कुटुंबं त्यांचा आदेश पाळतात. गोबा समंजस, आध्यात्मिक आणि अनुभवी असणं आवश्यक असतं. कार्मांमध्ये हे सर्व गुण आहेत. "आम्हांला भटकं आयुष्य आवडतं कारण, ते स्वातंत्र्य बहाल करतं," ते काहीशा तिबेटी, काहीशा लडाखी, अशा सरमिसळ भाषेत म्हणाले.
चांगपा बौद्ध आहेत, आणि दलाई लामांचे अनुयायी आहेत. शेळ्यांव्यतिरिक्त, ते मेंढ्या आणि याकदेखील पाळतात. अनेकजण अजूनही जुनी वस्तुविनिमय पद्धत व्यवहारात वापरतात. आसपासच्या अनेक समुदायांबरोबर ते स्वतः तयार करत असलेल्या वस्तूंची देवाण घेवाण करतात.
पण काळ बदलतोय. इथे येत असताना, मी एका रस्त्याचं काम चालू असलेलं पाहिलं. या रस्त्यामुळे भारतीय सैन्य आणि इंडो-तिबेटन सीमेवरील पोलिसांसाठी दळणवळण सुकर होईल मात्र यामुळे इथल्या भूभागात बदल होणार हे निश्चित. कार्मा सांगतात, २०१६ हे वर्ष मुळीच चांगलं गेलं नाही,"...कारण लेहच्या सहकारी संस्थांनी अजूनपर्यंत लोकर नेलेली नाही. चीनची स्वस्त आणि कमी प्रतीची कश्मिरी लोकर बाजारात आली आहे त्यामुळेही असेल कदाचित..."